Sunday, May 3, 2026

थिरुकरुक्कुडी येथील श्री ब्रह्मपुरीश्वरर / श्री सर्गूणलिंगेश्वरर मंदिर

हे शिव मंदिर कुंभकोणम-मन्नारकुडी मार्गावर कुंभकोणम पासून ७ किलोमीटर्स वर थिरुकरुक्कुडी ह्या गावात वसले आहे. हे स्थळ नाचियार कोविल पासून ५ किलोमीटर्स वर तर तंजावूर पासून ४२ किलोमीटर्स वर आहे. सध्या ह्या स्थळाला मरूधनल्लूर किंवा मरूधनादनल्लूर असे नाव आहे. ह्या पाडळ पेथ्र स्थळाची स्तुती शैव संत संबंधर ह्यांनी केली आहे. म्हणून हे स्थळ ६व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्त्वात असावं. वर्तमान दगडी बांधकाम चोळा राजांनी केले. अतिरिक्त विस्ताराचे काम तंजावूरच्या नायक राजांनी केले. इथल्या शिलालेखांमध्ये ह्या राजांनी केलेल्या कामांचा उल्लेख आहे. 

मूलवर: श्री ब्रह्मपुरीश्वरर, श्री करुक्कुडीनाथर, श्री सर्गूणलिंगेश्वरर
देवी: श्री कल्याणनायकी, श्री अद्वैतनायकी, श्री सर्वालंकारनायकी
पवित्र तीर्थ: करी तीर्थ, यम तीर्थ
पवित्र वृक्ष: बिल्व वृक्ष
पुराणिक नाव:  थिरुकरुक्कुडी
वर्तमान नाव: मरूधनल्लूर किंवा मरूधनादनल्लूर

क्षेत्र पुराण:

१. पुराणानुसार श्रीलंकेच्या मार्गावर असताना प्रभू श्रीराम ह्या स्थळी काही काळ राहिले होते. त्यांना भगवान शिवांची पूजा करायची होती. म्हणून त्यांनी श्री हनुमानांना काशीहून शिव लिंग आणायला सांगितले. हनुमानांना शिव लिंग आणायला उशीर झाला म्हणून प्रभू श्रीरामांनी मातीचे शिव लिंग तयार केले. त्यांनी ह्या शिव लिंगाची प्रतिष्ठा करून त्याची पूजा केली. हे शिव लिंग मातीचे असल्या कारणाने त्याला पृथ्वी लिंग असे म्हणले जाते. त्यानंतर श्री हनुमान जे शिव लिंग घेऊन आले त्याची पण प्रतिष्ठा झाली. हे लिंग परिक्रमेमध्ये आहे. ह्या लिंगाला हनुमंत लिंग असे संबोधले जाते. 

२. पुराणानुसार श्री ब्रह्मदेवांनी इथे भगवान शिवांची पूजा केली. म्हणून इथे भगवान शिवांना श्री ब्रह्मपुरीश्वरर असे संबोधले जाते.

३. क्षेत्र पुराणानुसार इथे धनंजय नावाचा व्यापारी होता. एका स्त्रीशी अनैतिक संबंध ठेवल्यामुळे (काही जणांच्या मते सावत्र आईशी) त्याला कुष्टरोग जडला. त्याने इथे येऊन भगवान शिवांची पूजा केली. भगवान शिवांच्या कृपेने त्याचे पापनिरसन होऊन रोगातून मुक्ती झाली.

४.  पांड्य राजा सर्गूणन आणि त्याच्या मंत्र्याने इथे भगवान शिवांची पूजा केली. म्हणून भगवान शिवांना इथे सर्गूणनाथर किंवा सर्गूणलिंगेश्वरर असे संबोधले जाते.

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे: श्री ब्रह्म, प्रभू श्रीराम, श्री हनुमान, सर्गूणन राजा आणि त्याचा मंत्री, धनंजय व्यापारी.

वैशिष्ट्ये:

१. श्री पार्वती देवी आणि भगवान शिव वधूवराच्या रूपांत आहेत.

२. श्री दक्षिणामूर्तींच्या मूर्तीमध्ये त्यांच्या हातामध्ये वीणा आहे आणि त्यांच्याबरोबर चारच्या ऐवजी दोन मुनी आहेत.

३. श्री सुब्रमण्यम ह्यांच्या मूर्तीमध्ये मोर खाली बघत आहे.

४. गाभाऱ्याच्या मागे श्री लिंगोद्भवर ह्यांची मूर्ती आहे ज्यामध्ये श्री ब्रह्मदेव आणि श्री विष्णू त्यांची पूजा करत आहेत.

५. इथले शिव लिंग स्वयंभू आहे आणि मातीचे आहे.

६. शिव लिंगावर हाताची चिन्हे आहेत. ही चिन्हे प्रभू श्रीरामांची आहेत असा समज आहे.

७. श्री हनुमानांनी पुजीलेल्या शिव लिंगाला हनुमंत लिंग असे नाव आहे. ह्या लिंगाच्या समोर नंदी आहेत. 

मंदिराबद्दल माहिती

हे मंदिर पूर्वाभिमुख आहे.  ह्या मंदिराला राजगोपुर नाही पण इथे प्रवेशावर एक कमान आहे ज्यावर नंदी आणि शिव गणांसह अर्धनारीश्वरर ह्यांचे शिल्प आहे. इथे ध्वजस्तंभ नाही. इथे एकच परिक्रमा आहे. नंदी आणि बलीपीठ गाभाऱ्याकडे मुख करून आहेत. गाभाऱ्यामध्ये गाभारा, अर्धमंडप आणि महामंडप आहेत. गाभाऱ्याचा आकार शिव लिंगासारखा आहे. शिव लिंग स्वयंभू आहे आणि मातीचे बनले आहे. हे लिंग खूप छोटं आहे आणि एका दगडी पायथ्यावर (अवूदयार) आहे. ह्या शिव लिंगाला कवचाने आच्छादून मग त्यावर अभिषेक केला जातो. महामंडपाच्या प्रवेशावर श्री विनायक आणि श्री बालमुरुगन ह्यांच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशावर द्वारपालक आहेत. 

कोष्ट मूर्ती: श्री नर्दन विनायक, हातामध्ये वीणा असलेले श्री दक्षिणामूर्ती आणि त्यांच्या बाजूला दोन सनकादि मुनी, श्री ब्रह्मदेव, श्री दुर्गादेवी, श्री लिंगोद्भवर आणि त्यांच्या आजूबाजूला त्यांची पूजा करत असलेले श्री ब्रह्मदेव आणि श्री विष्णू. श्री चंडिकेश्वरांची मूर्ती त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी आहे.

गाभाऱ्याच्या उजव्याबाजूला श्री अंबिका देवी पूर्वाभिमुख देवालयामध्ये आहेत. ह्या देवालयापुढे धनंजय हा व्यापारी श्री अंबिका देवींची पूजा करत आहे अशी मूर्ती आहे. चोळा राजा कुलोथंगन III ह्याची मूर्ती पण ह्या देवालयासमोर आहे.

परिक्रमे मधली इतर देवालये आणि मूर्ती: एका छोट्या देवालयामध्ये श्री हनुमंत लिंग आहे, सर्गूणन राजा आणि त्याचा मंत्री, श्री सुब्रमण्य त्यांच्या पत्नींसमवेत आणि त्यांचे वाहन मोर हा पृथ्वीकडे बघत आहे, श्री शक्ती विनायकर, नालवर, श्री गजलक्ष्मी देवी, श्री सूर्यदेव, श्री चंद्र, श्री बाल सुब्रह्मण्य, नवग्रह, श्री बालशनीश्वरर, श्री वलमपुरी विनायकर (ज्यांची सोंड उजवीकडे वळली आहे), श्री अंबिका देवींसमवेत शिव लिंग, श्री ब्रह्मदेव.

प्रार्थना:

१. ज्यांना कुष्ट रोग जडला आहे ते इथे अत्यंत भक्तीने भगवान शिवांची रोगमुक्त होण्यासाठी प्रार्थना करतात.

२. भाविक जन विवाहातल्या अडचणींवर मात करण्यासाठी तसेच पाप निरसनासाठी इथे प्रार्थना करतात.

२. भाविक जन इथे श्री सुब्रमण्यम ह्यांची वास्तूदोषाच्या निरसनासाठी प्रार्थना करतात.

पूजा: नित्य दैनंदिन पूजा, प्रदोष पूजा, पाक्षिक आणि साप्ताहिक पूजा

मंदिरात साजरे होणारे सण:

चित्राई (एप्रिल-मे): १० दिवसांचा ब्रह्मोत्सव
आनी (जून-जुलै): थिरुमंजनम
आडी (जुलै-ऑगस्ट): आडी पुरम (पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर पूजा)
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई, कार्थिगई दीपम
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै
मासी (फेब्रुवारी-मार्च): शिवरात्रि

कार्थिगई महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी शिव लिंगावर शंखाचा अभिषेक केला जातो. 

मंदिराच्या वेळा: सकाळी ७ ते ९, संध्याकाळी ५.३० ते ७

मंदिराचा पत्ता:

श्री ब्रह्मपुरीश्वरर / श्री सर्गूणलिंगेश्वरर मंदिर,
ऍट पोस्ट मरूधनल्लूर (थिरुकरुक्कुडी),
तालुका: कुंभकोणम,
तामिळनाडू ६१२४०२

पुजारी: श्रीधर गुरुक्कल +९१-९९४३५२३८५२

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment