Sunday, February 19, 2023

श्री शिव मंदिरामधे दर्शन घेण्याची पद्धत

मागच्या अंकात आपण श्री शिव मंदिरातील मुख्य विभागांची माहिती जाणून घेतली. आता आपण शिव मंदिरांमध्ये दर्शन घेण्याची काही विशिष्ट क्रमबद्ध पद्धत आहे ती जाणून घेऊया. नेहमीच्या व्यवहारात सुद्धा आपल्याला एखादी गोष्ट साधायची असेल तर परिणामकारक क्रमच कामाला येतो. आणि हा नियम देवकृपा मिळविण्यासाठी पण लागू पडतो. म्हणूनच शास्त्रांनी देवांची पूर्ण कृपा मिळविण्यासाठी एक विशिष्ट दर्शन पद्धत आपल्याला दिली आहे. 

मंदिरात आपल्याबरोबर बाकीचेच अनेक दर्शनार्थी पण असतात ह्याची जाणीव ठेवून दर्शन घेतेवेळी किंवा प्रदक्षिणा घालताना अत्यंत हळुवार बोलावं आणि चालावं जेणेकरून कोणाला व्यत्यय येणार नाही. परमाचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती ह्यांसारख्या थोर आचार्यांच्या उपन्यासांमध्येपण अशा सूचनांचा उल्लेख आढळतो.

आता आपण दर्शन पद्धत जाणून घेऊया.

  1. सर्वप्रथम मंदिरात दर्शन घेण्यास जाण्याआधी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. पुरुषांनी शक्यतो पंचकच्च म्हणजेच धोतर आणि अंगवस्त्र परिधान करणं उत्तम. स्त्रियांनी शक्यतो साडी परिधान करणं उत्तम. देवांना आणि आपल्या संस्कृतीला आदर देणे हा ह्यामागचा उद्देश आहे. 

  2. आपल्या कपाळावर विभूती किंवा कुंकू किंवा गंध परिधान करावं. धर्मशास्त्रानुसार सर्वकाळी, आणि मुख्यतः देवाचं दर्शन घेताना, कपाळ मोकळं ठेऊ नये असं म्हणतात. ह्याशिवाय आपल्या गुरूंनी दिलेल्या उपदेशानुसार किंवा आपल्या कुळपरंपरेनुसार रुद्राक्ष किंवा स्फटिकाची माळ परिधान करावी.  

  3. आपल्या क्षमतेनुसार देवांना अर्पण करण्यासाठी नारळ, विड्याची पाने, सुपाऱ्या, फळं, फुलं, फुलांचे हार घ्यावेत. 

  4. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी गोपुराचं (किंवा राजगोपुर) दर्शन घ्यावं. आणि मग परिक्रमेकडे जावं. 

  5. पहिल्या परिक्रमेमध्ये ध्वजस्तंभ असतो. तिथे नमस्कार करावा. 

  6. त्यानंतर बलिपीठाला नमस्कार करून तिथे आपण आणलेल्या गोष्टींपैकी काही अर्पण करावं. 

  7. मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वीपासून ते बाहेर पडेपर्यंत आपण अति हळुवार आवाजामध्ये बोलणं आवश्यक आहे जेणेकरून मंदिरातील इतर दर्शनार्थी भक्तांना कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही. 

  8. त्यानंतर आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करतो जिथे अंतः परिक्रमा असते. मंदिरात प्रवेश करण्याच्या वेळी आपले दोन्ही हात डोक्याच्या वरती उभे करावेत. मंदिरात प्रवेश केल्यावर विविध देवांचं दर्शन पुढे दिलेल्या पद्धतीने करावं. 

    1. श्री गणपतींना १ किंवा ३ प्रदक्षिणा घालाव्यात 

    2. जर शक्य असेल तर शिव लिंगाला ५ किंवा ७ किंवा ९ किंवा १५ किंवा २१ प्रदक्षिणा घालाव्यात. 

    3. श्री विष्णूंना ४ प्रदक्षिणा घालाव्यात 

    4. सर्व देवींना ४ प्रदक्षिणा घालाव्यात 

    5. श्री सोमस्कंदर, श्री दक्षिणामूर्ती आणि श्री सुब्रमण्यम ह्यांना ३ प्रदक्षिणा घालाव्यात 

    6. श्री मारुतींना ११ किंवा १६ प्रदक्षिणा घालाव्यात 

    7. जिथे प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तिथे स्वतःभोवती ३ प्रदक्षिणा घालाव्यात


इथे एक विशष सूचना अशी आहे कि प्रदक्षिणा घालताना आपण अति हळुवार चालणं आवश्यक आहे. जणू काही आपण आपल्या डोक्यावर दुधाची कळशी घेऊन चालताना दूध सांडणार नाही ह्याची काळजी कशी घेऊ त्याच काळजीने प्रदक्षिणा घालताना पण चालावं. 

  1. त्यांनतर आरती* घेतल्यावर, आपण समजा अर्चना किंवा अभिषेकासाठी विनंती केली असेल तर त्याचा प्रसाद पुरोहितांकडून स्वीकारावा. पुरोहित किंवा आपण स्वतः पूजा, अर्चना किंवा अभिषेक करत असू तर आपलं पूर्ण लक्ष हे मूर्तीवर आहे ह्याची काळजी घ्यावी.  

  2. शिव लिंगाचं दर्शन घेण्याआधी श्री नंदीदेवांचं दर्शन घेणे आवश्यक आहे. 

  3. जर मंदिरात श्री चंडिकेश्वरर ह्यांची मूर्ती असेल तर मंदिरातून बाहेर जाण्याआधी त्यांचं दर्शन घेऊन त्यांच्यासमोर जाऊन टाळी वाजवावी (किंवा टाळी सारखे दोन्ही हात झटकावेत). श्री चंडिकेश्वरर हे शिव मंदिराचे खजिनदार आहेत त्यामुळे असं करून आपण त्यांना सांगतो कि आम्ही ह्या मंदिरातून प्रसादाशिवाय काहीही घेऊन जात नाही. 

  4. मंदिरातील सर्व देवांचं दर्शन घेऊन झालं की मंदिराच्या आवारात थोडा काळ (कमीत कमी १ ते २ मिनिटे) बसून आपल्या स्मरणात असणारा एखादा श्लोक किंवा स्तोत्र हे मनातल्या मनात म्हणावं.  

  5. सर्वात शेवटी मंदिराच्या बाहेर जाताना ध्वजस्तंभाला नमस्कार करून मग बाहेर पडावं. जर मंदिराची दिशा पूर्व-पश्चिम अशी असेल तर उत्तरेकडे मुख करून नमस्कार करावा, आणि जर मंदिराची दिशा उत्तर-दक्षिण असेल तर पूर्वेकडे मुख करून नमस्कार करावा. स्त्रियांनी आपले हात, गुढगे आणि डोकं जमिनीला टेकवून नमस्कार करावा. पुरुषांनी साष्टांग नमस्कार घालायचा असतो. 


*ह्या मंदिरांमध्ये पूजा झाली कि पुरोहित आरती, म्हणजे निरंजन किंवा पंचारती, भक्तांसाठी उचलून धरतात जेणेकरून भक्त त्याला नमस्कार करू शकतात. 



अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy): ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment