Sunday, February 26, 2023

श्री शिव मंदिरातल्या मुख्य मुर्त्या

मागच्या अंकात आपण मंदिरामध्ये दर्शन कसं घ्यायचं ह्याच्यावर विचार केला. आता ह्या अंकामध्ये आपण शिव मंदिरामध्ये मुख्य मुर्त्या कोणत्या असतात ते जाणून घेऊया.

मुलवर आणि देवी:
मंदिरातील सर्वात मुख्य देवतेला मुलवर असं म्हणतात. अर्थात शिव मंदिरामध्ये मुलवर म्हणजे शिवलिंग असतं आणि त्या बरोबर श्री पार्वती देवींची मूर्ती असते. साधारणतः ह्या शिव लिंगाला त्या त्या स्थळपुराणानुसार नाव प्राप्त होतं. उदाहरणार्थ श्री वैथिश्वरन कोविल जे मंगळ ग्रहाचं स्थान म्हणून प्रसिद्ध आहे तेथल्या स्थळ पुराणानुसार श्री मुरुगन आणि राक्षस सुरपद्मन ह्यांच्यात झालेल्या युद्धात जे देव जखमी झाले त्यांची शुश्रूषा भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्या दोघांनी वैद्याची भूमिका निभावून केली. श्री शंकरांनी वैद्याची भूमिका निभावली तर श्री पार्वतीदेवींनी रुग्णांना तेल लावण्याचं काम केलं. म्हणून येथील शिव लिंगाला श्री वैद्यनाथ (श्री वैदिश्वरन किंवा श्री वैथिश्वरन) असं नाव आहे तर श्री पार्वती देवींचं श्री तैलनायकी असं नाव आहे. 

कुठल्याही मंदिरात भगवान शिवांची मूर्ती कधी नसते. भगवान शिवांची पूजा ही नेहमी शिवलिंगाची पूजा करूनच केली जाते. भगवान शिवांच्या इतर रूपांच्या मुर्त्या असतात आणि त्यांची पूजा केली जाते. ह्या मुर्त्यांची माहिती आपण पुढल्या अंकात वाचू. 

श्री गणेश आणि श्री मुरुगन:
पुराणांनुसार भगवान शिव, श्री पार्वती देवी आणि त्यांचे दोन पुत्र श्री गणपती आणि श्री मुरुगन असा शिव परिवार आहे. त्यामुळे प्रत्येक शिव मंदिरांमध्ये ह्या सर्वांच्या मुर्त्या असतातच. शिव मंदिरामध्ये ठिकठिकाणी आपल्याला श्री गणपती आणि श्री मुरुगन ह्यांच्या वेगवेगळ्या रूपाच्या मुर्त्या बघायला मिळतात. पण मुख्यत्वेकरून मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपल्याला ह्यांच्या मुर्त्या बघायला मिळतात.

साधारणतः श्री गणपतीच्या विविध मुर्त्या असतात त्यांची नावे अशी 

श्री सेल्व गणपती:
श्री गणपतींची ही मूर्ती त्यांच्या दोन पत्नी रिद्धी आणि सिद्धी ह्यांच्याबरोबर असते म्हणून त्या मूर्तीला सेल्व गणपती असं नाव आहे. 

श्री कर्पग गणपती: 
तामिळमध्ये कल्पतरूला कर्पग असं नाव आहे. भक्तांनी केलेल्या इच्छांची जो पूर्ती करतो त्याला कर्पग गणपती म्हणतात. आपल्या भक्तांना हा गणपती सर्व प्रकारचे ऐश्वर्य देतो.   

श्री वरद गणपती:
वर देणारा गणपती म्हणून ह्या गणपतीला श्री वरद गणपती असं म्हणतात.  

श्री नर्दन  गणपती:
नृत्य (नर्दन) करणारा गणपती म्हणून ह्या मूर्तीला श्री नर्दन गणपती असं नाव आहे. 

श्री बाल गणपती: 
गणपतीच्या बाल स्वरूपातली ही मूर्ती आहे म्हणून ह्याला श्री बाल गणपती म्हणतात. 

श्री कन्यामुल गणपती:
तामिळ मध्ये कोपऱ्याला मूल असं म्हणतात आणि नैऋत्य दिशेला कन्या म्हणतात. म्हणजेच नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यात ज्याची मूर्ती असते म्हणून त्याला कन्यामूल गणपती म्हणतात. 

साधारणतः श्री मुरुगन ह्यांच्या पण विविध मुर्त्या असतात त्यांची नावे अशी 

श्री मुरुगन: 
ज्यांचं मुख एवढं सुंदर आहे कि त्या मुखाकडे बघितल्यावर राग द्वेष सगळे विरघळून जातात म्हणून त्यांना मुरुगन म्हणतात.

श्री कार्तिकेय:
बाल स्वरूपामध्ये असताना श्री मुरुगन ह्यांना सहा कृत्तिका कन्यांनी वाढवलं म्हणून त्यांना श्री कार्तिकेय असं नाव प्राप्त झालं.

श्री षण्मुख: 
श्री कार्तिकेयांना सहा कृत्तिका कन्यकांनी वाढवले त्यामुळे त्यांना सहा मुखं होती. देवी पार्वतीने हि सगळी मुखं एकत्र केली. सहा मुखं असल्यामुळे त्यांना षण्मुख असं नाव प्राप्त झालं. ह्या रूपामध्ये त्यांच्याबरोबर त्यांच्या दोन पत्न्या श्री वल्ली आणि श्री दैवनै पण असतात. ह्या रूपामध्ये ते मोरावर आरूढ असतात, त्यांच्या झेंड्यावर कोंबडा असतो आणि पायाजवळ नाग असतो आणि सुरपद्म असुराला मारत आहेत असं रूप असतं.

श्री मुरुगन ह्यांना श्री दंडपाणी असं पण नाव आहे. दंडपाणी म्हणजे ज्यांनी हातामध्ये दंड धारण केला आहे.

श्री बालसुब्रमण्यम:
श्री मुरुगन ह्यांचे बाल स्वरूप

श्री बाल मुरुगन: 
श्री मुरुगन ह्यांचे बाल स्वरूप

श्री कुमारस्वामी: 
कुमार वयात असताना श्री मुरुगन ह्यांनी आपल्या पित्याला म्हणजेच भगवान शिवांना प्रणव मंत्राचा उपदेश केला म्हणून त्यांना कुमारस्वामी असं म्हणतात.
श्री वेलन् किंवा श्री वेलमुरूगन 
म्हणजे हातात भाला घेतलेले (भाल्याला वेल असं पण म्हणतात)

श्री सिंगारवेलन्: 
श्री मुरुगन ह्यांची भाला म्हणजेच वेल धारण केलेली सुंदर मूर्ती

श्री सुब्रमण्यम:
ह्या मूर्तीमध्ये श्री मुरुगन ह्यांच्या बरोबर त्यांच्या दोन पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै असतात 

श्री स्कंदर: 
ह्या मूर्तीमध्येपण श्री मुरुगन ह्यांच्या बरोबर त्यांच्या पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै असतात

 

No comments:

Post a Comment