हे मंदिर तामिळनाडुच्या कारैक्कल जिल्ह्यामध्ये थिरुथेलीचेरी गावामध्ये आहे. पोरैयुर गावातून कारैक्कलमध्ये प्रवेश केला की हे मंदिर आहे. थिरुथेलीचेरी गावाला आता कारैक्कलपथूर असं म्हणतात. कारैक्कल बस स्टँडच्या उत्तरेला हे मंदिर आहे. कारैक्कलपासून हे मंदिर २ किलोमीटर्स वर, पोरैयुरपासून १२ किलोमीटर्स वर, पूवमपासून ७ किलोमीटर्सवर, नागपट्टीनंपासून २२ किलोमीटर्सवर, थिरुक्कडैयूरपासून २० किलोमीटर्स वर आणि मयीलादुथुराईपासून ३६ किलोमीटर्स वर आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. ह्या मंदिराची स्तुती शैव संत संबंधर ह्यांनी गायली आहे. म्हणून हे मंदिर सहाव्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. चोळा साम्राज्याच्या राजांनी ह्याचा जीर्णोद्धार केला. पुढे जाऊन नाट्टूकोट्टै नागरथर राजांनी पण ह्याचा जीर्णोद्धार केला.
मूलवर: श्री पार्वतीश्वरर, श्री शमीवनेश्वरर
देवी: श्री स्वयंवरतपस्विनी, श्री शक्तीनायकी, श्री अंबादत्तकन्नल
क्षेत्र वृक्ष: शमी / बिल्व
पवित्र तीर्थ: सूर्य तीर्थ, गृह तीर्थ
पुराणिक नाव: थिरुथेलीचेरी, कारैक्कलपथूर
एैतिहासिक नावे: मुक्ती स्थळ, शिव स्थळ, सूर्य स्थळ, गुह स्थळ, गौरी स्थळ
क्षेत्र पुराण:
१. पुराणानूसार श्री सूर्यदेवांनी त्यांची पत्नी छाया हिच्यावर प्रेम केले नाही. ह्या त्यांच्या वागणुकीमुळे त्यांच्या पत्नीचे मन दुखावले होते. नारद मुनींनी छायादेवींच्या पितांना सूर्यदेवांच्या वागणुकीबद्दल सांगितले. तेव्हा त्यांनी सूर्यदेवांना त्यांचे सगळे तेज नाहीसे होईल असा शाप दिला. ह्या शापापासून मुक्त होण्यासाठी सूर्यदेवांनी इथे भास्कर तीर्थ निर्माण केले आणि भगवान शिवांची उपासना केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना शापमुक्त केले. सूर्यदेवांनी इथे भगवान शिवांची उपासना केली म्हणून ह्या क्षेत्राला भास्कर क्षेत्र असे नाव पडले.
२. श्री पार्वतीदेवींनी इथे कात्यायन ऋषींची कन्या म्हणून जन्म घेतला. म्हणून तिला कात्यायनी असे नाव प्राप्त झाले. त्यांनी इथे तपश्चर्या केली, भगवान शिवांची उपासना केली आणि नंतर भगवान शिवांबरोबर विवाह केला. म्हणून त्यांना श्री स्वयंवर तपस्विनी तसेच श्री पार्वतीअम्मन असे नाव प्राप्त झाले. भगवान शिवांनी इथे त्यांच्याशी विवाह केला म्हणून भगवान शिवांना इथे श्री पार्वतीश्वरर असे नाव प्राप्त झाले.
३. इथल्या स्थळ पुराणानुसार इथे एकदा प्रखर दुष्काळ पडला होता. त्यावेळी इथे जो चोळा साम्राज्याचा राजा होता त्याने भगवान शिवांना दुष्काळ दूर करण्यासाठी प्रार्थना केली. असा समज आहे की भगवान शिव आणि पार्वती देवी शेतकरी आणि त्यांच्या पत्नी अशा रूपांत आले. त्यांनी शेतजमीन नांगरली आणि भाताची बीजे पेरली. त्यांनी केलेल्या शेतीला भरपूर पीक आले आणि ह्या गावातल्या लोकांची दुष्काळापासून मुक्तता झाली. भगवान शिवांनी इथे शेतजमीन नांगरली आणि बीजे पेरली म्हणून ह्या स्थळाला थिरूथेलीचेरी (थिरूथेली (बीजे पेरणे) आणि चेरी (जागा, स्थळ)) असे नाव प्राप्त झाले.
४. स्थळपुराणानुसार एकदा शैव संत संबंधर थिरूनल्लुर मधल्या भगवान शिवांचं दर्शन घेऊन ज्या मार्गावरून चालले होते त्या मार्गात त्यांनी हे गाव पार केलं. त्यांना ह्या गावामध्ये शिव मंदिर आहे हे लक्षात आलं नाही. म्हणून इथल्या श्री विनायकांनी संबंधरांना दहा वेळा हाक मारून इथे आणलं आणि त्यांच्याकडून इथल्या भगवान शिवांची पूजा करविली. श्री विनायकांनी संबंधरांना हाक मारून आणलं म्हणून इथे श्री विनायकांना श्री कूवी अळैथ विनायक (म्हणजे विनायक ज्यांनी हाक मारली). म्हणून पूर्वी ह्या स्थळाला कूवी अळैथत असं नाव होतं पण कालांतराने ते कोविलपथू असं झालं.
५. जेव्हां शैव संबंधर ह्या मार्गावरून चालले होते तेव्हा काही इतर धर्माच्या लोकांनी त्यांना बोध मंगाई इथे अडवलं आणि त्यांना भगवान शिवांच्या समर्थतेबद्दल शंका घेऊन छळायला चालू केलं. संबंधरांनी भगवान शिवांकडे मदतीसाठी प्रार्थना केली. तेव्हा त्या स्थळी मेघगर्जना झाली. तरीपण इतरधर्मीय लोक संबंधरांना प्रश्न विचारून छळतच होते. त्यांनी संबंधरांना वादविवाद करण्यासाठी आव्हान केलं. तेव्हा संबंधरांनी आपल्या एका शिष्याला वादविवादासाठी पुढे केलं. त्या शिष्याने त्या लोकांना वादविवादामध्ये हारवलं. असं ऐकिवात आहे की त्या लोकांनी आपला पराभव स्वीकारला आणि त्यांनी शैवभक्ती आचरण्यास सुरुवात केली.
६. स्थळ पुराणानुसार अर्जुनाने इथे भगवान शिवांची पूजा केली. भगवान शिवांनी एका पारध्याच्या रूपांत येऊन आशीर्वाद दिले. अर्जुनाच्या प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून भगवान शिवांनी त्याची इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले. म्हणून इथे भगवान शिवांना श्री फाल्गुन लिंग संबोधले जाते. आणि इथल्या पवित्र तीर्थाला फाल्गुन तीर्थ असे नाव आहे.
७. स्थळ पुराणानुसार वसिष्ठ ऋषींच्या सल्ल्यानुसार अंबरीश राजाने इथे भगवान शिवांची पूजा केली. ह्या पूजेच्या प्रभावाने राजाला अपत्यप्राप्ती झाली. म्हणून इथल्या शिव लिंगाला राजलिंग असे संबोधले जाते.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नाव:
श्री पार्वती देवी, श्री ब्रह्मदेव, श्री इंद्रदेव, मार्कंडेय ऋषी, अर्जुन, सूर्यदेव, राजा अंबरीश, शैव संत संबंधर.
वैशिष्ट्ये:
१. इथले भगवान शिव चारही युगात इथे आहेत असा समज आहे. कृतयुगामध्ये ह्या स्थळाला ब्रह्मवनम असे नाव होते, त्रेतायुगामध्ये शमीवनम, द्वापारयुगामध्ये आनंदवनम आणि कलियुगामध्ये मुक्तीवनम असे नाव आहे.
२. भगवान शिवांच्या मिरवणुकीतल्या मूर्तीला किराटमूर्ती असे संबोधले जाते. ह्या मूर्तीमध्ये ते पार्वती देवींसमवेत आहेत. हि मूर्ती अलौकिक आणि खूप सुंदर आहे. ह्या मूर्तीमध्ये ते शेतकऱ्याच्या रूपात आहेत. त्यांच्या खांद्यावर नांगर आहे.
३. इथे एक उठावदार चित्र आहे ज्यामध्ये श्री पार्वती देवी शेतकऱ्याच्या रूपातल्या भगवान शिवांची पूजा करत आहेत.
४. इथे अजून एक उठावदार चित्र आहे ज्यामध्ये श्री सूर्यदेव आणि शैव संत संबंधर भगवान शिवांची पूजा करत आहेत असे चित्रित केले आहे.
५. इथे एक अर्जुनाची मूर्ती आहे ज्यामध्ये अर्जुन पारधी (किराटमूर्ती) रूपातल्या भगवान शिवांची पूजा करत आहे.
६. हे स्थळ ६३ नायनमारांपैकी एक असलेल्या कारैक्कल अम्मैयार नायनमारांचे जन्मस्थान आहे.
७. पंगूनी ह्या तामिळ महिन्यात दहा दिवस सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात.
८. इथे श्री सूर्यदेवांना त्यांना मिळालेल्या शापापासून मुक्ती मिळाली.
९. श्री शनैश्वरांचे इथे एक स्वतंत्र देवालय आहे ज्यामध्ये त्यांच्या पत्नी त्यांच्यासमवेत आहेत.
१०. इथल्या क्षेत्र विनायकांना श्री संबंधर विनायक असे संबोधले जाते.
११. श्री सूर्यदेवांनी पुजीलेल्या शिव लिंगाला भास्कर लिंग असे संबोधले जाते.
१२. श्री विनायकांनी इथे संबंधरांना दहा वेळा हाक मारली म्हणून ह्या स्थळाला कोविलपथु असे पण संबोधले जाते.
मंदिराबद्दल माहिती:
हे पश्चिमाभिमुख मंदिर असून ह्याच्या प्रवेशावर एक सुंदर कमान आहे ज्यामध्ये वृषभारूढ भगवान शिव आणि पार्वती देवी आणि त्यांच्या आजूबाजूला श्री विनायक आणि श्री मुरुगन असे स्टुक्कोचे चित्र आहे. इथे एक पांच स्तरांचे राजगोपुर आहे. मंदिराला दोन परिक्रमा आहेत. राजगोपुराच्या पुढे ध्वजस्तंभ, बलीपीठ आणि नंदी आहेत. कारैक्कल अम्मैयार ह्या नायनमारांचे हे जन्मस्थान आहे. इथले शिव लिंग स्वयंभू असून पश्चिमाभिमुख आहे. पंगूनी ह्या तामिळ महिन्यामध्ये दहाव्या दिवसापासून दहा दिवस सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात. मंदिरापुढे मंदिराचे पवित्र तीर्थ आहे. अर्ध मंडप आणि महा मंडप डाव्या बाजूला आहेत. गाभाऱ्यातील शिव लिंगाला श्री पार्वतीश्वरर असे संबोधले जाते. असा समज आहे की हे शिव लिंग चारही युगात अस्तित्वात आहे. हे एका चांदीच्या मंडपात आहे आणि दिसायला खूप सुंदर आहे. गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूला सिंहाच्या डोक्यावर द्वारपाल आहेत.
कोष्ठ मूर्ती: श्री विनायक, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्मदेव, आणि श्री दुर्गादेवी. श्री चंडिकेश्वरांची मूर्ती त्यांच्या नेहमीच्या स्थानी आहे.
भगवान शिवांना इथे विविध नावांनी संबोधले जाते जसे: महालिंगम, ब्रह्मलिंगम (श्री ब्रह्मदेवांनी पूजा केलेले लिंग), राजलिंगम (राजा अमरसेन ह्याने पूजा केलेले लिंग) आणि भास्कर लिंग (सूर्यदेवांनी पूजा केलेले लिंग).
परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती आणि देवालये आहेत: श्री विनायक, श्री वल्ली आणि श्री दैवानै ह्यांच्या समवेत श्री सुब्रमण्यम, श्री महालक्ष्मी, श्री लिंगोद्भवर, श्री दक्षिणामूर्ती, श्री चंडिकेश्वरर, शैव संत नालवर, नवग्रह, श्री भैरव, श्री सूर्यदेव, श्री चंद्रदेव, श्री दुर्गादेवी आणि ६३ नायनमार.
श्री अंबिकादेवींचे स्वतंत्र पश्चिमाभिमुख देवालय आहे. परिक्रमेमध्ये श्री शनीश्वरांचे स्वतंत्र देवालय आहे. इथल्या क्षेत्र विनायकांना श्री संबंधर विनायक असे संबोधले जाते. परिक्रमेमध्ये अजून पण मूर्ती आणि देवालये आहेत त्या अशा: श्री शिवगामींसमवेत श्री नटराज, श्री सोमस्कंद, श्री पिडारी अम्मन, श्री विशालाक्षींसमवेत श्री काशीविश्वनाथ आणि श्री किराटमूर्ती.
प्रार्थना:
१. विवाहातल्या अडचणींवर मात करण्यासाठी भाविक जन इथे श्री पार्वती देवींची पूजा करतात.
२. अपत्य प्राप्तीसाठी भाविक जन इथे श्री पार्वती देवींची पूजा करतात.
३. अपत्यांना ज्ञानप्राप्ती आणि शिक्षणामध्ये प्रगती व्हावी म्हणून भाविक जन इथे प्रार्थना करतात.
पूजा:
नियमित दैनंदिन पूजा, प्रदोष पूजा तसेच मासिक आणि साप्ताहिक पूजा केल्या जातात.
मंदिरात साजरे होणारे महत्वाचे सण:
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): भातशेतीचा वसंतोत्सव
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै
पांगूनी (मार्च-एप्रिल): उत्तरा फाल्गुनी नक्षत्र दिवशी उत्सव
मंदिराच्या वेळा: सकाळी ७ ते दुपारी १२, दुपारी ४ ते रात्री ८.३०
मंदिराचा पत्ता:
श्री पार्वतीश्वरर मंदिर,
ऍट पोस्ट थिरुथेलीचेरी (कोविलपथु),
कारैक्कल,
तामिळ नाडू ६०९६०२
दूरध्वनी: +९१-४३६८२२१००९, +९१-९७८६६३५५५९
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment