कुंभकोणम-कारैक्कल मार्गावर कुंभकोणमच्या जवळ थिरुनागेश्वरम मध्ये वसलेलं हे मंदिर पंचक्रोश स्थळांपैकी एक आहे. कावेरी नदीच्या दक्षिण काठावर वसलेल्या ह्या मंदिराची स्तुती शैव संत अप्पर, सुंदरर आणि संबंधर ह्यांनी गायली आहे. नवग्रह स्थळांमधील हे राहू ग्रहाचे स्थळ आहे. हे मंदिर सातव्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. चोळा साम्राज्याच्या काळामध्ये कंदरादित्य चोळा ह्या राजाच्या कारकिर्दीमध्ये ह्या मंदिराचं दगडी बांधकाम करण्यात आलं. कालांतराने चोळा साम्राज्याचे मंत्री सेक्कीळर ह्यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पुढे विजयनगर आणि नायक राजांनी ह्या मंदिराचा विस्तार केला. इथे काही शिलालेख आहेत ज्यांमध्ये चोळा आणि पल्लव राजांनी ह्या मंदिरासाठी केलेल्या कामाचे तसेच त्यांनी दिलेल्या देणग्यांचे उल्लेख आहेत.
मूलवर: श्री नागेश्वरर, श्री नागनाथस्वामी, श्री शेनबागअरण्येश्वरर
देवी: श्री गिरीगुजांबिका, श्री पिरैयानिवळ, श्री नुथल अम्माई
पवित्र तीर्थ: सूर्य तीर्थ
क्षेत्र वृक्ष: शेनबाग वृक्ष (मराठीमध्ये सोनचाफा)
पुराणिक नाव: शेनबाग वनं, गिरीकन्नीकाईवन
क्षेत्र पुराण:
१. सर्व अष्ट महानागांनी (अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, संकल्पन, कुलीगन, पद्मन, महापद्मन आणि आदिशेष) इथे भगवान शिवांची उपासना केली. म्हणून इथे भगवान शिवांना श्री नागनाथर असं संबोधलं जातं आणि ह्या स्थळाला थिरुनागेश्वरम असं संबोधलं जातं.
२. राहु देवांनी इथे येऊन आपल्या पत्नींसमवेत भगवान शिवांची उपासना केली. भगवान शिवांनी त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन राहूदेवांना वरदान दिलं कि हे स्थळ सर्प दोष परिहार स्थळ म्हणून मानलं जाईल. भगवान शिवांनी राहूदेवांना इथे मनुष्यरूपामध्ये त्यांच्या पत्नींसमवेत राहून भक्तांवर कृपा करण्याची आज्ञा केली. राहू देव इथे अभय आणि वरद मुद्रेमध्ये राहून आपल्या पत्नींसमवेत भक्तांवर कृपा करतात आणि त्यांना भय मुक्त करतात.
३. पुराणांनुसार इंद्रदेवाने गौतम ऋषींच्या पत्नीबरोबर व्यभिचार केला म्हणून त्यांना गौतम ऋषींनी शाप दिला ज्यामुळे इंद्रदेवांच्या पूर्ण शरीरात नेत्र निर्माण झाले. ह्या शापापासून मुक्ती मिळविण्यासाठी इंद्रदेवांनी इथे श्री गिरीगुजांबिका देवींची उपासना केली.
४. स्थळ पुराणानुसार नागराज थक्कन ह्याने सुशील ऋषींच्या पुत्राची हत्या केली म्हणून सुशील ऋषींनी त्याला शाप दिला. ह्या शापापासून मुक्ती मिळविण्यासाठी नागराज थक्कन ह्याने रात्रीच्या चार प्रहरांमध्ये चार ठिकाणी भगवान शिवांची पूजा केली. ती चार ठिकाणे अशी - कुंभकोणम किळकोट्टम (बिल्व वन), थिरुनागेश्वरम (हिबिसकस वन), थिरुपंपूरं (शमी वन) आणि नागपट्टीनं. ह्या ठिकाणी पूजा करून त्याला शापापासून मुक्ती मिळाली.
५. समुद्र मंथनानंतर ह्या ठिकाणी राहू देवाने आपल्या पत्नींसमवेत भगवान शिवांची पूजा केली आणि त्यामुळे त्यांना अर्ध मानवी शरीर तर अर्ध सर्पाचं शरीर प्राप्त झालं.
६. श्री पार्वती देवींनी इथे श्री लक्ष्मीदेवी आणि श्री सरस्वती देवींसमवेत तपश्चर्या केली. भगवान शिवांचे महाभक्त भृंगी ऋषी ह्यांनी श्री पार्वती देवींकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून श्री पार्वती देवींनी भृंगी ऋषींना शाप दिला. पण भृंगी ऋषी भगवान शिवांचे महाभक्त असल्याकारणाने श्री पार्वती देवींना ह्याचा दोष लागला. ह्या दोषाचा परिहार करण्यासाठी म्हणून श्री पार्वती देवींना इथे येऊन तपश्चर्या करण्याची आज्ञा झाली. तसेच त्यांना तपश्चर्येमध्ये श्री लक्ष्मीदेवी आणि श्री सरस्वतीदेवी सोबत करतील असं पण त्यांना सांगण्यात आलं. त्या श्री लक्ष्मीदेवी आणि श्री सरस्वतीदेवी ह्यांच्यासोबत इथे आल्या आणि त्यांनी तपश्चर्या केली. भगवान शिवांनी त्यांना दर्शन दिलं आणि ते श्री पार्वती देवींना परत कैलासावर घेऊन गेले. श्री पार्वती देवींची इथे श्री गिरीगुजांबिका म्हणून पूजा केली जाते. त्यांचे इथे स्वतंत्र देवालय आहे.
७. स्थळ पुराणानुसार संभूमाळी राजावर कालांगिरी ऋषी एवढे चिडले की त्यांनी राजाला शाप दिला. त्या शापापासून मुक्ती मिळविण्यासाठी राजाला भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांची ह्या ठिकाणी पवित्र तीर्थामध्ये स्नान करून उपासना करण्यास सांगितले. राजाने तसे केल्यावर त्याची शापापासून मुक्ती झाली.
८. गौतम ऋषींनी इथे भगवान शिवांची उपासना केल्यावर त्यांचे त्यांच्या पत्नीशी म्हणजेच अहिल्येशी पुनर्मीलन झाले.
९. नळ राजाने इथे भगवान शिवांची उपासना केल्यावर त्याला परत वैभव आणि राज्य प्राप्त झाले.
१०. चंद्रवर्मा राजाला श्वान होण्याचा शाप प्राप्त झाला. त्याने इथे भगवान शिवांची उपासना केल्यावर त्याची शापातून मुक्ती झाली.
११. श्री विनायकांनी इथे भगवान शिवांची उपासना केल्यावर त्यांना गणपती (गणांचा अधिपती) पद प्राप्त झाले.
१२. भृंगी ऋषींनी इथे भगवान शिवांची उपासना केल्यावर त्यांना सर्व देवींचे दर्शन मिळाले.
१३. भगवान शिवांनी श्री पार्वती देवींना सांगितले की हे क्षेत्र पृथ्वीवरील सर्वात चांगले क्षेत्र आहे.
१४. पांडवांनी इथे भगवान शिवांची उपासना केल्यावर त्यांना त्यांचे राज्य परत मिळाले.
१५. काही वर्षांपूर्वी सेक्कीळर ह्यांनी स्थापलेले शिवलिंग (नागेश्वर लिंग) हे विस्कळीत अवस्थेत होते. म्हणून हे शिवलिंग सूर्य तीर्थामध्ये विसर्जन करून नवीन शिवलिंगाची स्थापना केली गेली. त्या दिवशीच्या रात्री भगवान शिव एका भक्ताच्या स्वप्नात आले आणि त्यांनी मूळ लिंगाची परत स्थापना करण्याची आज्ञा केली. म्हणून मूळ लिंग सूर्य तीर्थामधून काढून परत स्थापन केले गेले. नवीन शिवलिंग हे सध्या गाभाऱ्याच्या मागे ठेवले आहे. त्याचे नाव अरुणाचलेश्वर आहे.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
पांडव, वसिष्ठ ऋषी, आदिशेष, दक्ष राजा, कर्कोटग, शौनक ऋषी, श्री राहू, श्री नंदि, श्री चंद्र, श्री सूर्य, नळ राजा, गौतम ऋषी, पराशर ऋषी, भगीरथ ऋषी, श्री गणेश, श्री इंद्र, भृंगी ऋषी.
वैशिष्ट्ये:
१. हे मंदिर चोळा साम्राज्याचे मंत्री सेक्कीळर ह्यांनी बांधलं.
२. इथे श्री विनायकांना श्री उनग्रहविनायक असे संबोधले जाते.
३. हे राहुदोषासाठी परिहार स्थळ आहे.
४. रविवारी राहुकाळामध्ये जेव्हा राहुंच्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक होतो त्यावेळी दुधाचा रंग निळा होतो.
५. श्री मुरुगन ह्यांचे देवालय भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांच्या देवालयांच्या मधे आहे. ह्या रचनेला सोमस्कंद रचना म्हणतात.
६. इथल्या १०० स्तंभांच्या मंडपामध्ये सुंदर शिल्पे आहेत आणि हा मंडप रथावर आरूढ आहे.
७. श्री पार्वती देवी, श्री महालक्ष्मी देवी आणि श्री सरस्वती देवी ह्या भक्तांवर एकाच देवालयातून कृपा करत आहे. हि रचना खूप दुर्मिळ आणि अद्वितीय आहे.
८. शैव संत अरुणागिरिनाथर ह्यांनी ह्या मंदिरातील श्री मुरुगन ह्यांची स्तुती गायली आहे.
९. श्री गिरीगुजांबिका ह्यांच्या देवालयामधे श्री विनायक आणि श्री योगराहू ह्यांच्या मूर्ती एका छोट्या पेटीमध्ये आहेत. हे खूप दुर्मिळ दृश्य आहे.
१०. ह्या मंदिरामध्ये खूप सुंदर चित्रे आहेत ज्यामध्ये येथील क्षेत्र पुराण चित्रित केले आहे.
११. चित्राई ह्या तामिळ महिन्यामध्ये सूर्याची किरणे मंदिरात प्रवेश करतात. म्हणून ह्या मंदिराला सूर्यकोट्टम असे पण संबोधले जाते.
१२. सकाळी कुंभकोणमच्या नागेश्वर मंदिरात, दुपारी थिरुनागेश्वरम मंदिरात तर संध्याकाळी थिरुपंपूरं इथे भगवान शिवांची पूजा करणे हे खूप शुभ मानलं जातं.
१३. असा समज आहे राहूदेवांसारखी कृपा कोणी करत नाही आणि केतूदेवांसारखे विघ्न कोणी आणत नाही.
१४. ह्या मंदिरात श्री पार्वती देवींना सकाळी लहान मुलीच्या रूपात चित्रीत केले जाते, दुपारी तरुण मुलीच्या रूपात चित्रित केले जाते तर संध्याकाळी सोळा कलांचे ज्ञान असलेल्या स्त्रीच्या रूपात चित्रित केले जाते.
१५. श्री कामाक्षी देवी दक्षिणाभिमुख असून त्यांचे वाहन म्हणजेच सिंह हे त्यांच्याकडे मुख करून आहेत.
१६. नवग्रह संनिधीमध्ये सर्व आठ ग्रह सूर्याकडे मुख करून आहेत.
मंदिराबद्दल माहिती:
गाभाऱ्यामध्ये गाभारा, अंतराळ आणि अर्थमंडप आहेत. ह्या मंदिराला राजगोपुरासमवेत चारी बाजूला प्रवेशद्वारे आहेत. हे मंदिर पूर्वाभिमुख असून ह्याला पांच स्तरांचे राजगोपुर आहे. ह्याशिवाय ह्या मंदिरामध्ये सहा गोपुरे आहेत आणि तीन परिक्रमा आहेत. चित्राई ह्या तामिळ महिन्यामधे सूर्याची किरणे मंदिरामधे प्रवेश करतात म्हणून ह्या मंदिराला सूर्यकोट्टम असे म्हणतात. गाभाऱ्याच्या प्रवेशावर एक कमान आहे. पूर्वेकडील प्रवेशाजवळ बलीपीठ, नंदि, ध्वजस्तंभ, सूर्य तीर्थ हे गाभाऱ्यावरील प्रवेशकमानीजवळ आहेत. सूर्य तीर्थाच्या काठावर श्री विनायकांची एक मूर्ती आहे. ह्या मूर्तीचे नाव मळूपोरुथा विनायकर असे आहे. गाभाऱ्याच्या पुढे एक १०० स्तंभांचा मंडप आहे ज्यामधे विलक्षण शिल्पे आहेत. हा मंडप अशा पद्धतीने बांधला आहे कि ज्यामुळे आपण जेव्हा मंडपात असतो त्यावेळी असं वाटतं कि आपण एका रथामध्ये आहोत. येथील शिव लिंग हे स्वयंभू आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशावर द्वारपाल आहेत.
कोष्ट मूर्ती: श्री नर्थन गणपती, श्री नटराज, अगस्त्य मुनी, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्म, श्री विष्णू आणि श्री दुर्गा देवी. श्री चंडिकेश्वरर ह्यांची मूर्ती त्यांच्या नेहमीच्या जागी आहे. गाभाऱ्याच्या मागे श्री लिंगोद्भवर आणि त्यांची पूजा करणारे श्री महाविष्णू आणि श्री ब्रह्मदेव ह्यांच्या मूर्ती आहेत.
दुसऱ्या परिक्रमेमधे ईशान्येला श्री राहूंचे देवालय आहे. मुख्य देवालयाकडे जाणाऱ्या मार्गावर कोरीव काम केलेले स्तंभ आहेत. इथल्या सगळ्या मंडपांमध्ये याळी आणि अश्वांची सुंदर शिल्पे आहेत. ह्या परिक्रमेमधे आपल्याला पुढील मूर्ती बघावयास मिळतात - श्री नटराज, श्री सेक्कीळर, थिरुपानी (उत्सव) मंडप, श्री सेक्कीळर त्यांच्या बंधू आणि मातेसमवेत, नटराज सभा, शैव संत नालवर, श्री नृत्यगणपती, श्री शेनबागविनायकर, श्री नंदि, श्री आदि विनायकर, श्री मुरुगन त्यांच्या पत्नींसमवेत, श्री नटराज, श्री सोमस्कंद, सप्त मातृका, श्री महालक्ष्मी, श्री सरस्वती, नवग्रह, श्री चंद्र, श्री सूर्य आणि श्री महाभैरव. अगस्त्य मुनी, पराशर ऋषी, गौतम ऋषी, व्याघ्रपाद ऋषी, पातंजली ऋषी, मार्कंडेय ऋषी - ह्या सर्व ऋषींनी पूजिलेली शिवे लिंगे. ६३ नायनमार ह्यांच्या मूर्ती. पवित्र तीर्थाच्या जवळ श्री गणेशांची मूर्ती आहे. ह्या मूर्तीचे नाव श्री मळूपोरुथा विनायकर (चुका क्षमा करणारा देव) असे आहे. नवग्रह संनिधीमध्ये सर्व ग्रह सूर्याकडे मुख करून आहेत.
देवीचे देवालय: इथे श्री पार्वती देवींची दोन स्वतंत्र देवालये आहेत. एका देवालयामध्ये श्री पिरैयानिवळ नुथल अम्माई (पिरै म्हणजे चंद्र कोर, अनिवल म्हणजे धारण करणे, नुथल म्हणजे कपाळ, अम्माई म्हणजे माता) ह्यांची मूर्ती आहे. हे देवालय गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला आहे. कार्थिगई ह्या तामिळ महिन्याच्या पौर्णिमेला चंद्राची किरणे श्री अंबिका देवींच्या मूर्तीवर पडतात. भगवान शिव आणि श्री पार्वती देवी (कुन्द्रममुलैअम्मन) ह्यांच्या देवालयांच्यामध्ये श्री मुरुगन ह्यांची मूर्ती आहे. हि रचना सोमस्कंद रचनेसारखीच आहे. श्री पार्वती देवींच्या दुसऱ्या मूर्तीचे नाव श्री गिरीगुजांबिका असे आहे. श्री गिरीगुजांबिका ह्यांचे देवालय उत्तरेला मंदिराच्या तलावाच्या समोर आहे. हे पूर्वाभिमुख देवालय आहे. श्री गिरीगुजांबिका ह्या मूर्तीमध्ये योगमुद्रेमध्ये आहेत. हि मूर्ती विशिष्ठ मातीपासून बनविली असल्याकारणाने ह्यावर अभिषेक होत नाही. कधी कधी सिवेट (तामिळ मध्ये पुन्नूगु) ह्या अत्तराचा लेप लावला जातो. श्री देवालयामध्ये श्री पार्वती देवींसमवेत त्यांच्या आजूबाजूला श्री लक्ष्मीदेवी आणि श्री सरस्वतीदेवी ह्यांच्या मूर्ती आहेत. श्री सरस्वती देवींच्या हातामध्ये वीणा आहे आणि श्री लक्ष्मीदेवींच्या हातामध्ये कमळ आहे. श्री गिरीगुजांबिका देवींच्या देवालयामध्ये श्री गणेश, श्री बालमुरूगन, श्री नवशक्ती देवी, श्री संगनिधी देवी, श्री तत्पुरुषशक्ती देवी, श्री पद्मनिधी देवी, श्री गंगादेवी, सनकादि ऋषींसमवेत श्री वैष्णवी, श्री क्रियाशक्ती देवी, श्री ज्ञानाम्बिका देवी, श्री भैरव, श्री बालहस्त (तामिळ मध्ये अय्यनार) आणि श्री दुर्गा देवी ह्यांच्या मूर्ती आहेत. ह्या देवालयामध्ये श्री विनायक आणि श्री योगराहू ह्यांच्या मूर्ती एका पेटीमध्ये आहेत.
श्री राहूंचे देवालय: हे देवालय दुसऱ्या परिक्रमेच्या ईशान्येला आहे. ह्या देवालयामध्ये श्री राहू नागफण्याच्या ऐवजी मानवी मुख असलेले आहेत. त्यांच्या पत्नी सिंही आणि चित्रलेखा त्यांच्या समवेत आहेत. प्रत्येक रविवारी राहुकाळामध्ये (संध्याकाळी ४.३० ते ६ मध्ये) श्री राहुंवर दुधाचा अभिषेक केला जातो. अभिषेकाच्या वेळेस अभिषेक केलेल्या दुधाचा रंग निळा होतो.
पवित्र तीर्थे: इथे पूर्वीकाळी १२ तीर्थे होती. ह्या तीर्थांपैकी तीन तीर्थे तीन नद्या आहेत. असा समज आहे की ह्या नद्या भगवान शिवांनी आपल्या त्रिशुळाने निर्माण केल्या. त्या नद्यांची नावे नट्टारू, अरीसीलारू आणि किर्तीमानारु अशी आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशकमानीच्या पुढे सूर्यतीर्थ आहे. सूर्य तीर्थाशिवाय इतर सर्व तीर्थे आता अस्तित्वात नाहीत.
प्रार्थना:
१. हे स्थळ पुढील दोषांचे परिहार स्थळ आहे. राहू, केतू आणि सर्पदोष, कलत्र दोष, पितृ दोष, कालसर्पदोष.
२.भाविक जन इथे विवाहातल्या अडचणींवर मत करण्यासाठी प्रार्थना करतात.
३. भाविक जन इथे अपत्यप्राप्ती आणि शैक्षणिक प्रगतीसाठी प्रार्थना करतात.
पूजा:
१. नियमित दैनंदिन पूजा तसेच प्रदोष पूजा केल्या जातात.
२. राहूच्या एका राशीतून दुसऱ्या राशीमधल्या भ्रमणाच्या वेळेस आहे इथे विशेष पूजा केली जाते.
मंदिरात साजरे होणारे सण:
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री, महामाघम उत्सव
वैकासि (मार्च-जुन): पुष्य नक्षत्रावर शैव संत सेक्कीळर ह्यांचा उत्सव
अवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): १० दिवसांचा ब्रह्मोत्सव, कार्थिगई दीपम
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवदुराई
पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तिरं
मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते दुपारी १२, दुपारी ४ ते रात्री ८.३०
पत्ता: श्री नागेश्वरस्वामी मंदिर, थिरुनागेश्वरम, कुंभकोणम तालुका, तामिळनाडू ६१२२०४
दूरध्वनी: ९१-४३५२४६३३५४,९४४३४८९८३९
No comments:
Post a Comment