Sunday, February 12, 2023

श्री शिव मंदिरातील मुख्य विभाग

शिव मंदिरांबद्दल माहितीस्वरूप मराठी भाषेतील लेखमालेतील मागच्या अंकामध्ये आपण मंदिरांचं दर्शन घेण्याचं महत्व काय ह्यावर विचार केला. आता ह्या अंकामध्ये आपण श्री शिव मंदिरातील मुख्य विभागांबद्दल माहिती करून घेऊया. 

राजगोपुर, गोपुर आणि विमान:
शिव मंदिरातील सर्वात पहिला विभाग म्हणजे अर्थातच प्रवेशद्वार. काही मंदिरांना चार प्रवेशद्वारं असतात तर काहींना दोन तर काहींना एक. पण ह्या सगळ्यांमध्ये जे मुख्य प्रवेशद्वार असतं त्याच्यावर असलेल्या शिखराला राजगोपुर असं म्हणतात. राजगोपुर हे साधारणतः तीन, पांच, सात किंवा अगदी तेरा स्तरांचे पण असतात. मुख्य प्रवेशद्वार सोडून बाकीच्या प्रवेशद्वारांवर असलेल्या शिखरांना गोपुर असं म्हणतात. ही गोपुरं पण तीन किंवा पांच स्तरांची असतात. राजगोपुर आणि गोपुर ह्यांच्या प्रत्येक स्तरावर विविध देवांच्या मुर्त्या असतात. प्रत्येक गोपुराच्या वरती अजून एक शिखर असतं आणि त्यावर एक किंवा तीन किंवा पांच किंवा सात कळस असतात. सहसा शिव मंदिरांच्या प्रवेशद्वारावर द्वारपालक किंवा श्री गणेश आणि श्री मुरुगन ह्यांच्या मुर्त्या असतात.

गाभाऱ्याच्या वरती जे शिखर असतं त्याला विमान म्हणतात.

ध्वजस्तंभ:
प्रवेशद्वारातून आत मध्ये गेलं कि दुसरा विभाग म्हणजे ध्वजस्तंभ. दक्षिण भारतातल्या मंदिरांमध्ये प्रत्यक्ष देवांच्या मूर्त्यांना नमस्कार करण्याचा अधिकार कोणाला नसतो. नमस्कार करण्यासाठी ध्वजस्तंभ असतो. जर मंदिराची दिशा पूर्व-पश्चिम अशी असेल तर ध्वजस्तंभाला उत्तरेकडे मुख करून नमस्कार करावा, आणि जर मंदिराची दिशा उत्तर-दक्षिण असेल तर पूर्वेकडे मुख करून नमस्कार करावा. स्त्रियांनी आपले हात, गुढगे आणि डोकं जमिनीला टेकवून नमस्कार करावा. पुरुषांनी साष्टांग नमस्कार घालायचा असतो.  काही मंदिरांमध्ये नमस्कार करण्याच्या जागा चिन्हांकित केलेल्या (आखलेल्या) दिसतात ज्यामुळे नमस्कार करण्याची जागा शोधणं सोपं होतं. 

ध्वजस्तंभाचं अजून एक महत्व म्हणजे कुठल्याही उत्सवाची सुरुवात ध्वजारोहण करून होते आणि उत्सवाच्या शेवटी ध्वजाचे अवरोहण केले जाते. 

सहसा ध्वजस्तंभाच्या खाली श्री गणेशांची मुर्ती दिसते. ह्या मूर्तीला श्री ध्वजस्तंभ गणेश असं म्हणतात.

बलीपीठ:
ध्वजस्तंभाच्या बाजूला सहसा बलीपीठ असतं. बलीपीठ म्हणजे जिथे बळी देतात ती जागा. पण इथे बळीचा अर्थ आहे आपल्या काम आणि क्रोधाचा बळी. म्हणजे मंदिरामध्ये मुख्य देवांचं दर्शन घेण्याआधी आपले चित्त शुद्ध करून मग दर्शन घ्यावं असा अर्थ आहे. म्हणून दर्शन घेण्याआधी बलीपीठाला नमस्कार करून त्याला काही अर्पण करावं. बलीपिठाला मीठ (कामाचं प्रतीक) आणि काळी मिरी (क्रोधाचं प्रतीक) हे अर्पण करण्याची प्रथा आहे.

परिक्रमा किंवा प्रकारं:
प्रदक्षिणा घालण्याच्या मार्गाला परिक्रमा किंवा प्रकार असं पण म्हणतात. प्रदक्षिणा घालताना आपल्याला कोष्ठ मूर्तींचं दर्शन होतं. शिवलिंगाच्या गाभाऱ्याच्या भिंतीवर बाहेरील बाजूवर ज्या मुर्त्या असतात त्यांना कोष्ठ मूर्ती म्हणतात. गाभाऱ्याच्या दक्षिणेला सहसा दक्षिणे कडे मुख असणारी श्री दक्षिणामूर्तींची मूर्ती असते. पाठच्या बाजूला श्री ब्रम्हा, श्री विष्णू आणि श्री लिंगोद्भवर ह्यांच्या मुर्त्या किंवा छोटी देवळं असतात. उजव्या बाजूच्या भिंतीवर श्री चंडिकेश्वर व श्री दुर्गा देवी ह्यांची छोटी देवळं असतात. ह्याशिवाय श्री अर्धनारीश्वर, श्री नर्तन गणपती ह्यांच्या मुर्त्या असतात.

अर्थमंडप, महामंडप आणि नंदीमंडप:
राजगोपुर आणि मंदिराची प्रथम परिक्रमा ह्यांच्यामधला जो भाग असतो त्याला अर्थमंडप असं म्हणतात. प्रथम परिक्रमा आणि गाभारा ह्यांमधला जो भाग असतो त्याला महामंडप म्हणतात. कधी कधी महामंडप आणि गाभारा ह्यांमध्ये नंदीचा स्वतंत्र मंडप असला तर त्याला नंदीमंडप असं म्हणतात.

गाभारा:
गाभारा म्हणजेच कोष्ठ. गाभाऱ्यामध्ये मंदिराच्या मुख्य देवतेची मूर्ती असते. म्हणजेच शिव मंदिरामधल्या गाभाऱ्यात शिव लिंग असतं. गाभारा म्हणजेच मंदिराचं मुख्य स्थान. इंग्लिश मध्ये ह्याला सॅन्क्टम सँक्टोरं (Sanctum Sanctorum) म्हणतात. म्हणून त्याचं पावित्र्य राखण्यासाठी तिथे पुजाऱ्यांशिवाय बाकीच्यांना प्रवेश निषिद्ध असतो.

कोष्ठ मूर्ती:
गाभाऱ्याच्या बाहेरील भिंतीवर किंवा भिंतींच्या बाजूला ज्या मुर्त्या किंवा छोटी देवळे असतात त्यांना कोष्ठ मूर्ती म्हणतात. आणि ह्या सर्व देवतांना परिवार देवतां म्हणतात. म्हणजे भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांचा परिवार. 

उत्सव मूर्ती:
सहसा मंदिरातील उत्सवांमध्ये मंदिराभोवतीच्या चार रस्त्यांवरून रथयात्रा आयोजित होतात. ह्या रथयात्रांमध्ये ज्या मुर्त्या रथामध्ये किंवा पालखीमध्ये ठेवल्या जातात त्यांना उत्सव मूर्ती म्हणतात. ह्या उत्सव मूर्ती पंचधातूच्या असतात. मुख्य मूर्तीच्या तुलनेमध्ये ह्या मुर्त्या छोट्या असतात. 

मंदिरांच्या गाभाऱ्यामध्ये पण छोट्या उत्सव मुर्त्या असतात. सहसा वारंवार होणाऱ्या अभिषेकासाठी उत्सव मुर्त्या वापरतात. मुख्य मूर्त्यांवर सहसा पुजा, अर्चना आणि अलंकार केले जातात. 

शयनगृह:
काही मंदिरांमध्ये शयनगृह असतं जिथे देव शयन करतात असा समज असतो.

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy): ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


 

No comments:

Post a Comment