Thursday, April 11, 2019

श्री ओंकारेश्वर

मध्य प्रदेशात नर्मदा नदीच्या काठी ओंकारेश्वर हे पवित्र स्थान आहे. नर्मदा नदीमध्ये मंधाता म्हणजेच शिवपुरी नावाचे एक बेट आहे व त्याचा आकार ॐ असा आहे. या जागेविषयी अनेक आख्यायिका आहेत. त्यातील खाली उद्धृत केलेल्या तीन दंतकथा प्रमुख व महत्वाच्या मानल्या जातात.

विंध्य पर्वत जरी उंच असला तरी तो मेरू पर्वताएवढा उंच नव्हता व त्यामुळे विंध्यपर्वत मेरू पर्वताचा द्वेष करत असे. एकदा नारदमुनींनी यावरून विंध्य पर्वताला डिवचले. त्यावर चिडून जाऊन विंध्य पर्वताने पर्वत लिंगाची पूजा करून कठोर तपश्चर्या केली. विंध्याच्या तपस्येवर प्रसन्न होऊन शंकराने विंध्य पर्वताची नर्मदेच्या काठावर शिवलिंग स्थापण्याची विनंती मान्य केली. समस्त देव व ऋषींच्या विनंतीवरून लिंगाचे दोन भाग करण्याचे सुद्धा मान्य केले. दोन भागांपैकी एकाला ओंकारेश्वर व दुसऱ्या भागाला ममलेश्वर अथवा अमरेश्वर असे म्हणतात. अशा प्रकारे ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग अस्तित्वात आले तसेच शंकराने विंध्य पर्वताला हवे तेवढे वाढण्याचा वर सुद्धा दिला. फक्त अट एवढीच होती की भक्तांच्या वाटेत त्याने अडथळा होऊ नये. शंकराच्या वराने शेफारून जाऊन विंध्यपर्वत एवढा वाढला की त्याने सूर्य व चंद्राला सुद्धा अडवले. या संकटातून मुक्त होण्यासाठी देवी भगवतीने अगस्त्य मुनी व त्यांच्या पत्नी लोपामुद्रा यांना पाठवले. अगस्त्य मुनींनी विंध्य पर्वताची समजूत घातली व त्याच्याकडून वचन घेतले की ते स्वतः दक्षिणेतून परत येत नाहीत तोपर्यंत विंध्य पर्वताने वाढू नये. अगस्त्य व त्यांची पत्नी श्रीशैलम् ला राहिले व परत कधी आलेच नाहीत. अर्थातच पर्वताचे वाढणे तिथेच थांबले. श्रीशैलम् ला दक्षिण काशी समजले जाते.

दुसरी कथा इक्ष्वाकु वंशातील जन्मलेल्या मंधाता राजा विषयी आहे. प्रभू श्रीराम सुद्धा इक्ष्वाकु कुळातीलच होते हे सर्वज्ञात आहेच. राजा मंधाताने ह्याच जागी ज्योतिर्लिंगाच्या रूपात शिव प्रगट होई पर्यंत घोर तपश्चर्या केली. असे म्हणतात की राजाच्या मुलांनीसुद्धा खूप उग्र आणि खडतर तपश्चर्या केली व शंकर त्यांच्यावरसुद्धा प्रसन्न झाले आणि म्हणूनच या पर्वत शिखराला मंधाता पर्वत अथवा मंधाता शिखर असे नाव पडले.

तिसरी कथा अशी आहे की देव आणि असुर यांच्या युद्धात असुरांचा विजय झाला. तेव्हा देवांनी शंकराची उपासना करून त्याला प्रसन्न करून घेतले. शंकर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रगट झाले व त्यांनी असुरांचा पराभव केला.

1 comment: