Sunday, April 12, 2026

अळगापुथ्थुर येथील श्री पडीकासूनाथर स्वामी मंदिर

हे अळगापुथ्थुर येथील मंदिर कुंभकोणम - नाचियार मार्गावर कुंभकोणम पासून ८ किलोमीटर्सवर आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. शैव संत संबंधर, अप्पर आणि सुंदरर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. हे काही थोड्या मंदिरांपैकी एक आहे जिथे ह्या तीनही शैव संतांनी स्तुती गायली आहे. कावेरी नदीची उपनदी असलेल्या अरिसलारू नदीच्या दक्षिण काठावर हे मंदिर आहे. चोळा साम्राज्याच्या कोचेंगट ह्या राजाने बांधलेल्या माड कोविल मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. हे मंदिर ३ऱ्या शतकापासून अस्तित्वात असावं असा समज आहे. सध्याचे जे दगडी बांधकाम आहे ते ९व्या शतकामध्ये एका चोळा राजाने केले असा समज आहे. ह्या मंदिरामध्ये सात शिलालेख आहेत ज्यामध्ये चोळा, पांड्या आणि विजयनगर साम्राज्याच्या राजांनी मंदिरासाठी केलेल्या कामांचे उल्लेख आहेत. 

मूलवर: श्री पडीकासूनाथर, श्री स्वर्णपुरीश्वरर, श्री कुबेरलिंगेश्वरर
देवी: श्री सौंदर्यनायकी, श्री अळगाम्बिकाई
उत्सव मूर्ती: श्री सोमस्कंदर
पवित्र तीर्थ: अमृतपुष्करिणी, अरिसलारू
पवित्र वृक्ष: बिल्व
आगम / पूजा: शिव आगम
पुराणिक नाव: अरिसीकरैपुथूर, सेरुविळीपुथूर

क्षेत्र पुराण:

१. स्थळ पुराणानुसार इथे शैव भक्त पुगळ थूनै नायनार वस्ती करून होते. ते ह्या मंदिरामध्ये पुरोहित म्हणून काम करत होते. ते रोज नदीतून एका मडक्यातून ताजं आणि थंड पाणी आणून त्या पाण्याने इथल्या शिव लिंगावर अभिषेक करायचे. एकदा ह्या प्रदेशामध्ये दुष्काळ पडला. पण पुगळ थूनै नायनार ह्यांनी त्यांच्या सेवेमध्ये खंड पडू दिला नाही. काही काळाने ते भुकेने अशक्त होऊन त्यांची तब्येत नाजूक झाली. तरीपण ते आपली सेवा करीतच राहिले. एकदा ते अभिषेक करताना बेशुद्ध होऊन पडले आणि त्यांच्या हातातलं मडकं शिव लिंगावर पडून फुटलं. भगवान शिव त्यांच्या स्वप्नांत आले आणि म्हणाले कि त्यांच्या सेवेचा मोबदला म्हणून ते रोज एक सोन्याची मुद्रा ठेवतील. ह्या मुद्रेचा वापर करून त्यांनी स्वतःचं आणि गावाचं दुष्काळामध्ये पोषण करावं असं पण सांगितलं. म्हणून इथे भगवान शिवांना श्री पडीकासूनाथर (तामिळ मध्ये पडी म्हणजे भत्ता किंवा पायरी आणि कासू म्हणजे मुद्रा) असं संबोधलं जातं. त्या दिवसानंतर भगवान शिव पुगळ थूनै नायनार ह्यांच्यासाठी रोज शिव लिंगाच्या पायथ्याशी एक मुद्रा ठेवत होते. पुगळ थूनै नायनार ह्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत सेवा केली. भगवान शिवांनी त्यांना ६३ नायनमारांमध्ये समाविष्ट केलं.

२. आम्ही एका आधीच्या ब्लॉगमध्ये उल्लेख केला होता की श्री ब्रह्मदेव प्रणव मंत्राचा अर्थ समजावू शकले नाहीत म्हणून श्री मुरुगन ह्यांनी त्यांना शिक्षा दिली. पण भगवान शिवांच्या मते ही श्री मुरुगन ह्यांची चूक होती म्हणून त्यांनी श्री मुरुगन ह्यांना शाप दिला. त्या शापाचे विमोचन करण्यासाठी श्री मुरुगन इथे आले आणि त्यांनी तपश्चर्या केली. भगवान शिवांनी श्री मुरुगन ह्यांना समजावले की एखाद्याची चूक दाखवणे हे उचित आहे पण त्या चूक करणाऱ्याला शिक्षा देणे हे मात्र पाप आहे.

३. पुराणानुसार एकदा स्वर्गलोकामध्ये असुर देवांवर अत्याचार करत होते. ह्या त्रासापासून रक्षा करण्यासाठी देव भगवान शिवांकडे गेले. भगवान शिवांनी श्री मुरुगन ह्यांना असुरांचा संहार करण्याची आज्ञा केली. जेव्हां श्री मुरुगन असुरांवर आक्रमण करण्याची तयारी करत होते त्यावेळी सर्व देवांनी त्यांना आपापली शस्त्रे प्रदान केली. भगवान विष्णूंनी त्यांना शंख आणि चक्र प्रदान केलं. ही शस्त्रे वापरून श्री मुरुगन ह्यांनी असुरांचा संहार केला. म्हणून इथे श्री मुरुगन ह्यांच्या हातामध्ये शंख आणि चक्र दिसतात.

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

श्री मुरुगन, आनंद मुनी, उन्मैयन नन्द ऋषि, पुगळ थूनै नायनार, शैव संत संबंधर, अप्पर आणि सुंदरर.

वैशिष्ट्ये:

१. पुगळ थूनै नायनार ह्यांचे हे जन्मस्थान आहे.

२. शैव संत संबंधर, अप्पर आणि सुंदरर ह्या तिघांनीही इथे स्तोत्रे गायली आहेत. म्हणून ह्या स्थळाला मूवर पाडळ पेथ्र स्थळ असं म्हणतात.

३. ह्या स्थळाला अरसलकरैपुथूर असे नाव आहे. म्हणजे अरिसिलारू ह्या नदीच्या काठावरील मंदिर.

४.  इथल्या नवग्रहांच्या देवालयामध्ये सूर्य आणि चंद्राची स्थाने अलौकिक आहेत. 

५. ह्या मंदिरामध्ये नवग्रहांना वायुरूपामध्ये पूजिले जाते.

६. श्री मुरुगन ह्यांची मूर्ती अलौकिक आहे.

७. श्री महालक्ष्मींची मूर्ती श्री मुरुगन ह्यांच्या जवळ आहे. ही रचना अलौकिक आहे.

मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर पश्चिमाभिमुख असून ह्याला तीन स्तरांचं राजगोपुर आहे आणि एक परिक्रमा आहे. राजगोपुराच्या आजूबाजूला सूर्य आणि चंद्र ह्यांची छोटी देवालये आहेत. बाहेरील परिक्रमेमध्ये नवीन बांधलेल्या मंडपामध्ये ध्वजस्तंभ, बलीपीठ आणि नंदी गाभाऱ्याकडे मुख करून आहेत. ध्वजस्तंभाच्या खाली श्री ध्वजस्तंभ विनायक ह्यांची मूर्ती आहे. गाभाऱ्यामध्ये गाभारा, अर्धमंडप आणि महामंडप आहेत. येथील शिव लिंग स्वयंभू आहे. शिव लिंग उंच आहे आणि एका मोठ्या पिठावर आहे (अवूदयार). गाभारा शिव लिंगाच्या आकाराचा आहे. गाभाऱ्यावर तीन स्तरांचं विमान आहे. 

कोष्ठ मूर्ती: श्री नर्दन विनायक, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्म आणि श्री दुर्गादेवी

श्री चंडिकेश्वरांचे देवालय त्यांच्या नेहमीच्या स्थानी आहे. श्री अंबिकादेवींचे दक्षिणाभिमुखी देवालय महामंडपामध्ये आहे. महामंडपामध्ये पुढील मूर्ती आहेत - शैव संत नालवर, पुगळ थूनै नायनार आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मी, नायनार सुंदरर आणि त्यांच्या पत्नी परैवैनाचियार. अर्धमंडपामध्ये श्री पार्वती देवी आणि भगवान शिवांचे ऋषभारूढ शिल्प आहे. ह्या शिल्पामधल्या भगवान शिवांना श्री ऋषभेश्वरर असे संबोधले जाते. श्री मुरुगन ह्यांच्या देवळामध्ये त्यांना श्री कल्याणसुंदर षण्मुख असे संबोधले जाते. श्री सुब्रमण्यम त्यांच्या पत्नींसमवेत मोरावर बसले आहेत. त्यांना १२ हात आहेत. त्यातील दोन हातांमध्ये श्री विष्णूंसारखे शंख आणि चक्र आहेत आणि बाकीच्या हातांमध्ये विविध शस्त्रे आहेत. मूर्ती अलौकिक आहे. इतर मंदिरांमध्ये अशी मूर्ती दिसत नाही. श्री सुब्रमण्यम ह्यांच्या मागे धातूची कमान (प्रभावळ) आहे जिचा आकार तामिळ ओम (ௐ) सारखा आहे. ह्या देवालयाच्या बाजूला श्री महालक्ष्मींचे देवालय आहे. श्री विनायकांचे स्वतंत्र देवालय आहे ज्यामध्ये त्यांचे नाव श्री स्वर्ण विनायक असे आहे. बाकीच्या देवालयाचे दर्शन घेण्याआधी ह्या मूर्तीचे दर्शन घेतले जाते. इथे नवग्रहांचे देवालय आहे ज्यामध्ये सूर्य आणि चंद्र एकमेकांकडे मुख करून आहेत. ह्या देवालयाच्या बाजूला नऊ खड्डे आहेत. असा समज आहे की नवग्रह ह्या खड्डयांमध्ये वायुरूपांत आहेत. ह्या शिवाय परिक्रमेमध्ये श्री लक्ष्मी, श्री स्वर्णभैरव आणि श्री काळभैरव ह्यांची देवालये आहेत. 

प्रार्थना:

१. भाविक जन इथे भगवान शिवांची पापविमोचनासाठी प्रार्थना करतात.

२. भाविक जन इथे भगवान शिवांना सम गणनेमध्ये मुद्रांचे (नाणी किंवा नोटा) निवेदन करतात. आणि मग ती नाणी किंवा नोटा परत घेऊन जातात ह्या समजुतीने की त्यामुळे त्यांना वैभवप्राप्ती होईल.

३. भाविक जन इथे कीडा आणि इतर प्राण्यांच्या दंशाने निर्माण झालेल्या विषाचे निरसन करण्यासाठी श्री मुरुगन ह्यांना प्रार्थना करतात.

४. भाविकांचा असा समज आहे की इथे प्रार्थना केल्याने त्यांना कुठल्याही समस्येला सामोरं जाण्याची मानसिक शक्ती प्राप्त होते.

५. वैवाहिक समस्यांच्या निवारणासाठी तसेच पितृदोषांचा परिहार करण्यासाठी भाविक इथे श्री मुरुगन ह्यांना अमावास्येच्या दिवशी विशिष्ट तांदळाची खीर (तामिळ मध्ये पालपायसम) नैवेद्य म्हणून अर्पण करून प्रार्थना करतात.

६. ज्यांनी आपल्या पितरांसाठी पितृकर्मे केलेली नाहीत असे भाविक इथे नवग्रह देवालयासमोर असलेल्या खड्डयांमध्ये दिवे लावून सूर्य आणि चंद्र ह्यांची पूजा करतात.

पूजा:

१. आगमानुसार इथे दैनंदिन पूजा केल्या जातात.

२. प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार इथे पूजा केली जाते. 

३. प्रत्येक पक्षामध्ये प्रदोष पूजा केली जाते. 

४. अमावस्या, पौर्णिमा, संकष्ट चतुर्थी आणि कृत्तिका नक्षत्र दिवशी इथे विशेष पूजा केली जाते. 

मंदिरात साजरे होणारे सण:

आनी (जून-जुलै): थिरुमंजनम
आडी (जुलै-ऑगस्ट): आडी पुरम (पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर पूजा)
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी, अनुराधा नक्षत्रावर पुगळ थूनै नायनार ह्यांची गुरुपूजा
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई दीपम
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै
थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकर संक्रांति
मासी (फेब्रुवारी-मार्च): शिवरात्रि, मासीमाघम
पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तिरं (उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर पूजा)

मंदिराच्या वेळा: सकाळी ८ ते दुपारी १२, दुपारी ४.३० ते ८.३०

मंदिराचा पत्ता

श्री पडीकासूनाथर स्वामी मंदिर,
अळगापुथ्थुर,
साक्कोटाई मार्गे,
तालुका कुंभकोणम,
तामिळनाडू ६१२४०१

दूरध्वनी: +९१-४३४२४६६९३९, +९१-९९४३१७८२९४

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


No comments:

Post a Comment