Sunday, March 12, 2023

श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या - भाग २

मागच्या अंकात आपण शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या ह्या सदरातील भाग १ वाचला. त्यामध्ये आपण भगवान शिवाच्या श्री रुद्र आणि श्री एकादश रुद्र ह्या रूपांबद्दल माहिती वाचली. आता ह्या अंकात आपण भगवान शिवाच्या पांच अवतार किंवा त्यांना एकत्र पंचशिव किंवा पंचब्रह्म असं पण म्हणतात त्याबद्दल माहिती करून घेऊया. 

ह्या सृष्टीमध्ये पांच कर्म ही कायमस्वरूपी म्हणजेच सनातन आहेत. त्यांना पंचकृत्य असं म्हणतात. ती कृत्ये म्हणजे - सृष्टीची निर्मिती (उप्तत्ती), सृष्टीचं पालनपोषण (स्थिती), सृष्टीचा संहार (लय). ही तीन प्रसिद्ध कर्म आहेत. ह्याशिवाय अजून दोन कर्मे आहेत ती म्हणजे - तिरोधान आणि अनुग्रह. ह्या प्रत्येक कर्माला एक अधिष्ठान देवता आहे. ह्या देवता म्हणजे शिव-शक्तींचीच रूपे आहेत. शिव आणि शक्ती हे एकत्रच वेगवेगळ्या रूपात ही पांच कर्मे करत असतात. ह्या भगवान शिवाच्या पांच रूपांना पंचब्रह्म किंवा पंचशिव किंवा पंचानन असं म्हणतात. भगवान शंकरांच्या मराठी आरतीमध्ये पंचानन हे नाव येतं.

पांच कर्मे दर्शविणाऱ्या भगवान शिवांच्या पांच रूपांची किंवा पांच मुखांची माहिती आम्ही इथे थोडक्यात देत आहोत. 


श्री सद्योजातमूर्ती:


भगवान शिवांचं हे रूप त्यांच्या सृष्टी निर्माण करणाऱ्या शक्तीचं रूप आहे. ह्या रूपाच्या मूर्तीमध्ये भगवान शिव ध्यानावस्थेत दाखवतात. हे पश्चिमाभिमुख रूप आहे. भगवान शिवांच्या ह्या रूपातून अजून काही रूपे निर्माण झाली ती अशी - श्री लिंगोद्भवर, श्री अर्धनारीश्वरर, श्री हरिहर, श्री सुखासन, श्री उमामहेश्वर


श्री वामदेवमूर्ती:


भगवान शिवांचं हे रूप त्यांच्या सृष्टीचं पालनपोषण करणाऱ्या शक्तीचं रूप आहे. हे त्यांचं उत्तराभिमुख रूप आहे. भगवान शिवांच्या ह्या रूपातून अजून काही रूपे निर्माण झाली ती अशी - श्री कंकाळ मूर्ती (ह्याला गंगाळ मूर्ती असं पण म्हणतात), श्री चक्रधर मूर्ती,  श्री चंडिकेश्वरर मूर्ती, श्री गजांतीक मूर्ती, श्री एकपाद मूर्ती


श्री अघोरमूर्ती:

 
भगवान शिवांचं हे रूप त्यांच्या सृष्टीचा संहार करणाऱ्या शक्तीचं रूप आहे. हे त्यांचं दक्षिणाभिमुख रूप आहे. भगवान शिवांच्या ह्या रूपातून अजून काही रूपे निर्माण झाली ती अशी - श्री गजसंहार मूर्ती, श्री वीरभद्र मूर्ती, श्री दक्षिणामूर्ती, श्री किराट मूर्ती, श्री नीलकंठ मूर्ती. 


श्री तत्पुरुषमूर्ती:

 
भगवान शिवांचं हे रूप त्यांच्या तिरोधान किंवा तिरोभाव शक्तीचं रूप आहे. संस्कृत मध्ये तिरो भवती म्हणजेच एखाद्यापासून एखादी गोष्ट किंवा माहिती गुप्त ठेवणे. जिवाच्या विकासासाठी जेवढं ज्ञान असणं आवश्यक आहे तेवढंच काही ज्ञान नसणं हे पण सहाय्यक ठरतं. सगळेच जीव आपल्या भूत भविष्याचं ज्ञान पचवू शकत नाहीत आणि म्हणून हे ज्ञान सगळ्यांना उपलब्ध नसतं. प्रत्येक जीवाला त्याच्या वर्तमान स्थितीला अयोग्य असणारं ज्ञान गुप्त ठेवण्याच्या ह्या भगवान शिवांच्या शक्तीला तिरोधान असं म्हणतात. भगवान शिवांचं हे रूप पूर्वाभिमुख आहे. त्यांच्या ह्या रूपातून अजून काही रूपे निर्माण झाली ती अशी - श्री भिक्षाटनर मूर्ती, श्री कामदहन मूर्ती, श्री कालसंहार मूर्ती (ह्या रूपामध्ये त्यांनी मार्कंडेयाचं मृत्त्यूपासून रक्षण केलं), श्री जालंधरसंहार मूर्ती, श्री त्रिपुरारी मूर्ती. 


श्री इशानमूर्ती:

 
भगवान शिवांचं हे रूप त्यांच्या अनुग्रह शक्तीचं रूप आहे. तिरोधानाच्या विरुद्ध अनुग्रह. तिरोधान शक्ती ज्ञान लपवते तर अनुग्रह शक्ती ज्ञान देते. जीव जसजसा विकास साधतो तसतसं जीवाची ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती वाढते. इथे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. जेव्हा एखादा जीव तपश्चर्येने म्हणा किंवा निरंतर भक्तीने आत्मज्ञानासाठी योग्य स्थिती प्राप्त करतो तेव्हा भगवान शिवांच्या अनुग्रह शक्तीमुळे त्या जीवास आत्मज्ञानाची प्राप्ती होते. भगवान शिवांचं हे रूप ऊर्ध्वमुख आहे. त्यांच्या ह्या रूपातून अजून काही रूपे निर्माण झाली ती अशी - श्री सोमस्कंदर मूर्ती, श्री नटराज मूर्ती, श्री वृषभारूढ मूर्ती, श्री चंद्रशेखर मूर्ती, श्री कल्याणसुंदर मूर्ती. 

 

पुढच्या अंकात आपण भगवान शिवांच्या श्री सोमस्कंदर रूपाबद्दल माहिती करून घेऊया. 

 

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
 
 

No comments:

Post a Comment