Sunday, August 31, 2025

वैकल येथील श्री वैकलनाथेश्वरर मंदिर

हे मंदिर कुंभकोणम-कारैक्कल मार्गावर कुंभकोणम पासून १२ किलोमीटर्स वर आहे. थिरुनीलकुडी आणि कोनेरीराजापूरम पासून ४ किलोमीटर्स वर आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. नालवर, म्हणजेच प्रसिद्ध चार शैव संत, ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. हे माड कोविल शैलीचे मंदिर कोचेंगट चोळा ह्या राजाने बांधले. हे मंदिर सातव्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावे आणि कालांतराने चोळा राजांनी ह्याचा जीर्णोद्धार केला. विजयनगर राजांनी ह्या मंदिरासाठी भरपूर काम केले आहे. हे मंदिर कैलासासी तुल्यबळ मानलं जातं. वैकल हा शब्द वै-कुरु-कल ह्या शब्दापासून आला आहे. मंदिराची सध्याची स्थिती चांगली नसून विस्कळीत आहे. जेव्हा आम्ही २००८ मध्ये ह्या मंदिराला भेट दिली त्यावेळी ह्या मंदिराची देखभाल करायला पण कोणी नव्हतं. हे मंदिर आणि ह्या मंदिराच्या १ किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात अजून दोन मंदिरे आहेत ज्यांना एकत्रित भगवान शिवांची तीन नेत्र मानली जातात. श्री काशीविश्वनाथर आणि विष्णू मंदिर हे उजवं नेत्र, श्री ब्रह्मपुरीश्वरर हे डावं नेत्र तर हे मंदिर कपाळावरचं नेत्र. ही तीन मंदिरे भगवान शिवांचे नेत्राचे प्रतीक आहेत म्हणून त्यांना मुक्कन क्षेत्र (तामिळ मध्ये मुक्कन म्हणजे ३ नेत्र) असं म्हणतात.

मूलवर: श्री वैकलनाथेश्वरर, श्री वैकलनाथर, श्री शेनबागारण्येश्वरर
देवी: श्री वैकलांबिका, श्री कोंबीएलकोदै, श्री शाककोमलवल्ली
पवित्र तीर्थ: शेनबाग तीर्थ
क्षेत्र वृक्ष: शेनबाग (मराठीमध्ये सोनचाफा)
पुराणिक नाव: शेनबाग अरण्यम, मुमूर्थी स्थळ, नित्यवासपुरम

क्षेत्र पुराण

१. पुराणानुसार भूदेवींनी भगवान विष्णूंशी विवाह करण्याची इच्छा दर्शवली. भगवान विष्णूंनी ती मान्य करून भूदेवींशी विवाह केला. श्री महालक्ष्मींना (श्रीदेवी) ह्यामुळे खूप राग आला. त्या शेनबागवनात म्हणजेच ह्या स्थळी भगवान शिवांची तपश्चर्या करण्यासाठी आल्या. श्री महालक्ष्मींना शोधत शोधत भगवान विष्णू भूदेवींसमवेत इथे आले. श्री ब्रह्मदेव पण त्यांना शोधत इथे आले आणि त्यांनी पण भगवान शिवांची तपश्चर्या केली. भगवान शिवांनी श्री महालक्ष्मींना भगवान विष्णू आणि भूदेवींचा विवाह मान्य करण्यासाठी समजावलं. 

२. स्थळपुराणानुसार एक हत्ती आपल्या पिल्लाला शोधत शोधत इथे आला आणि त्याच्याकडून अपघाताने एक मुंग्यांचं वारूळ मोडलं गेलं. त्यामुळे मुंग्यांनी हत्तीला मारून टाकलं. त्यानंतर त्या मुंग्यांनी आणि त्या हत्तीच्या पिल्लाने भगवान शिवांची प्रार्थना केली. भगवान शिवांनी त्या हत्तीच्या पिल्लांचं त्याची माता गमावल्यामुळे सांत्वन केलं आणि मुंग्यांना त्यांच्या पापाबद्दल माफ केलं. ह्या दोघांनाही भगवान शिवांनी मुक्ती दिली.

३. कोचेंगट चोळा राजा हा भगवान शिवांचा भक्त होता. तसेच तो ६३ नायनमारांपैकी पण एक नायनमार होता. असा समज आहे की तो पूर्वजन्मी कोळी (प्राणी) होता आणि त्याचं एका हत्तीबरोबर भगवान शिवांची भक्ती करण्यावरून भांडण झालं. तो जन्माला आला तेव्हा त्याचे नेत्र लाल होते. तो साधारण गर्भवासाच्या काळापेक्षा जास्त काळ आपल्या मातेच्या गर्भात राहिला. जेव्हा त्याच्या मातेने त्याचे लाल नेत्र पाहिले तेव्हा तिने त्याचे नाव कोचेंग कन्न असे ठेवले. त्याने राजा बनल्यावर ७० माडकोविल (मंदिरे) बांधली.

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

भगवान विष्णू, श्री लक्ष्मी, श्री ब्रह्म, श्री भूदेवी, श्री इंद्र, श्री सूर्य, इतर देव आणि अगस्त्य ऋषी. 

वैशिष्ट्ये:

१. हे कोचेंगट चोळा राजाने बांधलेल्या ७० माड कोविल पैकी एक आहे.

२. इथला गाभारा थोड्या उंचावर आहे. त्यामुळे भगवान शिवांचं दर्शन घेण्यासाठी पायऱ्या चढून जायला लागतं.

३. हे मंदिर कैलासाच्या तुल्यबळ मानलं जातं. 

४. इथे श्री पार्वती देवींचे नाव कोंबीएलकोडई असे आहे.

५. हे मंदिर वैकल गावात वसले आहे म्हणून ह्याला वैकलमाडकोविल असे संबोधले जाते.

६. ह्या मंदिराबरोबर अजून तीन मंदिरे भगवान शिवांची तीन नेत्रे मानली जातात.

मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर पूर्वाभिमुख आहे आणि ह्याला एक परिक्रमा आहे. राजगोपुर अपूर्णावस्थेत आहे आणि त्याला एकही स्तर नाही. इथले शिवलिंग दगडी स्वयंभू लिंग आहे. मंदिराच्या प्रवेशाच्या डाव्या बाजूला श्री गणेशांचे देवालय तर उजव्या बाजूला श्री मुरुगन ह्यांचे देवालय आहे. गाभारा थोड्या उंचावर असल्याकारणाने दर्शन घेण्यासाठी काही पायऱ्या चढून जायला लागतं. गाभाऱ्याच्या पायऱ्या परिक्रमेच्या दक्षिणेकडून चालू होतात. गाभाऱ्याचा प्रवेश अरुंद आहे. नंदि आणि बलीपीठ हे गाभाऱ्याला मुख करून आहेत. गाभारा हा लिंगाच्या आकाराचा आहे. 

कोष्टामध्ये श्री दक्षिणामूर्तींची मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला एका स्वतंत्र देवालयामध्ये श्री अंबिका दक्षिणाभिमुख आहेत. आपल्याला पुढल्या देवालयांचे आणि मूर्तींचे दर्शन होते - श्री गणेश, श्री वल्ली आणि श्री दैवानै ह्यांच्या समवेत श्री सुब्रह्मण्य, श्री भूदेवी आणि श्री श्रीदेवी ह्यांच्या समवेत भगवान विष्णू, श्री गजलक्ष्मी, श्री चंडिकेश्वरींसमवेत श्री चंडिकेश्वर, श्री सूर्य, श्री काळभैरव, श्री शनीश्वरर. इथे स्वतंत्र नवग्रह संनिधी नाही. इथे श्री काशीविश्वनाथर ह्यांचे मंदिर आहे जिथे श्री काशीविश्वनाथर श्री विशालाक्षींसमवेत आहेत. इथे श्री ब्रह्मपुरीश्वरर ह्यांचे देवालय आहे जिथे मूलवर श्री ब्रह्मपुरीश्वरर आहेत आणि देवी श्री पेरियानायकी आहेत. 

गाभाऱ्याच्या प्रवेशाजवळ नंदि, ध्वजस्तंभ आणि बलीपीठ आहेत. ह्याशिवाय पुढील देवालये आणि मूर्ती आहेत - श्री गणेश, श्री सुब्रह्मण्य त्यांच्या पत्नींसमवेत, श्री दक्षिणामूर्ती, श्री दुर्गादेवी, श्री ब्रह्म, श्री सूर्य, श्री चंद्र, नालवर, श्री गजलक्ष्मी आणि नवग्रह.

प्रार्थना:

१. भाविक जन भगवान शिवांची विवाहातल्या अडचणी दूर होण्यासाठी, वैभव आणि समृद्धी प्राप्तीसाठी प्रार्थना करतात

२. असा समज आहे की इथे भगवान शिवांची प्रार्थना केल्याने मृत्यूचे भय निघून जाते.

पूजा:

इथे रोज फक्त एक पुजा केली जाते.

मंदिरात साजरे होणारे काही महत्वाचे सण:

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

ऐप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

ह्या शिवाय सहसा शिव मंदिरामध्ये जे सण साजरे होतात ते इथे पण साजरे होतात तसेच ज्या विशेष पूजा होतात त्या पण इथे केल्या जातात.

मंदिराच्या वेळा: सकाळी ७ ते दुपारी १२, दुपारी ३ ते रात्री ८

(इथे दर्शनासाठी किंवा पूजेसाठी येण्याआधी येथील पुजाऱ्यांशी संपर्क साधावा)

मंदिराचा पत्ता: श्री वैकलनाथर कोविल, वैकल गाव, पोस्ट मेलैवायूर अदुथुराई मार्गे, तामिळ नाडू ६१२१०१

पुजाऱ्यांचे दूरध्वनी: ०४३५-२४६-५६१६, +९१-९७८८९९२८६० 

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


No comments:

Post a Comment