ह्या मंदिराला श्री गोमुक्तीश्वरर मंदिर असं पण म्हणतात. हे कंजनूर च्या आसपासच्या सप्तस्थानांमधलं एक मंदिर आहे. मयीलादुथुराई-कुट्रालम-कुंभकोणम मार्गावर मयीलादुथुराईपासून २० किलोमीटर्स वर हे मंदिर आहे. थिरुवलंकाडूपासून खूप जवळ आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. शैव संत संबंधर, अप्पर आणि सुंदरर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. थिरूमुलर सिद्ध आणि शैव संत थिरुमळीगैनायनार ह्यांना इथे मुक्ती मिळाली. थिरुवाडुथुराई आदिनम हा जुना शिव मठ ह्या ठिकाणी आहे.
मूलवर: श्री गोमुक्तीश्वरर, श्री मासीलामणीश्वरर
देवी: श्री ओप्पीलमुलीयअम्माई, श्री अतुल्यकुजाम्बळ, श्री अभयगुजांबळ
क्षेत्र वृक्ष: पीपल वृक्ष (तामिळ मध्ये पडर अरासू)
पुराणिक नाव: नंदिनगर, नवकोटीसिद्धपूरम, अरसवनम, बोधीवनम, गोकळी-गोमुखी-पुरम
क्षेत्र पुराण:
१. एकदा कैलासावर भगवान शिव आणि श्री पार्वती देवी द्यूत खेळत होते. भगवान शिव खेळ हरले आणि श्री पार्वती देवी त्यावर हसल्या. ह्यामुळे भगवान शिवांना राग आला आणि त्यांनी श्री पार्वती देवींना गाय होऊन भूलोकावर फिरण्याचा शाप दिला. श्री पार्वती देवी खूप अस्वस्थ झाल्या आणि त्यांना आपल्या पतींपासून दूर जायला लागत आहे ह्याचं फार वाईट वाटलं. त्यांनी भगवान शिवांकडे क्षमायाचना केली त्याचबरोबर भगवान शिवांबरोबर पुनर्मीलन होण्याचा उपाय विचारला. भगवान शिवांनी त्यांना सांगितलं कि एका ठिकाणी त्या परत मूळ रूपात येतील आणि त्यांचं पुनर्मीलन होईल. श्री पार्वती देवी भूलोकात आल्या आणि त्या कावेरी नदीच्या दक्षिण काठावर पोचल्या. थिरुवाडुथुराई येथे त्यांना शिवलिंग दिसलं आणि त्यांना त्या शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करून पूजा करण्यास आरंभ केला. भगवान शिव त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी श्री पार्वती देवींना मूळ रूपात आणले आणि त्यांना आलिंगन दिलं. ह्या ठिकाणी भगवान शिवांनी गायीला मुक्ती दिली म्हणून ह्या स्थळाला श्री गोमुक्तिश्वरम असं म्हणतात तर भगवान शिवांना श्री गोमुक्तेश्वरर असं म्हणतात. ह्या स्थळाची माहिती पुराणांमध्ये अनेक प्रसंगामध्ये सांगितली आहे.
२. एकदा श्री पार्वतीदेवींनी भगवान शिवांना विचारलं की “सगळेजण तुमची भक्ती करतात कारण त्यांना तुमच्याकडून काहीतरी वरदान पाहिजे असतं, पण असं कोणी आहे का जे कुठलीही अपेक्षा न करता ते तुमची भक्ती करतात?” भगवान शिवांनी श्री पार्वती देवींना एका बिल्व वृक्षाखाली असलेले शिवलिंग दाखवले. तिथे एक माकड बिल्व वृक्षाची पाने तोडून ते खेळ खेळल्यागत शिवलिंगावर टाकत होतं. आणि तो दिवस शिवरात्रि होता. भगवान त्या माकडावर प्रसन्न झाले आणि त्याला चक्रवर्ती बनवलं आणि त्रैलोक्याचा राजा बनवलं. राजाने भगवानांना प्रार्थना केली कि त्याला माकडाचं मुख प्राप्त व्हावं आणि चित्त सतत भगवानांच्या ध्यानामध्ये असावं अशी इच्छा केली. भगवानांनी त्याची इच्छा मान्य केली आणि त्याला मुचुकुंद असे नाव दिले. एकदा मुचुकुंद राजा आपल्या आठ बांधवांसह श्री इंद्रदेवांना त्यांच्या वालासुराबरोबरच्या युद्धामध्ये मदत करण्यासाठी गेले आणि त्यामुळे इंद्रदेवांना विजय मिळाला. श्री इंद्रदेव मुचुकुंद राजावर प्रसन्न झाले आणि त्यांनी कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून मुचुकुंद राजाला त्याला हवे ते मागण्यास सांगितले. इंद्रदेव ह्या काळामध्ये सुख उपभोगण्यामध्ये रमले होते आणि म्हणून त्यांचं भगवान शिवांनी त्यांना दिलेल्या त्यागराज मूर्तीची उपासना करण्यामध्ये दुर्लक्ष झालं होतं. म्हणून भगवान शिवांनी मुचुकुंद राजाला इंद्रदेवांकडून त्यागराजाची मूर्ती मागण्याचा सल्ला दिला. इंद्रदेवांना ती मूर्ती कोणाला द्यायची नव्हती म्हणून त्यांनी त्या मूर्तीच्या हुबेहूब अजून सहा मूर्ती केल्या आणि त्या सर्व एकत्र ठेवल्या. त्या रात्री भगवान शिवांनी मुचुकुंद राजाच्या स्वप्नात येऊन त्याला इंद्रदेवांचा सहा मूर्ती करण्यामागचा हेतू सांगितला आणि मूळ मूर्ती कशी ओळखायची ह्याचेपण ज्ञान दिले. इंद्रदेवांनी मुचुकुंद राजाला त्या सात विडंग मूर्ती दाखवल्या आणि त्यातून मूर्ती निवडायची विनंती केली. भगवान शिवांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे मुचुकुंद राजाने मूळ मूर्तीच निवडली. त्यानंतर इंद्र देवांनी मुचकुंद राजाला सर्वच मूर्ती प्रदान केल्या. त्यागराजांची मूळ मूर्ती थिरुवारुर येथे स्थापन केली गेली. त्यानंतर मुचुकुंद राजाने उरलेल्या सहा मूर्ती सहा ठिकाणी स्थापित केल्या. त्यानंतर एके रात्री भगवान शिवांनी मुचुकुंद राजाला स्वप्नात येऊन त्याला थिरुवाडुथुराई इथे जाण्यास सांगितले आणि तिथून राज्य सांभाळण्याचा आदेश दिला. मुचुकुंदने भगवान शिवांनी सांगितल्याप्रमाणे केले आणि त्यामुळे ते महान राजा म्हणून प्रसिद्धी पावले.
३. इथल्या रथयात्रेतील मूर्तीचे नाव श्री अनैथूएरुंडनायकर (भगवान ज्यांनी आपल्या पत्नीला आलिंगन दिले) असे आहे. पण मूर्तीमध्ये ते पार्वती मातेला आलिंगन देत आहे असं दिसत नाही.
४. शैव संत संबंधर ह्यांनी आपल्या पित्यांसमवेत इथे वास्तव्य केलं. त्यांनी आपल्या पितांना त्यांच्या कडे संपत्ती नसल्याने भगवान शिवांची कृपा प्राप्त करण्यासाठी त्यांनी जो यज्ञ केला त्यामध्ये सहाय्य केलं. बलीपीठ जिथे भगवान शिवांनी त्यांना संपत्ती प्रदान केली ते मंदिरामध्ये अजून आहे. ह्या पीठाभोवती शिवगण आहेत.
५. नायनमारांपैकी एक नायनमार थिरुमळीगैथेवर ह्या मंदिरात भगवान शिवांची बराच काळ पूजा करत होते. काही गैरसमजुतीमुळे इथल्या राजाने थिरुमळीगैथेवर ह्यांना अटक करण्यासाठी सैनिक पाठवले. श्री अंबिका देवींच्या विनंती वरून भगवान शिवांनी नंदिंचं सैन्य पाठवून त्या सैनिकांना पळवून लावले. त्यानंतर सगळे नंदि एका नंदि मध्ये विलीन झाले आणि त्यातून एक भव्य नंदि तयार झाला. हा नंदि इथे मंदिरात बघायला मिळतो. ह्या नंदिंची प्रार्थना करणं हे खूप शुभ मानलं जातं. प्रदोषकाळी ह्या नंदिवर अभिषेक केला जातो.
६. शिवयोगींपैकी सुंदरनाथर नावाचे योगी एकदा कैलास पर्वतावरून अगस्त्य मुनींना भेटण्यासाठी दक्षिणेकडे आले. त्यांनी इथे एक धनगर मृत्युमुखी पडलेला बघितला. त्या धनगराच्या भोवती सगळ्या गायी उभ्या राहून रडत होत्या. त्या शिवयोगींनी आपल्या योगसामर्थ्याने त्या धनगराच्या शरीरात प्रवेश केला आणि गायींना घेऊन तो धनगराच्या घरी गेला. नंतर परत आपल्या स्थानी येऊन त्यांनी तपश्चर्या केली. हे शिवयोगी पुढे थिरूमुलर ह्या नावाने प्रसिद्ध झाले. त्यांनी तीन हजार दिव्य स्तोत्रे लिहिली आणि ह्या मंदिरामध्ये ते भगवानांमध्ये विलीन झाले.
७. भगवानांच्या उजव्या बाजूला श्री त्यागेश ह्यांची मूर्ती श्री कमलांबिका मातेसमवेत आहे. असा समज आहे कि भगवान शिवांनी नवकोटी सिद्धांना अष्ट-महासिद्धी शिकविल्या त्यामध्ये बोगर हे सिद्ध पण होते. इथे थिरुमळीगैदेवर आणि नमःशिवायमूर्तीस्वामीगल ह्यांची स्वतंत्र देवालये आहेत.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री पार्वती देवी, नवकोटी सिद्ध, बोगर सिद्ध, चेरामन (६३ नायनमारांपैकी एक), कोचेंगट चोळा राजा, विक्रम पांड्य राजा, श्री यमदेव, संत थिरूमुलर, थिरुमळीगैथेवर (६३ नायनमारांपैकी एक), शैव संत सुंदरर आणि संबंधर, मुचुकुंद चक्रवर्ती
वैशिष्ट्ये:
१. भगवान शिवांनी इथे महातांडव नृत्य केले. त्याचे नाव सुंदर नटनं असे आहे.
२. इथले क्षेत्र वृक्ष (पीपल वृक्ष) हे खूप जुने आहे. हे वृक्ष देवांचं प्रतीक आहे असं मानलं जातं. असा समज आहे की भगवान शिव ह्या वृक्षातून प्रकट झाले आणि त्यांनी देवांना आशीर्वाद दिले.
३. श्री विनायकांनी त्यांच्या मातेला इथे येण्यास सहाय्य केले.
४. इथे श्री पार्वती देवीं श्री गोरूपांबिका रूपात आहेत.
५. असा समज आहे की इथे बोगर सिद्ध ह्यांच्या समवेत नवकोटीसिद्धांनी तपश्चर्या केली. भगवान शिवांनी त्यांना अष्ट-महासिद्धींचं ज्ञान दिलं.
६. हे मंदिर विशेष मंदिर आहे कारण इथे चेरा राजा चेरामन पेरुमल, कोचेंगट चोळा राजा आणि पांड्या राजा विक्रम पांडियन ह्यांनी भगवान शिवांची उपासना केली.
७. श्री यमदेवांनी इथे भगवान शिवांची उपासना केली. भगवान शिवांनी त्यांना आशीर्वाद दिले आणि भगवानांचा वृषभ वाहन बनण्याचं वरदान दिलं.
मंदिराबद्दल माहिती:
हे पूर्वाभिमुख मंदिर असून इथे तीन परिक्रमा आहेत आणि पांच स्तरांचं राजगोपुर आहे. गाभाऱ्यावरचे विमान (शिखर) हे दोन स्तरांचं (द्विदल) आहे. इथले शिवलिंग स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे. आतला नंदि खूप भव्य आहे. मंदिराचे वर्तमान बांधकाम २००० वर्षे जुनं आहे. वर्तमान बांधकाम चोळा राजांनी केलं. इथल्या शिलालेखांमध्ये विविध राजांनी मंदिरासाठी केलेल्या कामांची माहिती आहे. श्री अंबिका एका पश्चिमाभिमुख देवालयात स्थित आहेत. इथल्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या परिक्रमा भव्य भिंतींनी अलग केल्या आहेत. तिसऱ्या परिक्रमेमध्ये संत थिरूमुलर ह्यांची मूर्ती आहे. इथले क्षेत्र वृक्ष खूप जुनं आहे आणि ते देवांचं प्रतीक आहे असा समज आहे. मंदिराच्या आवारात थिरूमुलर ह्यांची समाधी आहे.
इथे स्थळ विनायकांना थुनाई वंद विनायकर असं पण म्हणतात. ह्या नावाचा अर्थ गणपती जे आपल्या गायीच्या रूपातल्या मातेला मार्ग दाखविण्यासाठी मार्गदर्शक म्हणून आले आणि ज्यांनी आपल्या मातेला म्हणजेच श्री पार्वती देवींना इथं आणून सोडलं.
प्रकारामध्ये एक गायीची मूर्ती आहे ज्यामध्ये गाय शिव लिंगावर अभिषेक म्हणून दूध ओतत आहे. ह्या मूर्तीचे नाव श्री गोरूपांबिका असे आहे. ह्या मंदिरात नवग्रह संनिधी नाही. श्री शनीश्वरांची मूर्ती आहे. श्री सुर्यदेवांच्या इथे तीन मूर्ती आहेत.
भगवान शिवांच्या उजव्याबाजूला श्री त्यागराज आणि श्री कमलांबिका माता ह्यांचे देवालय आहे.
इथल्या उत्सव मूर्तीचे नाव श्री अनैथूइरुंडनायकर (भगवान मातेला आलिंगन देताना) असे आहे. पण मूर्तीमध्ये भगवान शिव पार्वती मातेला स्पर्श करताना दिसत नाहीत.
इथे एक लहान नंदि आहे ज्याचे नाव श्री अधिकार नंदि असे आहे. ह्या नंदिवर अभिषेक केला जातो.
असा समज आहे की भगवान शिवांनी बोगर सिद्ध ह्यांच्या समवेत नवकोटी सिद्धांना अष्ट-महासिद्धींचं ध्यान दिलं.
इतर देवता आणि देवालये:
परिक्रमेमध्ये श्री विनायकर, श्री मुरुगन, श्री नटराज, श्री दंडपाणी, अगस्त्य मुनी, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू, श्री दुर्गादेवी, पंचलिंग, चोळा लिंग, श्री भैरव, श्री शनीश्वरर, श्री सूर्य, श्री चंद्र, श्री सरस्वती देवी, श्री हरदत्त शिवाचार्यार, शैव संत मरैज्ञानसंबंधऱ, श्री उमापती शिवम, श्री मेयकंदर, श्री अरुलनिधीशिवम, ६३ नायनमार, नालवर, श्री आदी गोमुक्तीश्वरर ह्यांच्या मूर्ती आहेत. ह्या मूर्ती परिक्रमा तसेच कोष्ठामध्ये पण दिसतात. भगवान शिवांच्या देवालयाच्या प्रवेशावर श्री विनायक आणि श्री मुरुगन ह्यांच्या मूर्ती आहेत. असा उल्लेख आहे कि त्यांनी आपल्या गायीच्या रूपातल्या मातेला म्हणजेच श्री पार्वती देवींना इथे येण्यासाठी मार्गदर्शन केलं.
प्रार्थना:
१. स्त्रिया आपल्या पतींच्या स्वास्थ्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी इथे प्रार्थना करतात.
२. विभत्क्त दाम्पत्य इथे त्यांचे पुनर्मीलन व्हावं म्हणून प्रार्थना करतात.
३. भाविक जन इथे अपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना करतात.
४. विवाह ठरण्यातल्या अडचणी दूर होण्यासाठी भाविक जन इथे प्रार्थना करतात.
पूजा:
दैनंदिन पूजा आणि प्रदोष पूजा नियमित केल्या जातात.
मंदिरात साजरे होणारे महत्वाचे सण:
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): ब्रह्मोत्सव
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
थै (जानेवारी-फेब्रुवारी): पांच दिवसांचा रथसप्तमी उत्सव
मंदिराच्या वेळा: सकाळी ७ ते १२, दुपारी ४ ते रात्री ८
मंदिराचा पत्ता: श्री गोमुक्तीश्वरर मंदिर, थिरुवाडुथुराई पोस्ट, कुट्रालम तालुका, नागपट्टीनं जिल्हा, तामिळनाडू ६०९८०३
दूरध्वनी: +९१-४३६४२३२०२१, +९१-४३६४२३२०५५
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment