हे मंदिर तामिळनाडूमधल्या कारूर जिल्ह्यामध्ये कुळितलै गावाजवळ अय्यारमलै ह्या गावामध्ये वसलेलं आहे. १५०० वर्षे जुनं असलेलं हे मंदिर कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. श्री अरुणागिरिनाथर ह्यांनी येथील श्री मुरुगन ह्यांची स्तुती गायली आहे. नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी हे एक स्थळ आहे. श्री अप्पर, श्री संबंधर आणि श्री वल्लालर ह्या श्रेष्ठ नायनमारांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. त्यामुळे हे मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. इथे साधारण ५० शिलालेख आहेत ज्यांमध्ये असलेल्या माहितीमधले संदर्भ ११ ते १६व्या शतकांमधल्या घटना दर्शवतात. चोळा, पांड्या, होयसाला आणि विजयनगर साम्राज्यातील राजांनी वेळोवेळी देणग्या देऊन ह्या मंदिराचा जीर्णोद्धार तसेच देखभाल केली आहे.
हे मंदिर मनपारै-मुसिरी मार्गावर कुळितलै पासून ९ किलोमीटर्स, मुसिरी पासून १४ किलोमीटर्स वर, कारूर पासून ४१ किलोमीटर्स तर त्रिची पासून ४७ किलोमीटर्स वर आहे. पूर्वी ह्या स्थळाचे नाव थिरुवाटपोक्कि असे होते तर आता अय्यारमलै / अय्यरमलै असे आहे. चोळा साम्राज्यातील कुलोथंगन २ ह्या राजाने ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
मूलवर: श्री रत्नगिरीश्वरर, श्री अर्धनारीश्वरर, श्री मणिकेसर, श्री मैकोळुंदिसर, श्री मध्यान्हसोक्कर, श्री वाटपोक्किनाथर, श्री रत्नगिरीसर, श्री राजलिंगं
देवी: श्री कुरंबरकुळली, श्री सुरुंबरकुळली, श्री अरलकेसी
क्षेत्र वृक्ष: निम वृक्ष
पौराणिक नाव: थिरुवाटपोक्कि, अय्यारमलै, एैवरमलै, शिवायमलै, रत्नगिरी
वर्तमान नाव: अय्यारमलै
पवित्र तीर्थ: कावेरी
क्षेत्र पुराण:
१. स्थळ पुराणानुसार एक आर्यन राजा ज्याने आपले राज्य गमावले होते तो इथे रत्नांच्या शोधात आला. भगवान शिवांनी त्याची परीक्षा घ्यायचे ठरवले आणि ते राजासमोर एका ब्राम्हणाच्या वेषात प्रगट झाले. त्यांनी त्या राजाला स्नानासाठी एक तुबरा कावेरी नदीमधून पाणी आणून पूर्ण भरावयास सांगितले. राजाने बराच प्रयत्न केला पण काही केल्या तो तुबरा पूर्ण भरेना. राजा खूप क्रोधीत झाला आणि त्याने ब्राम्हणावर तलवारीने वार केला. त्या ब्राम्हणातल्या रुपातले भगवान शिव त्यांच्या मूळ रूपात प्रकट झाले आणि त्यांनी त्या राजाला परत तलवारीचा वार करण्यापासून परावृत्त केले. त्यांनी त्या राजाला त्याला हवा असलेला रत्न दिला. तामिळ मध्ये वाळ म्हणजे तलवार आणि पोक्कि म्हणजे थांबवणे. भगवान शिवांनी तलवारीचा वार थांबवला म्हणून ह्या स्थळाचे नाव वाळपोक्कि पडले ज्याचा पुढे अपभ्रंश होऊन ते वाटपोक्कि असे झाले. अजूनही इथे शिव लिंगावर तलवारीच्या वाराचे चिन्ह दिसते. भगवान शिवांनी त्या राजाला रत्न दिले म्हणून भगवान शिवांचे येथे श्री रत्नगिरीश्वरर असे नाव प्रसिद्ध झाले.
२. पुराणानुसार जेव्हां भगवान शिव आणि अंधकासुर यांचे युद्ध चालू होते त्यावेळी जेव्हां जेव्हां अंधकासुराच्या शरीरामधून रक्ताचा थेंब पडत होता त्यापासून नवीन असुर जन्माला येत होता. तेव्हां भगवान शिवांनी आपल्या मुखाच्या ज्वालेतून श्री योगेश्वरी देवी निर्माण केली. तिने सप्त मातृकांच्या सहाय्याने अंधकासुराचे रक्त जमिनीवर पडण्याआधी गिळण्यास चालू केले. आणि त्यामुळे असुराचा वध झाला. म्हणून इथे सप्त मातृकांसमवेत श्री योगेश्वरी देवीची पूजा करणे हे महत्वाचे मानले जाते. इथल्या गुहेमध्ये श्री योगेश्वरी देवी समवेत सप्त मातृकांचे देवालय आहे.
३. पुराणानुसार श्री इंद्रदेव मूलवर च्या समोर असलेल्या भिंतींच्या नऊ छिद्रांमधून येऊन भगवान शिवांची पूजा करायचे. त्यावेळी ते वादळ आणि कडाडणाऱ्या वीजेच्या रूपात यायचे. अजून पण इथे भगवान शिवांना वाहिलेले हार आणि वस्त्र हे दुसऱ्या दिवशी जळलेल्या अवस्थेत दिसतात. तसेच अभिषेकासाठी वापरलेले दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होते.
४. आधीच्या लेखांमध्ये आम्ही वायू आणि आदिशेष ह्यांच्या युद्धाबद्दल उल्लेख केला होता. त्यामध्ये असा पण उल्लेख केला होता कि त्यांच्या युद्धसमयी मेरू पर्वताचे काही मौल्यवान दगडांचे तुकडे उडाले होते आणि ते विविध जागी पडून त्यांचे रूपांतर शिव लिंगामध्ये झाले होते. कोरल दगडाचे थिरुवन्नमलै इथे शिव लिंगामध्ये रूपांतर झाले. रुबी दगड रत्नागिरी (म्हणजे ह्या जागेत) पडला, पाचूचा दगड एलोनगोई इथे पडला, निळा नीलम दगड पोडिगाईमलै मध्ये पडला आणि हिरा कोडूमुडी मध्ये पडला.
५. कांचीपुरम येथे राहणाऱ्या वैराग्य पेरुमल ह्या भक्ताने त्याला अपत्य प्राप्ती झाली तर श्री रत्नगिरीश्वरांना म्हणजेच भगवान शिवांना आपले शिर अर्पण करिन असा संकल्प केला होता. जेव्हां त्याला अपत्य प्राप्ती झाली तेव्हा त्याने इथे येऊन आपला शिरच्छेद केला. त्याचे शिर टेकडीच्या शिखरावर पोचले पण पाय मात्र टेकडीच्या खालीच राहिले. मंदिरामध्ये त्याच्या शिराची मूर्ती आहे. ह्या मूर्तीला दूध आणि मधाचे स्नान घालून मग भगवान शिवांना अर्पण केलेला हार ह्या मूर्तीला अर्पण केला जातो.
६. स्थळ पुराणानुसार पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळात काही काळ इथे वास्तव्य केलं. म्हणून ह्या टेकडीला एैवरमलै (एैवर म्हणजेच पांच म्हणजेच पांडव, मलै म्हणजे टेकडी).
मंदिरात ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
अगस्त्य मुनी, श्री इंद्रदेव, श्री वायुदेव, श्री दुर्गा देवी, सप्त मातृका, आदिशेष, रोमेश ऋषी, जयंतन आणि श्री सूर्यदेव.
वैशिष्ट्ये:
१. अभिषेकासाठी वापरलेलं दूध संध्याकाळ पर्यंत खराब होत नाही. त्याचे काही तासांमध्ये गोड दह्यामध्ये रूपांतर होते.
२. कार्थिगई महिन्याच्या पहिल्या दिवशी भगवान शिवांना माणिकमुगुट अर्पण केला जातो.
३. ज्यांना आपल्या कुलदेवतेबद्दल माहिती नाही ते ह्या मंदिरातल्या भगवान शिवांना आपले कुलदैवत मानतात.
४. असा समज आहे कि इथे भगवान शिव नऊ मौल्यवान रत्नांच्या रूपामध्ये आहेत. म्हणून इथल्या टेकडीच्या आसपासच्या जमिनीमध्ये खणल्यावर लाल आणि हिरवे दगड मिळतात.
५. इथल्या शिव लिंगावर तलवारीने वार केल्याचे चिन्ह आहे.
६. ह्या टेकडीवर भाविक जनांना सर्प दंश होत नाहीत.
७. ह्या टेकडीवर एका ठिकाणी अशी जागा आहे जिथे एकही कावळा उडताना दिसत नाही.
८. येथील अभिषेकासाठी इथून ८ किलोमीटर्स वर असलेल्या कावेरी नदीचे पाणी दररोज पायी चालत जाऊन आणले जाते.
९. मंदिर आणि मंदिरातील परिक्रमा तामिळ भाषेतील ௐ (ॐ) आकाराचे आहेत.
१०. तमिळ चित्राइ महिन्यामध्ये शिव लिंगाच्या समोरील भिंतीवरील नऊ छिद्रांतून सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात.
११. शिव लिंग एका खडकावर आहे आणि सभोवतालच्या आठ खडकांनी वेढलेले आहे.
मंदिराबद्दल माहिती:
हे मंदिर टेकडीवर ११७८ फुटावर वसलेलं आहे. मंदिरात जाण्यासाठी साधारण १२०० पायऱ्या चढून जायला लागतं. हे त्या तीन मंदिरांपैकी एक आहे ज्या मंदिरांचं दर्शन एका दिवसात घेतल्याने मोक्षप्राप्ती होते. ती तीन मंदिरे आणि त्यांचं दर्शन घेण्याच्या वेळा अशा आहेत - सकाळी श्री कदंबर कोविल, दुपारी १२ वाजता श्री रत्नगिरीश्वरर (हे मंदिर), संध्याकाळी श्री एंगोईनाथर मंदिर. हे मंदिर आणि त्याची परिक्रमा हे तामिळ भाषेतील ௐ (ॐ) ह्या आकाराचे आहे म्हणून ह्या स्थळाला शिवमलै असं पण म्हणतात. इथे भगवान शिव हे टेकडीच्या शिखरावर वसलेले असल्याकारणाने त्यांना श्री मलैकुरींदिसर असे संबोधले जाते. आणि इथली पूजा मध्यान्ह समयी केली जाते म्हणून त्यांना श्री मध्यान्हसोक्कर असे संबोधले जाते.
मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या चढणाऱ्या भक्तांना विश्रांती मिळावी म्हणून पायऱ्यांच्या बाजूला छोटे छोटे मंडप बांधले आहेत.
ह्या टेकडीवर बऱ्याच गुहा आहेत. असा समज आहे कि ह्या गुहांमध्ये ऋषीमुनींनी तपश्चर्या केली.
प्रवेशद्वाराच्या कमानीवर शिव लिंग चित्रित केले आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूंना श्री गणेश, श्री पार्वती देवी आणि श्री मुरुगन ह्यांची पण चित्रे आहेत.
हे मंदिर पश्चिमाभिमुख असून ह्याचा गाभारा शिव लिंगाच्या आकाराचा आहे.
चित्राई ह्या तामिळ महिन्यामध्ये शिव लिंगासमोर असलेल्या नऊ छिद्रांमधून सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात. शिव लिंग एका खडकावर असून ते आठ खडकांनी वेढलेले आहे. मंदिराच्या मागील बाजूस आठ दिशांना हत्ती आहेत. शिव लिंगावर उजव्या बाजूला तलवारीने वार केल्याचे चिन्ह आहे.
कोष्ठामध्ये श्री दक्षिणामूर्ती, श्री अर्धनारीश्वरर, श्री भैरवर, श्री ब्रम्हदेव आणि श्री दुर्गादेवी ह्यांच्या मूर्ती आहेत.
मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर १०७व्या पायरीवर श्री गणेशांचे देवालय आहे. देवीच्या देवालयाच्या प्रवेशद्वाराजवळ अजून एक श्री गणेशांचे देवालय आहे.
टेकडीच्या पायाशी श्री विनायकर, श्री कुप्पुस्वामी आणि श्री विश्वकर्मा ह्यांची देवालये आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराजवळ ध्वजस्तंभ आणि नंदि आहेत आणि दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. पायऱ्यांची फरसबंदी समान रीतीने केली आहे आणि प्रत्येक टप्प्यावर एक श्री विनायकांचे देवालय आहे. टेकडीच्या मार्गावर एका जागी पाउलांची चिन्हे दिसतात जी भगवान शिवांची आहेत असा समज आहे. ह्या स्थळाला पोन्नीदूमपराई (पराई म्हणजे तामीळ मध्ये खडक) असे नाव आहे. ह्या ठिकाणी श्रेष्ठ शैवसंत संबंधर ह्यांना भगवान शिवांकडून सोनं मिळालं. टेकड़ीवर अजून वरती गेल्यावर एका गुहेमध्ये सप्त मातृकांच्या मूर्ती आहेत. श्री अंबिका देवी एका स्वतंत्र पूर्वाभिमुख देवालयामध्ये आहेत. त्यामुळे इथे भगवान शिव आणि श्री पार्वती देवी एकमेकांसमोर आहेत. श्री अंबिका देवींचे देवालय भगवान शिवांच्या देवालयापेक्षा एक पायरी खाली आहे. इथे श्री सूर्यदेव आणि श्री चंद्रदेव त्यांच्या पत्नींसमवेत आहेत. हे दृश्य दुर्मिळ आहे. टेकडीच्या पायथ्याशी श्री आंजनेय आणि शैवसंत नालवर ह्यांची देवालये आहेत. परिक्रमेमध्ये ६३ नायनमार, श्री शिवगामी देवी समवेत श्री नटराज, श्री नंदिदेव, श्री वल्ली आणि श्री दैवानै समवेत श्री सुब्रमण्यम ह्यांची देवालये आहेत.
प्रार्थना:
१. भाविक जन इथे विवाहामधल्या अडचणींवर मात करण्यासाठी, अपत्य प्राप्तीसाठी, मानसिक शांती मिळविण्यासाठी, रोगनिवारणासाठी तसेच व्यवसायामध्ये यश मिळविण्यासाठी प्रार्थना करतात.
२. भाविक जन इथे अस्थमा, रक्तदाबाचे असंतुलन, शारीरिक वेदना ह्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी येतात. कारण अशी समजूत आहे कि इथल्या वातावरणामध्ये ह्या मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या औषधी वनस्पतींमुळे औषधी गुण भरले आहेत.
पूजा:
१. दिवसातून तीन वेळेला पूजा केली जाते (सकाळी १०.३०, दुपारी १२ आणि संध्याकाळी ५).
२. प्रदोष दिवशी प्रदोष पूजा
३. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा, अमावस्या, सोमवार, शुक्रवार, प्रत्येक तामिळ महिन्याचा पहिला दिवस ह्या दिवशी पूजा केल्या जातात.
४. गुरु गोचर, शनी गोचर ह्या वेळी विशेष पूजा केल्या जातात.
५. तामिळ नववर्ष, इंग्लिश नववर्ष आणि पोंगल ह्या वेळी विशेष पूजा केल्या जातात.
मंदिरात साजरे होणारे काही महत्वाचे सण:
चित्राई (एप्रिल-मे): १५ दिवसांचा चैत्र उत्सव
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): प्रत्येक शुक्रवारी आणि सोमवारी विशेष पूजा, पौर्णिमेला गिरीवलम
थै (जानेवारी-फेब्रुवारी): थैपुसम, तीर्थवारी
मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते ११, संध्याकाळी ४ ते ८
पत्ता: श्री रत्नगिरीनाथर अय्यारमलै (थिरुवाटपोक्कि), पोस्ट शिवायम, तालुका कुळितलै, जिल्हा कारूर
दूरध्वनी: +९१-४३२३२४५५२२
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment