Thursday, April 13, 2017

Kapil Chintamani - second incarnation of Lord Vinayak

अवतार दुसरा - कपिल चिंतामणी - अध्याय २ ते ६ - विनायक विजय


या अवतारात श्री गणेशाने द्रविडदेशीचा राजा अभिजित व राणी गुणवती यांचा पुत्र गणदैत्य, ज्याने कपिल ऋषींच्या आश्रमातून त्यांचा चिंतामणी नावाचा रत्नमणी जबरदस्तीने हिरावून घेतला, त्याच्याशी युद्ध करून व त्याचा वध करून कपिलऋषींना त्यांचा चिंतामणी त्यांना परत आणून दिला. कपिलऋषींनी तोच चिंतामणी श्री गणेशाच्या कंठात घातला, म्हणून सर्व ऋषींनी त्याचे नाव चिंतामणी असे ठेवले.


या अवतारात श्री गणेश सिंहावर बसलेला, दिव्यवस्त्रे व अलंकार धारण केलेला, चतुर्भुज - चार हातात परशु, कमल, मोदक व गदा हि आयुधे धारण केलेला, असा आहे. कपिल मुनींच्या अनुष्ठानाने यज्ञकुंडातून प्रकट झाला म्हणून याचे नाव कपिल, असा हा कपिल चिंतामणी अवतार.


पूर्वी द्रविड देशात अभिजित नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या राणीचे नांव गुणवती. दोघेही धर्मशील, व्रती आणि दानशूर होते. राज्यात सुख, समृद्धी व समाधान होते. प्रजा सुखी होती. एकच दुःख होते. राजाला मुलबाळ नव्हते. विविध व्रते, दाने, होम हवन करूनही उपयोग झाला नाही. शेवटी तपाकरिता आपण अरण्यात जावे असा विचार करून प्रधानावर राज्य सोपवून राजाराणी बाहेर पडले. फिरता फिरता एका उपवनात एक शोभिवंत आश्रम त्यांनी पाहिला. तो वैशंपायन ऋषींचा आश्रम होता. राजाने त्यांना साष्टांग नमस्कार केला. वैशंपायन ऋषींनी अंतर्ज्ञानाने राजाचे दुःख जाणले व त्या दोघांना सिंधुतीरी जाऊन तिथल्या सरोवराकाठी हवन व जप करण्यास सांगितले. चार महिने व्रतस्थ राहून मग घरी जाण्यास सांगितले. वैशंपायन ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजाने सरोवराच्या तीरावर जप होम हवन केले. चार महिने दोघे व्रतस्थ राहिले. मध्यंतरीच्या काळात ब्रह्मदेव वासनांध होऊन आपल्याच कन्येच्या सरस्वतीच्या मागे लागला. पण नंतर त्याला पश्चात्ताप होऊन त्याने आपले दुर्वीर्य त्या सरोवराच्या पाण्यात टाकून दिले. योगायोगाने त्याच सरोवरतीरी राहणाऱ्या गुणवती राणीने ते पाणी प्यायले व तिला गर्भ राहिला. राजाला फार आनंद झाला. चार महिनेही पूर्ण झाले होते.  दोघेहीजण हर्षभरित होऊन नगरात परतले. नऊ मास पूर्ण झाल्यावर गुणवतीला पुत्र झाला. त्याचे नाव गण असे ठेवले. लहानपणापासूनच तो बलाढ्य होता. पूर्वसुकृतानुसार गणाला वनात जाऊन तपश्चर्या करावेसे वाटले. आई वडिलांची आज्ञा घेऊन तो घोर अरण्यात गेला. “ॐ नमः शिवाय” या पंचाक्षरी जपाने त्याने एकाग्रमनाने तपश्चर्येला प्रारंभ केला. दहा वर्षे एका पायावर उभे राहून व तितकीच वर्षे वायुभक्षण करून व तीस वर्षे केवळ पाणी पिऊन काढली. थंडी वारा ऊन पाऊस यांची पर्वा केली  नाही. गणाचे उग्रतप बघून इंद्राला आपलेच इंद्रपद जाईल अशी भीती वाटली व सर्व देव मिळून शिवशंकराला शरण गेले व त्यांना सर्व हकीकत निवेदन केली. शिवशंकर तप करणाऱ्या गणाजवळ गेले व संतुष्ट होऊन त्यास वर मागण्यास सांगितले. त्याने तुझी कृपादृष्टी माझ्यावर नेहमीच राहो असा वर मागितला. शंकराने तो वर तर दिलाच शिवाय तू त्रैलोक्यात विजयी होशील, तुला देवांकडून मरण येणार नाही असा वर देऊन शंकर अंतर्धान पावले. गणाला अत्यंत आनंद झाला. नगरात परत जाऊन त्याने आपल्या आईवडिलांना हे वृत्त सांगितले. अभिजित राजानेही आनंदून त्याच्यावर सर्व राज्यकारभार सोपविला. राजा होताच गण दैत्य उन्मत्त झाला. त्यात शंकराचे वरदान असल्याने तो स्वतःला अजेय समजू लागला. त्याने आपले सैन्य अपरिमित वाढविले. शस्त्रास्त्रांनी परिपूर्ण केले. त्याला कुणाचीच भीती वाटेनाशी झाली.


एकदा त्याने स्वर्गावर वारी करून इंद्रालाही हरवले व परत त्याला त्याचे इंद्रपद देऊन टाकले. दिवसेंदिवस गणदैत्य अहंकारी व उन्मत्त झाला. एकदा तो सैन्य घेऊन शिकारीसाठी अरण्यात गेला. तिथे त्याने कपिलमुनींचा आश्रम पाहिला. तो कपिलमुनींना भेटण्यास गेला. त्याने कपिलमुनींच्या कंठात दिव्य रत्नमणी पाहिला. त्या रत्नमणीच्या तेजाने सर्व आश्रम उजळला होता. त्या रत्नमणीचे नाव चिंतामणी असे होते. कपिलमुनींचे दर्शन घेऊन गणदैत्याने परत जाण्याची अनुज्ञा मागितली. कपिलमुनींनी मध्यान्ह समय असल्याने दैत्यराजाला जेऊन जाण्यास सांगितले. दैत्यराजाने आपले सैन्य बरोबर असल्याने सैन्याला उपाशी ठेऊन भोजन करणे योग्य नाही असे सांगितले. त्यावर कपिलमुनींनी दैत्यराजाला ससैन्य भोजनाचे निमंत्रण दिले व सर्वांना चविष्ट भोजनही दिले. गणदैत्याला आश्चर्य वाटले. मग त्याला समजले कि हि त्या चिंतामणीची किमया आहे. त्याने तो चिंतामणी कपिलमुनींजवळ मागितला. कपिलमुनींनी नकार दिला. गणदैत्याने रागावून जबरदस्तीने तो चिंतामणी हिरावून घेतला. कपिलमुनींनी क्रोधीत होऊन गणदैत्याला शाप दिला “त्रैलोक्याला छळणारा तू कृतघ्न आहेस. माझ्या आश्रमात तू मला छळण्यासाठी का आलास? तुझा वध करण्यासाठी परमात्मा अवतार घेईल. लवकर तुझे तोंड काळे कर, नाहीतर भस्म होशील.” शापवाणी ऐकून गणदैत्य खिन्न झाला, पण तो दिव्य चिंतामणी घेऊन तो नगरात परत आला. आश्रमातील वृत्त ऐकून अभिजित राजाला दुःख झाले, पण गणदैत्य मात्र निर्भयपणे राज्यकारभार करीत होता. त्यात तो चिंतामणी मिळाल्याने तो पूर्ण ब्रह्माण्डात प्रसिद्ध झाला. इकडे आश्रमात चिंतामणी पळवून नेल्याने कपिलमुनी दुःखाने मूर्च्छित झाले. सावध झाल्यावर पूर्ण एकाग्रतेने ध्यानास बसले. त्यांच्यापुढे आदिमाया प्रकट झाली. शंकरांनी त्रैलोक्यात अजिंक्य होशील असा वर दिल्यानेच गणदैत्य उन्मत्त झाला आहे असे तिने सांगितले. परमात्मा विनायकच त्याचा नाश करेल असेही सांगितले. कपिलमुनींनी विचारले कि त्याला किती अवधी लागेल? आदिमायेने कपिलमुनींना “गं” या मंत्राचा उपदेश दिला. कपिलमुनींनी अहोरात्र एकाग्र मनाने हा जप केल्यास होमकुंडातून स्वतः विनायकाची चतुर्भुज मूर्ती प्रकट होईल असे सांगितले. आदिमायेने सांगितल्याप्रमाणे कपिलमुनींनी अनुष्ठान सुरु केले. अहोरात्र हवन, जप, ब्राह्मण भोजन सुरु ठेवले. शेवटी होमकुंडातून दैदिप्यमान विनायकमूर्ती प्रकट झाली. त्रैलोक्यास पिडणाऱ्या, देव संन्यासी ब्राह्मण व संत सज्जनांना छळणाऱ्या गणदैत्याचा नाश करून तुझा चिंतामणी तुला परत आणून देण्यासाठीच मी अवतार घेतला आहे असे विनायकाने सांगितले.


इकडे गणदैत्याला स्वप्न पडले. एका चतुर्भुज दिव्य तेजस्वी पुरुषाने, ज्याच्या हातात परशु कमल मोदक अशी आयुधे विजेसारखी लवलवत आहेत, त्याने कपिलमुनींसह येऊन माझे सर्व सैन्य भक्षण केले व माझे मस्तक छेदले. स्वप्नाने भयकंपित होऊन गणदैत्याने आपल्या प्रधानांना व पुत्रांना आपले स्वप्न सांगितले. प्रधानांच्या व पुत्रांच्या इच्छेनुसार गणदैत्य क्रोधीत होऊन स्वतःच प्रचंड सैन्य घेऊन वडिलांच्या विरोधाला न जुमानता, कपिल मुनींच्या आश्रमावर चाल करून गेला. वेदिकेमध्ये त्याने चतुर्भुज, विक्राळ शरीराचा, चारही हातात आयुधे असलेला, रक्तरंगी वस्त्र नेसलेला, रक्तरंगी पुष्पे धारण केलेला, सिंहावर बसलेला गणपती पाहिला जो त्याने स्वप्नात पाहिला होता. गणपतीसहित बसलेल्या सिध्दीने युद्ध करण्याची अनुज्ञा गणपतीस मागितली. गणपतीने ती आनंदाने दिल्यावर सिध्दीने रणांगणात जाऊन तीन पायांचे, चार पायांचे, तसेच चतुर्मुखी, पंचमुखी, बारामुखी असे अक्राळविक्राळ देहाचे प्राणी शस्त्रांसहित निर्माण केले. परंतु सिद्धीच्या सैन्याचा गणदैत्याच्या सैन्यापुढे टिकाव लागेना. तेंव्हा सिध्दीने मानससुत निर्माण केला. त्याचे नाव लक्ष. हा महाशूर होता. त्याने आपल्या दिव्य अस्त्रांनी असंख्य दैत्य मारले. त्याच्या बाणांनी अवघे आकाश भरले. सूर्यालाही त्यांनी व्यापून टाकले. दैत्यसैन्य धारातीर्थी पडू लागले. उरलेसुरले सैन्य सैरावैरा पळू लागले. गणदैत्याचे फक्त दोन पुत्र रणांगणावर उरले, सुलभ व शूलपाणी. तेही पलायनाचा विचार करू लागले., तेवढ्यात वाऱ्याच्या गतीने लक्ष धावला, त्यांच्या रथासहित त्या दोघांना पकडून त्याने स्वतःच्या सैन्यात आणले. पित्याला वंदून लक्ष म्हणाला, “आपण गणदैत्याला ठार करून ह्यांना राज्यावर बसवावे”


इकडे रणांगणावर कुणीही दैत्यसैन्य उरले नाही. एका सैनिकाने ही सर्व वार्ता व दोन्ही पुत्रांना धरून नेल्याची वार्ता गणदैत्यास सांगितली. गणदैत्यावर वज्राघात झाला. तो मूर्च्छित झाला. दुःखाने व्याकुळ झाला. परंतु त्याच्या प्रधानांनी त्याला समजावल्यावर त्वेषाने पुन्हा सैन्य घेऊन रणांगणावर गेला, ती मी मरेन अथवा मारिन अशी प्रतिज्ञा करूनच. कपिलमुंनींच्या आश्रमात जाऊन बघितले असता त्याने ती चतुर्भुज मूर्ती पाहिली. त्याच्या दोन्ही बाजूस सिद्धीबुद्धी होत्या व ती सूर्याहूनही अति तेजस्वी अशी विनायकाची मूर्ति सिंहावर आरूढ झाली होती. ती मूर्ति पाहताक्षणी गणदैत्याची सेना भयकंपित झाली. गणदैत्याने कपिलमुनींना क्रोधाविष्ट होऊन विचारले “हा पुरुष कोणीकडून आला आहे? सांग नाहीतर एकाच बाणाने तुम्हा दोघांचा मी प्राण घेईन.” ते ऐकून कपिल ऋषी क्रोधाने म्हणाले “दुष्टा, तू सर्व देव, गायी, ब्राह्मण, संत, सज्जन ह्यांना छळलेस, त्याची फळे भोग! तुला मारण्यासाठी हा प्रत्यक्ष परमात्मा अवतरला आहे!” हे ऐकून क्रोधीत होऊन गणदैत्याने पांच बाण विनायकावर सोडले. दोन वाया गेले. तीन विनायकाला लागले. विनायकाने मूर्च्छित झाल्याचे नाटक केले. ते बघून दैत्याने विजयाची आरोळी मारली. त्या संधीचा फायदा घेऊन विनायकाने परशुने त्याला कंठस्नान घातले. त्याचा शिरच्छेद केला. त्याचे मस्तक आभाळात उडाले व धड धरणीवर पडले. ऋषी जयजयकार करू लागले. दैत्यसैन्यात हा:हा:कार माजला.


गणदैत्य रणांगणावर पडल्याचे समजल्यावर त्याच्या पित्याला राजा अभिजीतला अतोनात दुःख झाले. पण ही पुत्राच्याच कर्माची फळे आहेत हे त्याने जाणले. अभिजित राजा तो चिंतामणी घेऊन स्वतः कपिलमुनींच्या आश्रमात गेला व विनायक आणि कपिलमुनींना दोघांना वंदन करून त्याने तो चिंतामणी कपिलमुनींच्या हवाली केला. कपिलमुनींनी विनायकाच्याच गळ्यात तो चिंतामणी घातला व म्हटले “तू दुष्ट दैत्याला मारून हा चिंतामणी माझ्याकरता परत मिळविलास म्हणून आजपासून चिंतामणी ह्या नावाने ब्रह्माण्डात ख्यात होशील”

हा चिंतामणी स्वर्गाचा राजा इंद्र ह्याला श्री विष्णूंनी दिला होता. इंद्राने कपिलमुनींच्या आश्रमातील आतिथ्याने प्रसन्न होऊन त्यांना हा चिंतामणी दिला होता. हे कथानक ऐकल्याने श्रवण करणाऱ्यांची पापे नष्ट होतात. त्यांचे दोष नष्ट होतात. व त्यांना सुख लाभते. असा हा “चिंतामणी” अध्याय समाप्त.

No comments:

Post a Comment