हे मंदिर कारकथी पासून ५ किलोमीटर्स वर आहे. कारकथी गाव मयीलादुथुराई-कारैक्कल मार्गावर कुंभकोणमपासून २८ किलोमीटर्स वर आहे. पेरलम पासून मयीलादुथुराई-थिरुवारुर मार्गावर ९ किलोमीटर्स वर आहे. थिरुपांपूरं पासून १ किलोमीटर वर आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. ह्या मंदिराची स्तुती शैव संत संबंधर ह्यांनी गायली आहे. ह्या स्थळाचे ऐतिहासिक नाव सूक्ष्मपुरी / सिरूपुरी असे आहे. मूळ मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावे. चोळा राजांनी ह्या मंदिराचे दगडी बांधकाम केले आणि विजयनगर आणि मराठा राजांनी ह्या मंदिराचा विस्तार केला. इथल्या शिलालेखांमध्ये विविध राजांनी मंदिरासाठी दिलेल्या देणग्यांचा उल्लेख आहे. हे स्थळ पानन ह्यांचं जन्मस्थळ आहे. पानन हे किल्लीवनन राजाचे मित्र होते. ते त्यांच्या परोपकारी कार्यासाठी प्रसिद्ध होते. अरणनुरू आणि पुराणरुर ह्या संगम काळातल्या साहित्यामध्ये त्यांची स्तुती केली आहे. हे मंदिर चार पाडळ पेथ्र स्थळांच्या मध्यभागी आहे. ह्या मंदिराच्या पूर्वेला थिरुपांपूरं आहे, दक्षिणेला थिरुवीळीमाली आहे, पश्चिमेला अन्नीयुर आहे आणि उत्तरेला थिरुथेरूचेंदूर आहे.
मूलवर: श्री सूक्ष्मपुरीश्वरर, श्री मंगळनाथर, श्री चिरूगुडीश्वरर, श्री कल्याणसुंदरेश्वरर
देवी: श्री मंगळनायकी
पवित्र तीर्थ: मंगळ तीर्थ, सूर्य तीर्थ
पवित्र वृक्ष: बिल्व
क्षेत्र पुराण:
१. एकदा भगवान शिव आणि श्री पार्वती देवी द्यूत खेळत होते. जेव्हा श्री पार्वती देवी जिंकायच्या बेतात होत्या त्यावेळी भगवान शिव अकस्मात अदृश्य झाले. श्री पार्वती देवी चिंतीत झाल्या आणि भगवान शिवांना सर्व ठिकाणी शोधू लागल्या. त्यांना भगवान शिव कुठे सापडले नाहीत. शेवटी त्या एका स्थळी आल्या जे स्थळ बिल्व वृक्षांनी घनदाट भरले होते. त्यांनी मंगळ तीर्थ नावाचे तीर्थ निर्माण केले आणि तिथल्या मूठभर वाळूने एक शिवलिंग तयार केले. त्यांची भक्ती पाहून भगवान शिवांनी त्यांना दर्शन दिलं आणि ते परत त्यांना कैलासावर घेऊन गेले. श्री पार्वती देवींनी तयार केलेले लिंग हे मूठभर वाळूने तयार केले होते म्हणून ह्या लिंगाला सिरूपीडी (तामिळ मध्ये सिरू म्हणजे मूठभर) असं नाव प्राप्त झालं. कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन सिरूकुडी असं नाव झालं आणि अजून अपभ्रंश होऊन ते चिरूगुडी असं झालं. ह्या शिवलिंगावर अजूनही हाताची चिन्हे दिसतात. भगवान शिव अकस्मात प्रगट झाले म्हणून त्यांना श्री सूक्ष्मपुरीश्वरर असे संबोधले जाते. इथले पवित्र तीर्थ श्री पार्वती देवींनी निर्माण केले म्हणून ह्या तीर्थाला मंगळतीर्थ असे नाव प्राप्त झाले आणि श्री पार्वती देवींना श्री मंगळनायकी असे नाव प्राप्त झाले.
२. इथल्या स्थळपुराणानुसार कूनपांडियन नावाचा राजा मदुराईवर राज्य करत होता. तो काही जैन साधूंच्या शिकवणुकींना प्रभावित झाला. त्याची पत्नी मंगैयारक्करसियार हीने आपल्या पतीला परत शैव धर्मामध्ये आणण्यासाठी शैव संत संबंधर आणि अप्पर ह्यांच्याकडे मदतीची विनंती केली. संबंधरांनी ही विनंती मान्य केली आणि मदुराईला जाण्याचं ठरवलं. त्यावेळी संबंधर आणि अप्पर इथे राहत होते. अप्पर ह्यांना वाटलं की मदुराईला भेट देण्यासाठी वेळ योग्य नाही आणि म्हणून त्यांनी संबंधरांना मदुराईची भेट पुढे ढकलण्याचा सल्ला दिला. संबंधर त्यावेळी खूप तरुण होते. ते म्हणाले शिवभक्तांवर कुठल्याही ग्रहदशेचा परिणाम होत नाही. त्यांनी ग्रहदशेचे प्रतिकूल परिणाम होऊ नयेत म्हणून पडीगम (तामिळ मधले लिहिलेली पवित्र स्तोत्रे) गायलं आणि ते मदुराईकडे निघाले आणि तिथे सुरक्षित पोचले. त्यांनी जैन साधूंचा पराभव केला. आणि त्यांनी कूनपांडियन राजाला कुबडेपणातून पण बरे केले. आणि त्याला परत शैव धर्मामध्ये परत आणले. हि कथा इथे नवग्रह संनिधीमध्ये चित्रित केली आहे जिथे श्री विष्णू, श्री ब्रह्म आणि संबंधर ह्यांच्या मूर्ती आहेत.
३. मंगळ ग्रहाने इथे भगवान शिवांची उपासना करून शापापासून मुक्ती मिळविली.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री सूर्य, विश्वरीश, गंधर्व, श्री पार्वती देवी, अंगारक, गरुड, शैव संत अप्पर आणि संबंधर.
वैशिष्ट्ये:
१. श्री आलिंगनमूर्तींची मिरवणुकीसाठी जी मूर्ती आहे ती अतिशय सुंदर आहे.
२. इथले शिवलिंग वाळूचे आहे आणि त्याला कवच आहे.
३. नवग्रह संनिधीमध्ये श्री विनायक, श्री भैरव आणि शैव संत संबंधर ह्यांच्या मूर्ती आहेत. श्री शनीश्वरर आणि श्री सूर्य एकमेकांच्या जवळ आहेत.
४. शैव संत संबंधरांनी भगवान शिव आणि श्री पार्वती देवींच्या स्तुतीपर कोलारू पडीगम गायलं. ग्रहांच्या प्रतिकूल परिणामांपासून वाचण्यासाठी त्यांनी हे गायलं. ह्या पडीगमनुसार जे भाविक जन इथे भगवान शिवांची उपासना करतील ते मुक्ती पावतील आणि शिवलोकामध्ये वास्तव्य करतील.
५. हे अंगारक दोषांचे परिहार स्थळ आहे.
मंदिराबद्दल माहिती:
मुख्य मंदिरामध्ये गाभारा, अंतराळ, अर्धमंडप आणि महामंडप आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून ह्याला तीन स्तरांचं राजगोपुर आहे आणि एक परिक्रमा आहे. हे मंदिर भिंतींनी पूर्ण आच्छादलेले आहे. इथे ध्वजस्तंभ नाही. राजगोपुराच्या पुढे बलीपीठ आणि नंदी आहेत जे गाभाऱ्याकडे मुख करून आहेत. शिवलिंग वाळूचे बनलेले आहे आणि स्वयंभू आहे. ह्या लिंगावर हाताची चिन्हे आहेत. असा समज आहे की ही चिन्हे श्री पार्वती देवींची आहेत. इथले शिवलिंग सतत कवचाने आच्छादलेले असते. ह्या शिवलिंगावर अभिषेक होत नाही.अभिषेक अवूदयारवर होतो (पीठ ज्यावर शिवलिंग स्थापिलेले आहे). शिवलिंगाला कधी कधी सिवेट लावले जाते. गाभाऱ्यावरचे विमान तीन स्तरांचे आहे.
कोष्ट मूर्ती: श्री विनायक, श्री दक्षिणामूर्ती, श्री महाविष्णू, श्री ब्रह्म, श्री अर्धनारीश्वरर. श्री चंडिकेश्वरांचे देवालय नेहमीच्या स्थानी आहे.
गाभाऱ्याच्या डावीकडे मुख मंडपामध्ये श्री अंबिका देवींचे पूर्वाभिमुख देवालय आहे. त्या उभ्या मुद्रेमध्ये आहेत आणि त्याचे हात अभय आणि वरद मुद्रेमध्ये आहेत. शिवलिंगाच्या ऐवजी श्री पार्वती देवींवर अभिषेक केला जातो. श्री संतोषआलिंगन मूर्ती ही उत्सव मूर्ती आहे. ह्या मूर्तीमध्ये आनंदी मनःस्थितीमध्ये भगवान शिव श्री पार्वती देवींना आलिंगन देत आहेत.
इतर देवालये:
मुख मंडपामध्ये नवग्रह संनिधी ज्यामध्ये शैव संत संबंधर, श्री नर्दन विनायक आणि श्री भैरव ह्यांच्या मूर्ती आहेत. श्री अंगारक (मंगळ), श्री मंगळ विनायक, श्री वल्ली आणि श्री दैवानै समवेत श्री सुब्रह्मण्य, श्री सूर्य आणि श्री शनीश्वरर ह्यांची स्वतंत्र देवालये आहेत.
प्रार्थना:
१. हे अंगारक दोषांसाठी परिहार स्थळ आहे. जे मंगळ ग्रहाच्या प्रतिकूल परिणामांमधून जात असतील त्यांनी इथे उपासना केल्यास त्यांना ह्या परिणामांतून मुक्ती मिळते.
२. भाविक जन इथे विवाहातल्या अडचणी तसेच इतर रोगांपासून मुक्ती मिळविण्यासाठी पूजा करतात. तसेच इथे दांपत्याचे पुनर्मीलन व्हावं म्हणून पण इथे भाविक जन पूजा करतात.
३. असा समज आहे कि मासी ह्या तामिळ महिन्याच्या मंगळवारी इथे मंगळ ग्रहाची पूजा केल्यास विभक्त दाम्पत्याचे पुनर्मीलन होते आणि विवाहातल्या अडचणी पण दुर होतात. त्यावेळी पवित्र तीर्थातील पाणी आणि बिल्व पत्रांनी विशेष पूजा केली जाते.
४. मंगळवारी इथे श्री मंगळांबिकांची पूजा करणे अतिशुभ मानलं जातं.
पूजा:
नियमित दैनंदिन पूजा तसेच प्रदोष पूजा केल्या जातात.
मंदिरात साजरे होणारे सण:
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी
कार्थिगई (नोव्हेबंर-डिसेंबर): थिरुकार्थिगई
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री, मासीमाघम
मंदिराच्या वेळा: सकाळी ६.३० ते ११.३०, दुपारी ४.३० ते संध्याकाळी ७.३०
मंदिराचा पत्ता:
श्री सूक्ष्मपुरीश्वरर मंदिर
पुंथोट्टम मार्गे,
तालुका कूडवासल,
जिल्हा थिरुवारुर,
तामिळनाडू ६०९५०३
दूरध्वनी: +९१-४३६६२९१६४६
पुरोहिताचा संपर्क: श्री मुथूसुब्रह्मण्य गुरुकल +९१-९५८५१६०६६०
No comments:
Post a Comment