Thursday, March 8, 2012

Information about Holi festival

("आपले सण - एक सुलभ संकल्पना" - वेदमूर्ती विनायक वासुदेव भातखंडे व विलास मोरेश्वर कर्णिक, एम. ए, ह्यांच्या पुस्तकातून)

हिंदू संवत्सरातील सर्वात शेवटचा सण म्हणजे होळी. प्रस्तुत पुस्तक लिहिण्याची प्रेरणा व गरज ह्या सणामुळे नकळत मिळाली. गेल्यावर्षी होळी दर्शनाला गेलो असता काही महिला नैवेद्य दाखवीत होत्या. एक गंमत म्हणून एका गृहिणीस "हा नैवेद्य तुम्ही कोणाला दाखविता?" असे विचारले. त्या गृहिणीने "होळीला" असे उत्तर दिले. कुतूहल चाळवल्याने हाच प्रश्न आणखी कांही उपस्थित महिलांना विचारला. कोणी "शंकराला", कोणी "देवीला" किंबहुना "अग्नीला" अशी उत्तरे मिळाली. त्यात पण हवी तितकी खात्री दिसेना. त्याचवेळी ५-६ वर्षाच्या मुलांपासून कॉलेज तरुणांपर्यंत बरेच जण होळीसमोर बोंब मारून, कोणाच्या न कोणाच्या नावाने शिव्या देत होते. त्यांना विचारले की "तुम्ही असे कां बरे करता" तर "सगळेच जण शिव्या देतात म्हणून आम्ही पण देतोय" असे "मॉब मेंटालिटी" चे उत्तर मिळाले.

ह्या अज्ञानाला आपण जबाबदार आहोत असे प्रकर्षाने जाणवले. दोष सध्याच्या पिढीचा नसून त्यांना योग्य माहिती वेळोवेळी न देणाऱ्यांचा आहे. विभक्त कुटुंब पद्धतीत आजी-आजोबा हे कलम बऱ्याच घरातून बाद झाले आहे. माहितीचा एक स्त्रोत आटला आहे. तेव्हा मनात आले की सर्व सणांविषयी थोडक्यात पण आवश्यक अशा माहितीचे छोटे पुस्तक लिहावे. ही पूर्वपीठिका.

सर्व साधारणपणे मार्चच्या मध्यावर येणारा होळी हा सण म्हणजे फाल्गुन शुद्ध पौर्णिमा होय. ह्या सणाविषयी अनेक कथा प्रचलित आहेत परंतु धुंडा राक्षशिणीविषयीची कथा शास्त्रसंमत मानली जाते.

धुंडा राक्षशीण ही देवीचा अंश असलेली राक्षशीण होती. तिने भगवान श्री शंकराची उग्र उपासना करून त्याला प्रसन्न करून घेतले. त्यावेळी तिने शंकराकडे वर मागितला की, "मला बालके भक्षण करण्याची मुभा असावी." शंकर उत्तरले, " तथास्तु! रंभेची मुले तुला खावयास हरकत नाही. तसेच तुला अपशब्दाने संबोधतील त्या बालकांचे तुला रक्षण करावे लागेल."

रंभा म्हणजे केळ. रंभेची मुले म्हणजे केळी. होळीमध्ये व्यायलेली केळ मध्यभागी ठेवण्याची कारणमीमांसा ही आहे. त्याचप्रमाणे होळीसमोर उभे राहून अपशब्द उच्चारत बोंब मारण्यामागे ही कथा आहे.

होळीला वरण-भात, वडे, पुरणपोळी हा नैवेद्य होळीत बसलेल्या धुंडा राक्षशिणीला दाखविला जातो. होळीचा उजेड जिथपर्यंत जातो त्याच्या पलीकडे जाण्याची तिला विनंती केली जाते. तिला अर्पण केलेला नारळ प्रसाद म्हणून वाटण्याची पद्धत आहे.

होळी साजरी करण्यामागे सर्व अशुभ गोष्टींचा नाश करण्याची संकल्पनापण आहे. त्यामुळेच होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवडीला पहाटे घरातील कचरा काढून, केरसुणी सकट, तो वेशीबाहेर टाकला जातो. घरातील अमंगल गोष्टींचा त्यामुळे नायनाट होऊन नष्टचर्य संपते ही भावना !

होळी उभी करण्याची सुद्धा विशिष्ट पद्धत आहे. कमीत कमी तीन फुट व्यासाचे वर्तुळ काढून जमिनीत दीड फुट खोल खड्डा खणावा. त्यात व्यायलेली केळ मध्यभागी रोवून शेणाने जमीन सारवावी. इतर लाकूड-फाटा शंकूच्या आकारात (पिरामिड) उभा करावा. शंकूच्या टोकदार भागातून शुद्ध शक्तीचा प्रवेश होतो आणि होळीचा उजेड दूरवर पसरतो. व्यायलेली केळ ठेवण्याचे कारण वर सांगितले आहे. त्यानंतर होळीची पूजा करून तिला प्रज्वलित करावे. नंतर वर सांगितल्याप्रमाणे नैवेद्य दाखवून पेटत्या होळीत टाकावा. मुला-बाळांचे रक्षण करण्याची प्रार्थना धुंडा राक्षशिणीला करावी.

कोकणातील काहीं ठिकाणी होळी हा सण फाल्गुन शुद्ध पंचमी पासून पौर्णिमेपर्यंत साजरा करतात. होळीवरच पाणी तापवून, होळीतील राख अंगाला लावून, धुळवडीला स्नान करतात. होळीतील रक्षा औषधी असल्याचा समज आहे.

उत्तर हिंदुस्थानात होळी फार मोठ्या प्रमाणात साजरी होते व धुळवडीलाच रंगपंचमी खेळतात.

महाराष्ट्राच्यासुद्धा काहीं भागात धुळवड दंगामस्ती करून, रंग खेळत, दारू पिऊन गोंधळ करत साजरी करतात. त्याला शास्त्रीय आधार नाही.

No comments:

Post a Comment