Thursday, April 18, 2019

श्री वैद्यनाथ

श्री वैद्यनाथ ह्या ज्योतिर्लिंगाची तीन स्थाने आहेत व प्रत्येक स्थानाविषयी काहीना काही दंतकथा आहेत. महाराष्ट्रातील अंबेजोगाई जवळील परळी हे एक स्थळ तर झारखंडातील देवगढ हे दुसरे व हिमाचल प्रदेशातील वैजनाथ हे तिसरे स्थळ होय.

हिमाचल प्रदेशातील वैजनाथ हे शंकराचे एक अत्यंत पवित्र असे निवासस्थान समजले जाते. असुरांचा राजा रावण हा शिवाचा कट्टर उपासक होता व शंकराची तपस्या करत असता एका पाठोपाठ एक आपली दहाही शिरे कापून त्याने ती शंकराला बळी म्हणून अर्पण केली. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्याच्या सर्व जखमा बऱ्या केल्या. यावेळी शंकराने वैद्याचे काम केले म्हणून हिमाचल प्रदेशात त्याला वैजनाथ अथवा वैद्यनाथ असे म्हणतात.

दुसरी आख्यायिका परळीच्या ज्योतिर्लिंगाविषयी आहे. अंबेजोगाई देवी योगेश्वरी म्हणजे पार्वती परळीच्या वैद्यनाथाशी विवाहबद्ध होणार होती. पण विवाहाला येणारी मंडळी अंबेजोगाईला उशिरा पोहोचल्यामुळे योगेश्वरी देवीने सर्वांचे रूपांतर दगडामध्ये केले. ह्याच जागेविषयी आणखी एक आख्यायिका समुद्र मंथनाशी जोडलेली आहे. त्या दंतकथेनुसार समुद्रमंथनानंतर भगवान विष्णूंनी धन्वंतरी व समुद्रमंथनातून बाहेर पडलेली इतर रत्ने एका शिवलिंगामध्ये लपवली. जेव्हा दानवांनी ती रत्ने हिसकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यातून अतिप्रचंड महाकाय अशा ज्वाळा बाहेर आल्या व त्यामुळे असुरांना मागे हटावे लागले. हेच ते वैद्यनाथ येथील ज्योतिर्लिंग. अभिषेकाचे जे तीर्थ शिवलिंगातुन बाहेर येते त्यात रोग बरे करण्याचे गुण आहेत असे म्हणतात. जवळच वटेश्वर मंदिर आहे व त्या मंदिराजवळ जो वटवृक्ष आहे तिथेच सावित्रीने सत्यवानाला वाचविण्याचा प्रसंग घडला असे म्हणतात. जवळच असलेल्या तलावाला मार्कंडेय ऋषींचे नाव दिले आहे. याच जागेवर मार्कंडेय ऋषींना शंकराकडून अमरत्वाचा वर मिळाला.

देवगडची आख्यायिका वेगळी आहे. रावणाला अभ्यंगस्नान करावयाची इच्छा झाली पण जवळपास पाणीच नसल्याने त्याने जमिनीवर मुष्टिप्रहार केला व त्यामुळे शिवगंगा नावाचा तलाव प्रगट झाला. रावणाने तेथील शिवलिंगाचे पूजन करून स्वतःचे सर्व हात यज्ञात दिले. त्याने केलेल्या त्यागाने संतुष्ट होऊन शंकर अवतीर्ण झाले व त्याचे सर्व हात त्याला परत देऊन तो अजिंक्य राहील असा वर दिला. त्यामुळे या शिवलिंगाला वैद्यनाथ असे संबोधतात.

No comments:

Post a Comment