Sunday, May 31, 2026

थिरुपनैयुर येथील श्री सौन्दरेश्वरर मंदिर

हे मंदिर थिरुवारुर-मयीलादुथुराई मार्गावर सन्ननल्लूर मार्गे जाताना थिरुवारुर पासून १२ किलोमीटर्सवर वसले आहे. नन्नीलं पासून ८ किलोमीटर्स वर, पेरळम पासून १६ किलोमीटर्स वर, थिरुकोंडीश्वरम पासून ७ किलोमीटर्स वर, थिरुवारुर पासून १४ किलोमीटर्स वर, मयीलादुथुराई पासून ३३ किलोमीटर्सवर आणि कुंभकोणम पासून ३८ किलोमीटर्सवर आहे.

कावेरी नदीच्या दक्षिण काठावर वसलेल्या ह्या पाडळ पेथ्र स्थळाची स्तुती शैव संत संबंधर आणि सुंदरर ह्यांनी गायली आहे. तामिळ मध्ये पनै किंवा थाळ म्हणजे मराठी मध्ये ताडाचे झाड. ह्या स्थळाचे पौराणिक नाव थाळवनम असे होते आणि भगवान शिवांचे नाव थाळवनेश्वरर असे होते. 

इतर स्थळे जिथे ताड हे क्षेत्र वृक्ष आहे ती अशी - वनपर्थन, पननकत्तुर, थिरुपूरवर, थिरुछेय्यर, थिरुमळपडी, थिरुवलमपुरम, थिरुप्पनंदल.

इथे १४ शिलालेख आहेत ज्यातून कळतं की हे मंदिर ६व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. ११व्या शतकामध्ये ग्रॅनाईट वापरून ह्या मंदिराची पुनर्निर्मिती झाली. 

ह्या स्थळाशी निगडित इतिहास:

इतिहासानुसार एल्लमचेतचेन्नी ह्या चोळा राजाची हत्या झाली. त्यावेळी त्याचा मुलगा कारिकलन हा खूप लहान होता. संगम काळातला कवी इरुंबिदर थलैयार हा कारिकलनचा मामा होता. त्याने कारिकलन आणि त्याच्या आईला ह्या मंदिरात पाठवून सुरक्षित केलं. कारिकलनच्या आईने श्री विनायकांकडे शत्रूपासून रक्षणाची प्रार्थना केली. असा समज आहे की श्री विनायकांनी त्यांचं रक्षण केलं. म्हणून इथे श्री विनायकांना थूनै इरुंद विनायकर असं संबोधलं जातं. वयाच्या १३व्या वर्षी आपल्या मामाच्या सहाय्याने कारिकलनने शत्रूचा पराभव करून राज्य परत मिळवलं. जेव्हा मंत्र्यांनी राजकुमाराची निवड करण्यासाठी हत्तीला नगरात पाठवलं तेव्हा हत्तीने कारिकलनची निवड करून त्याला हार घातला. त्यानंतर कारिकलनचा राज्याभिषेक झाला.

मूलवर: श्री सौन्दरेश्वरर, श्री थाळवनेश्वरर, श्री अळकीयनाथर
देवी: श्री ब्रुहन्नायकी, श्री पेरियानायकी
पवित्र तीर्थ: अमृत पुष्करिणी, पराशर पुष्करिणी, थिरुमळल तीर्थ
क्षेत्र वृक्ष: ताड वृक्ष (तामिळ मध्ये पनै)
पुराणिक नाव: थाळवनम, पनैयुर
वर्तमान नाव: थिरुपनैयुर

क्षेत्र पुराण:

१. आधीच्या ब्लॉगमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे थिरुवारुर येथे पंगूनी उत्तिरं उत्सव साजरा करण्यासाठी भगवान शिवांनी शैव संत सुंदरर ह्यांना थिरुपुगलूर मंदिरात सोन्याची मुद्रा प्रदान केली. सुंदरर सोन्याची मुद्रा घेऊन  थिरुपुगलूर वरून थिरुवारुर कडे निघाले. ते जेव्हा थिरुपनैयुरच्या बाहेरील भागात आले तेव्हां त्यांना भगवान शिवांच्या तांडव नृत्याचे दर्शन झाले. सुंदरर ह्यांनी भगवान शिवांना साष्टांग नमस्कार केला आणि भगवान शिवांची  स्तुती गायली. ह्या गावाच्या ईशान्येला माणिक्कनच्चीयार तीर्थाजवळ एक तीर्थ आहे ज्याचे नाव संधिथ तीर्थ आहे.

२. थाळवनेश्वरम: इथे ताडाची झाडे विपुल प्रमाणात होती म्हणून ह्या स्थळाला थिरुपनैयुर असे नाव प्राप्त झाले. तसेच ताडाचे झाड आणि  कारिकलन राजा ह्यांचे नाते आहे. असा समज आहे की जेव्हा हत्तीने कारिकलनच्या गळ्यात हार घातला त्यावेळी कारिकलन ताडाच्या झाडाखाली उभे होते.

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

सप्त ऋषी, पराशर ऋषी, श्री महालक्ष्मी आणि कारिकलन चोळा राजा.

वैशिष्ट्ये:

१. जेव्हा जुने ताडाचे झाड नष्ट झाले तेव्हा त्याच्या बाजूला आपोआप ताडाचे एक नर वृक्ष तर एक नारी वृक्ष एकमेकांच्या बाजूला उगवले. 

२. पराशर ऋषींनी अमृत पुष्करिणी हे तीर्थ निर्माण केले. 

३. सुंदरमूर्ती नायनार ह्यांनी रचलेल्या स्तुतींमध्ये मातृ उरैथ विनायकाचा उल्लेख आहे. 

४. परिक्रमेमध्ये कारिकलन राजाच्या बाळपणाची चित्रे आहेत.

५. परिक्रमेमध्ये भगवान शिवांनी सप्त ऋषींना आणि शैव संत सुंदरर ह्यांना दर्शन दिले ह्या घटनांची चित्रे आहेत.

६. ह्या मंदिरातल्या पुढल्या मंडपाचा आकार वटवाघुळाच्या कपाळासारखा आहे.

७. इथे काही उठावदार चित्रे आहेत ज्यामध्ये श्री करकटेश्वरर ह्याच्या कथा चित्रित केल्या आहेत. 

मंदिराबद्दल माहिती:

हे पूर्वाभिमुख मंदिर आहे. इथे राजगोपुर नाही आणि ध्वजस्तंभ पण नाही. इथे दोन परिक्रमा आहेत. प्रवेशाच्या कमानीवर भगवान शिव आणि श्री पार्वती देवींचे स्टुक्कोचे चित्र आहे. नंदी आणि बलीपीठ गाभाऱ्याकडे मुख करून आहेत. इथले शिव लिंग स्वयंभू आहे आणि चौकोनी पायथ्यावर (अवूदयार) आहे. पराशर ऋषींनी हे शिव लिंग स्थापन करून त्याची पूजा केली. ह्या शिव लिंगाला एक प्रकारचं सुंदर तेज आहे आणि हे लिंग थोडं उंच आहे. मंदिराच्या तीर्थाचं नाव अमृत तीर्थ आहे.

कोष्ठ मूर्ती: श्री दक्षिणामूर्ती, श्री विनायक, श्री ब्रह्म, श्री दुर्गादेवी. श्री चंडिकेश्वरांची मूर्ती त्यांच्या नेहमीच्या स्थानी आहे.

अमृत तीर्थाच्या बाजूला श्री विनायकांचे देवालय आहे. शैव संतांनी रचलेली स्तोत्रे भिंतींवर कोरली आहेत.  

भगवान शिवांच्या गाभाऱ्याच्या मंडपात नालवर आणि श्री नटराज ह्यांची देवालये आहेत.

मंदिरात प्रवेश केल्यावर उजवीकडे श्री अंबिका देवींचे देवालय आहे. त्या दक्षिणाभिमुख आहेत आणि उभ्या मुद्रेमध्ये आहेत.  

श्री विनायकांना इथे थुनै इरुंद विनायक असे संबोधले जातें. तामिळ मध्ये थुनै म्हणजे आधार आणि इरुंद म्हणजे वास्तव्य करणे. ह्या देवालयाच्या बाजूला दोन ताडाची झाडं आहेत जी स्वतःहून उगवली आणि वाढली ती खूप जुनी आहेत असं मानलं जातं.

थिरुवारुर मंदिराप्रमाणेच इथल्या क्षेत्र विनायकांना मातृ उरैथ विनायक असे संबोधले जाते. 

परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती आणि देवालये आहेत: श्री संदेश्वरर, श्री महालक्ष्मी, अष्ट लिंगे, सप्त ऋषींनी पूजिलेली शिव लिंगे, श्री सोमस्कंद ज्यांच्या डाव्या हातामध्ये फळ आहे, श्री अय्यप्पा, श्री भैरव, श्री सूर्य, श्री चंद्र आणि नवग्रह. 

श्री थाळवनेश्वरांचे स्वतंत्र देवालय आहे.

प्रार्थना:

१. नोकरी मध्ये बढती किंवा नोकरीमध्ये बदल प्राप्त करण्यासाठी इथे भाविक जन भगवान शिवांवर अभिषेक करतात तसेच वस्त्र दान करतात.

२. विवाहातल्या अडचणी दूर करण्यासाठी भाविक जन श्री दुर्गा देवींची पूजा करतात.

पूजा: दैनंदिन पूजा, प्रदोष पूजा तसेच साप्ताहिक आणि पाक्षिक (अमावस्या आणि पौर्णिमा) पूजा केल्या जातात.

मंदिरात साजरे होणारे महत्वाचे सण:

आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): स्कंद षष्ठी

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेम्बर): थिरुकार्थिगई दीपम

मासी (फेब्रुवारी-मार्च): शिवरात्रि

पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तिरं (उत्तरा फाल्गुनी नक्षत्र दिवशी पूजा)

मंदिराच्या वेळा:  सकाळी ७ ते दुपारी १२, दुपारी ४.३० ते रात्री ८

मंदिराचा पत्ता:

श्री सौन्दरेश्वरर मंदिर,
ऍट पोस्ट थिरुपनैयुर,
सन्ननल्लूर मार्गे,
तालुका नन्नीलं,
तामिळनाडू ६०९५०४

दूरध्वनी: +९१-४३६६२३७००७

मंदिराच्या पुजाऱ्याचा संपर्क: श्री कल्याणसुंदरर गुरुक्कल +९१-९९६५९८१५७४, +९१९९४२२८१७५८

No comments:

Post a Comment