Wednesday, October 26, 2011

दिपावली

("आपले सण - एक सुलभ संकल्पना" - वेदमूर्ती विनायक वासुदेव भातखंडे व विलास मोरेश्वर कर्णिक, एम. ए, ह्यांच्या पुस्तकातून) 

दिपावली अर्थात दिपोत्सव ह्या भारतभर अत्यंत उत्साहाने साजरा होणाऱ्या सणाचे प्रामुख्याने सहा भाग पडतात.

१) वसुबारस (अश्विन वद्य द्वादशी)
२) धनत्रयोदशी (अश्विन वद्य त्रयोदशी)
३) नरक चतुर्दशी (अश्विन वद्य चतुर्दशी)
४) लक्ष्मीपूजन (अश्विन वद्य अमावास्या)
५) बलिप्रतिपदा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा)
६) भाऊबीज (कार्तिक शुद्ध द्वितीया)

वरील प्रत्येक दिवसाचे महत्व, तिथीवार खाली विशद केले आहे.


१) वसुबारस

दिपोत्सवाचा हा प्रथम दिवस. हा दिवस गुरुद्वादशी तसेच गोवत्स द्वादशी असा सुद्धा ओळखला जातो. ह्या दिवसापासून आरंभ झालेला दिपोत्सव त्रिपुरी पौर्णिमे पर्यंत आकाश कंदिल लावून साजरा करतात. (हल्ली मात्र अपुऱ्या माहितीमुळे बहुतेक जन दिवा, पणती तसेच आकाश कंदिल धन त्रयोदशी अथवा नरक चतुर्दशी पासून भाऊबीजेपर्यंत लावतात.)

वसुबारस ह्या दिवसाला गुरुद्वादशी म्हटले जाते. याचे कारण म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांच्या निजगमनाचा हा दिवस. त्यांच्या स्मरणार्थ भक्त दिपोत्सव साजरा करतात. ह्याच दिवशी धेनु व तिचे वासरू यांचे पूजन स्त्रिया करतात. ह्या मागे सुद्धा असणारी भूमिका अशी आहे की, पोळ्याला पुरुष बैलाचे पूजन करतात. तसेच पुत्र-पौत्र, धनधान्य, सुबत्ता, आनंद व शांती ह्यासाठी स्त्रिया सवत्स देनुची पूजा करतात. धेनु व तिच्या बछड्याला उकडीचे वाडे, उडदाचे वाडे, भात, गोडधोड पदार्थ, आंबवण खाऊ घालतात. काही ठिकाणी गाईला ओवाळून तिची आरती सुद्धा केली जाते. ह्याच दिवशी एकभुक्त राहणाऱ्या स्त्रिया गाईचे दुध, दही, तूप इत्यादी खात नाहीत.

२) धनत्रयोदशी

सर्व देवांनी केलेल्या समुद्र मंथनातून धनत्रयोदशीला जी चौदा रत्ने बाहेर आली त्यातील एक रत्न धन्वंतरी हे होय. धन्वंतरी हा विष्णूचा अवतार असून ही आरोग्य देवता आहे. अर्थातच धनत्रयोदशी ही वैद्यक व्यवसायात असणाऱ्या लोकांसाठी अतिशय महत्वाची आहे. ह्याच दिवशी स्त्रिया सुद्धा अभ्यंगस्नान करतात. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या लोकांखेरीज व्यापारी लोकसुद्धा तितक्याच भावभक्तीने लक्ष्मीची पूजा करतात. घरोघरी सुद्धा सायंकाळी लक्ष्मीची पूजा करण्याची पद्धत आहे. ह्या दिवशी जरी पूजा लक्ष्मीची होत असते तरी मुख्य उद्देश श्री विष्णूंचा म्हणजेच धन्वंतरीचा वास आरोग्यासाठी घरात असावा, हा असतो. धणे-गुळाचा नैवेद्य देवाला दाखवितात.

३) नरकचतुर्दशी

सर्वसामान्यांची दिवाळी ह्या दिवसापासून धुमधडाक्यात चालू होते. वास्तविक पहाता, दिवाळीचे सहाही दिवस अभ्यंगस्नान आवश्यक असते; पण वेळे अभावी पहिले दोन दिवस अभ्यंगस्नानाची प्रथा बंद पडली आहे.

नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचा वध करून परतलेल्या श्रीकृष्णाने नरकासुराला दिलेल्या वराप्रमाणे सर्वांनी मंगलस्नान करून दिपोत्सव साजरा करावा. त्या दिवशी जरी आबालवृद्ध स्त्री-पुरुषांनी अभ्यंगस्नान करावयाचे असले, तरी स्त्रियांनी पुरुषांच्या अंगाला तेल लावून स्नान घालण्याची रूढी पडली आहे. स्नान करतानाच चिराटे फोडून नरकासुराचा प्रतिकात्मक वध केला जातो. त्याच्या वधाच्या आनंदाप्रीत्यर्थ फटाके वाजविले जातात. पुरुषांना औक्षण करून मग फराळ केला जातो. 

अभ्यंगस्नानाविषयी विशेष महत्व तिळाच्या तेलाचे आहे. तिळाचे तेल हे लक्ष्मीचे द्योतक आहे तर पाणी गंगेचे द्योतक आहे. ह्या दोघांचे मिश्रण म्हणजे अभ्यंगस्नान होय. जल आरोग्यदायी, जीवनदायी आहे, तर तेल लक्ष्मी स्वरूप आहे. लक्ष्मी चंचल राहू नये म्हणजेच स्थिर रहावी, यासाठी दिपावलीचे सर्व दिवस अभ्यंगस्नान केल्यास संपूर्ण संवत्सर आरोग्य व संपत्तीचा लाभ होतो.

४) लक्ष्मीकुबेरपूजन

अलक्ष्मी नाशासाठी (म्हणजेच अवदसेचे पारिपत्य करण्यासाठी) तसेच अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी ह्या अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करतात. अखंड लक्ष्मीप्राप्ती म्हणजे अष्ट लक्ष्मींची प्राप्ती. त्या अष्ट लक्ष्मी म्हणजे धनलक्ष्मी, लाभलक्ष्मी, किर्तीलक्ष्मी, रौप्यलक्ष्मी, सुवर्णलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, विजयलक्ष्मी, गृहलक्ष्मी होय. हे पूजन प्रदोषकाळी (सूर्यास्तानंतर) होते कारण लक्ष्मीचा प्रवेश तिन्हीसांजेला होतो. सूर्यास्तानंतर, स्थिर लग्नावर, पूजा करण्याची पद्धत असल्यामुळे कधी-कधी पूजेचा मुहूर्त रात्री ८-९ नंतर सुद्धा येतो. लक्ष्मीपूजनात कुबेर पूजन सुद्धा असते, कारण कुबेर हा संपत्तीचा देव असून लक्ष्मीने दिलेल्या वरामुळे त्याची संपत्ती अक्षय्य आहे.

लक्ष्मीपूजनाला धान्य, रूपे, सुवर्ण ह्यांची पूजा अपेक्षित आहे, परंतु घरोघरी हल्ली सोने, दागदागिने व वहीपूजन करून साळीच्या लाह्यांचा नैवेद्य दाखवितात. ह्याच वेळी नवीन केरसुणीची सुद्धा पूजा करतात. लक्ष्मीचे स्वागत फटाक्यांच्या आवाजाने (आतषबाजीने) करतात. रात्री बारानंतर नव्या केरसुणीने घरातील कचरा झाडून तो वेशीबाहेर ठेवावा. ह्याचा प्रतीकात्मक अर्थ अवदसेला घरातून बाहेर काढण्याचा आहे. पारंपारिक रित्या हा केर जुन्या सुपात भरून, जुन्या केरसुणीसकट, सूप वाजवून टाकला जात असे. सूप वाजविण्याचा अर्थ अलक्ष्मीला निरोप देणे असा आहे. एखाद्या गोष्टीचे 'सूप वाजले' ह्या शब्दप्रयोगाची उत्पत्ती ह्यात आहे.

५) बलीप्रतिपदा

बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असे महाराष्ट्रात, उर्वरित पश्चिम भारतात व दक्षिण भारतातील काही भागात मानले जाते. उत्तरेत मात्र बलिप्रतिपदा हा अर्धाच मुहूर्त समजला जातो. जरी हा दिवस मुहूर्ताचा असला, तरी विवाह व मुंज या कार्यासाठी हा मुहूर्त योग्य असेलच, असे नाही.

बलिप्रतिपदा साजरी करण्यामागे एक कथा आहे. श्री विष्णूंचा चौथा अवतार म्हणजे वामन अवतार. हा अवतार उन्मत्त झालेल्या बळीराजाला वठणीवर आणण्यासाठीच झाला होता. त्या काळच्या प्रथेप्रमाणे राजे-रजवाडे भिक्षुकांना, विशेषत: बटूंना विन्मुख पाठवत नसत. बळीराजा जरी क्रूर दानव असला, तरी दानशूर म्हणून प्रसिद्ध होताच. म्हणून श्री विष्णूंनी बटूचे रूप घेऊन तीन पावले भूमी बळीकडे दान मागितली. बळीराजाने त्याला रुकार देताच पहिल्या पावलाने बटूने स्वर्ग व्यापला, दुसऱ्या पावलाने पृथ्वी व्यापल्यावर  तिसरे पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेऊन त्याला पाताळात पाठविले. परंतु बळीराजा हा विष्णूंचा भक्त असल्याने त्याने विष्णूंकडे वर मागितला की, ह्या दिवशी जे माझी पूजा करतील, त्यांना आपल्या चरणांशी स्थान द्यावे. श्री विष्णूंनी हे मान्य केल्यामुळे बलिप्रतिपदा साजरी करण्याची प्रथा पडली. शहरांमध्ये बलीची पूजा करणे हे अभावांनेच आढळते. पण खेडेगावांमध्ये मात्र शेणाच्या बाहुल्या करून बळीचे पूजन संकल्प करून केले जाते. शहरांमधील लोकांना पूजा करणे शक्य नसल्यास खालील प्रार्थना करावी.

बलीराज नमस्तुभ्यं विरोचन सुत प्रभो |
दानवेन्द्र सुराराते पुजामे प्रतीगृह्यताम  ||


बलीची पूजा ही पुरुषांनी करावयाची असते. बलिप्रतिपदेला सायंकाळी पत्नी पतीला औक्षण करून आपल्या पतीचे आयुष्य वाढावे, म्हणून प्रार्थना करते. औक्षण करताना पत्नीने ज्याप्रमाणे सावित्रीने सत्यवानाचे आयुष्य यमाकडून वाढवून घेतले, तसेच आपल्या पतीचे आयुष्य वृद्धिंगत व्हावे, अशी यमाला प्रार्थना करावी.

बलिप्रतिपदेला द्यूत खेळण्याची जी परंपरा आहे, त्याविषयी आदित्य पुराणात स्पष्टीकरण आहे. ह्या दिवशी शंकर-पार्वती द्यूत खेळले व त्यामध्ये पार्वतीने शंकराचा सतत पराजय केला. पार्वतीच्या खेळावर प्रसन्न होऊन शंकराने पार्वतीला 'शक्तिशाली होशील' असा वर दिला. ह्या दिवशी द्युतामध्ये जे घडते, तेच वर्षभर घडत रहाते अशी समजूत आहे.

६) भाऊबीज

धर्मशास्त्राप्रमाणे दिपावली वसुबारसेपासून ते त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत असली तरी सुद्धा लौकिक अर्थाने भाऊबीज हा दिवाळीचा अखेरचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

ज्याप्रमाणे रक्षाबंधनास बहिण भावाकडे जाते, त्याचप्रमाणे भाऊबीजेला भाऊ बहिणीकडे जातो. भाऊबीज हा दिवस यम द्वितीयाअसा सुद्धा ओळखला जातो. कारण ह्याच दिवशी यम यमीकडे जातो व यमी त्याला स्नान घालून मिष्टान्नांचे भोजन देऊन ओवाळते.
"औक्षण करणे" ह्या कृतीमागे दोन उद्देश आहेत. एक म्हणजे भावाने बहिणीचे संरक्षण करावे व दुसरा उद्देश बहिण-भावांमधील प्रेम वृद्धिंगत व्हावे, असा आहे. भाऊबीजेला यम यमीकडे गेला असल्याने त्याचा दरबार भरत नाही; त्यामुळे ह्या दिवशी मृत्यू पावणाऱ्या कोणत्याही जीवास यमराज नसल्याने स्वर्गप्राप्ती होते असे गरुड पुराणात उल्लेखलेले आहे.

No comments:

Post a Comment