Friday, March 23, 2012

Festival of Gudhi Padava

("आपले सण - एक सुलभ संकल्पना" - वेदमूर्ती विनायक वासुदेव भातखंडे व विलास मोरेश्वर कर्णिक, एम. ए, ह्यांच्या पुस्तकातून)

हिंदू दिनदर्शिकेतील पहिला सण म्हणजेच गुढी पाडवा. हिंदू धर्मातील जे साडेतीन मुहूर्त सांगितले आहेत, त्यातील पहिला पूर्ण मुहूर्त गुढी पाडवा हा होय.

केव्हा ?

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा. इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे सर्वसाधारणपणे मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा अथवा एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा.

काय करावे ?

चैत्र शुद्ध प्रतिपदेला अरुणोदय व सूर्योदय ह्यांच्या मध्ये म्हणजेच सकाळी ५.४५ ते सुर्योदयामधील काळांत गुढी उभारावयाची असते. गुढी उभी करणाऱ्या पुरुषांनी मंगलस्नान करून नित्य नैमित्तिक पूजा आदि कार्ये आटोपून गुढी उभारण्याचे कार्य करावे.

घराच्या पुढील दारात रांगोळी काढून त्यावर चौरंग अथवा पाट ठेवून त्यावर गुढी उभारावी. हल्ली मात्र जागेच्या अभावी लोक गैलरीत अथवा घराच्या दर्शनी विभागात गुढी उभारतात.

गुढीसाठी वेळू (हिरवा बांबू), कलश, गंध, अक्षता, पुष्प, हळद, कुंकू, सुशोभित कापड, पुष्पमाला, कडूनिंबाची डहाळी हे साहित्य लागते. वेळूवर ठेवण्याचा कलश कुंकवाने अलंकृत करून घ्यावा. कलशामध्ये कापड, कडूनिंबाची डहाळी, पुष्पमाला हे घट्ट बसवून वेळू पाटावर अथवा चौरंगावर उभा करावा. आधार देण्यासाठी सुतळीने तो वेळू खांबाला अथवा योग्य त्या आधाराला बांधावा. कलश हा उपडा असतो, हे लक्षात घेऊन वाऱ्याने अथवा कोणत्याही धक्क्याने पडू नये, म्हणून वेळूला व्यवस्थित बांधावा.

त्यानंतर गुढीची पंचोपचार पूजा करून, उदबत्ती-निरांजन दाखवून दुध-साखरेचा नैवेद्य दाखवावा. त्याचप्रमाणे अमृतवृक्षाची म्हणजेच कडूनिंबाची कोवळी पाने घेऊन हिंग, जिरे, मीठ, गूळ, मिरे, डाळ हे एकत्र वाटून त्याचे चूर्ण घरातील प्रत्येकाने अनशापोटी भक्षण करावे. ह्याच दिवशी हिंदू धर्माचे नवे संवत्सर सुरु होत असल्याने पंचांगाचीही पंचोपचार पूजा करून पंचांगात सांगितलेले संवत्सर फळ वाचावे अथवा श्रवण करावे.

गुढीच्या महानैवेद्यासाठी वरण-पुरण अथवा पक्वान्नाचे भोजन तयार करावे. हा नैवेद्य दुसरा प्रहर संपल्यावर व तिसऱ्या प्रहराचे सुरुवातीला म्हणजेच १२.०० ते १२.३० च्या दरम्यान दाखवावा. सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवावी. गुढीला सूर्यास्त दिसू देऊ नये. गुढी उतरवताना अक्षता वाहण्याची आवश्यकता नाही. गुढी हा फक्त ब्रह्मदंड आहे, देव नाही, म्हणून गुढीची प्राणप्रतिष्ठा अथवा विसर्जन नसते.

लग्न व मुंज वर्ज्य करता, बाकी कोणत्याही शुभकार्यास गुढी पाडवा हा योग्य मुहूर्त समजला जातो. त्यामुळेच ह्या दिवशी काही न काही खरेदी करण्याची (शक्यतो जमीन-जुमला, सोने, चांदी वगैरे) प्रथा आहे. विवाह नक्की करणे, पत्रिका छापावयास देणे, अशी शुभ कार्ये सुद्धा ह्या दिवशी मुद्दाम केली जातात. तसेच नवविवाहित दाम्पत्याला बोलावून, वराचे श्वशुर दाम्पत्याला योग्य अशी वस्तू देऊन त्यांचा आदराने मान राखतात. 

का?

गुढी पाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का? तर ह्या तिथीला ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करून ब्रह्मदंड उभा केला. ब्रह्मदंड वेळूचा असणे, ह्यामागे सुद्धा कारण मीमांसा आहे. ती म्हणजे वंशवृद्धी (बांबूचा डोळा हा हमखास रुजतोच), खंबीरपणा (बांबू न झुकता उभा असतो) व एकत्र समूहाने जीवन व्यतीत करण्याचे बांबू (बांबूचे बेटवन असते) प्रतिक आहे. ह्याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी वनवासातून अयोध्येला परत येण्याची योजना ब्रह्मदेवाच्या संमतीने केली. त्या दिवसाचा उत्सव म्हणून गुढी उभारून सृष्टीनिर्मात्याला अभिवादन करावे.

हे केल्याचे फळ

गुढी उभारणे तसेच संवत्सर फळ वाचल्याचे फलित म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन वद्य अमावस्येपर्यंत म्हणजेच संपूर्ण वर्ष सुख, समाधान, समृद्धी, शांती, कीर्ती, विजय, आनंद, धनधान्य, पुत्र-पौत्र इत्यादी प्राप्त होतात.

No comments:

Post a Comment