Sunday, January 19, 2025

कुळितलै येथील श्री कदंबवनेश्वरर

हे मंदिर त्रिची-कारुर मार्गावर असून त्रिची शहरापासून ४० किलोमीटर्स वर आहे तर कारुर पासून ४१ किलोमीटर्स वर आहे. पूर्वी ह्या प्रदेशामध्ये भरपूर कदंबाची झाडे होती म्हणून ह्या स्थळाला कदंबवनथुराई असं नाव होतं. शैवसंतांनी स्तुती केलेल्या २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी हे एक मंदिर आहे. हे मंदिर कावेरी नदीच्या दक्षिण काठावर वसले आहे. शैवसंत अप्पर ह्यांनी त्यांच्या स्तोत्रांमधे ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. तसेच शैवसंत अरुणागिरिनाथर ह्यांनी पण ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. श्री मुथुस्वामी दीक्षितर ह्यांनी इथल्या भगवान शिवांवर कृती रचली आहे. आधीच्या लेखामध्ये नमूद केल्याप्रमाणे हे त्या तीन मंदिरांपैकी एक आहे ज्यांचे दर्शन एका दिवसात घेतले जाते. ह्या मंदिराचे दर्शन सकाळी घेतले जाते. नायनमारांनी ह्या मंदिराची स्तुती गायली असल्याने हे मंदिर त्यांच्याही आधी म्हणजे सहाव्या शतकाच्याही आधी बांधले गेले असावे आणि नंतर मध्ययुगीन काळामध्ये चोळा राजांनी त्याचा जीर्णोद्धार केला असावा. कालांतराने नायक आणि विजयनगर साम्राज्यातल्या राजांनी पण जीर्णोद्धार आणि विस्तार केला. पल्लव राजांच्याही आधी हे मंदिर अस्तित्वात असावं. हे मंदिर उत्तराभिमुख असल्याने ह्या मंदिराला दक्षिण काशी असं म्हणलं जातं. 

मूलवर: श्री कदंबवनेश्वरर, श्री कदंबवननाथर
देवी: श्री बालाकुजाम्बल, श्री मुत्रीलामुलयाल
क्षेत्र वृक्ष: कदंब
पवित्र तीर्थ: कावेरी नदी, ब्रम्ह तीर्थ
पौराणिक नाव: कदंबथुराई, कुळीठण्डलै
वर्तमान नाव: कुळितलै
उत्सव मूर्ती: सोमस्कंद मूर्ती

क्षेत्र पुराण

१. पुराणानुसार स्वर्गातील देव, ऋषी आणि मुनी धुम्रलोचन राक्षसाच्या त्रासाने घाबरले होते. त्यांनी श्री अंबिका देवींना राक्षसाच्या अत्याचारापासून वाचविण्यासाठी मदतीची विनंती केली. श्री अंबिका देवींनी श्री दुर्गादेवींचे रूप घेतलं आणि राक्षसाबरोबर यद्ध केलं. धुम्रलोचन राक्षसाला तपश्चर्येमुळे मिळालेल्या वरदानांमुळे श्री दुर्गादेवींना राक्षसाला हरवता नाही आलं. तेव्हां भगवान शिवांनी सप्त मातृकांना अंबिका देवीला मदत करण्यासाठी धाडले. धुम्रलोचन सर्व शक्तींना एकत्र तोंड देणं कठीण झालं म्हणून तो कात्यायन ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन लपून बसला. त्याचा पाठलाग करत आलेल्या सप्त मातृकांनी कात्यायन ऋषी म्हणजेच धुम्रलोचन आहे असं समजून कात्यायन ऋषींची हत्या केली. त्यामुळे त्यांना ब्रम्हहत्या दोष प्राप्त झाला. ह्या दोषामुळे त्यांचा वर्ण बदलून काळा झाला आणि त्यांची मुखे उग्र झाली. त्या अंबिका देवींकडे ह्याचं निवारण करण्यासाठी गेल्या तेव्हां अंबिका देवींनी त्यांना भगवान शिवांची उपासना करण्यास सांगितले. त्यांनी ह्या ठिकाणी उपासना केली आणि त्यांची ब्रम्हहत्या दोषातून मुक्तता झाली. भगवान शिवांनी त्यांना कदंब वृक्षामधून प्रकट होऊन दर्शन दिले. म्हणून इथे भगवान शिवांचे नाव श्री कदंबवनेश्वरर आहे. इथे भगवान शिवांच्या मुख्य देवालयातील गाभाऱ्याच्या मागे सप्त मातृकांच्या मूर्ती आहेत. 

२. पुराणानुसार श्री ब्रम्हदेव सृष्टी निर्माण करण्याच्या कार्यामध्ये थकले. त्यांनी भगवान शिवांना मुक्तीसाठी प्रार्थना केली. भगवान शिवांनी श्री ब्रम्हदेवांनी आत्तापर्यंत केलेल्या सृष्टी निर्माणाच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांनी श्री ब्रम्हदेवांना इथे उपासना करावयास सांगितले. श्री ब्रम्हदेवांनी अनेक वर्षे इथे राहून उपासना केली आणि मुक्ती प्राप्त केली. श्री ब्रम्हदेवांनी इथे रथयात्रा आयोजित केली. ह्या ठिकाणी श्री ब्रम्हदेवांना मुक्ती प्राप्त झाली म्हणून ह्या स्थळाला ब्रम्हपुरम असे नाव प्राप्त झाले.

३. इथल्या स्थळ पुराणामध्ये असा उल्लेख आहे कि जे कोणी सकाळी श्री कदंबवनेश्वरर, माध्यान्ह समयी अय्यारमलै येथील श्री रत्नगिरीश्वरर आणि सायंकाळी श्री एंगोईमलैनाथर ह्यांची उपासना करतील त्यांना मुक्ती मिळेल.

४. इथल्या स्थळ पुराणानुसार श्री मुरुगन ह्यांनी स्थापिलेल्या पांच कदंब देवालयांतील हे एक देवालय आहे. इतर चार असे आहेत - श्री कदंबर, श्री आदि कदंबर, श्री इलान कदंबनूर आणि श्री पेरू कदंबनूर.

५. पुराणांनुसार भगवान विष्णूंनी सोमासुरापासून चार वेद परत मिळविण्यासाठी ह्या ठिकाणी उपासना केली म्हणून ह्या स्थळाला चतुर्वेदपुरी असे नाव आहे.

६. असा समज आहे की निष्ठावान शिवभक्त देव शर्मा ह्यांना मदुराई येथे पार पडलेल्या श्री सुन्दरेश्वरर आणि श्री मीनाक्षी देवी ह्यांच्या विवाह सोहळ्याचे दर्शन ह्या मंदिरात झाले. 

७. श्री मुरुगन ह्यांनी इथे भगवान शिवांची उपासना केल्यामुळे सुरपद्मन ह्या राक्षसाची हत्या करून त्यांना प्राप्त झालेल्या पापाचे क्षालन झाले.

मंदिरात ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

भगवान शिव, श्री मुरुगन, श्री ब्रम्हदेव, सप्त मातृका, कण्व ऋषी, देव शर्मा, अगस्त्य ऋषी, शैव संत अप्पर, अयादिगल आणि काडवरकोण. 

वैशिष्ट्ये:

१. इथे भगवान शिव उत्तराभिमुख आहेत, श्री चंडिकेश्वरर पश्चिमाभिमुख आहेत, श्री दक्षिणामूर्ती दक्षिणाभिमुख आहेत तर श्री ब्रम्हदेव पूर्वाभिमुख आहेत.

२. भगवान शिवांच्या पाठीमागे सप्त कन्नीग असणं हे खूप दुर्मिळ आहे. 

३. नवग्रह देवालयाच्यावर श्री सुब्रमण्यम ह्यांची त्यांच्या पत्नींसमवेत मूर्ती आहे.

४. इथे श्री दुर्गादेवी ह्यांचे देवालय नाही. म्हणून इथे भाविक जन श्री चामुंडादेवींची श्री दुर्गादेवी म्हणून उपासना करतात. भगवान शिवांच्या देवालयात हि पूजा होते. राहू काळामध्ये भगवान शिव आणि श्री दुर्गादेवींची (श्री चामुंडादेवी) विशेष पूजा केली जाते.

५. इथे श्री नटराजांच्या दोन मूर्ती आहेत. एका मूर्तीमध्ये त्यांच्या पायाखाली मुलायगन नाही. श्री नटराजांच्या कपाळावर चंद्रकोर आहे.

मंदिराबद्दल माहिती:

श्री मुरुगन ह्यांनी स्थापन केलेल्या सहा कदंब देवालयांपैकी हे एक आहे. हे मंदिर उत्तराभिमुख आहे. इथे पांच स्तरांचं राजगोपुर आहे आणि दोन परिक्रमा (प्रकार) आहेत. राजगोपुराच्या पुढे एक मंडप आहे जिथे भगवान शिव, श्री पार्वतीदेवी, श्री नंदिदेव, श्री मुरुगन आणि श्री विनायकर ह्यांच्या स्टुक्कोच्या मूर्ती आहेत. 

ध्वजस्तंभ मंडपाच्या छिद्रामधून वरती जातो. राजगोपुरानंतर बलीपीठ आणि श्री नंदिदेव आहेत. गाभाऱ्यामध्ये गाभारा, अंतराळ, अर्थमंडप आणि मुखमंडप आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशाजवळ दिंडी आणि मुंडी हे द्वारपाल आहेत. येथील शिवलिंग स्वयंभू आहे आणि ते उत्तराभिमुख आहे. मूलवर च्या पाठीमागे सप्त मातृकांच्या मूर्ती आहेत.

कोष्टामध्ये श्री विनायकर, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रम्हदेव आणि श्री दुर्गादेवी ह्यांच्या मूर्ती आहेत. 

श्री चंडिकेश्वरर हे सहसा दक्षिणाभिमुख असतात पण इथे ते पश्चिमाभिमुख आहेत. श्री ब्रम्हदेव हे सहसा पूर्वाभिमुख असतात पण इथे ते उत्तराभिमुख आहेत. अर्थ मंडपामध्ये श्री गणेशांची विशाल मूर्ती आहे. महामंडपाच्या बाहेर श्री अंबिकादेवींचे स्वतंत्र देवालय आहे ज्यामध्ये ध्वजस्तंभ, बलीपीठ आणि नंदि आहेत. श्री अंबिकादेवींच्या समोर परमनाथर ह्यांचे शिल्प आहे जे ह्या देवालयाचे संरक्षक आहेत.

इतर देवालये:

इथे परिक्रमेमध्ये श्री अनुग्रह विनायकर, श्री वल्ली आणि श्री दैवानै समवेत श्री षण्मुख, श्री शनीश्वरर ह्यांची देवालये आहेत. श्री नटराज ह्यांची दोन देवालये आहेत. त्यापैकी एका देवालयामध्ये श्री नटराजांच्या पायाशी मुलायगन (अज्ञानाचे प्रतीक) नाही. इथे श्री दुर्गादेवींचे स्वतंत्र देवालय नाही म्हणून श्री चामुंडादेवींची श्री दुर्गादेवी म्हणून पूजा केली जाते. आतील परिक्रमेमध्ये श्री चंडिकेश्वर, श्री अघोर वीरभद्र, पंचभूत लिंग, श्री ज्येष्ठादेवी, शैवसंत नालवर, ६३ नायनमार, सेक्कीळर, श्री विश्वनाथ, श्री विनायकर, श्री सोमस्कंदर, श्री विनायकांसमवेत श्री गजलक्ष्मी आणि नवग्रह ह्यांच्या मूर्ती आहेत. बाहेरील दुसऱ्या परिक्रमेमध्ये मोकळी जागा आहे. ह्या जागेमध्ये मूर्ती नाहीत पण फक्त क्षेत्रवृक्ष आहे. इथला तलाव म्हणजेच ब्रम्हतीर्थ आहे. हे मंदिर खूप जुनं असून खूप चांगल्यारित्या सांभाळलं आहे. हे मंदिर किती जुनं आहे हे जाणणं खूप अवघड आहे.

प्रार्थना:

१. असा समज आहे की भगवान शिव इथे स्त्रियांचे रक्षण करतात म्हणून इथे स्त्रिया त्यांच्या समस्या मिटविण्यासाठी भगवान शिवांची उपासना करतात. 

२. मंगळ ग्रहाचे श्री मुरुगन हे अधिदेवता आहेत. म्हणून मंगळ ग्रहदोषाच्या निवारणासाठी भक्त गण इथे श्री मुरुगन ह्यांची उपासना करतात. 

३. इथे भगवान शिव उत्तराभिमुख आहेत म्हणून ह्या स्थळाला दक्षिण काशी असं म्हणतात. म्हणून काशीमध्ये पूजा केल्याची फळे मिळण्यासाठी इथे भाविक जन सकाळी भगवान शिवांची पूजा करतात. 

४.  श्री अंबिकादेवींच्या देवालयामध्ये श्री परमनाथर हे श्री अंबिकादेवींचे स्वामी आहेत. सर्व संकटांतून मुक्ती मिळविण्यासाठी भाविक जन त्यांच्यावर मधाचा अभिषेक करतात.

पूजा:

१. इथे दररोज चार पूजा होतात - सकाळी ६.३० थिरु वनंथल, सकाळी ८.३० वाजता काळशांती, दुपारी १२ वाजता उच्चीकाळ पूजा आणि संध्याकाळी ५.३० वाजता सायंरक्षा पूजा. 

२. प्रत्येक महिन्यात पौर्णिमा आणि अमावास्येला पूजा केल्या जातात. 

३. प्रदोष दिवशी प्रदोष पूजा केली जाते.

मंदिरात साजरे होणारे काही महत्वाचे सण:

वैकासि (मे-जून): १० दिवसांचा ब्रम्होत्सवम
आडी (जुलै-ऑगस्ट): १० दिवसांचा आडीपुरम उत्सव
पूरत्तासी (सप्टेम्बर-ऑक्टोबर): १० दिवसांचा नवरात्री उत्सव
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): १० दिवसांचा स्कंदषष्ठी उत्सव
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): दर सोमवारी विशेष पूजा
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै
थै (जानेवारी-फेब्रुवारी): थैपुसम (पुष्य नक्षत्र)
मासी (फेब्रुवारी-मार्च): मघा नक्षत्र उत्सव
पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तरम

सणांबद्दल माहिती:

१. ऎप्पासी महिन्यामध्ये तूळ स्नान ह्या पर्वणीचा पहिला टप्पा इथे कावेरी नदीच्या काठावर साजरा होतो. इथे कावेरी नदीला अगंड (रुंद) कावेरी असे म्हणले जाते.

२. थैपुसम उत्सवाच्या समयास श्री पार्वतीदेवी आणि भगवान शिव सभोवतालच्या अय्यारमलै, थिरुएंगोईमलै, करुपत्तुर, मुसरी, वेलूर आणि राजेंद्रम ह्या मंदिरातील मूर्तींसमवेत भक्तांवर कृपावर्षाव करतात. असा समज आहे कि ह्या समयी भगवान शिवांनी कावेरी नदीच्या काठावर सप्त मातृकांना दर्शन दिलं म्हणून इथे ते भाविकांना दर्शन देतात.

मंदिराच्या वेळा: सकाळ ६ ते दुपारी १, संध्याकाळी ५ ते रात्री ९

पत्ता: श्री कदंबवनेश्वरर मंदिर, कुळितलै, कारुर जिल्हा, तामिळ नाडू ६३९१०४

दूरध्वनी: +९१-४३२३२२५२२८


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


No comments:

Post a Comment