हे मंदिर सेम्बरनार कोविल पासून १२ किलोमीटर्स वर तर मयीलादुथुराई-पुम्पूहार मार्गावर पुम्पूहार पासून ६ किलोमीटर्सवर आहे. हे २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी हे एक स्थळ आहे आणि कावेरी नदीच्या दक्षिण काठावर वसले आहे. ह्या मंदिराची स्तुती मूवर म्हणजेच तीन ज्येष्ठ नायनमार (संबंधर, अप्पर आणि सुंदरर) ह्यांनी केली आहे. हे माड शैलीचे मंदिर कोचेंगट चोळा राजाने बांधले. मूळ मंदिर २००० वर्षे जूनं असून द्रविड साम्रज्याच्या आभूषिथु ह्या राजाने बांधले. चोळा राजांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि विजयनगर साम्राज्याच्या राजांनी ह्या मंदिराचा विस्तार केला. ह्या स्थळाला पेरीपल्लम थिरुवलम्पुरम असे पण नाव आहे.
मूलवर: श्री वलम्पुरीनाथर, श्री थालवलनाथर, श्री वन्निनीलनाथर, श्री कैलासनाथर, श्री काशी विश्वनाथर, श्री मुक्तीश्वरर
देवी: श्री स्वर्णपद्मअंबिका, श्री ज्ञानसुंदरी, श्री शंकरी, श्री वधूवाहिर कन्नीअम्माई
उत्सव मूर्ती: चंद्रशेखर, देवीच्या उत्सव मूर्तीचे नाव पद्मनायकी असे आहे.
पवित्र तीर्थ: ब्रह्म तीर्थ, लक्ष्मी तीर्थ, स्वर्णपंकज तीर्थ
क्षेत्र वृक्ष: नर पालम् वृक्ष (तामिळ मध्ये पनै)
पूजा / आगम: शिव आगम
पुराणिक नाव: थाळवनम, मूंगील (बांबू), थोप्पू (वन किंवा उद्यान), संगमथेनथुराई, संगेंथीवनगिरी, मालमाकुडी, लक्ष्मीनारायणपुरम
क्षेत्र पुराण:
१. मूळ मंदिर द्रविड साम्राज्याच्या अभिषिथु ह्या राजाने बांधले. ह्या कर्माच्या प्रभावाने त्याला अपत्य प्राप्ती झाली.
२. स्थळ पुराणानुसार श्री महाविष्णूंनी इथे त्यांना दक्षिणावर्ती शंखाची (उजव्या हाताच्या शंखाची) प्राप्ती व्हावी म्हणून भगवान शिवांची पूजा केली. ह्यासाठी त्यांनी श्री पार्वती देवींना सहाय्य करण्यासाठी म्हणून श्री महालक्ष्मींना इथे आणलं. भगवान शिव श्री महाविष्णूंच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी श्री महाविष्णूंना गदा आणि चक्र प्रदान केले. जेव्हां ते श्री महालक्ष्मींना नेण्यासाठी आले त्यावेळी श्री पार्वती देवींनी त्यांना शंख आणि कमळ प्रदान केले. म्हणून ह्या स्थळाला वलम्पुरम असे नाव प्राप्त झाले.
३. पुराणानुसार एकदा शिवरात्रीच्या दिवशी श्री आदिशेष पाताळ लोकामधून भगवान शिवांची पूजा करण्यासाठी थिरुवलम्चुळी इथे आले. ते जिथून पाताळ लोकांतून बाहेर आले तेथे भिलंद्वार नावाचे छिद्र तयार झाले. इथे वाहणारी कावेरी नदी ह्या छिद्रातून पाताळ लोकाकडे वाहायला चालू झाली. ह्यामुळे ह्या गावात पाण्याची कमतरता भासून शेतजमीन नापीक व्हायला लागली. इथला राजा हरीध्वज चिंतीत झाला. तो कट्टर शिवभक्त असल्याकारणाने त्याने हि समस्या दूर करण्यासाठी भगवान शिवांची प्रार्थना केली. त्यावेळी आकाशवाणी झाली कि राजा किंवा एखाद्या ऋषींनी त्या छिद्रामध्ये शिरून आपल्या जीवाचा त्याग केला तर कावेरी नदीला परत जमिनीवर आणता येईल आणि ते छिद्र पण बुजेल. हेरंड ऋषींनी हि आकाशवाणी सगळ्यांना सांगितली. राजाने लोककल्याणासाठी आपल्या जीवाचा त्याग करून त्या छिद्रामध्ये शिरण्याचे ठरवले. त्यावेळी हेरंड ऋषींनी राजाला थांबवले आणि ते स्वतः त्या छिद्रामध्ये शिरले. त्या क्षणीच कावेरी नदी जमिनीवर आली आणि नेहमीप्रमाणे जमिनीवर वाहायला लागली. ऋषींनी तपश्चर्या केली आणि ते छिद्रामुळे निर्माण झालेल्या बोगद्यातून वाहत जाऊन इथे बाहेर पडले. म्हणून ह्या स्थळाला थिरुवलम्पूरम (तामिळ मध्ये वलम् म्हणजे उजवी बाजू, कावेरी नदीच्या उजव्या बाजूचे म्हणून थिरुवलम्पूरम) असे नाव प्राप्त झाले. हेरंड ऋषींनी इथे काही काळ तपश्चर्या केली आणि त्यांना मुक्ती प्राप्त झाली. ह्या मंदिराच्या पुढ्यात एक देवालय आहे जिथे त्यांना जीवसमाधी प्राप्त झाली. ह्या देवालयामध्ये हेरंड ऋषींनी पुजीलेलं शिव लिंग आहे. ज्या स्थळी ते छिद्रातून बाहेर आले त्या स्थळाला मेलकावेरी असे संबोधले जाते.
४. मगध देशाचा राजा धंनजय ह्याने आपलं शरीर जाळल्यावर राहिलेलं भस्म आपल्या पुत्राला अशा पवित्र तीर्थामध्ये अर्पण करायला सांगितले जिथे ते भस्म पुष्पांमध्ये परिवर्तित होईल. त्याचा पुत्र दक्षिणा आणि त्याची पत्नी ह्यांनी पवित्र तीर्थाच्या शोधात बऱ्याच शिव मंदिरांना भेट दिली. जेव्हा ते इथे आले तेव्हा ते भस्म पुष्पांमध्ये परिवर्तित झाले. तेव्हा त्याने ती पुष्पे येथील तीर्थामध्ये अर्पण केली आणि नंतर भगवान शिवांची पूजा केली. इथे परिक्रमेमध्ये दक्षिणा आणि त्याची पत्नी ह्यांची मूर्ती आहे. पुराणानुसार हे स्थळ काशीच्या तुल्यबळ मानलं जातं.
५. दक्ष राजा आणि त्यांची पत्नी ह्यांनी इथे श्री पार्वती देवी आपल्याला पुत्रीच्या रूपात प्राप्त व्हावी ह्यासाठी तपश्चर्या केली. असा समज आहे कि श्री पार्वती देवी ह्यांचा जन्म मघा नक्षत्रावर झाला आणि त्यांचे दाक्षायणी असे नामकरण करण्यात आले.
६. स्थळ पुराणानुसार एकदा काशी राजाला आपल्या पत्नीच्या आपल्याप्रती किती निष्ठा आहे ह्याची परीक्षा घ्यायची इच्छा झाली. एकदा शिकारीच्या मोहिमेवर असताना त्याने आपल्या एका मंत्र्याला “राजाचा वाघाच्या हल्ल्याने मृत्यू झाला” अशी खोटी बातमी आपल्या पत्नीस कळविण्याची आज्ञा केली. मंत्र्याने त्यांच्या आज्ञेवरून तसे केल्यानंतर राणीला दुःख सहन झाले नाही आणि त्या शोकाच्या आवेगामध्ये मध्ये तिचा मृत्यू झाला. ह्यामुळे राजाला ब्रह्महत्येचा दोष प्राप्त झाला. राजाने विविध ऋषीमुनी आणि ज्ञानी लोकांना ह्या ब्रह्महत्येपासून मुक्त होण्यासाठी मार्ग विचारला. त्यातून राजाला दरदिवशी १००० ब्राह्मणांना अन्नदान करण्याचा सल्ला मिळाला. त्याचबरोबर त्याला असा पण सल्ला मिळाला कि त्याने एक घंटा बांधावी आणि जेव्हा एखादा ऋषीमुनी किंवा संत अन्नदान स्वीकारेल त्यावेळी हि घंटा वाजेल असे सांगितले. राजाने अन्नदान करण्यासाठी एक धर्मशाळा बांधली. एके दिवशी शैव संत पट्टिनाथर हे अन्नदान स्वीकारण्यासाठी आले. पण त्यांचा पेहेराव बघून राजाच्या सेवकांनी त्यांना ब्राह्मण म्हणून स्वीकारलं नाही आणि म्हणून त्यांना अन्नदान स्वीकारण्यास परवानगी दिली नाही. पट्टिनाथर ह्यांनी अन्न मिळाले नाही म्हणून भातातून उरलेलं पाणी म्हणजेच पेज प्यायली. आणि त्याचवेळी घंटा वाजली. अजून अन्नदान चालू पण झाले नव्हते. घंटेचा नाद ऐकून राजा त्वरित तेथे पोचला आणि त्यांने हसतमुख पट्टिनाथर ह्यांना बघितले आणि राजाने त्यांच्याकडे क्षमायाचना केली. असा समज आहे कि त्याच क्षणी राजाची ब्रह्महत्या दोषातून मुक्तता झाली. ह्या घटनेच्या स्मृतीप्रीत्यर्थ अजूनही इथे एक उत्सव साजरा केला जातो.
७. स्थळ पुराणानुसार तीर्थ यात्रेवर निघालेले शैव संत अप्पर आणि संबंधर ह्यांना भगवान शिवांनी इथे दर्शन दिले.
८. पुराणानुसार सूर्यदेवांना कैलासावर असलेल्या भगवान शिवांचे इथून दर्शन झाले.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री मुरुगन, श्री महाविष्णू, श्री ब्रह्मदेव, श्री इंद्रदेव, एकादश रुद्र, देव, श्री सरस्वती देवी, श्री लक्ष्मी देवी, श्री सूर्य, श्री चंद्र, थाळवन ऋषी, वासुकी, श्री वरुण, कावेरी नदी, स्वर्गीय गाय कामधेनू आणि श्री इंद्राचे वाहन ऐरावत.
वैशिष्ट्ये:
१. इथले शिव लिंग वाळूचे असल्याकारणाने ते सदा आच्छादित असते.
२. भिक्षाटनर ह्यांची मूर्ती खूप सुंदर आहे.
३. हे मंदिर माड शैलीचे आहे.
४. शैव संत अप्पर ह्यांना स्वतः भगवान शिवांनी बोलावून घेतले आणि त्यांना दर्शन दिले.
५. इथे शिव लिंगावर उथळ छिद्र आहे.
६. कालांतराने चोळा साम्राज्याच्या विक्रम आणि राजराजचोळा II ह्या राजांनी पुढील मूर्ती प्रतिष्ठित केल्या - श्री शिवगामी समवेत श्री नटराज, नाचियार, तंदनगन्नी नाचियार. त्याचबरोबर त्यांनी पळ्ळीयारै (शयनगृह) पण बांधले.
७. इथे किराट ह्यांची कांस्याची मूर्ती आहे जी खूप सुंदर आहे.
मंदिराबद्दल माहिती:
हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. ह्या मंदिराला राजगोपुर नाही आणि दोन परिक्रमा आहेत. गाभाऱ्यामधे गाभारा, अंतराळ आणि मंडप आहे. गाभाऱ्यावर दोन स्तरांचं विमान (शिखर) आहे. गाभारा खंदकाच्या आकाराचा आहे. मंदिराचे तीर्थ मंदिराच्या पुढ्यात आहे. ह्या तीर्थाच्या काठाशी श्री विनायकांचे देवालय आहे. ह्या देवालयाच्या बाजूला हेरंड महर्षींचे (अत्री ऋषी) देवालय आहे. नंदि आणि बलीपीठ हे गाभाऱ्याकडे मुख करून आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशाला ऋषभावर आरूढ असलेले भगवान शिव आणि श्री पार्वती देवी आणि त्यांच्या बाजूला श्री विनायक आणि श्री मुरुगन अशी स्टुक्कोची चित्रे आहेत. शिव लिंग स्वयंभू आहे. त्याचे नाव पृथ्वी लिंग असे आहे. हे लिंग वाळूचे बनवलेले आहे आणि ते कवचाने आच्छादित आहे. अभिषेक कवचावर केला जातो. ह्या लिंगाच्या वरच्या भागावर दोन छिद्रे आहेत. म्हणून ह्या स्थळाला मेलपुरीपल्लम असे नाव आहे. काही काळाने ह्या लिंगावर सुगंधी अत्तर आणि पुनुगू (सिवेट) चोळले जाते.
कोष्ट मूर्ती: श्री विनायक, श्री दक्षिणामूर्ती, श्री महाविष्णू, श्री ब्रह्म आणि श्री दुर्गा देवी.
श्री चंडिकेश्वरर ह्यांची मूर्ती त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी आहे.
परिक्रमेमधे पुढील देवालये आणि मूर्ती आहेत - श्री विनायक, श्री सुब्रह्मण्य त्यांच्या पत्नींसमवेत, श्री नटराज, श्री सोमस्कंदर, श्री भिक्षाटनर, शैव संत नालवर, नागांच्या मूर्ती, श्री विश्वनाथ, लक्ष्मणाने पुजीलेलं शिव लिंग, रामाने पुजीलेलं शिव लिंग, श्री रामनाथर, श्री गजलक्ष्मी, सप्त मातृका, श्री सूर्य, श्री काळभैरव आणि श्री शनीश्वरर.
इथे दक्ष राजा आणि त्यांच्या पत्नी ह्यांची मूर्ती आहे. येथील श्री विनायकांना श्री वलम्पुरी विनायक, श्री सेल्व विनायक, श्री वेल्लै (श्वेत) विनायक अशी नावे आहेत.
श्री भिक्षाटनर ह्यांची मूर्ती खूप सुंदर आहे. असा समज आहे कि हि मूर्ती मंदिराच्या तीर्थामधे सापडली. ह्या मूर्तीला श्री वट्टनैनाथर आणि अर्धनारीश्वरर भिक्षाटनर अशी नावे आहेत. ते वीणा वाजवीत आहेत असे चित्रित केले आहे.
प्रार्थना:
१. भाविक जन इथे त्वचा रोग, स्त्री-दोष, ग्रहांचे प्रतिकूल परिणाम, सर्पदोष आणि विवाहातल्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रार्थना करतात.
२. भाविकांचा असा समज आहे इथे भगवान शिवांची उपासना केल्याने जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती प्राप्त होते.
३. भाविक जन इथे अपत्य प्राप्तीसाठी प्रार्थना करतात.
४. ज्या पुरुषांच्या कुंडलीमध्ये राहू आणि शुक्र ह्यांचे प्रतिकूल परिणाम दर्शवले असतील आणि ज्या स्त्रियांच्या कुंडलीमधे केतू आणि शुक्र ह्यांचे प्रतिकूल परिणाम दर्शविले असतील असे स्त्री-पुरुष इथे पूजा करतात. असा समज आहे कि इथे २४ वेळा पूजा केल्यावर ह्या दोषांपासून मुक्ती प्राप्त होते. असा पण समज आहे की ज्यांची राहू दशा किंवा शुक्र दशा चालू आहे त्यांनी एकदा तरी ह्या स्थळाला भेट देऊन दर्शन घ्यावे.
पूजा:
नियमित पूजा, प्रदोष पूजा, थै आणि आडी ह्या तामिळ महिन्यांमध्ये विशेष पूजा आणि महालय पक्षामध्ये अमावास्येला इथे विशेष पूजा केल्या जातात.
मंदिरात साजरे होणारे महत्वाचे सण:
प्रदोष दिवशी पट्टिनाथर उत्सव
आडी (जुलै-ऑगस्ट): पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर उत्सव
अवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): गणेश चतुर्थी
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): स्कंदषष्ठी, अन्नाभिषेक
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई, कार्थिगई दीपम, प्रत्येक सोमवारी विशेष पूजा
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै
थै (जानेवारी-फेब्रुवारी): भरणी नक्षत्र दिवशी भिक्षाटनर उत्सव
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
पंगूनी (मार्च-एप्रिल): उत्तर फाल्गुनी नक्षत्रावर उत्सव
मंदिराच्या वेळा: सकाळी ८ ते दुपारी १२, संध्याकाळी ६ ते ८
मंदिराचा पत्ता:
श्री वलम्पुरीनाथर मंदिर
मेलपुरमपल्लम (थिरुवलम्पुरम)
ऍट पोस्ट मेलयूर
तालुका: थरंगंपडी
तामिळ नाडू ६०९१०७
दूरध्वनी: +९१-४३६४२००८९०, +९१-४३६४२००६८५
पुरोहिताचा संपर्क:
श्री ज्ञानस्कंध गुरुक्कल: +९१-८११०८०५०५९
श्री पट्टू गुरुक्कल: +९१-९४४२८६०६०५
No comments:
Post a Comment