हे मंदिर कुंभकोणम-पुंथोट्टम मार्गावर कुंथळूर मार्गे जाताना कुंभकोणम पासून २२ किलोमीटर्सवर आहे, नाचियार कोविल पासून २० किलोमीटर्सवर, थिरुपांपूरं पासून १५ किलोमीटर्सवर, पुंथोट्टमपासून २० किलोमीटर्सवर, मयीलादुथुराईपासून ३३ किलोमीटर्सवर आणि थिरुवारुरपासून ४० किलोमीटर्सवर आहे. ह्या पाडळ पेथ्र स्थळाची स्तुती शैव संत अप्पर ह्यांनी गायली आहे. हे मंदिर कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आणि अरीसिलारू ह्या कावेरी नदीच्या उपनदीच्या उत्तर काठावर आहे. वर्तमान मंदिर १३०० वर्षे जुनं आहे. चोळा साम्राज्याच्या कालावधीत ह्या मंदिराची दगडी बांधकाम करून पुनर्निर्मिती झाली आणि कालांतराने विजयनगर आणि मराठा राजांनी ह्या मंदिराचा विस्तार केला. १९९० साली इथल्या काही स्थानिक लोकांनी पुढाकार घेऊन मोडकळीस आलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यांनी स्थापिलेल्या संस्थेचं नाव करुवेली असे आहे आणि सध्या ही संस्था ह्या मंदिराचे व्यवस्थापन बघत आहे.
मूलवर: श्री सर्गुणेश्वरर
देवी: श्री सर्वांगसुंदरी
पवित्र तीर्थ: यम तीर्थ
पवित्र वृक्ष: बिल्व
पुराणिक नाव: थिरुकरूवेली, थिरुवेलीकोट्टीआई, सर्गुणेश्वर पुरम
जिल्हा: थिरुवारुर
क्षेत्र पुराण:
१. पुराणानुसार प्रजापती दक्ष राजाने यज्ञ आयोजित केला होता. ह्या यज्ञासाठी त्याने सर्व देवांना आमंत्रित केले पण आपली कन्या आणि जावई म्हणजेच श्री पार्वती देवी आणि भगवान शिव ह्यांना वगळले. पार्वती देवींना ह्या यज्ञात सहभागी होण्याची इच्छा होती. भगवान शिवांनी पार्वती देवींना न जाण्याचा सल्ला दिला. पण त्याकडे दुर्लक्ष करून पार्वती देवी यज्ञात सहभागी होण्यासाठी गेल्या. पण यज्ञस्थळी त्यांच्या पितांनी म्हणजेच दक्ष राजाने आपल्या कन्येचा आणि भगवान शिवांचा अपमान केला. पार्वती देवींना आपल्या पतीचा झालेला अपमान सहन झाला नाही. म्हणून त्यांनी यज्ञाला आणि यज्ञात सहभागी झालेल्यांना शाप दिला आणि स्वतः यज्ञकुंडामध्ये उडी मारून आत्मदहन केलं. कालांतराने त्यांनी हिमवानाची कन्या म्हणून जन्म घेतला. त्या ह्या स्थळी आल्या आणि भगवान शिवांशी पुनर्मीलन व्हावं म्हणून त्यांनी तपश्चर्या केली. भगवान शिवांसमोर त्या अत्यंत सुंदर आणि आल्हाददायक रूपांत आल्या. आणि नंतर त्यांनी भगवान शिवांसमवेत विवाह केला.
२. दक्ष यज्ञाचा संहार केल्यानंतर भगवान शिवांनी कुडूकोट्टी नावाचं तांडव नृत्त्य केलं.
३. स्थळ पुराणानुसार सर्गुणन नावाच्या राजाने इथे भगवान शिवांची उपासना केली. म्हणून भगवान शिवांना इथे सर्गुणनाथर असं संबोधलं जातं. भगवान शिवांनी सर्गुणनला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती दिली. म्हणून ह्या स्थळाला करुवेली असं नाव प्राप्त झालं.
४. पुराणानुसार यमदेवांनी इथे येऊन यम तीर्थ निर्माण केलं आणि भगवान शिवांची उपासना करून पापक्षालन केलं.
५. पुराणानुसार दक्ष राजाच्या पोटी जन्म घेतल्याने श्री पार्वती देवींना परत जन्म घ्यायला लागला. हिमवानाच्या पोटी जन्म घेतल्यानंतर त्यांनी भगवान शिवांशी विवाह केला आणि त्या अमृतत्व पावल्या. म्हणून असा समज आहे कि जे भाविक जन इथे येऊन भगवान शिवांची उपासना करतात त्यांना परत जन्म घ्यायला लागत नाही म्हणजेच त्यांना मातेच्या गर्भातून जन्म घ्यायला लागत नाही. (तामिळ मध्ये करू म्हणजे गर्भ आणि इल्लाई म्हणजे नाही). म्हणून ह्या स्थळाला करूइल्लाई असं नाव प्राप्त झालं. कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन ते करुवेली असं झालं.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
सर्गुणन राजा, श्री पार्वती देवी, श्री इंद्रदेव, श्री यमदेव, देव, रुद्रगण
वैशिष्ट्ये:
१. ह्या मंदिरातल्या मूर्ती खूप प्राचीन आहेत आणि त्यांचं शिल्पकाम सुंदर आहे.
२. ह्या मंदिरामध्ये श्री दक्षिणामूर्तींच्या मूर्तीमध्ये त्यांनी हातामध्ये सर्प धरला आहे. हे दृश्य खूप दुर्मिळ आहे.
३. भगवान शिव आणि श्री पार्वतीदेवींच्या देवालयामध्ये ते दोघे विवाह मुद्रेमध्ये आहेत.
४. परिक्रमेच्या भिंतीवर एक शिल्प आहे ज्यामध्ये एक हत्ती भगवान शिवांची पूजा करत आहे आणि त्याच्या बाजूला श्री गणेश आहेत.
५. श्री यमदेवांनी इथे एक तीर्थ निर्माण केलं आणि भगवान शिवांची उपासना केली.
६. ह्या स्थळाच्या जवळपास अशी आठ मंदिरे आहेत जिथे अष्टदिक्पालांनी भगवान शिवांची उपासना केली. ह्या सर्व मंदिरांमध्ये पूजा करणं हे खूप शुभ मानलं जातं. ही स्थळे पुढीलप्रमाणे आहेत
७. इथे नवग्रहांचे देवालय नाही
मंदिराबद्दल माहिती:
हे छोटं मंदिर पूर्वाभिमुख असून ह्याला तीन स्तरांचं राजगोपुर आहे. इथे प्रवेशावर एक सुंदर कमान आहे. मंदिराच्या पुढे पवित्र तीर्थ आहे. भाविक जन मंदिरात प्रवेश करण्याआधी हात पाय धुवून मग प्रवेश करतात. ह्या मंदिरात एक परिक्रमा आहे पण इथे ध्वजस्तंभ नाही. मंदिरात प्रवेश केल्यावर एका मंडपामध्ये नंदी आणि बलीपीठ आहे आणि नंदी गाभाऱ्याकडे मुख करून आहे.
भगवान शिवांनी इथे तांडव नृत्य ज्याचे नाव कुडूकोट्टी असे आहे. ह्या स्थळाला करूइल्लाई असं नाव प्राप्त झालं कारण असा समज आहे कि जे इथे पूजा करतात त्यांना पुनर्जन्म नाही (तामिळ मध्ये करू म्हणजे गर्भ आणि इल्लाई म्हणजे नाही).
इथले स्वयंभू लिंग साधारण उंचीचे आहे पण खूप सुंदर आहे.
कोष्ठ मूर्ती: श्री नर्दन विनायक, श्री दक्षिणामूर्ती, श्री भैरव, श्री ब्रह्म, श्री अर्धनारीश्वरर आणि श्री दुर्गादेवी
श्री चंडिकेश्वरांचे देवालय त्यांच्या नेहमीच्या स्थानी आहे.
इथल्या शिवलिंगातुन शांती, स्थैर्य, अव्यक्त आनंद आणि मुक्ती उल्लसतात.
भगवान शिवांच्या देवालयाच्या उजव्या बाजूला श्री अंबिका देवींचे पूर्वाभिमुख देवालय आहे. ह्या देवालयामध्ये स्वतंत्र गाभारा, अर्धमंडप आणि गाभाऱ्यावर विमान आहे. श्री अंबिकादेवींची मूर्ती त्यांच्या नावानुसार अतिशय सुंदर आहे. ही मूर्ती साधारण साडेपांच फूट उंच आहे. ह्या मूर्तीमध्ये श्री अंबिका देवी उभ्या मुद्रेमध्ये आहेत आणि त्यांना चार हात आहेत. त्यांच्या दर्शनाने मनाला शांतता आणि मुक्ती मिळते. श्री अंबिका देवींच्या देवालयामध्ये श्री दुर्गादेवी सिंहवाहिनी रूपांत आहेत.
महामंडपामध्ये श्री शिवगामींसमवेत श्री नटराजांची मूर्ती आहे.
इथे श्री हनुमानांची मूर्ती आहे ज्याचे नाव संजीवनी अंजनेय असे आहे.
इथे स्वतंत्र नवग्रह देवालय नाही. मंदिराच्या आवारात पिंपळ आणि निंब वृक्षांच्या खाली श्री वलमपुरी विनायक आणि नागांच्या मूर्ती आहेत.
परिक्रमेमध्ये श्री ध्यान गणेश, श्री बालमुरूगन, श्री वल्ली आणि श्री दैवानै समवेत श्री सुब्रह्मण्य ह्यांची देवालये आहेत. तसेच परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती पण आहेत - शैव संत अप्पर, संबंधर आणि सुंदरर आणि दोन राजे.
प्रार्थना:
१. भाविक जनांचा असा समज आहे कि इथे पूजा केल्याने जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते.
२. भाविक जन इथे विवाहातील अडचणींचा परिहार होण्यासाठी आणि अपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना करतात.
३. भाविक जन इथे ज्ञान आणि शैक्षणिक प्रगतीसाठी प्रार्थना करतात.
पूजा:
परंपरेनुसार नियमित दैनंदिन पूजा, प्रदोष पूजा आणि नियमित साप्ताहिक पूजा.
मंदिरात साजरे होणारे महत्वाचे सण:
आडी (जुलै-ऑगस्ट): पुर्वा फाल्गुनी नक्षत्रावर पूजा तसेच दर शुक्रवारी विशेष पूजा
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै
थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकरसंक्रांति
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
प्रत्येक वर्षी कुंभाभिषेकाच्या वेळी संवत्सर अभिषेक आणि होम केला जातो. ह्यावेळी भगवान शिव, श्री पार्वती देवी आणि श्री गणेशांवर महाभिषेक केला जातो. आणि संध्याकाळी भगवान शिव आणि पार्वती देवींचा दिव्य विवाह सोहळा साजरा होतो. नवरात्री मध्ये सकाळ ते संध्याकाळ ललिता सहस्रनामाचे पारायण होते.
मंदिराच्या वेळा: सकाळी ७ ते दुपारी १२, दुपारी ४.३० ते रात्री ८
मंदिराचा पत्ता:
श्री सर्गुणेश्वरर मंदिर,
ऍट पोस्ट करुवेली कोट्टैडै (करुवेली),
पुंथोट्टम मार्गे,
तालुका: कूडवासल,
जिल्हा: थिरुवारुर,
तामिळ नाडू ६०९५०१
दूरध्वनी: ९१-९४२२९३२९४२, ०४३६६-२७३९००
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
No comments:
Post a Comment