Sunday, December 21, 2025

थिरुवेट्टिकुडी (कारैक्कल) येथील श्री थिरुमेनीअळगर मंदिर / श्री सुंदरेश्वरर मंदिर

हे मंदिर कारैक्कल पासून ९ किलोमीटर्स वर, थिरुवारुर पासून ४९ किलोमीटर्स वर, नागपट्टीनं पासून २९ किलोमीटर्स वर आणि मयीलादुथुराई पासून ३७ किलोमीटर्स वर आहे. ह्या कावेरी नदीच्या दक्षिण काठावरील पाडळ पेथ्र स्थळाची स्तुती शैव संत संबंधर ह्यांनी गायली आहे. म्हणून हे मंदिर सातव्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. ह्या स्थळाला पूर्वी कोविलमेडु असे नाव होते. चोळा साम्राज्याच्या राजांनी ह्या मंदिराचे दगडी बांधकाम केले आणि विजयनगर साम्राज्याच्या राजांनी ह्याचा विस्तार केला. भगवान शिव ह्या मंदिरामध्ये एका पारध्याच्या रूपांत आले. म्हणून ह्या स्थळाला थिरुवेट्टिकुडी (तामिळ मध्ये वेडन म्हणजे पारधी आणि कुडी म्हणजे गाव). श्री पार्वती देवींनी इथे एका कोळिणीच्या रूपांत जन्म घेतला. म्हणून ह्या स्थळाला अंबिकापूरम असे पण नाव आहे. ह्या स्थळाची काही ऐतिहासिक नावे अशी आहेत - पुन्नागवनम, देवकोडीपूरम, अंबिकापूरम.

मूलवर: श्री सुंदरेश्वरर, श्री थिरुमेनी अळगर, श्री वेदमूर्ती
देवी: श्री शांतनायकी, श्री सौंदर्यनायकी
पूजा / आगम: कारण आगम
क्षेत्र वृक्ष: पुन्नाग वृक्ष
पवित्र तीर्थ: देव तीर्थ, चंद्र तीर्थ, पुष्करिणी तीर्थ आणि समुद्र
वर्तमान नाव: थिरुवेट्टिकुडी

क्षेत्र पुराण:

१. ह्या पुराणाचा उल्लेख महाभारतामध्ये आहे. जेव्हा कौरव-पांडव मधलं युद्ध अनिवार्य झालं, तेव्हां व्यास ऋषींनी अर्जुनाला भगवान शिवांचं ध्यान करून पाशुपातास्त्र प्राप्त करून घेण्याचा सल्ला दिला. अर्जुन इथे आला आणि त्याने तपश्चर्या चालू केली. जेव्हां दुर्योधनाला अर्जुनाच्या तपश्चर्येबद्दल माहित झालं तेव्हां त्याने अर्जुनाच्या तपश्चर्येमध्ये व्यत्यय आणण्यासाठी मूखासूर नावाच्या असूराला ह्या ठिकाणी धाडलं. मूखासूर एका डुक्कराच्या रूपांत इथे आला आणि त्याने अर्जुनाच्या तपश्चर्येमध्ये व्यत्यय आणण्यास चालू केलं. अर्जुनाने असुरावर बाण सोडला. त्याचवेळी भगवान शिव, श्री पार्वती देवी आणि श्री मुरुगन पारधी, पारध्याची पत्नी आणि पारध्याचा पुत्र अशा रूपांत तर चार वेद त्यांच्याबरोबर चार श्वानांच्या रूपांत तेथे आले आणि भगवान शिवांनी पण असूरावर म्हणजेच डुक्करावर बाण सोडला. पारध्याच्या रूपांतील भगवान शिव तसेच अर्जुन ह्या दोघांनी ह्या शिकारावर अधिकार सिद्ध केला त्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. शेवटी भगवान शिव आपल्या मूळ रूपांत आले. त्यांनी आपले पाशुपातास्त्र अर्जुनाला देण्याचे ठरवले. पण पार्वती देवींनी अर्जुनाच्या पात्रतेबद्दल शंका व्यक्त केली. तेव्हा भगवान शिवांनी सांगितले कि अर्जुनाच्या हातावर मत्स्यरेखा आहे आणि म्हणून तो हे अस्त्र प्राप्त करण्यासाठी पात्र आहे. जेव्हा अर्जुनाने पार्वती देवींना आपल्या हाताचा पंजा दाखवला तेव्हा पार्वती देवींना त्याच्या पात्रतेची खात्री झाली. त्यानंतर भगवान शिवांनी अर्जुनाला पाशुपातास्त्र प्रदान केलं. अर्जुनाच्या विनंतीवरून भगवान शिव इथे स्वयंभू लिंगाच्या रूपांत राहिले. मासी ह्या तामिळ महिन्यामध्ये माघ नक्षत्राच्या दिवशी हि घटना नाट्यरूपात सादर केली जाते.

२. एकदा कैलासावर श्री पार्वती देवींनी भगवान शिवांना बोलून दाखवलं की त्यांच्या मदतीशिवाय म्हणजेच पार्वती देवींच्या मदतीशिवाय भगवान शिव जगाचं रक्षण करू शकत नाहीत. भगवान शिवांना जाणवलं की पार्वती देवींना अभिमान झाला आहे आणि म्हणून त्यांना शिक्षण देण्यासाठी म्हणून त्यांनी पार्वती देवींना पृथ्वीवर एका कोळ्याच्या घरात जन्म घेण्याचा शाप दिला. त्यांचा पार्वती देवींवरचा विश्वास परत पूर्ववत व्हावा म्हणून त्यांनी पार्वती देवींना प्रखर तपश्चर्या करण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे पार्वती देवींनी पृथ्वीवर कोळ्याच्या घरी जन्म घेतला आणि त्या भगवान शिवांच्या कट्टर भक्त बनल्या. त्यांनी भगवान शिवांच्या आज्ञेनुसार प्रखर तपश्चर्या केली आणि कोळी रूपात आलेल्या भगवान शिवांशी विवाह केला. ह्या घटनेच्या स्मृत्यर्थ इथला कोळी समाज मासी ह्या तामिळ महिन्यामध्ये कडलडू हा उत्सव साजरा करतात. ह्या उत्सवामध्ये भगवान शिवांच्या मूर्तीची जावई ह्या नात्याने मिरवणूक काढली जाते.

३.  स्थळ पुराणानुसार जेव्हा शैव संत संबंधर ह्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी समुद्रातून आले त्यांना समुद्राच्या तीरावरील वाळूच्या प्रत्येक कणामध्ये शिव लिंगाचे दर्शन झाले. त्यांना वाळूवर पाय ठेवणे योग्य वाटले नाही म्हणून त्यांनी समुद्रातुनच शिवांना नमस्कार करून त्यांची स्तुती गायली.

ह्या मंदिरात ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

श्री पार्वती देवी, देव, विश्वामित्र ऋषी, अय्याडिगळ काडवरकोन नायनार, अर्जुन, राजा अन्नवर्त. 

वैशिष्ट्ये:

१. ह्या मंदिरात भगवान शिवांची एक मूर्ती आहे ज्यामध्ये भगवान शिव एका पारध्याच्या रूपांत असून त्यांनी हातात धनुष्य बाण घेतले आहे, आणि त्यांच्या बरोबर श्री पार्वती देवी कोळिणीच्या रूपात डोक्यावर एक मडकं घेऊन आहेत, श्री मुरुगन हातात धनुष्यबाण घेऊन आहेत आणि चार वेद चार श्वानांच्या रूपात आहेत. अशी मूर्ती बाकी कुठल्या मंदिरात दिसत नाही.

२. भगवान शिव आणि श्री मुरुगन ह्या दोघांनी हातात धनुष्य बाण घेतले हे दृश्य खूप दुर्मिळ आहे.

३. ह्या मंदिरात एका देवालयात श्री मुरुगन ह्यांना चार हात आहेत. ते त्यांच्या पत्नींसमवेत म्हणजेच वल्ली आणि दैवानै समवेत आहेत.

४. इथे श्री पुन्नागवननाथर ह्यांच्यासमोर शैव संत संबंधर आणि श्री शनैश्वर आहेत. हे दृश्य दुर्मिळ आहे.

५. इथे अर्जुनाची हातात धनुष्यबाण घेतले आहेत अशी मूर्ती आहे.

६. ह्या मंदिरात भगवान शिव पारधी आणि कोळी अशा दोन्ही रूपांत कृपावर्षाव करतात. 

मंदिराबद्दल माहिती:

मंदिरामध्ये गाभारा, अंतराळ आणि अर्धमंडप आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून ह्याला पांच स्तरांचं राजगोपुर आहे आणि एक परिक्रमा आहे. इथले शिव लिंग स्वयंभू आहे. भगवान शिव इथे एका पारध्याच्या रूपात आहेत. राजगोपुरावर स्टुक्कोची सुंदर चित्रे आहेत. राजगोपुरापुढे मंडपामध्ये बलीपीठ, ध्वजस्तंभ आणि नंदी आहेत. इथले स्वयंभू लिंग रुद्राक्ष मंडपामध्ये चौकोनी चौथऱ्यावर आहे. आणि ते जरा उंच आहे. 

कोष्ट मूर्ती: श्री दक्षिणामूर्ती, श्री दुर्गादेवी

परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती आणि देवालये आहेत: श्री विनायक, श्री सुब्रह्मण्य, श्री पून्नैवननाथर (श्री पुन्नागवननाथर), श्री गजलक्ष्मी, श्री शास्ता, शैव संत नालवर, श्री भैरव, श्री सूर्य आणि श्री चंद्र. उत्सव मूर्ती अशा आहेत: धनुष्य बाण हातात धरलेले भगवान शिव, श्री पार्वती देवी कोळिणीच्या रूपात डोक्यावर एक मडके घेऊन, हातात धनुष्य बाण धरलेले श्री मुरुगन, चार श्वानांच्या रूपात वेद. 

इथे अर्जुनाची हातात धनुष्य बाण घेतलेली मूर्ती आहे. ह्या मूर्तीची मिरवणूक काढली जाते. तसेच श्री सोमस्कंदर आणि श्री प्रदोष नायकर ह्यांच्या मूर्ती आहेत. श्री अंबिका ह्यांचे एक स्वतंत्र दक्षिणाभिमुखी देवालय आहे. श्री मुरुगन ह्यांना चार हात आहेत. ते त्यांच्या पत्नींसमवेत म्हणजेच श्री वल्ली आणि दैवानै ह्यांच्या समवेत कृपावर्षाव करतात. प्रकारामध्ये म्हणजेच परिक्रमेमध्ये श्री पून्नैवननाथर (श्री पुन्नागवननाथर) ह्यांचे स्वतंत्र देवालय आहे. गाभाऱ्यासमोर श्री शनैश्वर आणि शैव संत संबंधर ह्यांच्या मूर्ती आहेत. प्रकारामध्ये पुढील मूर्ती आहेत: श्री नटराज, श्री सिद्धी विनायक, श्री पूर्णादेवी आणि श्री पुष्कला देवींसमवेत श्री अय्यप्पा, श्री महालक्ष्मी, श्री चंडिकेश्वरर आणि नवग्रह.

प्रार्थना:

१. भाविकांचा असा समज आहे की इथे भगवान शिवांची प्रार्थना केल्याने ग्रहांच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्ती मिळते. 

२. विभक्त दंपती पुनर्मीलनासाठी इथे श्री पार्वती देवींची प्रार्थना करतात.

३. भाविक जन इथे सर्व इच्छांच्या पूर्तीसाठी, शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी तसेच अहंकारावर विजय मिळविण्यासाठी इथे प्रार्थना करतात. 

पूजा:

कारण आगमानुसार इथे रोज चार पूजा केल्या जातात. नियमित प्रदोष पूजा केल्या जातात. 

मंदिरात साजरे होणारे महत्वाचे सण:

मासी (फेब्रुवारी-मार्च): तीन दिवसांचा मघा नक्षत्र उत्सव आणि महाशिवरात्री
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई

मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते दुपारी १२, संध्याकाळी ४ ते संध्याकाळी ८

मंदिराचा पत्ता

श्री थिरुमेनीअळगर मंदिर / श्री सुंदरेश्वरर मंदिर,
थिरुवेट्टिकुडी (कारैक्कल),
पॉंडीचेरी,
तामिळनाडू ६०९६०९

दूरध्वनी: +९१-४३६८२६५२९३/२६५६९१, +९१-९८९४०५१७५३

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment