हे मंदिर कुंभकोणम-कारैक्कल मार्गावर कुंभकोणम पासून १४ किलोमीटर्स वर असलेल्या थिरुनल्लम येथे वसलेलं आहे. हे मंदिर पंचलोक-नटराज मंदिर म्हणून पण प्रसिद्ध आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. ह्या स्थळाचे वर्तमान नाव कोनेरीराजापूरम असे आहे. शैव संत संबंधर आणि अप्पर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती केली आहे. पूर्वीकाळी हे स्थळ पुराच्या पाण्यामध्ये बुडालं होतं. नंतर ते उत्खननातुन परत वसवलं गेलं. मूळ मंदिर सातव्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. पूर्वीचं विटांचं बांधकाम असलेलं मंदिर चोळा राज्याची राणी चेम्बिअन महादेवी हिने परत ग्रॅनाईट वापरून बांधलं. इथले शिलालेख असं दर्शवतात की चोळा राजांनी ह्या मंदिराचा साधारण तीन शतके सांभाळ केला.
मूलवर: श्री उमामहेश्वरर, श्री मामनीश्वरर, श्री भूमीनाथर
देवी: श्री अंगबलनायकी, श्री मंगलनायकी, श्री देहसौन्दरी
पवित्र तीर्थ: शक्ती तीर्थ, भूमी तीर्थ, ब्रह्म तीर्थ
पवित्र वृक्ष: पीपल आणि बिल्व
पुराणिक नाव: थिरुनल्लम, थिरुवल्लम
क्षेत्र पुराण:
१. स्थळ पुराणानुसार वरगुण पांडियन (काही जणांच्यामते गंडरादिथ चोळा राजा) ह्या चोळा राजाने ह्या मंदिरासाठी श्री नटराजांची पंच-धातूची मूर्ती बनविण्याची आज्ञा केली होती. स्थपतींच्या बऱ्याच प्रयत्नांनंतर पण ते राजाच्या अपेक्षेप्रमाणे मूर्ती बनवू शकले नाहीत. स्थपतींचा मुख्य चिंतेत होता कारण नियोजित वेळेच्या आत मूर्ती तयार झाली नाही तर राजाने शिरच्छेदाची शिक्षा फर्मावली होती. स्थपतींने साच्यामध्ये ओतण्यासाठी वितळलेल्या अवस्थेत धातू तयार ठेवले होते. त्यावेळी त्याच्याकडे एक वृद्ध दाम्पत्य आले आणि त्यांनी त्याला पिण्यासाठी पाणी मागितलं. पण तो स्थपती अत्यंत विमनस्क अवस्थेत असल्याने त्यांच्याकडे न बघताच चिडून त्याने त्या दाम्पत्याला तुम्ही एवढेच तहानलेले असाल तर हे वितळलेले धातूच प्या असे म्हणाला. थोड्या वेळाने त्याला लक्षात आले ते खरोखरच वितळलेले धातू पिऊन अदृश्य झाले होते. आणि त्यांच्या जागी मानवी आकाराची श्री नटराज आणि श्री शिवकामी ह्यांची मूर्ती उभी राहिली होती. ही श्री नटराजांची मूर्ती प्रत्यक्ष मानव असल्याचा भास होतो. राजाने जेव्हा मूर्ती पहिली त्यावेळी तो विस्मयचकित झाला पण त्याचा त्या घटनेवर विश्वास बसला नाही. त्याने परीक्षा घेण्यासाठी तलवारीने त्या मूर्तीच्या पायावर वार केला. त्या पायातून रक्त बाहेर आले आणि काही थेम्ब राजाच्या अंगावर पडले. त्याचक्षणी राजाला कुष्ठरोग झाला. राजाने भगवान शिवांची स्तुती केली आणि क्षमायाचना केली. भगवान शिव स्वतः तिथे श्री वैद्यनाथर रूपात असल्याने त्यांनी राजाला ह्या मंदिरात ४२ दिवसांसाठी पूजा करण्याची आज्ञा केली. राजाने तसे केल्यावर त्याची कुष्ठरोगातून मुक्ती झाली. राजाने केलेल्या वाराने जी मूर्तीवर जखम झाली ती अजूनही दृश्य आहे. ह्या मूर्तीची रोज पूजा करणारे पुजारी सांगतात कि मूर्तीला मानवी शरीरासारखे केस आहेत, नखे आहेत तसेच तिळासारख्या खुणापण आहेत. मदुराई आणि उत्तरकोशमंगई ह्या स्थळांसारखेच इथे पण श्री नटराजांची मूर्तीची मिरवणूक निघत नाही.
२. स्थळ पुराणानुसार पुरुवारस राजाला कुष्ठरोग झाला होता. त्याने रोगनिवारणासाठी भगवान शिवांच्या विविध मंदिरांना भेट देऊन तिथे पूजा केली. शेवटी कावेरी नदीच्या दक्षिण काठावर असलेल्या ह्या मंदिरात येऊन भगवान शिवांची पूजा केल्यावर मग त्याची रोगातून त्वरित मुक्तता झाली. कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून त्याने सुवर्णानी आच्छादित असलेलं विमान (शिखर) ह्या मंदिरासाठी बांधलं, तसेच वैकासि है तामिळ महिन्याच्या विशाखा नक्षत्रावर ब्रह्मोत्सव आयोजित केला.
३. पुराणानुसार श्री ममानीश्वरांनी श्री भूमादेवींना हे मंदिर बांधण्याची आज्ञा केली. श्री भूमादेवींनी दिलेल्या सूचनेनुसार विश्वकर्मांनी शिव लिंगाची रचना केली. श्री भूमादेवींनी ब्रह्म तीर्थामध्ये स्नान करून पश्चिमाभिमुख असलेल्या शिवलिंगाची पूजा केली. म्हणून भगवान शिवांना इथे श्री भूमीनाथर असं संबोधलं जातं आणि ह्या स्थळाला भूमीचरम असं संबोधलं जातं.
४. पुराणानुसार नंदिंनीं इथे भगवान शिवांची पूजा केली.
५. पुराणानुसार थिरुनल्लरला निघण्याआधी नल राजा आणि त्यांची पत्नी दमयंती ह्यांनी इथे श्री शनीश्वरांची पूजा करून त्यांची कृपा प्राप्त केली. सहसा श्री शनिंची मूर्तीला काळे वस्त्र नेसवलेले असते पण इथे ते अनुग्रह मूर्ती असल्याकारणाने त्यांना पांढरं वस्त्र नेसवले आहे. भाविक जन इथे श्री शनिंची काळ्या तिळाच्या ऐवजी पांढऱ्या तिळाच्या तेलाने पूजा करतात.
६. भगवान विष्णूंसमवेत अगस्त्य मुनींना इथे भगवान शिव आणि पार्वती देवींच्या विवाह सोहळ्याचे दर्शन झाले.
७. असा उल्लेख आहे की श्री यमदेवांनी इथे येऊन श्री दुर्गादेवींची पूजा केली. श्री यमदेवांना भगवान शिवांनी थिरुकडीयुर इथे शिक्षा केल्यामुळे त्यांच्या मनाला धक्का बसला होता. इथे येऊन श्री दुर्गादेवींची पूजा केल्यानंतर त्यांना त्या मानसिक धक्क्यातून मुक्ती मिळाली.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
अगस्त्य मुनी, नळ राजा आणि त्यांची पत्नी दमयंती, १६ सिद्ध पुरुष, अष्टदिक्पाल, यमदेव, नंदी, श्री भूमादेवी, पुरवरास राजा, वरगुण पांडियन राजा, कंदराथीथन राजा, चेम्बिअन महादेवी राणी.
वैशिष्ट्ये:
१. हे स्थळ इथल्या अद्वितीय अशा श्री नटराजांच्या भव्य धातूच्या मूर्तीमुळे प्रसिद्ध आहे.
२. असा समज आहे कि मूळ स्थळ थिरुनल्लम होतं जे पुराच्या पाण्यात बुडालं आणि नंतर उत्खनन करून परत वसवलं गेलं.
३. इथल्या नवग्रह संनिधींमधल्या नवग्रहांची एक विशिष्ट रचना आहे.
४. गाभाऱ्याजवळ भगवान शिव आणि श्री पार्वती देवींच्या मूर्तीमध्ये ते विवाहाच्या वेळेस वधू वर जसे उभे असतात तसे आहेत आणि त्यांच्याबरोबर भगवान विष्णू आहेत जसं काही ते विवाहामध्ये भाग घेत आहेत.
५. हे स्थळ पवित्रतेमध्ये कैलास पर्वताच्या तुल्यबळ मानलं जातं आणि इथले तीर्थ हे गंगेइतकंच पवित्र मानलं जातं.
६. शैव संत अप्पर ह्यांच्या मते ज्यांना पूर्वजन्मी कृपा प्राप्त झालेली असते त्यांनाच ह्या स्थळाला भेट देण्याचं सौभाग्य लाभतं.
७. ह्या मंदिराच्या आवारामध्ये सहा गणेशाच्या मूर्ती आहेत.
८. श्री चंडिकेश्वरांच्या तीन मूर्ती आहेत.
९. सिम्बिअन महादेवी ह्या चोळा राणीचे उठावदार चित्र आहे.
१०. ह्या मंदिरामध्ये शिलालेख आहेत जे दर्शवतात कि हे मंदिर राणीचा पती कंदराथीथन, जो भगवान शिवांचा मोठा भक्त होता, त्याच्या स्मृत्यर्थ बांधले गेले.
११. श्री त्रिपुरसंहार मूर्तींचे इथे स्वतंत्र देवालय आहे.
१२. हे अशा तीन क्षेत्रांपैकी आहे जिथे पीपल वृक्ष हा स्थळ वृक्ष आहे. इतर दोन असे आहेत - काशी आणि थिरुवडुथुराई
१३. हिज हायनेस श्री कांचीपरमाचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती ह्यांचे हे विशेष प्रार्थनास्थान होते. त्यांच्यामुळे उमाची हा वाक्प्रचार प्रचलित झाला. उमाची चा अर्थ लहान मुलांचा देव
१४. इथल्या बिल्व वृक्षाच्या प्रत्येक दळाला १३ पाने आहेत.
१५. इथल्या स्थळ वृक्षाखाली श्री विनायकांची मूर्ती आहे ज्याचे नाव श्री अर्सामार विनायकर असे आहे.
१६. गाभाऱ्याच्या पाठीचा आकार गजपृष्ठासारखा आहे.
मंदिराबद्दल माहिती:
हे पश्चिमाभिमुख मंदिर आहे. इथल्या राजगोपुराला स्तरे नाहीत पण त्यावर भगवान शिव, श्री पार्वती देवी, श्री विनायक आणि श्री मुरुगन ह्यांची सुंदर शिल्पे आहेत. ह्या मंदिराला दोन परिक्रमा आहेत. इथले शिव लिंग स्वयंभू असून साधारण ४.५ फूट उंच आहे आणि पूर्वाभिमुख आहे. पुढल्या मंडपामध्ये बलीपीठ, ध्वजस्तंभ आणि नंदि गाभाऱ्याकडे मुख करून आहेत. ध्वजस्तंभाच्या खाली असलेल्या श्री विनायकांना श्री कोडीमारा (ध्वजस्तंभ) विनायकर असे नाव आहे. शिव लिंग सुंदर आहे आणि रुद्राक्षांनी वेढलेलं आहे. गाभाऱ्याची पाठीमागची बाजू गजपृष्ठाच्या (हत्तीचा मागचा भाग) आकाराची आहे. गाभाऱ्याच्या वरच्या विमानाला (शिखर) अष्टद्वारपाल विमान म्हणतात. इथे अजून एक स्वयंभू लिंग आहे ज्याचे नाव वैद्यनाथ स्वामी असे आहे. असा समज आहे गाभाऱ्याचे चार स्तंभ हे चार वेद आहेत.
कोष्टमूर्ती: मंगाईअप्पर, श्री लिंगोद्भवर, श्री दुर्गादेवी, श्री ब्रह्म, श्री भिक्षाटनर, श्री ज्वरहरेश्वरर, श्री दक्षिणामूर्ती, श्री गणेश, अगस्त्य मुनी, श्री नटराज (खूप दुर्मिळ मूर्ती), कोष्ठाच्या भिंतीच्या मागे श्री लिंगोद्भवरांच्या दोन्ही बाजूला भगवान विष्णू आणि श्री ब्रह्म आहेत. इथे भगवान शिवांचे एक देवालय आहे जिथे भगवान शिवांना श्री त्रिपुरसंहारमूर्ती म्हणलं जातं. आतल्या मंडपामध्ये श्री अनगवळनायकी त्यांच्या स्वतंत्र देवालयामध्ये पूर्वाभिमुख आहेत.
परिक्रमेमधल्या मूर्ती आणि देवालये: श्री सुब्रह्मण्य त्यांच्या पत्नींसमवेत, शिव लिंग ज्याचे नाव श्री वैद्यनाथर असे आहे, यागशाळा, श्री महागणपती, श्री अग्नीश्वरर, श्री सनतकुमार, श्री शेनबागअरण्येश्वरर, श्री सुंदरेश्वरर, श्री पशुपतीश्वरर, श्री कैलासनाथर (सर्व शिव लिंगे), श्री कण्व लिंग, श्री शनीश्वरर, नवग्रह आणि नवग्रहांनी पूजिलेली शिव लिंगे.
नवग्रह संनिधीमध्ये आठ ग्रह सुर्याभिमुख आहेत तर शनी पश्चिमाभिमुख आहेत. एका देवालयामध्ये तीन चंडिकेश्वरांच्या मूर्ती आहेत. एका देवालयात श्री सुंदरकुसांबीका ह्यांची मूर्ती आहे. आतल्या परिक्रमेमध्ये ब्रह्मलिंग, श्री सुब्रह्मण्य त्यांच्या पत्नींसमवेत, श्री महालक्ष्मी, श्री नटराजसभा, उत्सवमूर्ती, शैव संत नालवर, श्री गणेश, अगस्त्य लिंग आणि श्री ब्रह्म ह्यांच्या मूर्ती आहेत. ह्याशिवाय परिक्रमेमध्ये श्री ब्रह्म आणि भगवान विष्णू ह्यांची देवालये आहेत.
ह्या मंदिरामध्ये श्री नटराजांची धातूची मूर्ती आहे आणि त्यांच्याबाजूला श्री शिवगामी ह्यांचीपण मूर्ती आहे. ही श्री नटराजांची मूर्ती चिदंबरम इथे असलेल्या मूर्तीपेक्षाही मोठी आहे.
अजून एका देवालयामध्ये श्री नटराजांच्या बाजूला श्री नटराजांची उत्सव मूर्ती ठेवली आहे. त्यांचं नाव श्री कल्याणसुंदरेश्वरर असे आहे आणि त्यांच्या पत्नीचे नाव श्री कात्यायनी देवी असे आहे.
भगवान शिवांच्या उजव्याबाजूला श्री वल्ली आणि श्री देवसेना ह्यांच्यासमवेत श्री षण्मुख आहेत. श्री गणेशांच्या डाव्या बाजूला भूतगण आहेत. एका भूतगणाच्या शिरावर केळ्यांचा गढ आहे तर अजून एका भुतगणाच्या शिरावर फणस आहे.
मुख्य मंडपाच्या छतावर भगवान शिवांच्या पांच मुखांची चित्रे आहेत - तत्पुरुष, इशान, वामदेव, सद्योजात आणि अघोर. ह्याशिवाय इथे चार वेद पण आहेत.
मुखमंडपामध्ये श्री नटराज आणि श्री कल्याणसुंदरेश्वरर ह्यांच्या दहाव्या शतकातल्या धातूच्या मूर्ती आहेत.
ह्या मंदिरामध्ये एका देवालयामध्ये सहा विनायक आहेत. श्री दक्षिणामूर्ती पश्चिमाभिमुख आहेत.
इथे एक श्री मुरुगन ह्यांची मूर्ती आहे ज्याचे नाव श्री मुथूकुमारस्वामी असे आहे.
प्रार्थना:
१. भाविक जनांचा असा समज आहे की इथे पवित्र तीर्थात स्नान करून भगवान शिवांची पूजा केल्यास कुठल्याही थराला पोचलेल्या रोगाचे निरसन होऊ शकते.
२. भाविक जन इथे जमिनीचे वाद मिटविण्यासाठी तसेच इमारत बांधणीमध्ये व्यत्यय येऊ नयेत म्हणून प्रार्थना करतात.
३. विवाह ठरण्यामध्ये ज्यांना अडचणी येत असतात, तसेच आरोग्य चांगले ठेवण्यामध्ये ज्यांना अडचणी येत असतात ते इथे सोमवारी प्रार्थना करतात. ते भगवान शिवांवर अभिषेक करतात आणि श्री पार्वती देवींसाठी वसुदरा यज्ञ करतात.
४. शत्रूंपासून भय आणि संकटे ह्यांच्यावर मात करण्यासाठी भाविक जन इथे श्री त्रिपूरसंहारमूर्ती ह्यांची कृष्णाष्टमीला पूजा करतात.
५. हे विवाह आणि अपत्यप्राप्तीच्या दोषांचे परिहार स्थळ आहे.
६. इथे श्री नंदिदेवांनी भगवान शिवांची पूजा केली म्हणून भाविक जनांचा असा समज आहे की इथे प्रदोष काळी पूजा करणे खूप शुभदायक असते आणि त्याने बहुविध फायदे होतात.
७. हे शनिदोषाचे परिहार स्थळ आहे.
पूजा:
१. रोज ६ पूजा केल्या जातात.
२. ह्या शिवाय प्रत्येक आठवड्यात सोमवारी आणि शुक्रवारी पूजा केल्या जातात
३. प्रदोष दिवशी प्रदोष पूजा केल्या जातात
४. अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी आणि कृतिका नक्षत्रावर विशेष पूजा केल्या जातात.
मंदिरात साजरे होणारे काही महत्वाचे सण:
विशेष उत्सव:
वैकासि (मे-जून): विशाखा उत्सव, ६ दिवसांचा ब्रह्मोत्सव. ह्या वेळेस भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांचा विवाह सोहळा साजरा होतो.
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीराई उत्सव
श्री नटराजांचा अभिषेक वर्षातून ६ वेळा होतो - चित्राई, आनी, आवनी, पूरत्तासी, मारगळी, मासी
इतर उत्सव
आनी (जून-जुलै): श्री गणेश चतुर्थी
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): स्कंदषष्ठी
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशवरात्री
मंदिराच्या वेळा: सकाळी ६.३० ते १२, दुपारी ४.३० ते ८.३०
मंदिराचा पत्ता: श्री उमामहेश्वर स्वामी मंदिर, कोनेरीराजापूरम (थिरुनल्लम), मयीलादुथुराई जिल्हा, तामिळ नाडू ६१२२०१
दूरध्वनी: +९१-९४८६५१०५१५, +९१-४३५२४४९८३०, +९१-४३५२४४९८०
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment