हे मंदिर त्रिची ते कारुर मार्गावर कुळीतलै द्वारे जाताना त्रिची पासून १६ किलोमीटर्स वर आहे. शैवसंतांनी स्तुती केलेल्या २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी हे स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. शैवसंत श्री अप्पर, श्री संबंधर आणि श्री माणिकवाचगर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. पूर्वी हा प्रदेश पालई (दारूक) वृक्षांनी भरलेला होता. ह्या मंदिरामध्ये ८३ शिलालेख आहेत ज्यांमध्ये चोळा, पांड्या आणि विजयनगर साम्राज्यांच्या राजांनी केलेल्या कामांची वर्णने दिली आहेत. मूळ मंदिर सहाव्या शतकाच्याही आधी बांधलं असावं. हे त्रिचीच्या सभोवताली असणाऱ्या सप्त स्थानांपैकी पण एक आहे. बाकीची सहा मंदिरे अशी आहेत - थिरुवनीकोविल, थिरुपैंजली, थिरुचेन्दुरै, थिरुवासी, थिरुवेधीकुडी आणि थिरुअलनथुराई.
मूलवर: श्री दारुकावनेश्वरर, श्री पराईथुराईनाथर
देवी: श्री हेमवर्णाम्बल, श्री पासूमपोन, श्री मयिलअम्माई
उत्सव मूर्ती: भिक्षाटनर
पवित्र तीर्थ: अगंड कावेरी (रुंद कावेरी)
क्षेत्र वृक्ष: पालई (तामिळ मध्ये पालई, संस्कृत मध्ये दारूक आणि मराठी मध्ये पोई किंवा खरोटा)
क्षेत्र पुराण:
१. आधी उल्लेखलेल्या प्रमाणे ह्या ठिकाणी भरपूर दारूक वृक्ष असल्याने ह्या स्थळाला दारूकवन असे नाव पडले.
२. पूर्वी प्रकाशित केलेल्या श्री वळूवुर अष्टविराट्ट मंदिराच्या लेखामध्ये उल्लेखलेल्या प्रमाणे त्या मंदिराच्या स्थळ पुराणाशी हे मंदिर निगडित आहे. दारुकवनामध्ये वास्तव्य करणाऱ्या ऋषींना अहंकारी भावना निर्माण झाली. त्यांना वाटायला लागलं की त्यांना प्राप्त झालेले आध्यात्मिक ज्ञान आणि सिद्धी हे त्यांचा आणि जनांचा उद्धार करण्यासाठी पुरेसे आहे. त्यांना असे वाटायला लागले की प्रत्येक मनुष्य आपल्या कर्मानुसार बरे वाईट भोग भोगत असल्याने देवाची गरज नाही. त्यांच्या पत्नींना पण असे वाटायला लागले की त्या सर्व स्त्रियांपेक्षा, म्हणजे अगदी देवांच्या पत्नी तसेच स्वर्गातल्या अप्सरा, ह्यांच्यापेक्षाही सुंदर आहेत. ऋषींना आणि त्यांच्या पत्नींना शिक्षण देण्यासाठी म्हणून भगवान शिव भिक्षाटनरच्या (अंगावर कपडे नसलेला भिक्षुक) तर भगवान विष्णू भिक्षाटनरच्या पत्नी मोहिनी म्हणजेच एका सुंदर स्त्रीच्या रूपात इथे प्रकट झाले. भिक्षाटनरला पाहून ऋषींच्या स्त्रिया त्यांच्याकडे आकर्षित झाल्या आणि त्यांचं त्यांच्या कामामधलं लक्ष विचलित झालं तसेच मोहिनीला पाहून त्यांना आपल्या अति सुंदर असण्याच्या भावनेची लाज वाटली. भिक्षाटनर आणि मोहिनीच्या पाठीमागे येत येत भिक्षाटनर, मोहिनी आणि ऋषींच्या पत्नी ऋषी जिथे यज्ञ करीत होते तेथे आले. मोहिनीला बघून ऋषिपण तिच्याकडे आकर्षित झाले. पण त्याचवेळी आपल्या पत्नींचं त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे हे पाहून ते क्रोधीत पण झाले. त्यांनी भिक्षाटनरचा नाश करण्यासाठी अनेक मायावी प्रयत्न केले. त्यांनी आपल्या मंत्रशक्तीने हिंस्त्र प्राणी, वाईट शक्ती निर्माण करून त्यांना भिक्षाटनरवर धाडले. पण त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले. शेवटी भगवान शिवांनी आपल्या मूळ रूपात येऊन ऋषींना दर्शन दिले आणि त्यांनी तिथे पराई वृक्षाच्या खाली ऊर्ध्व तांडव नृत्य केले. ऋषींना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी भगवान शिवांकडे क्षमायाचना केली.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री इंद्रदेव, श्री कुबेर आणि सप्त ऋषी.
वैशिष्ट्ये:
१. प्राचीन काळामध्ये हि जागा पालई वृक्षांनी भरली होती म्हणून ह्या जागेला थिरुप्पराईथुराई असे नाव प्राप्त झाले.
२. पालई वृक्षांमध्ये एक शिव लिंग निर्माण झाले आणि कालांतराने तिथे मंदिर बांधले गेले.
३. संस्कृत मध्ये पालई वृक्षाला दारूक असं म्हणतात म्हणून ह्या स्थळाचे पौराणिक नाव दारुकवन असे आहे.
४. रथयात्रेची उत्सव मूर्ती आणि भिक्षाटनर ह्यांची मूर्ती ज्या मंडपामध्ये आहे त्या मंडपाच्या छतावर बारा राशींची चिन्हे चित्रित केली आहेत. असा समज आहे की ज्याच्या त्याच्या राशीच्या चिन्हाखाली उभे राहून भगवान शिव आणि भिक्षाटनर ह्यांची प्रार्थना केल्यास ग्रहांच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्ती मिळते.
५. मंदिराच्या बाहेर असलेल्या श्री विनायकांच्या मंदिरात त्यांचे नाव श्री पालई विनायकर असे आहे.
६. श्री दक्षिणामूर्तींचे देवालय कल्लल वृक्षाच्या (वटवृक्ष) खाली आहे. इथे त्यांच्या मूर्तीमध्ये चार सिंह चार स्तंभ घेऊन उभे आहेत असे चित्रित केले आहे.
७. इथे श्री अर्धनारीश्वरर हे ऋषभ वाहनावर आरूढ असे चित्रित केले आहे. हे दृश्य दुर्मिळ आहे.
८. प्रत्येक वर्षी पूरत्तासी महिन्याच्या १८व्या दिवशी सूर्याचे किरण शिव लिंगावर पडतात.
९. इथल्या क्षेत्र वृक्षाच्या खाली भगवान शिवांचे ध्यान करणे हे खूप कल्याणकारी समजले जाते.
१०. ह्या ठिकाणी कावेरी नदी खूप रुंद होते म्हणून इथे कावेरी नदीचे अगंड (रुंद) कावेरी असे नाव आहे.
११. मयीलादुथुराई येथील तीर्थामधलं स्नान जसं पवित्र जातं तसंच ऎप्पासी महिन्याच्या पहिल्या दिवशी इथल्या तीर्थामधलं स्नान पण पवित्र मानलं जातं.
१२. हे ह्या प्रदेशातल्या सप्त स्थानांपैकी पण एक आहे.
१३. श्री मुरुगन ह्यांची इथे एका देवालयामध्ये श्री दंडपाणी ह्या रूपात पूजा केली जाते तर अजून एका देवालयामध्ये सहा मुखे असलेल्या श्री षण्मुख रूपामध्ये पूजा केली जाते.
१४. शैवसंत अरुणागिरिनाथर ह्यांनी इथल्या श्री मुरुगन ह्यांच्या स्तुत्यर्थ स्तोत्रे रचली आहेत.
१५. श्री अंबिका देवींच्या देवालयासमोरच्या स्तंभावर ऊर्ध्व तांडव करत असलेले श्री नटराज आणि नृत्य करत असलेली श्री कालीदेवी ह्यांचे शिल्प आहे.
मंदिराबद्दल माहिती:
हे मंदिर माड शैलीचे असून ह्या मंदिराचा व्याप साधारण ५ एकर आहे. जेव्हां इथे घनदाट पालई वृक्षांच्या वनामध्ये शिव लिंग सापडलं तेव्हां इथे मंदिर बांधलं गेलं. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. इथे दोन परिक्रमा आहेत. राजगोपुराच्या पुढे ध्वजस्तंभ, बलीपीठ आणि नंदि आहेत. प्रत्येक परिक्रमेच्या प्रवेशावर राजगोपुर आहे. मुख्य प्रवेशद्वाराचे राजगोपुर सात स्तरांचे आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्याजवळ श्री गणेशांची विशाल मूर्ती आहे. राजगोपुराच्या बाहेर मंदिराचा तलाव आणि १०० स्तंभ असलेला मंडप आहे. ह्या मंडपाला अलंकारिक मनोरा असलेलं प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात गाभारा, अंतराळ आणि महामंडप आहे. हे माड शैलीचे मंदिर असल्या कारणाने भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांच्या मूर्ती जरा उंचीवर आहेत. शिव लिंग स्वयंभू असून छोटं आहे. पूरत्तासी महिन्याच्या १८व्या दिवशी सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात.
कोष्टामध्ये श्री विनायकर, श्री दक्षिणामूर्ती, श्री अर्धनारीश्वरर, श्री ब्रह्म, श्री दुर्गा देवी आणि श्री चंडिकेश्वरर ह्यांच्या मूर्ती आहेत.
इथल्या मंडपातील स्तंभावर श्री नटराज, ज्यांचा एक पाय आकाशाच्या दिशेने आहे, आणि श्री दुर्गा देवी ह्यांचे नृत्य करतानाचे शिल्प आहे. श्री नंदिदेव एका छोट्या मंडपामध्ये गाभाऱ्याकडे मुख करून आहेत. महामंडपाच्या बाहेर श्री अंबिकादेवींचे स्वतंत्र देवालय आहे आणि त्या दक्षिणाभिमुख आहेत. त्या उभ्या मुद्रेमध्ये आहेत. त्यांच्या समोर एक छोटा नंदि आहे. आतल्या परिक्रमेमध्ये मंदिराचं सौंदर्य दिसून येतं तसेच येथील शिल्पांमधून कारागिरीचे कौशल्य पण प्रतीत होतं. परिक्रमेच्या दोन्ही बाजूंना उंचीवर मंच आहेत. इथे सप्तमातृका, पिडारी, शैवसंत नालवर, श्री गणेश, ६३ नायनमार, अप्पू लिंग, वायू लिंग, तेयु लिंग, श्री अय्यनार, स्वर्ण लिंग, श्री सुब्रमण्यम त्यांच्या पत्नींसमवेत, भगवान विष्णू, श्री महालक्ष्मी, श्री भैरवर, श्री सूर्य, श्री चंद्र, नवग्रह, गांगल मूर्ती आणि श्री दुर्गादेवी ह्यांच्या मूर्ती आहेत. सोमस्कंदांची इथे छोटी देवालये आहेत. श्री दक्षिणामूर्तींचे छोटे पण सुंदर देवालय आहे. सगळ्या कोष्ठ मूर्ती खूप सुंदर आहेत. बाहेरील परिक्रमेमध्ये मोकळी जागा आहे. मंदिराच्या नैऋत्येला श्री विनायकांचे देवालय आहे जिथे त्यांना श्री कन्नी विनायकर असे संबोधले जाते. पादुका धारण केलेले श्री दंडपाणी ह्यांचे देवालय बाहेरील परिक्रमेमध्ये आहे. क्षेत्र वृक्षाखाली छोटं शिव लिंग आहे. नवग्रह देवालयामध्ये फक्त श्री शनिदेव हे त्यांच्या वाहनावर आहेत. मंदिरामध्ये एक जागा अशी आहे जिथून पांच गोपुरांचं दर्शन एकाच वेळी घेता येतं. श्री नटराजांचे स्वतंत्र देवालय आहे. श्री विनायकांना येथे श्री पालई विनायकर असे संबोधले जाते. त्यांचे देवालय मंदिराच्या बाहेर आहे. ते इथे उभ्या मुद्रेमध्ये आहेत. मंडपामध्ये भिक्षाटनर आणि बऱ्याच कास्याच्या मूर्ती आहेत. मंडपाच्या छतावर १२ राशींची चिन्हे चित्रित केली आहेत. असा समज आहे कि भगवान शिवांनी इथे क्षेत्र वृक्षाखाली दर्शन दिलं. म्हणून इथे क्षेत्र वृक्षाखाली शिव लिंग आहे. ऎप्पासी महिन्यामध्ये महिनाभर तुला स्नान घेतलं जात. ह्या महिन्यामध्ये भाविक जन कावेरी नदीमध्ये पवित्र स्नान घेतात. मयीलादुथुराई मध्ये ऎप्पासी महिन्याच्या शेवटच्या दिवशीच्या स्नानाला कडईमुळुकु असं म्हणतात. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी ऎप्पासी महिन्याच्या पहिल्या दिवशीच्या स्नानाला मुदलमुळुकु म्हणतात. असा समज आहे की ह्या वेळी भक्तांवर कृपावर्षाव करण्यासाठी भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ऋषभ वाहनावर येतात.
प्रार्थना:
१. भाविक जन इथे त्वचारोग आणि इतर रोगांतून मुक्ती मिळविण्यासाठी प्रार्थना करतात.
२. पालक इथे येऊन आपल्या अपत्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात.
३. भाविक जन इथे विवाहातील अडचणींवर मात करण्यासाठी तसेच समृद्धीसाठी श्री पार्वतीदेवींची प्रार्थना करतात
४. विवाहासाठी योग्य वर आणि वधू मिळण्यासाटी भाविक जन इथे श्री वाराहीदेवींची पूजा करतात.
मंदिरात साजरे होणारे सण:
वैकासि (मे-जून): वैकासि विशाखा उत्सव (हा इथला मुख्य उत्सव आहे), १२ दिवसांचा ब्रम्होत्सव
आवनी (जून-जुलै): गणेश चतुर्थी
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): पहिल्या दिवशी तीर्थवारी उत्सव, अन्नाभिषेक
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीराई
मासी (फेब्रुवारी-मार्च): शिवरात्रि
मंदिराच्या वेळा: सकाळी ७.३० ते ११.३०, संध्याकाळी ४.३० ते ८.३०
पत्ता: श्री दारुकावनेश्वरर मंदिर, पोस्ट थिरुप्पराईथुराई, कारूर जिल्हा, तामिळनाडू ६३९११५
दूरध्वनी: +९१-९९४०८४३५७१
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment