Thursday, May 11, 2017

Gajanan - third incarnation of Lord Vinayak

अवतार तिसरा - गजानन - अध्याय ७ ते १० - श्री विनायक विजय

या अवतारात विनायकाने सिंदुरासूराचा वध केला. शस्त्राने त्याला मरण नसल्यामुळे विनायकाने दोन्ही हातांनी धरून त्याचे मर्दन केले. पिळून त्याचे चूर्ण करून तो सिंदूर आपल्या सर्वांगाला लावला. तेव्हांपासून देवाला सिंदूर आवडू लागला.

शंकर पार्वतीच्या पुत्राला गजासुराचे मस्तक लावल्याने देवांनी व ऋषींनी गजानन नाव ठेवले. किरीट कुंडले धारण केलेला, पितांबर नेसलेला, चतुर्बाहु, दिव्य आयुधे धारण केलेला असे ह्या गजाननाचे स्वरूप आहे. जवळ सिद्धी बुद्धी आहेत. विराट रूप म्हणून "विकट" नाव. भव्य देह म्हणून "महाकाय". शंकराने प्रेमाने आपली चंद्रकला त्याच्या मस्तकावर ठेवली म्हणून "भालचंद्र" अशी नावे पडली. जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला!

एकदा ब्रह्मदेवांना जांभई आली. तेव्हां त्यांच्या मुखातून एक रक्तवर्णाचा, क्रूर चेहरा असलेला पुरुष बाहेर पडला. त्याच्या शरीराला येणाऱ्या सुगंधाने दाही दिशा व्यापल्या होत्या. ब्रह्मदेवाने आश्चर्याने विचारले "तू कोण? कुठून आलास?" त्या पुरुषाने उत्तर दिले "मी तुमचाच पुत्र आहे. तुमच्या मुखातून मी जन्म घेतला आहे. आता माझे नाव ठेवा व मला राहण्यासाठी उत्तम स्थान द्या. तुमच्या कृपेने माझा चरितार्थ मी स्वतः चालवीन."

ब्रह्मदेव म्हणाला "तुझे नांव सिंदूर. पृथ्वीवर हव्या त्या स्थानी तू रहा. तुला मी आणखी एक वर देतो. तुला शस्त्रास्त्रांपासून, विष्णू इंद्र आदी देवांपासून मृत्यूचे भय नाही. तू ज्याला मिठी मारशील त्याचे तात्काळ भस्म होईल!" सिंदुराला आनंद झाला. जे तपश्चर्येने व यज्ञ करूनही मिळायला अवघड असे दुर्लभ वर त्याला विनासायास मिळाले होते.

परत फिरताना त्याला दुर्बुद्धी सुचली व तो आपल्या वराची प्रचिती पाहण्यासाठी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला मिठी मारायला निघाला. ब्रह्मदेवाला आता वर दिल्याचा पश्चात्ताप झाला. तो क्रोधाने म्हणाला "तुझा संहार करण्यासाठी विनायक अवतार घेईल". या शापाने भयभीत न होता सिंदूर पुढे सरसावला. ब्रह्मदेव आपल्या आसनासहित वैकुंठमार्गाने श्री विष्णूंकडे निघाला. मागोमाग सिंदुरही गेला. ब्रह्मदेवाने सर्व वृत्तांत श्री विष्णूला कथन केला.  श्री विष्णू म्हणाले "तुम्ही जरी अविचाराने वर दिला तरी तो खोटा होंणार नाही. हा दैत्य सर्व त्रैलोक्याचा नाश करेल. जर विनायकाने अवतार घेतला तरच याचा नाश होईल." इतक्यात सिंदूर दैत्य तेथे पोहोचला व त्याने श्री विष्णू व ब्रह्मदेव यांना युद्धाचे आव्हान दिले. श्री विष्णू म्हणाले "मी सत्वापासून निर्माण झालो आहे. निर्गुण, निरिच्छ आहे. ब्रह्मदेव वेदशास्त्रसंपन्न आहेत. आम्हाला दोघांनाही युद्धात स्वारस्य नाही. तू श्री शंकरांकडे जाऊन त्यांना युद्धाचे आव्हान दे"

उन्मत्त असा तो सिंदूर दैत्य कैलासावर गेला. शिवमंदिरात पोहोचला. भस्म चर्चित, गजचर्म परिधान केलेली, हातात खट्वाङ्ग असलेली, जटेत गंगा असलेली चंद्रमौळी श्री शंकरांची ध्यानस्थ सुंदर मूर्ती बघून, सिंदूर दैत्याचे मन फिरले. त्याला वाटले त्याला मिठी मारण्यापेक्षा याच्या मांडीवर बसलेल्या पार्वतीलाच न्यावे. त्याने पार्वतीची वेणी ओढून तिला जबरदस्तीने घेऊन जाऊ लागला. भयभीत होऊन पार्वतीने आक्रोश केला. श्री शंकरांची कळवळून प्रार्थना केली पण श्री शंकर ध्यानातून जागे झाले नाहीत.

ध्यानातून जागे झाल्यावर शिवगणांनी श्री शंकरांना सर्व वृत्त सांगितले. अत्यंत क्रोधित होऊन श्री शंकर हातात डमरू व त्रिशूल घेऊन नंदीवर बसून सिंदूर दैत्याकडे निघाले. त्याने आपल्या डमरूचा प्रहार सिंदुरावर केला. सिंदूर क्षणभर थांबला व श्री शंकरांना मिठी मारायला निघाला, तितक्यात एक दिव्य ब्राह्मण दोघांमध्ये प्रकट झाला. तो ब्राह्मण सिंदुराला म्हणाला "तू माझ्या समक्ष शंकरांना जिंकलेस तर पार्वती तुझी झाली." बोलता बोलता ब्राह्मणाने गुप्त परशु सिंदुरासुरावर सोडला. तो लागताच सिंदुरासूर शक्तिहीन झाला. दिव्य ब्राह्मणाने म्हटले "सिंदुरासुरा आता प्राण वाचवायचे असतील तर सत्वर पलायन कर, नाहीतर श्री शंकरांच्या त्रिशुळाच्या आघाताने तू मरशील" ते ऐकून पार्वतीला सोडून देऊन, पण क्रोधाने सिंदूर दैत्य पृथ्वीवर परतला.

पार्वतीने ब्राह्मणाला विचारले "या दुष्टापासून मला सोडवलेत. आपण कोण आहात?" उत्तरादाखल ब्राह्मण आपल्या मूळ रूपात प्रकट झाला. पार्वती समोर सगुण रूपात विनायक प्रकट झाला. चतुर्भुज, किरीट कुंडले घातलेली, सिद्धी बुद्धी दोन बाजूस असलेली, सिंहावर आरूढ झालेली अशी विनायकाची मूर्ती बघताच पार्वतीला आनंद झाला. विनायक पार्वतीला म्हणाला "तुला दुःख देणाऱ्या सिंदूर दैत्याचा मी नाश करिन. त्याकरता मी तुझ्याच पोटी जन्म घेईन" हे बोलून विनायक अंतर्धान पावले.

इकडे सिंदुरासुराने सर्वांना त्रास देण्यास सुरुवात केली. कित्येकांना मिठी मारून भस्म केले. कित्येक ब्राह्मणांना जीवे मारले. कित्येक क्षत्रियांचा वध केला. कित्येकांचे पुत्र मारले. यज्ञयागांचा विध्वंस केला. देव ब्राह्मण संत संन्यासी, पृथ्वीवरील शूर राजे, कुणालाच सोडले नाही. शेवटी सर्व देवांनी विनायकाची प्रार्थना केली. विनायकाने पार्वतीच्या पोटी जन्म घेऊन सिंदुरासुराचा वध करेन असे आश्वासन दिले.

पार्वतीला डोहाळे लागले. दिवसेंदिवस गर्भ वाढू लागला. एकदा पृथ्वीवर रमणीय उपवनात जाऊन कांही दिवस राहावे असे वाटू लागले. तिने श्री शंकरांना सांगितले. दोघेही नदीवर बसून पृथ्वीवर आले. तिथले दाट, सुगंधी झाडांनी वेलींनी युक्त असे रमणीय पर्यळी उपवन त्यांना दिसले. त्यांनी आपल्या सर्व शिवगणांसह तिथेच मुक्काम करण्याचे ठरवले.

एकदा गजासुर नावाच्या श्री शंकरांच्या भक्ताने, जो हत्ती होता, त्याने पर्यळी उपवनात शिवगणांनी खास पार्वतीकरता उभारलेला मंडप आपल्या सोंडेने उध्वस्त केला. हा गजासुर गतजन्मात महेश नांवाचा राजा होता. अत्यंत देवभक्त, पुराणे ऐकणारा, जपजाप्य करणारा, असा त्रिभुवनात प्रख्यात होता. एकदा त्याच्या राजवाडयात देवगुरु बृहस्पती आले. त्यांची राजाने यथाविधी  पूजा केली. त्यांच्या पायावर स्वतःचे मस्तक ठेऊन त्यांना वंदन केले. बृहस्पतीने त्याच्या आदरातिथ्याने भारावून जात त्याला आशीर्वाद दिला "जे मस्तक माझ्या पायावर ठेवलेस ते मस्तक तिन्ही जगतात सर्व देव ऋषींना पूज्य होईल. पुढच्या जन्मी तू गजराजाच्या योनीत जन्माला येशील तेव्हां तुझे मस्तक छेदून स्वतः श्री शंकर तुला मुक्ती देतील. 

एकदा महेश राजाने मार्गाने जात असलेल्या नारदमुनींना वंदन केले नाही. तेव्हां रागावून नारदमुनींनी त्याला पुढच्या जन्मी तुझे मुख हत्तीचे होईल व शंकर तुला कैलासात नेतील असा शाप देऊन निघून गेले. 

पुढे महेश राजा मरण पावला व पर्यळी वनात गजमुखाने जन्मला. हत्तीचे मुख सोडल्यास देह नराचा होता. देव राक्षस गंधर्व कुणीच त्याच्या बरोबरीला नव्हते. असा हा गजासुर! त्याने मंडप तोडला. शिवगण त्याला पाहून भयभीत होऊन सैरावैरा पळू लागले. पार्वतीने हे श्री शंकरांना सांगताच श्री शंकरांनी क्रोधीत होऊन त्रिशुळाने त्याचे मस्तक छेदले. अंतःसमयी त्या गजासुराने "ॐ नमः शिवाय" म्हणून प्राण सोडला. 

श्री शंकर म्हणाले "मग मी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला मुक्ती दिली व त्याचे गजमुख माझ्या पूजास्थानी ठेवले. त्याचे चर्म मी स्वतः पांघरले. त्याचे चर्म पांघरले म्हणून माझे नांव महेश पडले."

इकडे सिंदुरासूर गर्वाने म्हणत होता "मला देव मनुष्य राक्षस यांपासून मृत्यू नाही." तोच आकाशवाणी झाली "मुर्खा तुझा वध करण्याकरता स्वतः परमात्मा विनायकाने पार्वतीच्या पोटी जन्म घेतला आहे. तिच्या उदरात त्याचा गर्भ वाढतो आहे." ते ऐकून क्रोधीत होऊन गर्भातच शत्रूचा नाश करण्यासाठी  तो कैलासावर गेला. तेथे कुणी नाही हे पाहून पर्यळी उपवनात आला. श्री शंकर व पार्वती निद्रिस्त होते हे पाहून तो वायुरूपाने पार्वतीच्या उदरात शिरला व नखाने गर्भाचे शिर तोडून बाहेर आला. ते शिर त्याने नर्मदेच्या कुंडात टाकले. त्यामुळे नर्मदेतील पाषाणही रक्तासारखे लाल झाले. सर्व लाल पाषाण नर्मदी गणपती म्हणून प्रसिद्ध झाले. तो दैत्य आपले काम करून गेला. पण निद्रावस्थेत असल्याने कुणाला काही कळले नाही. 

काही दिवस उलटल्यावर पार्वतीच्या इच्छेनुसार सर्व परत कैलासावर पोहोचले. नऊ मास भरल्यावर पार्वतीने एका बालकास जन्म दिला. पण ते बालक मस्तकविरहित होते. ते पाहून पार्वतीस अनावर शोक झाला व तिने शंकरांना बोलावले. श्री शंकरही दुःखाने व्याकुळ झाले व नंदीला बोलावून त्यांनी सर्व देवांना हे मस्तक विरहित बालक बघण्यास बोलावले. 

सर्व देव धावून आले. ते मस्तक विरहित बालक बघून सर्वांनाच आश्चर्य वाटले. तेवढ्यात ते बालक बोलू लागले. "सिंदुरासुराचा वध करण्यासाठी मी पार्वतीच्या पोटी जन्म घेतला आहे." बृहस्पतीने त्याच्या मस्तकाविषयी विचारले असता विनायकाने बृहस्पतीस महेश राजाची आठवण दिली व श्री शंकरांच्या पूजास्थानीचे गजमुख लावण्यास सांगितले. आपले मस्तक सिंदुरासुरानेच कुणाच्याही नकळत गर्भावस्थेतच नखाने छेदले हेही सांगितले. 

नारदाने सांगितले "आम्ही कुणीच गजमुख लावण्याच्या योग्यतेचे नाही. केवळ आपल्या प्रभावानेच ते शक्य होईल." असे सांगितल्यावर काहीच क्षणात गजमुख धारण केलेले विनायक, चतुर्भुज अवतारात, सिद्धीबुद्धी सह प्रकट झाले. 

नारदांनी सिंदुरासुराकडे जाऊन त्याला तुझ्या शत्रूचा जन्म कैलासावर झाला आहे असे सांगितले. सिंदुरासूर क्रोधीत झाला व आपल्या शत्रूला मारण्यासाठी कैलासावर चाल करून गेला. विनायकाला बालरुपात पाहून "तू अंगणात खेळण्याऐवजी इथे कसा आलास?" असे विचारले. ते ऐकून विनायकाने महाकाय रूप प्रकट केले. ते पाहून सिंदुरासूर भयकंपित झाला. विनायकाने दोन्ही हातांनी सिंदुरासुराचे मर्दन केले व त्याच्या सर्व रक्तांगाचे चूर्ण करून आपल्या अंगास लावले. सर्व दिशांत सुगंध भरून राहिला. सर्व देव ऋषी यांना आनंद झाला. सर्वांनी विनायकाचे पूजन केले. तोच सर्वांदेखत गजानन अवतार धारण केलेला विनायक अंतर्धान पावला. असा हा गजानन अवतार अध्याय समाप्त! 

No comments:

Post a Comment