हे शिव मंदिर कुंभकोणम-साक्कोटाई-थिरुवारुर मार्गावर कुंभकोणम पासून ७ किलोमीटर्स वर, थिरुवारुर पासून ३८ किलोमीटर्स वर आणि थिरुनागेश्वरम पासून ४ किलोमीटर्स वर आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर वसले आहे. शैव संत संबंधर, सुंदरर आणि माणिकवाचगर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. म्हणून हे मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. हे चोळा राजांनी बांधलेलं मंदिर साधारण २००० वर्षे जुनं असावं. नायक राजांनी आणि नट्टूकोट्टै चेट्टीयार ह्यांनी ह्या मंदिराचा विस्तार केला आणि सांभाळ केला. संत अरुणागिरिनाथर ह्यांनी ह्या मंदिरातील श्री मुरुगन ह्यांची स्तुती गायली आहे.
पूर्वी हे मंदिर पूर्ण शिव लिंगांनी भरलेलं होतं. त्यामुळे मंदिरात कोणी चालत जाऊ शकायचं नाही. म्हणून भाविक जन लोळून ह्या मंदिरात यायचे. ह्याला तामिळ मध्ये अंगप्रदक्षिणा असं म्हणतात.
मूलवर: श्री शिवगुरुनाथर, श्री शिवपुरनाथर, श्री ब्रह्मपुरीनाथर, श्री शिवपुरीश्वरर
देवी: श्री आयंबाळ, श्री शृंगारवल्ली, श्री पेरियानायकी
पवित्र तीर्थ: चंद्र तीर्थ, सूर्य तीर्थ, सुंदर तीर्थ
पवित्र वृक्ष: मराठीमध्ये सोनचाफा, तामिळमध्ये शेनबागम
पुराणिक नाव: कुबेरपुरम, भुकैलास, शेनबाग अरण्य
वर्तमान नाव: शिवपुरम
क्षेत्र पुराण:
१. स्थळ पुराणानुसार पृथ्वीवर जेव्हां प्रलय आला तेव्हां पृथ्वीला वाचविण्यासाठी श्री महाविष्णूंनी श्वेतवराह अवतार घेतला आणि पृथ्वीला आपल्या माथ्यावर धारण केलं. पृथ्वीला वाचविल्यानंतर आपल्या मूळ रूपांमध्ये परत येण्यासाठी त्यांनी भगवान शिवांची इथे उपासना केली. भगवान शिवांनी त्यांना परत मूळ रूपांत आणलं. श्री दक्षिणामूर्तींच्या देवालयाजवळ गाभाऱ्याच्या भिंतीवर एका शिल्पामध्ये ही घटना चित्रित केली आहे. शैव संत संबंधर आणि अप्पर ह्यांनी गायलेल्या स्तुतींमध्ये ह्या घटनेचा उल्लेख आढळतो.
२. पुराणानुसार एकदा रावण इथे दर्शन घेण्यासाठी आला. त्याने मंदिरात येण्याआधी स्नान केले नव्हते आणि धार्मिक विधी पण केले नव्हते. नंदीने रावणाला अटकवले. कुबेर रावणाच्या मदतीसाठी आला आणि त्याने खरं कारण काय आहे हे न जाणता नंदीला रावणाला मंदिरात प्रवेश करू देण्याची आज्ञा केली. नंदीने कुबेराला शाप दिला की तो पृथ्वीवर एक अत्यंत लोभी राजा म्हणून जन्म घेईल. कुबेराने पृथ्वीवर एका राजघराण्यात जन्म घेतला आणि मोठा होऊन तो राजा बनला जो अत्यंत लोभी होता. तो नियमित शिव मंदिराला भेट देऊन भगवान शिवांची पूजा करायचा. एकदा त्याने परिक्रमेमध्ये एका तांब्याच्या पट्टीवर कोरलेला लेख वाचला ज्यामध्ये असं लिहिलं होतं की "जो कोणी तामिळ महिन्याच्या सोमवारी येणाऱ्या शिवरात्रीच्या दिवशी एका मुलाच्या रक्ताने शिव लिंगावर अभिषेक करेल तो प्रचंड श्रीमंत होईल". राजाने एका गरीब दाम्पत्याला पैसे देऊन त्यांच्या मुलाला बळी द्यायला तयार केलं. त्याने शिव मंदिरामध्ये तो मुलगा आणि त्याच्या पालकांसमवेत पूजा सुरु केली. जेव्हा राजाने त्या मुलाच्या गळा कापण्याची वेळ आली त्यावेळी तो मुलगा आपल्या पालकांना चिकटून बसला आणि त्याने श्री पार्वती देवींची प्रार्थना करायला चालू केलं. श्री पार्वती देवींनी भगवान शिवांना त्या मुलाला वाचविण्याची विनंती केली. भगवान शिव पार्वती देवींना म्हणाले की ही सगळी नंदीने कुबेराला दिलेल्या शापातून कुबेराला मुक्त करण्याची योजना आहे. ते म्हणाले तो मुलगा साक्षात अग्निदेव आहे आणि त्याचे पालक श्री इंद्रदेव आणि श्री इंद्राणी आहेत. भगवान शिव त्या स्थळी प्रकट झाले आणि त्यांनी त्या मुलाचं रक्षण केलं. कुबेराला आपल्या लोभाच्या तीव्रतेची जाणीव झाली आणि किती मोठं पाप त्याच्याकडून घडणार होतं ह्याची पण जाणीव झाली. कुबेराने भगवान शिवांकडे क्षमायाचना केली आणि भगवान शिवांनी त्याला शापातून मुक्त केलं. ह्या घटनेचं महत्त्व दर्शविण्यासाठी इथल्या शिवलिंगावर एक तडा आणि रक्ताचा थेंब आहे. म्हणून ह्या स्थळाला कुबेरपुरी किंवा कुबेरपूरम असे नाव प्राप्त झाले.
३. सृष्टी निर्मिती चालू करण्याआधी श्री ब्रह्मदेवांनी इथे भगवान शिवांची उपासना केली म्हणून भगवान शिवांना इथे श्री ब्रह्मपुरीश्वरर असे संबोधले जाते.
४. एकदा शैव संत संबंधर त्यांच्या शिष्यांसमवेत इथे दर्शनासाठी आले त्यावेळी त्यांना असा अनुभव आला कि जमिनीच्या खाली सगळीकडे शिव लिंगेच पुरलेली आहेत. ह्या शिव लिंगांना पायाचा स्पर्श करून मंदिरात प्रवेश करणे त्यांना अनुचित वाटले म्हणून ते आणि त्यांचे शिष्य अंगप्रदक्षिणा करत मंदिरात पोचले. मंदिराच्या बाहेर त्यांनी भगवान शिवांची प्रार्थना करून त्यांची स्तुती गायली. ज्या ठिकाणाहून त्यांनी हि स्तुती गायली त्या ठिकाणाला स्वामिगलथूरै असे नाव आहे.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री महाविष्णू, श्री कुबेर, शैव संत अप्पर, रावण, शैव संत पट्टिनाथर, शैव संत संबंधर, शैव संत अरुणागिरिनाथर, श्री अग्नी, श्री इंद्र आणि त्यांची पत्नी श्री इंद्राणी.
वैशिष्ट्ये:
१. इथले शिव लिंग खूप भव्य आहे.
२. इथली श्री दक्षिणामूर्तींची मूर्ती अलौकिक आहे. ह्या मूर्तीच्या पायाशी वराह, राहू आणि सनकादि ऋषींची उठावदार शिल्पे आहेत.
३. हे एकच शिव मंदिर असे आहे जिथे अंगप्रदक्षिणा केली जाते.
४. हे एकच मंदिर आहे जिथे गुरूंबरोबर वराह आणि राहू आहेत.
५. नंदीच्या पुढ्यात श्री ब्रह्मदेवांचे देवालय आहे.
६. चित्राई ह्या तामिळ महिन्याच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या दिवशी सकाळी इथल्या शिव लिंगावर सूर्याची किरणे पडतात.
७. श्री पार्वती देवींच्या देवालयाच्या पुढल्या मंडपाच्या छतावर बारा राशींची शिल्पे कोरली आहेत. भाविकांचा असा समज आहे की त्यांच्या जन्मराशीच्या शिल्पाखाली प्रार्थना केल्यास त्या फळतात.
८. शैव संत अरुणागिरिनाथर ह्यांनी ह्या मंदिरातील श्री मुरुगन ह्यांच्यावर स्तुती गायली आहे.
९. श्री षण्मुखांची मूर्ती अलौकिक आहे.
१०. इथे एक शिल्प आहे ज्यामध्ये स्थळ पुराणातील वराह भगवान शिवांची फुलांनी पूजा करत आहेत ही कथा चित्रित केली आहे.
११. श्री भैरवांची मूर्ती अलौकिक आहे. त्यांचे वाहन म्हणजेच श्वान त्यांच्या डाव्याबाजूला त्यांच्याकडे मुख करून आहेत. त्याचा डावा कान उंचावला आहे जणूकाही तो भक्तांच्या प्रार्थना ऐकत आहे.
मंदिराबद्दल माहिती:
हे पूर्वाभिमुख मंदिर साधारण १.५ एकरवर पसरले आहे. ह्या मंदिराला तीन स्तरांचं राजगोपुर आहे. ह्या मुख्य राजगोपुरासमोर अजून एक तीन स्तरांचं राजगोपुर आहे. ह्या दोन गोपुरांमध्ये बलीपीठ आणि नंदीमंडप आहे. ह्या मंदिरात ध्वजस्तंभ नाही. इथले शिव लिंग स्वयंभू आहे.
कोष्ठ मूर्ती: श्री नर्थन विनायक, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर आणि श्री दुर्गादेवी.
असा समज आहे की ह्या मंदिराच्या जमिनीखाली अनेक शिव लिंगे पुरलेली आहेत ज्यांची पूजा शैव संत संबंधर ह्यांनी केली.
श्री दक्षिणामूर्तींच्या दोन्ही बाजूंना सनकादि ऋषींची शिल्पे आहेत. त्यांच्या मूर्तीच्या खाली वराह आणि सर्प आहे. असा समज आहे श्री महाविष्णू वराहाच्या रूपात आहेत तर राहू सर्पाच्या रूपात आहेत.
श्री अंबिकादेवी दक्षिणाभिमुखी देवालयामध्ये आहेत. त्यांच्या देवालयाच्या समोरील मंडपाच्या छतावर १२ राशींची शिल्पे कोरलेली आहेत.
इथे एक शिल्प आहे ज्यामध्ये वराह म्हणजेच श्री महाविष्णू भगवान शिवांची फुलांनी पूजा करत आहेत असे चित्रित केले आहे.
बाहेरील परिक्रमेमध्ये नंदींच्या समोर श्री भैरवांचे दक्षिणाभिमुखी देवालय आहे. त्यांच्या डाव्याबाजूला त्यांचे वाहन श्वान आहे ज्याचे मुख श्री भैरवांकडे आहे. ह्या श्वानाचा डावा कान उंचावलेला आहे जणूकाही तो भक्तांच्या प्रार्थना ऐकत आहे. श्री अग्नी, श्री इंद्र, श्री इंद्राणीदेवी आणि श्री कुबेर हे एका समरेषेमध्ये लिंगांच्या रूपात आहेत. परिक्रमेमध्ये शैव संत संबंधर आणि त्यांच्या पत्नी परवै नाचियार ह्यांच्या मूर्ती आहेत.
ह्या मंदिरामध्ये नवग्रह नाहीत. कारण नवग्रहांची स्थापना करण्याची पद्धत पल्लव राजांच्या काळात चालू झाली.
ह्या शिवाय इथे पुढल्या मूर्ती आहेत - श्री गणेशांची देवालये, श्री सुब्रह्मण्य त्यांच्या पत्नींसमवेत, श्री गजलक्ष्मी, श्री बालमुरूगन, श्री भैरवांची दोन देवालये, श्री चंद्रांची दोन देवालये, श्री सूर्य, श्री शनीश्वरर, श्री चंडिकेश्वरर आणि श्री महाविष्णू. ह्याशिवाय इथे तीन लिंगे आहेत ज्यांची नावे - थेयु लिंग, वायू लिंग आणि पृथ्वी लिंग अशी आहेत. मिरवणुकीतली श्री नटराजांची मूळ मूर्ती खूप सुंदर आहे. ही मूर्ती तस्करांनी पळवली होती आणि नंतर कायदेशीर कारवाई होऊन ही मूर्ती परत आणली गेली. सध्या ही मूर्ती मैलापुर येथील श्री कपालीश्वरर मंदिरामध्ये एका सुरक्षित तिजोरीमध्ये ठेवली आहे.
येथील श्री षण्मुखांच्या मूर्तीमध्ये त्यांना एक मुख आणि चार हात आहेत. हे दृश्य अलौकिक आहे.
प्रार्थना:
१. भाविक जन आपल्या अपत्यांच्या कल्याणासाठी २१ दिवे लावून प्रार्थना करतात.
२. भाविकांचा असा समज आहे की इथे श्री दक्षिणामूर्तींची प्रार्थना केल्याने सर्पदोषांचा परिहार होतो. म्हणून सर्पदोषांसाठी हे परिहार स्थळ आहे.
३. भाविक जन इथे शत्रूंपासून रक्षण होण्यासाठी तसेच कोर्टकचेरी मधल्या दाव्यांमध्ये विजय मिळविण्यासाठी इथे प्रार्थना करतात. ते भगवान शिवांना वड्याची माला अर्पण करतात आणि शेंगदाण्याचे लाडू आणि दहीभात नैवेद्य म्हणून अर्पण करतात.
४. दिवाळीतल्या कुबेर पूजेच्या दिवशी इथे कुबेरांची पूजा केल्याने समृद्धी प्राप्त होते असा समज आहे.
५. भाविक जन इथे अपत्य प्राप्तीसाठी श्री पार्वती देवींवर ११ शुक्रवार उपवास करून अभिषेक करतात.
६. रोगातून मुक्ती मिळविण्यासाठी इथे भाविक अंगप्रदक्षिणा घालतात.
पूजा:
१. रोज चार वेळा पूजा होते.
२. प्रदोष दिवशी प्रदोष पूजा
३. दिवाळीतल्या कुबेर पूजेच्या दिवशी कुबेर पूजा.
४. तामिळ आणि इंग्लिश नववर्षदिनी विशेष पूजा केली जाते.
मंदिरात साजरे होणारे महत्वाचे सण:
चित्राई (एप्रिल-मे): दहा दिवसांचा ब्रह्मोत्सव
आनी (जुन-जुलै): थिरुमंजनम
आडी (जुलै-ऑगस्ट): आडी पुरम (पूर्वा फाल्गुनी नक्षत्र दिवशी पूजा)
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेम्बर): थिरुकार्थिगई दीपम
मारगळी (डिसेम्बर-जानेवारी): थिरुवथीरै
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
थै (जानेवारी-फेब्रुवारी): पोंगल
पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तिरं (उत्तरा फाल्गुनी नक्षत्र दिवशी पूजा)
मंदिराच्या वेळा: सकाळी ७ ते दुपारी १२, दुपारी ४ ते रात्री ८.३०
मंदिराचा पत्ता:
श्री शिवगुरूनाथस्वामी मंदिर / श्री शिवपूरनाथर / श्री ब्रह्मपुरीश्वरर मंदिर,
ऍट पोस्ट शिवपूरम,
तालुका: कुंभकोणम,
तामिळनाडू ६१२४०१
पुरोहित: श्री बाळशास्त्री गुरुक्कल आणि श्री साईसतीश
दूरध्वनी: +९१-९८६५३०६८४९, +९१-९६९८४६०९८४, +९१-८९७३६२१९३८
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment