Sunday, August 6, 2023

श्री थिरुनागेश्वरम - राहू ग्रहाचे मंदिर

श्रेष्ठ ६३ शिवभक्त जे नायन्मार म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांनी पुजलेल्या २७६ शिव मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. हे मंदिर अंदाजे २००० वर्षांपूर्वी बांधलेलं आहे. तामिळनाडू मधल्या कुंभकोणम ह्या शहरापासून ८ किलोमीटर वर असलेल्या थिरुनागेश्वरम गावात हे मंदिर आहे. 

मुलवर: श्री थिरुनागेश्वर, श्री थिरूनागनाथ स्वामी, श्री शेनबाग अरण्येश्वर

देवी: श्री गिरीगुजांबिका, श्री पीराई अनिवळ नूथळ अंबिका (डोक्यावर चंद्रकोर धारण केलेली)

पवित्र तीर्थ: सूर्यतीर्थ

स्थळ वृक्ष: चंपा (शेनबाग) 

येथील शिवलिंग हे स्वयंभू लिंग आहे. राहू परिहार स्थळ (म्हणजेच राहू ग्रह दोषांचा परिहार करण्याचे स्थळ) म्हणून प्रसिद्ध आहे. येथील वनामध्ये भरपूर चंपा वृक्षे होती म्हणूनच ह्याला चंपारण्य किंवा शेनबाग अरण्य असे नाव पडले.

मंदिराबद्दल माहिती

पुराणांनुसार ह्या ठिकाणी भगवान विनायकांनी भगवान शिवांची उपासना केली आणि ह्या उपासनेचं फळ म्हणून त्यांना गणपती म्हणजेच सर्व गणांचा अधिपती असं नाव पडलं. 

अजून एका आख्यायिकेनुसार अष्टमहासर्प (अनंत, वासुकी, कर्कोटक, संकल्प, कुलिक, पद्मन, महापद्मन आणि तक्षक) आणि आदिशेष (पांच फणे असलेला सर्प) ह्यांनी इथे भगवान शिवांची उपासना केली. रामायणामधल्या आख्यायिकेनुसार ह्या स्थानी श्री गौतमीला (श्री गौतम ऋषींची पत्नी), तिच्या शापातून मुक्ती मिळाली आणि ती परत श्री गौतम ऋषींना मिळाली.

श्री पार्वती देवीने ऋषी भृंगींना शाप दिला. पण त्यामुळे तिच्या कडून पाप घडलं. ह्या पापाचं क्षालन करण्यासाठी भगवान शिवांनी तिला तपश्चर्या करण्यास सांगितले. श्री पार्वती देवीने हे स्थान आपल्या तपश्चर्येसाठी निवडलं. भगवान शिवांच्या अनुज्ञेनुसार श्री लक्ष्मी देवी आणि श्री सरस्वती देवी ह्या पण श्री पार्वती देवींसह तपश्चर्या करण्यासाठी येथे आल्या. श्री पार्वती देवींच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शिव परत तिला कैलासस्थानी घेऊन गेले. ह्या ठिकाणी श्री पार्वती देवीचे श्री गिरीगुजांबाळ (अंबाळ म्हणजे माता) असे नाव आहे. श्री गिरिगुजांबिकेची मूर्ती स्वयंभू आहे. ह्या मूर्तीवर अभिषेक करत नाहीत.

पंचफणे असलेले श्री आदिशेष ह्यांनी पाताळ लोकांतून इथे येऊन भगवान शिवांची उपासना केली. श्री राहू देवाने पण इथे भगवान शिवांची उपासना केली आहे. इथली श्री राहूंची मूर्ती मनुष्यरूपामध्ये आहे आणि त्यांच्या दोन्ही बाजूंना त्याच्या दोन पत्नी आहेत - श्री नागवळ्ळी आणि श्री नागवन्नी. 

स्थळ पुराणांनुसार - श्री नंदी, श्री चंद्र, श्री सूर्य, श्री नळ राजा, श्री गौतम ऋषी आणि श्री पराशर ऋषी ह्यांनी इथे भगवान शिवांची उपासना केली आहे. नळराजाने इथे केलेल्या त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्याचे गेलेले वैभव त्याला परत दिले असा समज आहे. तसेच पांडवांनीपण आपले गेलेले वैभव भगवान शिवांची इथे उपासना करून परत मिळवले असा समज आहे. श्री नंदीदेवाला इथे श्री नंदिकेश्वर असा मान मिळाला. श्री इंद्र देवाने इथे श्री गिरिगुजांबिकेची उपासना करून आपल्या पापांचे क्षालन केले. ऋषी भृंगींना इथे श्री पार्वती देवी, श्री लक्ष्मी देवी आणि श्री सरस्वती देवी  ह्यांचे एकत्र दर्शन झाले. 

येथील इतर देवस्थाने: 

इथल्या भगवान शिव आणि श्री पार्वती देवीच्या मुर्त्या पूर्वाभिमुख आहेत. गाभाऱ्याभोवतीच्या पहिल्या परिक्रमेमध्ये श्री विनायक, श्री मुरुगन आणि श्री चंद्रशेखर ह्यांच्या मुर्त्या आहेत. पूर्वी इथे १२ पवित्र तीर्थे होती असा समज आहे. त्यांची नावे - सूर्य, हिमालय, ब्रह्म, चंद्र, अग्नी, दुर्गा, पराशर, इंद्र, भृगु, कण्व आणि वसिष्ठ. पण त्यातील फक्त सूर्यतीर्थ आता उरले आहे. मुख्य परिक्रमेमध्ये श्री नृत्य गणपती, श्री शेनबाग विनायक, श्री नंदी, श्री आदिविनायक, श्री मुरुगन आणि त्याच्या पत्नी (श्री वळ्ळी आणि श्री दैवनै), श्री नटराज, श्री सोमस्कंद, श्री सप्त मातृका, श्री महालक्ष्मी देवी आणि श्री सरस्वती देवी ह्यांच्या मुर्त्या आहेत. 

कोष्टम् मध्ये, म्हणजेच गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतीमध्ये, श्री नर्तन गणपती, श्री नटराज, श्री अगस्त्य, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री दुर्गा देवी आणि श्री चंडिकेश्वर ह्यांच्या मुर्त्या आहेत. 

श्री पार्वती देवीची इथे दोन देवस्थाने आहेत - १) योगमुद्रेमधील श्री गिरीगुजांबिकेची मातीची मूर्ती. मूर्ती मातीची असल्याने त्यावर अभिषेक करत नाहीत. तिच्या बाजूला श्री लक्ष्मी देवी  आणि श्री सरस्वती देवी ह्यांच्या मुर्त्या आहेत. श्री सरस्वती देवीच्या हातात वीणा आहे तर श्री लक्ष्मी देवीच्या हातात पुष्प आहे. २) दुसरे देवस्थान श्री पीराई अनिवळ नूथळ अंबिका हिचे आहे. 

मंदिराची वैशिष्ठ्ये: 

१) प्रत्येक वर्षी कार्तीगई (नोव्हेंबर-डिसेंबर) ह्या तामिळ महिन्याच्या पौर्णिमेला श्री पीराई अनिवळ नूथळ अंबिकेच्या मूर्तीवर चंद्राची किरणे पडतात. २) प्रत्येक दिवशी राहू काळामध्ये1 राहूदेवाच्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक केला जातो. अभिषेक करताना राहुदेवाच्या मूर्तीवरून वाहताना दुधाचा रंग निळा होतो पण जमिनीवर पोचल्यावर परत पांढरा होतो. ३) श्री गिरिगुजांबिका देवीच्या देवस्थानामध्ये श्री राहूदेवाची एक अद्वितीय मूर्ती आहे जी श्री योगराहू या नावाने प्रसिद्ध आहे. 

ह्या क्षेत्राला सर्पदोष, कळत्रदोष, पितृदोष आणि कालसर्पदोष ह्या दोषांचे परिहार क्षेत्र म्हणून मानलं जातं. 

अजून एका आख्यायिकेनुसार पाताळ लोकातील सर्पांचा राजा नागराज ह्याने इथे (कुंभकोणमच्या आसपास) भगवान शिवांची उपासना करण्यासाठी चार वने निवडली आणि प्रत्येक वनात त्याने भगवान शिवांची मंदिरे बांधली. ती चार वने अशी - १) बिल्ववन, २) जास्वन्द वन, ३) वन्नी वन, ४) नागपट्टणम. 

मंदिरात साजरे होणारे सण:

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): १० दिवसांचा ब्रह्मोत्सव साजरा केला जातो. नवव्या दिवशी रथयात्रा तर दहाव्या दिवशी सूर्य तीर्थ सण साजरा केला जातो. 

मरगळी (डिसेंबर-जानेवारी): भगवान शिवांचा आर्द्रा सण साजरा केला जातो. 

थाई (जानेवारी-फेब्रुवारी): महिन्याच्या पहिल्या दिवशी (१४ किंवा १५ जानेवारी) श्री गिरिगुजांबिका देवी सण साजरा केला जातो. 

मासी (फेब्रुवारी - मार्च): महाशिवरात्री 

चित्राई (एप्रिल-मे): भगवान मुरूगांचा चैत्र पौर्णिमा सण 

वैकासि (मे -जून): भगवान सोमस्कंदांचा सण

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर):  स्कंदषष्टी आणि सुरसंहार सण (भगवान स्कंदांनी सुरपद्मन ह्या राक्षसाचा केलेला संहार).  

राहू काळ (सोमवारी सकाळी ७.३० ते ९, मंगळवारी दुपारी ३ ते ४.३०, बुधवारी दुपारी १२ ते १.३०, गुरुवारी दुपारी १.३० ते ३, शुक्रवारी सकाळी १०.३० ते १२, शनिवारी सकाळी ९ ते १०.३०)


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


No comments:

Post a Comment