कुथालम हे मयीलादुथुराई-कुंभकोणम मार्गावर मयीलादुथुराईपासून १२ किलोमीटर्स वर आहे. कावेरी नदीच्या दक्षिण काठावर वसलेल्या ह्या पाडळ पेथ्र स्थळाची स्तुती शैव संत अप्पर, सुंदरर आणि संबंधर ह्यांनी गायली आहे. ह्या स्थळाचे पुराणिक नाव उथपवनम असे होते. येथील भिंतींवर असलेल्या कोरीव कामांमध्ये ह्या स्थळाचा उल्लेख चोळीश्वरं आणि थिरुथ्रूथी (म्हणजे बेट) असा आहे. पूर्वीच्या काळी हे कावेरी नदीवर एक बेट होतं. हे स्थळ पाचव्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. कालांतराने चोळा, पांड्या आणि विजयनगर साम्राज्याच्या राजांनी ह्याचा जीर्णोद्धार केला.
मूलवर: श्री उक्त वेदिश्वरर, श्री उथ वेदिश्वरर, श्री सोन्नवारू अरिव
देवी: श्री अमृत मुखांबिका, श्री परिमलनायकी, श्री अरुमपनवलमुलैयल
क्षेत्र पुराण: सुंदर तीर्थ, पद्म तीर्थ, वडकुळम आणि कावेरी नदी
क्षेत्र वृक्ष: कायीलै वृक्ष / पुथ्थल वृक्ष (मराठीमध्ये औदुंबर)
पुराणिक नाव: थिरुथ्रूथी, चोळीश्वरं
क्षेत्र पुराण:
१. पुराणानुसार श्री पार्वती देवींना एकदा पृथ्वीवर थिरुकोळंबम येथे गाय म्हणून जन्म घेण्याचा शाप मिळाला होता. ह्याचा आम्ही पूर्वीच्या लेखांमध्ये उल्लेख केला आहे. थिरुवाडुथुराई येथे श्री पार्वती देवींनी गायीच्या रूपात भगवान शिवांची पूजा केली आणि त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना मूळ रूपात आणलं. कुथालम येथे श्री पार्वती देवी भरत ऋषींच्या यज्ञामधे यज्ञकुंडातून एका बालिकेच्या रूपात प्रकट झाल्या. एथिरकोलपडी येथे भरत ऋषींनी भगवान शिवांना जामात म्हणून स्वीकारलं. थिरुवेलवीकूडी येथे विवाहयज्ञ संपन्न झाला. थिरुमनंचेरी येथे श्री पार्वती देवी आणि भगवान शिव यांनी वधुवर रूपामध्ये दर्शन दिलं. कुथालम म्हणजे ह्या ठिकाणी श्री पार्वती देवी यज्ञकुंडातून प्रकट झाल्या. त्यांची भगवान शिवांशी विवाह करण्याची इच्छा होती. म्हणून त्यांनीं कावेरी नदीच्या काठावर शिव लिंग स्थापून त्याची पूजा केली. भगवान शिव त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी विधिलिखितानुसार विवाह करण्याचं वचन दिलं. म्हणून इथे भगवान शिवांना सोन्नवारू अरिव (ज्यांनी आपलं वाचन पाळलं) असं संबोधलं जातं. जेव्हा श्री पार्वती देवी विवाहयोग्य झाल्या तेव्हा भरत ऋषींनी भगवान शिवांना त्यांच्या पुत्रीसाठी म्हणजेच श्री पार्वती देवींसाठी योग्य वर शोधण्याची विनंती केली. भगवान शिवांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि सांगितलं की ते स्वतः त्यांच्या पुत्रीशी विवाह करतील कारण त्यांची पुत्री साक्षात श्री पार्वती देवीच आहेत. त्यांनी श्री पार्वती देवींनी त्यांच्या यज्ञकुंडातून प्रकट होऊन त्यांची पुत्री बनण्याचं कारण पण सांगितलं. असा समज आहे की ह्या ठिकाणी विवाहाचा वाङ्निश्चय विधि साजरा झाला.
२. स्थळपुराणानुसार विवाहसमयी स्वर्गातून उक्थल वृक्ष इथे आणला गेला. त्या समयापासून हा क्षेत्र वृक्ष इथे आहे. ह्या ठिकाणी वाङ्निश्चय विधी ह्या वृक्षाच्या खाली साजरा झाला, म्हणून असा समज आहे कि ह्या वृक्षाखाली सध्या ज्या पादुका आहेत त्या भगवान शिव इथे ठेऊन गेले. असा समज आहे की असा उक्थल वृक्ष दुसरीकडे कुठेही नाही.
३. क्षेत्र पुराणानुसार शैव संत सुंदरर जेव्हां ह्या मंदिरात आले त्यावेळी ते आजारामुळे खूप अशक्त झाले होते. त्यांनी ह्यातून बाहेर पडण्यासाठी भगवान शिवांची स्तुती करून त्यांना प्रार्थना केली. भगवान शिवांनी त्यांना इथे पद्म तीर्थामध्ये स्नान करायला सांगितलं. स्नान केल्यावर ते बरे झाले. म्हणून ह्या तीर्थाला त्यांचे नाव दिले आहे. इथे सुंदरर ह्यांची मूर्तीपण आहे.
४. रुद्रशर्मा नावाचा भक्त इथून काशीला मुक्तीप्राप्त करण्यासाठी निघाला. हे स्थळ पण काशी एवढंच तुल्यबळ आहे हे समजाविण्यासाठी भगवान शिवांनी गुंडोधर नावाच्या आपल्या गणाला सर्प बनून रूद्रशर्माच्या काशीच्या प्रवासात व्यत्यय आणण्याची आज्ञा केली. रुद्रशर्माने गरुड मंत्र म्हणून त्या सर्पाला बेशुद्ध केले. त्या सर्पाला वाचविण्यासाठी भगवान शिव स्वतः गारुड्याच्या रूपात आले. जेव्हां रुद्रशर्माला ज्ञात झालं की हे गारुडी दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात भगवान शिव आहेत तेव्हां त्यांनी भगवान शिवांना नमस्कार करून आशीर्वाद मागितले. भगवान शिवांनी त्यांना ह्या स्थळाची महती सांगितली आणि ह्या स्थळी पूजा करून काशीला पूजा केल्याचंच फळ मिळतं असं पण सांगितलं.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री पार्वती देवी, श्री काळीदेवी, कश्यप ऋषी, अंगिरस ऋषी, गौतम ऋषी, मार्कंडेय ऋषी, वसिष्ठ ऋषी, पूलस्थि ऋषी, अगस्त्य ऋषी, श्री अग्निदेव, श्री वरुण, शिवाचार्य, श्री कादिरवनम (श्री सूर्यदेव).
वैशिष्ट्ये:
१. इथले शिव लिंग स्वयंभू आहे.
२. इथली श्री मुरुगन ह्यांची मूर्ती अलौकिक आहे कारण इथे त्यांचे वाहन त्यांच्या समोर आहे.
३. गाभाऱ्यावरचं विमान खूप सुंदर आहे आणि त्यावर सुंदर शिल्पे कोरलेली आहेत.
४. असा समज आहे की इथले क्षेत्र वृक्ष साऱ्या विश्वात अद्वितीय आहे.
५. इथल्या क्षेत्र वृक्षाखाली असलेल्या पादुका हे स्वतः भगवान शिव सोडून गेले असा समज आहे.
६. श्री अग्निदेवांनी त्यांच्यावर लागलेल्या आरोपाचं निरसन करण्यासाठी इथे पूजा केली.
७. इथून जवळ असलेल्या कादिरमंगलम ह्या स्थळी सूर्यदेवांनी वास्तव्य केलं आणि भगवान शिवांची पूजा केली म्हणून श्री सूर्यदेवांना इथे श्री कादिरवनम असं संबोधलं जातं.
मंदिराबद्द्ल माहिती:
हे पूर्वाभिमुख मंदिर असून ह्याला पांच स्तरांचं राजगोपुर आहे. ध्वजस्तंभ, नंदि आणि बलीपिठ हे क्षेत्र वृक्षाजवळ आहेत. इथले शिवलिंग स्वयंभू आहे.
कोष्टामध्ये पुढील मूर्ती आहेत: श्री गणेश, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर आणि त्यांच्या आजूबाजूला श्री ब्रह्मदेव आणि श्री विष्णू, अगस्त्य ऋषी, श्री भिक्षाटनर, श्री ब्रह्म आणि श्री दुर्गा देवी.
परिक्रमेमध्ये आपल्याला श्री थुनाईवन्थ-विनायकर (श्री विनायक जे आपल्या मातेला मार्गदर्शक म्हणून आले), श्री षण्मुख त्यांच्या पत्नींसमवेत त्यांच्या मोर ह्या वाहनावर आरूढ असलेले, श्री वळमपुरी विनायकर (श्री विनायक ज्यांची सोंड उजव्या बाजूला वळली आहे), श्री मुरुगन, श्री नटराज, श्री विश्वनाथ, सप्त ऋषी, ६३ नायनमार, पंचभूत लिंगे, नवग्रह, श्री मंगल शनीश्वरर, श्री भैरव, श्री महालक्ष्मी देवी, श्री सूर्य ह्यांच्या मूर्ती बघावयास मिळतात. गाभाऱ्याच्या मागे श्री पार्वती देवी आणि भगवान शिव ह्यांचे वधुवर पोषाखातले स्टुक्को चित्र आहे. असा समज आहे कि श्री पार्वती देवी भरत ऋषींनि केलेल्या यज्ञसमयी यज्ञकुंडातून प्रकट झाल्या. म्हणून हे स्थळ अशा आजूबाजूच्या स्थळांपैकी आहे जी स्थळे श्री पार्वती देवी आणि भगवान शिव ह्यांच्या विवाहाशी निगडित आहेत. ह्या मंदिरात श्री पार्वती देवींचे एक स्वतंत्र देवालय आहे जिथे त्यांना श्री अरुमपनवलमुलैयल अम्माई असं संबोधलं जातं. परिक्रमेमध्ये एक छोटं देवालय आहे जिथे त्यांना श्री परिमलनायकी असं संबोधलं जातं.
प्रार्थना:
१. भाविक जन इथे विवाह ठरण्यातल्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रार्थना करतात.
२. भाविक जन इथे त्वचारोग निवारणासाठी पवित्र तीर्थामध्ये स्नान करून भगवान शिवाची पूजा करतात.
पूजा:
दैनंदिन पूजा, पाक्षिक पूजा, मासिक पूजा तसेच प्रदोष पूजा नियमित केल्या जातात.
मंदिरात साजरे होणारे महत्वाचे सण:
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तिरं
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): सोमवार पूजा
मंदिराच्या वेळा: सकाळी ९ ते १२, संध्याकाळी ५.३० ते रात्री ८.३०
मंदिराचा पत्ता: श्री उक्थ वेदिश्वररस्वामि मंदिर, ऍट पोस्ट कुथालम, मयीलादुथुराई जिल्हा, तामिळ नाडू ६०९८०१
दूरध्वनी: +९१-४३६४२३५२२५, +९१-९४८७८८३८००
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment