हे अष्टविराट्ट स्थळांपैकी एक आहे. मार्कंडेय ऋषींना वाचविण्यासाठी भगवान शिवांनी यमराजाची हत्या केली ह्या कथेशी निगडित हे स्थळ आहे.
हे मंदिर श्री अमृतघटेश्वरर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. मयीलादुथुराई-कारैक्कल मार्गावर मयीलादुथुराई २१ किलोमीटर्स वर, कारैक्कलपासून २२ किलोमीटर्स वर तर कुंभकोणम पासून ५५ किलोमीटर्स वर हे मंदिर स्थित आहे.
हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. शैव संत अप्पर आणि सुंदरर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. म्हणूनच हे मंदिर सातव्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. मंदिराचे वर्तमान बांधकाम साधारण २००० वर्षे जुनं आहे. चोळा साम्राज्याच्या राजांनी ह्या मंदिराचे दगडी बांधकाम करून जीर्णोद्धार केला. कालांतराने ह्या मंदिराचा विस्तार आणि जीर्णोद्धार पांड्या आणि विजयनगर साम्राज्याच्या राजांनी केला. ह्या मंदिरातल्या शिलालेखांमध्ये चोळा, पांड्या आणि विजयनगर साम्राज्याच्या राजांनी मंदिरासाठी केलेली कामे आणि दिलेल्या देणग्यांचा उल्लेख आहे. तसेच नाट्टूकोट्टै चेट्टीयारांनी केलेल्या योगदानांचे पण उल्लेख आहेत. हे शक्तीपीठांपैकी एक पीठ समजलं जातं.
मूलवर: श्री अमृतघटेश्वरर
देवी: श्री अभिरामी अम्मन
उत्सव मूर्ती: श्री कालसंहारमूर्ती
क्षेत्र वृक्ष: बिल्व, गुलाबी चमेली (तामिळ मध्ये पिंजलम किंवा जादी मल्ली)
पवित्र तीर्थ: अमृत पुष्करिणी, गंगा तीर्थ, शिव गंगा तीर्थ, मार्कंडेय तीर्थ आणि कला तीर्थ
पुराणिक नाव: थिरुक्कडैयुर, बिल्ववनम, पिंजलमवनम
वर्तमान नाव: थिरुक्कडैयुर
जिल्हा: नागपट्टीनं, तामिळ नाडू
क्षेत्र पुराण:
१. श्री ब्रह्मदेव एकदा भगवान शिवांकडून ज्ञानोपदेश घेण्यासाठी कैलासावर गेले. भगवान शिवांनी त्यांना काही बिल्व पत्राची बीजे दिली आणि सांगितलं की हि बीजे ज्या ठिकाणी एका प्रहराच्या आत अंकुरित होऊन त्याचा वृक्ष होईल अशा ठिकाणी ते उपदेश देतील. जेव्हा श्री ब्रह्मदेव ह्या ठिकाणी आले त्यावेळी ती बीजे एका प्रहराच्या आत अंकुरित होऊन त्याचा वृक्ष बनला. भगवान शिवांनी श्री ब्रह्मदेवांना इथे उपदेश दिला. ह्या स्थळाला बिल्ववनम असं म्हणतात आणि शिव लिंगाला बिल्ववननाथर असं संबोधलं जातं.
२. पुराणानुसार भगवान शिवांनी समुद्र मंथनामध्ये एक अमृत कलश देवांना दिला. पण अमृत प्राशन करण्याच्या आधी देव श्री गणेशांची पूजा करण्यास विसरले. म्हणून श्री गणेशांनी अमृत कलश घेतला आणि ह्या स्थळी लपवून ठेवला. पण हा कलश खुप खोल रुतला आणि तो बाहेर काढता आला नाही. कालांतराने ह्या कलशाचे शिवलिंगामध्ये रूपांतर झाले आणि त्याचे नाव श्री अमृतघटेश्वरर असे झाले.
३. मृकण्डु ऋषी आणि त्यांची पत्नी मरुद्मति ह्यांनी ह्या ठिकाणी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येचं फळ म्हणून भगवान शिवांच्या आशीर्वादाने त्यांना एक पुत्र झाला ज्याचं भाकीत असं होतं की तो अतिशय थोर असेल पण त्याचं आयुष्य मात्र अवघं १६ वर्षेच मर्यादित राहील. जेव्हां मार्कंडेयांना त्यांच्या प्रारब्धाचं ज्ञान झालं त्यावेळी ते विविध शिव स्थळांच्या तीर्थयात्रेला निघाले. ते जेव्हां इथे आले त्यावेळी ते त्यांच्या तीर्थयात्रेतलं १०८व्व स्थळ होतं आणि तो दिवस त्यांच्या आयुष्यातल्या शेवटचा दिवस होता. ते जेव्हां भगवान शिवांची पूजा करत होते त्यावेळी यमराज त्यांचं आयुष्य घ्यायला आले. जेव्हां यमराजांनी यमपाश मार्कंडेयांकडे फेकला तेव्हां त्याने शिव लिंगाला पण आच्छादित केले. पुराणामध्ये असा उल्लेख आहे कि त्यावेळी भगवान शिव शिवलिंगातून कालसंहार रूपांत बाहेर आले आणि त्यांनी त्यांच्या त्रिशुळाने यमराजाचा नाश केला. त्यांनी मार्कंडेयांना आशीर्वाद दिला कि ते आजन्म १६ वर्षांचेच राहतील. यमराजांचा वध झाल्याने पृथ्वीवर मृत्यू होण्याचे थांबले. तेव्हां भूदेवींनी भगवान शिवांकडे ह्याबद्दल तक्रार केली. भगवान शिवांनी ह्या ठिकाणी यमराजांना पुनर्जीवित केले.
४. जेव्हा आपण कालसंहार मूर्तीचे यमराजांशिवाय दर्शन घेतो तेव्हां त्या दर्शनाला संहार दर्शन असं म्हणतात आणि जेव्हां यमराजांसमवेत कालसंहारमूर्तीचे दर्शन घेतले जाते त्या दर्शनाला सजीव दर्शन म्हणतात (तामिळ मध्ये ऊइरपित्त दर्शन).
५. समुद्र मंथनातून बाहेर आलेले अमृत आपल्याला मिळावे ह्यासाठी भगवान विष्णूंना भगवान शिवांची पूजा करावयाची होती. पूजा करण्यासाठी अलंकार काढून ठेवणे आवश्यक असते. म्हणून भगवान विष्णूंनी आपले अलंकार काढून ठेवले. ह्या अलंकारांतून अंबिका देवी अभिरामी रूपांत प्रकट झाल्या. असा समज आहे की भगवान विष्णूंच्या अलंकारांत महालक्ष्मी देवींचा वास असतो. भगवान विष्णूंच्या अलंकारांतून अंबिका प्रकट झाल्या म्हणून इथे भगवान विष्णूंना इथे अंबिकांची माता असे पूजिले जाते.
६. एकदा अभिरामी देवींचा कट्टर भक्त सुब्रमण्य ह्याने तंजावूरच्या सरभोजी महाराज ह्या मराठा साम्राज्याच्या राजांना त्या दिवशी पौर्णिमा आहे असे सांगितले पण वस्तुतः त्या दिवशी अमावस्या होती. त्यावेळी सुब्रमण्य अभिराम देवींच्या ध्यानामध्ये मग्न होता. सरभोजी महाराजांना राग आला आणि त्यांनी सुब्रमण्यला त्या दिवशी पौर्णिमा असे सिद्ध करण्यास सांगितले आणि तसे त्याने केले नाही तर त्यास मृत्युदंडाला सामोरं जायला लागेल असं सांगितलं. सुब्रमण्य, ज्याला अभिरामीभट्टर असे पण म्हणले जाते, त्याने स्वतः रचलेले अभिरामी अंतादी हे स्तोत्र गायला चालू केले. ह्या स्तोत्रामध्ये पहिल्या कडव्याचे शेवटचे अक्षर दुसऱ्या कडव्याचे पहिले अक्षर बनते. ह्या स्तोत्रामध्ये १०० कडवी आहेत. जेव्हां सुब्रमण्य ७९व्व कडवं गात होता त्यावेळी अभिरामी देवींनी आपल्या एका कानातील कुंडले काढून ती आकाशात फेकली आणि ती आकाशात पूर्ण चंद्रासारखी भासू लागली. आणि त्यामुळे तो दिवस पौर्णिमा भासू लागला. म्हणून थै ह्या तामिळ महिन्याची अमावस्या इथे खूप थाटामाटात साजरी केली जाते.
७. कुंगिलिया कलय नायनार हे ६३ नायनमारांपैकी एक होते. त्यांचं वास्तव्य ७व्या शतकामध्ये होतं. संबंधर, अप्पर, सिरूथोंडर आणि नीलनक्कर ह्या नायनमारांचं त्यांनी आतिथ्य केलं होतं. त्यांचा जन्म थिरुक्कडैयुर येथे झाला आणि त्यांनी ह्या मंदिरामध्ये पौरोहित्य केलं होतं. ते भगवान शिवांना कुंगिलिया नावाचा धूप अर्पण करायचे म्हणून त्यांना कुंगिलिया नायनार असं संबोधलं जातं. भगवान शिवांनी त्यांच्या भक्तीची परीक्षा घेण्याचे ठरवले. भगवान शिवांनी त्यांना त्यांची सर्व संपत्ती शिव भक्तांच्या सेवेमध्ये खर्च करावयास लावली. शिव भक्तांची सेवा करण्यामध्ये त्यांची सर्व स्थावर मालमत्ता पण खर्च झाली. एक वेळ तर आपल्या कुटुंबाला पोसण्यासाठी त्यांना सोन्याचं मंगळसूत्र विकायला लागलं. एकदा त्यांच्याकडे भगवान शिव एका व्यापाराच्या वेषामध्ये येऊन एक धुपाची पूर्ण पोती विकत घ्यायला लावली. त्या वेळेस कुंगिलिया नायनार ती धुपाची पोतीची किमती एवढे पैसे मिळविण्यासाठी आपल्या बायका मुलांना उपाशी ठेवणे भाग पडले. त्यांच्या पत्नीने भगवान शिवांकडे मदतीची प्रार्थना केली. भगवान शिवांनी तिला स्वप्नामध्ये वचन दिलं की ते दुसऱ्या दिवशी त्यांची सर्व संपत्ती पूर्ववत करतील. त्यांची पत्नी दुसऱ्यादिवशी जेव्हां जागी झाली त्यावेळी त्यांचं घर सर्व संपत्तीने भरलेलं होतं. भगवान शिव कुंगिलिया नायनार ह्यांच्या समोर प्रकट झाले आणि त्यांनी त्यांना आशीर्वाद दिले.
८. करी नायनार हे ४७व्वे नायनार होते. त्यांचा जन्म थिरुक्कडैयुर येथे झाला. ते वैदिक आणि संस्कृत पंडित होते. त्यांनी भगवान शिव आणि त्यांच्या भक्तांची खूप सेवा केली. त्यांच्या निस्वार्थी भक्तीचे फळ म्हणून त्यांना मोक्ष प्राप्त झाला.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री ब्रह्मदेव, श्री यमदेव, श्री दुर्गादेवी, वासुकी, अगस्त्य ऋषी, पुलस्ती ऋषी, मार्कंडेय ऋषी, सप्त मातृका आणि शैव संत अप्पर आणि संबंधर.
वैशिष्ट्ये:
१. मूलवरच्या मागे आपल्याला अजून एक शिव लिंग बघायला मिळते.
२. तामिळ नाडू मध्ये श्री विनायकांची सहा स्थळं आहेत. हे त्यातील तिसरं स्थळ आहे.
३. हे ५२ शक्तिपीठांपैकी एक पीठ समजलं जातं.
४. ह्या मंदिरामध्ये श्री पार्वती देवी आणि त्यांच्या मांडीवर श्री मुरुगन अशी एक मूर्ती आहे. ह्या मूर्तीमध्ये श्री पार्वती देवींचे नाव श्री गुहांबिका असे आहे.
५. श्री गणेश ह्यांनी त्यांच्या सोंडेवर अमृत कलश धरलेला आहे अशी मूर्ती आहे.
६. चिदंबरम मंदिरासारखंच इथे पण गाभाऱ्याच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर एक धातूचं यंत्र आहे.
७. मार्कंडेय ऋषींनी श्री यमदेवांपासून वाचण्यासाठी ज्या १०८ शिव मंदिरांमध्ये पूजा केली त्यापैकी हे एक मंदिर आहे.
८. श्री यमदेवांच्या पाशाचा वण शिव लिंगावर दिसतो.
९. इथे श्री पार्वती देवी ह्या लहान मुलीच्या रूपात चित्रित केल्या आहेत. इथे त्यांचे नाव श्री बालांबिका असे आहे.
१०. श्री यमदेवांच्या भयापासून मुक्त होण्यासाठी जी सहा स्थळं आहेत ती अशी - थिरुक्कडैयुर, थिरुविळीमलै, थिरुवैकुडी, थिरुवेंगाडू, थिरुकैकावूर, थिरुवंचिअम
११. मार्कंडेय ऋषींच्या शिवपूजेसाठी भगवान शिवांनी गंगा इथे आणली. मंदिराच्या जवळ एक विहीर आहे ज्यामध्ये गंगेचं पाणी आहे असा समज आहे. ह्या विहिरीतलं पाणी फक्त अभिषेकासाठी वापरलं जातं.
१२. इथे एक भव्य कालसंहार मूर्ती आहे. भगवान शिवांनी कालसंहार रूपामध्ये मार्कंडेयांचं यमदेवांपासून रक्षण केलं. ह्या मूर्तीमध्ये भगवान शिवांचा डावा पाय आदिशेषांवर आहे आणि त्यांचं त्रिशूल त्यांच्या पायापाशी असलेल्या यमदेवांच्या दिशेने आहे. बाजूला एक मूर्ती आहे ज्यामध्ये भूतगण यमदेवांवर पाश टाकून त्यांना ओढत आहेत. यमदेवांची मूर्ती एका धातूच्या फळीने आच्छादित आहे. ही फळी फक्त पूजेच्या वेळेस काढली जाते.
१३. श्री पार्वती देवींना इथे श्री सरस्वती आणि श्री लक्ष्मीदेवींसमवेत एका लहान मुलीच्या रूपामध्ये चित्रित केले आहे. इथे त्यांचे नाव श्री बालांबिका आहे.
१४. इथल्या शिव लिंगावर एक वण आहे जो फक्त अभिषेक करताना दिसतो. असा समज आहे की हा वण यमदेवांनी मार्कंडेय ऋषींवर फेकलेल्या पाशाचा आहे. मार्कंडेय ऋषींनी त्यावेळी शिव लिंगाला पकडून ठेवलं होतं.
१५. असा समज आहे की ह्या स्थळामध्ये सिद्धांचा वास होता उदारहर्णार्थ पांम्बट्टी सिद्धर.
मंदिराबद्दल माहिती:
ह्या पश्चिमाभिमुख मंदिराला पांच परिक्रमा आहेत आणि सात स्तरांचं राजगोपुर आहे. मंदिराचे क्षेत्र साधारण ११ एकर्स व्यापलेलं आहे. पूर्वेला पांच स्तरांचं राजगोपुर आहे. आतल्या परिक्रमेच्या प्रवेशाला अजून एक गोपुर आहे. राजगोपुरानंतर लगेच डाव्या बाजूला बाहेरील परिक्रमा आहेत.
इथे एक १०० स्तंभांचा मंडप आहे. गाभाऱ्यामध्ये गाभारा, अंतराळ, अर्ध मंडप आणि महा मंडप आहेत. इथलं शिव लिंग स्वयंभू आहे. ते पश्चिमाभिमुख असून थोडं मोठं आहे. गाभारा लिंगाच्या आकाराचा आहे. शिव लिंगावर मार्कंडेयांचं आयुष्य घ्यायला आलेल्या यमराजांनी मार्कंडेयांवर फेकलेल्या पाशाचा वण आहे. हा वण फक्त अभिषेकाच्या वेळेसच दिसतो. जेव्हा हे शिव लिंग आपण जवळून बघतो तेव्हां प्रतिबिंबामध्ये अजून एक शिव लिंग दिसतं.
कोष्ट मूर्ती: श्री विनायक, श्री दक्षिणामूर्ती, श्री भिक्षाटनर, श्री ब्रह्मदेव आणि श्री दुर्गादेवी. श्री चंडिकेश्वरर त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी आहेत.
इथले क्षेत्र वृक्ष, पिंजलम, २००० वर्षे जुनं आहे. ह्या झाडाला वर्षभर फुले येतात आणि हि फुले भगवान शिवांच्या पूजेसाठी वापरली जातात.
श्री कालसंहारमूर्ती हे उत्सव मूर्ती आहेत. महामंडपाच्या उजव्या बाजूला त्यांचे दक्षिणाभिमुखी देवालय आहे. त्यांचं मुख उग्र आहे, त्यांचा उजवा पाय यमराजांच्या दिशेने उंचावलेला आहे आणि त्यांचे त्रिशूल यमराजांवर रोखले आहे. डाव्या बाजूला भूतगण यमराजावर पाश टाकून त्याला ओढत आहेत असे दृश्य चित्रित केले आहे. कालसंहार मूर्तीच्या जवळ मार्कंडेय ऋषींची मूर्ती आहे. कालसंहार मूर्तीमधला खालचा भाग ज्यामध्ये ते यमराजाची हत्या करत असे चित्रित केले आहे, तो भाग आच्छादित असतो. फक्त आरतीच्या वेळेस आच्छादन काढलं जातं. कालसंहारमूर्तींची यमराजांसमवेत मूर्ती हे अनुग्रह-मूर्ती समजली जाते.
गाभाऱ्याच्या आत उजव्या बाजूच्या भिंतीवर एक यंत्र आहे. ह्या यंत्राला थिरुक्कडैयुर रहस्य असे नाव आहे. असा समज आहे की भाविकांनी प्रथम श्री पापकारेश्वर, मग भगवान शिव आणि शेवटी यंत्राचे दर्शन घ्यावे. असे केल्याने आयुष्याची वृद्धी होते. इथे श्री कालसंहार मूर्तींच्या समोर यमराजांची त्यांच्या वाहनासमवेत मूर्ती आहे. ह्या मूर्तीमध्ये ते शिव पूजा करत आहेत असे चित्रित केले आहे.
इथे श्री गणेश, श्री मुरुगन त्यांच्या पत्नी वल्ली आणि दैवानै समवेत, श्री सोमस्कंद, श्री नटराज त्यांच्या पत्नी श्री शिवगामी समवेत. परिक्रमेमध्ये श्री महालक्ष्मी, श्री बिल्ववनेश्वरर, श्री दक्षिणामूर्ती, श्री भिक्षाटनर, श्री दुर्गा देवी, श्री अर्धनारीश्वरर, श्री भैरव आणि कोष्ठ मूर्ती आहेत.
ह्या मंदिरामध्ये नवग्रहांचे देवालय नाही. इथे श्री पापकारेश्वर ह्यांचे देवालय आहे ज्याची पूजा अगस्त्य ऋषींनी केली होती. तसेच इथे श्री पुण्यवरदनर ह्यांची मूर्ती आहे ज्यांची पूजा पुलस्ती ऋषींनी केली होती.
श्री मुरुगन ह्यांची सहा क्षेत्रे आहेत. तसेच श्री विनायकांची पण तामिळ नाडूमध्ये सहा क्षेत्रे आहेत. बाहेरील परिक्रमेमध्ये नंदिंच्या उजव्याबाजूला श्री गणेशांचे देवालय आहे. इथे त्यांचे नाव श्री कल्लवरण विनायक असे आहे. श्री विनायकांच्या सहा क्षेत्रांपैकी हे तिसरं क्षेत्र आहे. श्री गणेश त्यांच्या सोंडेमध्ये अमृत कलश वाहून नेत आहेत.
परिक्रमेमध्ये श्री पार्वती देवींचे देवालय आहे ज्यामध्ये त्यांच्या मांडीवर बाळ रुपातले श्री मुरुगन बसले आहेत. इथे श्री पार्वती देवींचे गुहांबिका असे नाव आहे.
श्री अंबिका देवी एका स्वतंत्र पूर्वाभिमुखी देवालयामध्ये आहेत. इथे ध्वजस्तंभ, बलीपीठ आणि त्यांचे वाहन सिंह आहे. हे देवालय नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यामध्ये आहे. इथे त्यांचे नाव श्री अभिरामी आहे. त्यांना चार हात असून दोन हात अभय आणि वरद मुद्रेमध्ये आहेत.
इथे एक पाचूचे (मरगद) लिंग एका सुरक्षित पेटित ठेवले आहे. सकाळच्या आणि संध्याकाळच्या पूजेसाठी ते बाहेर काढले जाते.
मंदिराच्या आवारात श्री विष्णूंचे पण देवालय आहे. ते श्री लक्ष्मी देवींसमवेत आहेत. इथे त्यांना श्री अमृतनारायण आणि श्री लक्ष्मी देवींना अमृतवल्ली असे संबोधले जाते.
इथे नवग्रहांचे देवालय नाही कारण ह्या स्थळामध्ये नवग्रहांना अधिकार नाही. श्री काळसंहारमूर्तींवरच नवग्रहांची पूजा केली जाते.
क्षेत्राचा महिमा:
पंगूनी ह्या तामिळ महिन्यामध्ये अश्विनी दिवस नक्षत्र दिवशी इथून जवळ असलेल्या थिरुक्कडैयुर मायनम् मधल्या श्री ब्रह्मपुरीश्वरर मंदिरामध्ये गंगा अवतरते. फक्त ह्या दिवशी भाविकांना ह्या विहिरीमध्ये स्नान करावयाची परवानगी आहे. बाकीच्या दिवशी ह्या विहीरीतले पाणी फक्त भगवान शिवांच्या अभिषेकासाठी वापरले जाते.
भगवान शिवांची पिंजलम फुलाने पूजा केल्यास ती पूजा १००८ वेळा पूजा केल्याच्या तुल्यबळ मनाली जाते.
पुराणानुसार प्रथम श्री पापकारेश्वरर आणि श्री पुण्यकारेश्वरर ह्यांची पूजा करावी अशी प्रथा आहे. असे केल्यास सर्व पापे नाश पावतात आणि पुण्य प्राप्ती होते.
६३ नायनमारांपैकी करी नायनार आणि कुंगीलिया कलय नायनार ह्यांनी इथे वास्तव्य केलं आणि त्यांना मुक्ती मिळाली. अभिरामी अंतादि रचणाऱ्या अभिरामीभट्टर ह्यांनी पण इथे वास्तव्य केलं.
प्रार्थना:
१. भाविक जन इथे आपला ६०व्वा वाढदिवस ज्याला षष्ठ्याब्दीपूर्ती म्हणतात तो साजरा करतात. तसेच ७०व्वा वाढदिवस ज्याला भीमारथी शांती, ८०व्वा वाढदिवस ज्याला शताभिषेक शांती आणि ९०व्वा वाढदिवस ज्याला कनकाभिषेक म्हणतात ते साजरे करतात.
२. भाविक जन इथे जीवनातले अडथळे दूर करण्यासाठी जन्म नक्षत्र शांती, आयुष्य होम, महामृत्युंजय होम करतात.
३. भाविक जन इथे वैभव, अपत्यप्राप्ती, विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी, ग्रहांच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्ती मिळविण्यासाठी आणि मनःशांतीसाठी विशेष पूजा करतात.
४. भाविक जन इथे दीर्घायुष्यासाठी कालसंहारमूर्तींची पूजा करतात तर सौभाग्यासाठी श्री अभिरामी देवींची पूजा करतात.
पूजा:
नित्य दैनंदिन पूजा, प्रदोष पूजा, तसेच पौर्णिमा, अमावस्या, इंग्लिश नववर्ष आणि तामिळ नववर्ष दिनी विशेष पूजा केल्या जातात.
मंदिरात साजरे होणारे काही महत्वाचे सण:
चित्राई (एप्रिल-मे): मघा नक्षत्र दिवशी उत्सव. १८ दिवसांचा यमसंहार उत्सव, ह्या उत्सवातील सहाव्या दिवशी कालसंहार मूर्तींची मिरवणूक निघते.
आडी (जुलै-ऑगस्ट): पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर उत्सव
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): स्कंदषष्ठी, अन्नाभिषेक
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्थिगई दीपम उत्सव, प्रत्येक सोमवारी १००८ शंखांचा अभिषेक, प्रदोष पूजा आणि पौर्णिमा पूजा
थै (जानेवारी-फेब्रुवारी): अमावास्येच्या दिवशी पूजा
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
पंगूनी (मार्च-एप्रिल): उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर उत्सव
मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते १, दुपारी ४ ते ९
मंदिराचा पत्ता:
श्री अमृतघटेश्वरर मंदिर,
थिरुक्कडैयुर,
तालुका: थरंगंपाडी
तामिळ नाडू ६०९३११
दूरध्वनि: +९१-४३६४२८७४२९
पुरोहिताचा संपर्क: श्री रविशंकर गुरुक्कल +९१-९७८८८४३४९१, +९१-९००३७६७८९८
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment