Wednesday, October 5, 2011

दसरा (विजयादशमी)

("आपले सण - एक सुलभ संकल्पना" - वेदमूर्ती विनायक वासुदेव भातखंडे व विलास मोरेश्वर कर्णिक, एम. ए, ह्यांच्या पुस्तकातून)

वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा होय. अश्विन शुद्ध दशमीला येणारा दसरा हा इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे साधारणतः ऑक्टोबर मध्ये येतो.

जरी हा दिवस साडेतीन मुहूर्तातील एक असून बहुतेक शुभकार्यासाठी योग्य असला तरी विवाहासाठी तसेच मुंजीसाठी हा मुहूर्त चालत नाही. आषाढी एकादशीपासून तुलसीविवाह पर्यंतचा काळ विवाहास अयोग्य समजला जातो. तसेच व्रतबंधन उत्तरायणातच करावयाचे असते. ही दोन कार्ये सोडता इतर कोणत्याही शुभकार्यासाठी दसरा हा शुभ मुहूर्त आहे. 

विजयादशमी साजरी करण्याची कारणे व ती साजरी करण्याच्या प्रथा निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आढळतात. महाराष्ट्रामध्ये नवरात्रात बसलेली देवी दशमीला उत्थापन करून सीमोल्लंघन करते, त्याच्याप्रीत्यर्थ दसरा साजरा केला जातो. तसेच ह्या दिवशी क्षत्रिय लढाईसाठी निघण्यापूर्वी अपराजिता ह्या देवीची तसेच शमीवृक्षाची आणि अश्मंतक (आपटावृक्ष) ह्या वृक्षाची पूजा करीत असत. ह्या दिवशी आपट्याच्या पानांच्या रूपाने सोने लुटण्याची प्रथा पडली. शमीची पाने दुर्मिळ असून काटेरी असतात तर आपट्यांची पाने सहजगत्या उपलब्ध असल्यामुळे प्रतिकात्मक सोने म्हणून आपट्याची पाने वाटण्याची प्रथा पडली आहे.

सीमोल्लंघन कारणे ह्या प्रथेला सध्याच्या युगात काहीही अर्थ उरलेला नाही, परंतु आपट्यांची पाने वाटून सर्वांना शुभेच्छा देणे हे मात्र अजूनही कटाक्षाने लोक करतात. शस्त्रपूजन कारणे ह्या परंपरेला सुद्धा पूर्वीच्या काळा इतका अर्थ आता राहिला नसला तरी सरस्वतीपूजन, ग्रंथपूजन, नाममात्र शस्त्रपूजन व यंत्रपूजन, वाहनपूजन अवश्य करावे. 

ह्या संदर्भात सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आपट्याची उरलेली पाने दुसऱ्या दिवशी कचऱ्यामध्ये न टाकता त्यांचे यथासांग विसर्जन करावे अथवा आपटा व शमीची पाने वाळवून त्यांचा धूर करावा. त्यायोगे अनिष्ट शक्तींचा नाश होऊन भरभराट होते. एखादे आपट्याचे पान सोन्याचा संग्रह करतो त्याजागी ठेवल्यास सुवर्ण वृद्धिंगत होण्यास मदत होते. 

उत्तर भारतामध्ये हा सण रामाने केलेल्या रावणाच्या पराभवासाठी साजरा केला जातो. त्या निमित्ताने रामलीला वगैरे कार्यक्रम संपूर्ण नवरात्रात करून, विजयादशमीला रावणाची प्रतिमा सार्वजनिकरीत्या दहन केली जाते. 

अयोध्येमध्ये रामाने मिळविलेल्या रावणावरील विजय साजरा करण्यासाठी घरोघरी तोरणे लावली होती. 'दशहरा' म्हणजे दहा शिरे असलेल्या रावणाचे निर्दालन करून, देवांसकट सर्वांना भयमुक्त केल्याबद्दल देवांनीसुद्धा श्रीरामांवर पुष्पवृष्टी केली होती. म्हणूनच आज सुद्धा घरादारांना पुष्पमालेची तोरणे लावण्याची प्रथा पडली आहे.

No comments:

Post a Comment