Sunday, February 18, 2024

श्री पाताळेश्वरर हरिद्वार मंगलम

पंचारण्य स्थळांमधलं हे तिसरं मंदिर आहे. १८०० वर्ष जुनं असलेलं हे मंदिर तामिळनाडू राज्यातल्या थिरुवारुर जिल्ह्यातील हरिद्वार मंगलम ह्या गावामध्ये वसलेलं आहे. पाडळ पेथ्र स्थळे म्हणजेच ६३ नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ शिव मंदिरांपैकी पण एक आहे. येथील लिंग स्वयंभू आहे. 


मुलवर: श्री पाताळेश्वर, श्री पाताळवरदार

देवी: श्री अलंकारवल्ली, श्री अलंकारनायकी

स्थळ वृक्ष: शमी (तामिळ मध्ये वन्नी)

पवित्र तीर्थ: ब्रह्म तीर्थ 


क्षेत्र पुराण:

एकदा श्री विष्णू आणि श्री ब्रह्म ह्यामध्ये त्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे ह्याबाबतीत वाद उद्भवला. ह्या वादाच्या निरसनासाठी ते भगवान शिवांकडे गेले. भगवान शिव एका भव्य अशा ज्योतिस्तंभात प्रकट झाले. त्यांनी दोघांना ह्या स्तंभाचे आरंभ (शिखर) आणि अंत (तळ) शोधण्यास सांगितले. श्री ब्रह्म हंसरूपामध्ये स्तंभाचे शिखर शोधण्यास निघाले तर श्री विष्णूंनी वराह रूप घेऊन तळ शोधण्यासाठी पृथ्वी खोदायला चालू केली. बराच शोध घेतल्यावर श्री विष्णूंनी आपल्याला तळ मिळाला नाही हे मान्य केलं. पण श्री ब्रह्म मात्र आपल्याला शिखर दिसलं असं खोटं बोलले आणि त्याचा पुरावा म्हणून त्यांनी केतकी पुष्प दाखवलं. भगवान शिव श्री ब्रह्मदेवांवर क्रोधीत झाले आणि त्यांनी त्यांना शाप दिला कि श्री ब्रह्मदेव आणि केतकी पुष्प ह्यांना कुठल्याही पूजेमध्ये समाविष्ट केले जाणार नाही. आणि त्याचबरोबर श्री विष्णूंना आशीर्वाद दिला कि सर्व पृथ्वीवर श्री विष्णूंची पूजा केली जाईल. 


श्री विष्णूंनी भगवान शिवांच्या स्तंभाचा तळ शोधण्यासाठी ह्या ठिकाणी पृथ्वी खोदायला चालू केली म्हणून त्याचा पुरावा म्हणून ह्या ठिकाणी एक खड्डा आहे आणि तो दगडाने बंद करून ठेवला आहे. वराह रूपामध्ये हे खोदण्याचे काम करताना ह्या वराहाचे एक शिंग तुटले. श्री विष्णूंनी ते शिंग भगवान शिवांची ह्या ठिकाणी आराधना करून परत मिळवले.

 

मंदिरातील इतर देवता:

श्री विनायक, व्याघ्रपाद ऋषी आणि पतंजली ऋषींसमवेत श्री नटराज, श्री काशी विश्वनाथ, श्री भैरव, श्री लिंगोद्भवर, श्री शनैश्वर, श्री सूर्य, श्री चंद्र, श्री दक्षिणामूर्ती. 


मंदिराचे वैशिष्ठ्य:

१. असा समज आहे कि पंचारण्य स्थळांतील पांचही मंदिरांचे एका दिवसात दर्शन घेतल्याने उत्तर भारतातील हरिद्वार क्षेत्राला भेट देण्याचे फळ प्राप्त होते. 

२. ह्या मंदिराचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे श्री विनायकांच्या सात मुर्त्या आहेत. 


मंदिरात केल्या जाणाऱ्या प्रार्थना:

विवाहामधले अडथळे दूर होण्यासाठी तसेच अपत्यप्राप्तीसाठी इथे भाविक श्री अलंकारवल्ली म्हणजेच श्री पार्वती देवींची आराधना करतात. जे भाविक पंचारण्य स्थळांतील सर्व स्थळांचे एका दिवसात दर्शन घेण्याचा संकल्प करतात ते ह्या स्थळाचे दुपारी १२ वाजता दर्शन घेतात.   


मंदिरात साजरे होणारे सण:

वैकासि (मे-जून): विशाखा नक्षत्रावर खुप मोठा उत्सव साजरा केला जातो. 

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवदुराई


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment