Sunday, July 13, 2025

कुंभकोणम येथील श्री आदि कुंभेश्वरर मंदिर

हे मंदिर श्री कुंभेश्वरर स्वामी मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. कुंभकोणमच्या मध्यवर्ती भागामध्ये पोर्ट्रमरै कुलम (गोल्डन लोटस पॉंड) च्या जवळ हे मंदिर वसलं आहे. अपूर्ण गोपुर (मोट्टै) हि ह्या मंदिराची महत्वाची खूण आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. शैव संत संबंधर, अप्पर आणि वल्लळर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. शैव संत अरुणागिरिनाथर ह्यांनी येथील भगवान शिवांची स्तुती गेली आहे. म्हणून हे मंदिर सातव्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. पल्लव राजांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला असावा असा समज आहे. सध्याचे दगडी बांधकाम चोळा राजांनी नवव्या शतकामध्ये बांधलं आहे. पुढे ह्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि विस्तार चोळा आणि विजयनगर साम्राज्याच्या राजांनी केला आहे. चोळा साम्राज्याच्या काळाचे शिलालेख इथे उपलब्ध नाहीत. नागेश्वरर मंदिरातल्या शिलालेखांमध्ये विजयनगर आणि नायक राजांनी मंदिरासाठी दिलेल्या देणग्यांचा उल्लेख आहे. महामागम उत्सवाशी निगडित असलेल्या १२ मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. तसेच हे कुंभकोणम प्रदेशातील सप्त स्थानांमधीलपण एक मंदिर आहे.

मूलवर: श्री कुंभेश्वरर, श्री अमृतेश्वरर, श्री कुळजर
देवी: श्री मंगलांबीगाई, श्री मंत्रपीठेश्वरी
पवित्र तीर्थ: महामागम तलाव, पोर्ट्रमरै कुलम (विहीर) आणि १२ इतर तीर्थे, कावेरी नदी.
क्षेत्र वृक्ष: शमी (तामिळ मध्ये वन्नी)

क्षेत्र पुराण:

१. एकदा प्रलयाच्या आधी ब्रह्मदेवांना “जर सृष्टीनिर्मितीची सर्व बीजे नाश पावली तर परत सृष्टीनिर्मिती कशी करायची” हा प्रश्न पडला. ह्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर मिळविण्यासाठी त्यांनी सृष्टिसंहारक भगवान शिवांकडे धाव घेतली. भगवान शिवांनी त्यांना सृष्टीनिर्मितीची बीजे कशी जपायची आणि प्रलयानंतर परत सृष्टीनिर्मिती कशी करायची ह्याबद्दल ज्ञान प्रदान केलं. त्यांनी ब्रह्मदेवांना अमृत आणि माती ह्यांचं मिश्रण करून त्यापासून एक कलश निर्मायला सांगितलं. आणि त्यामध्ये अमृत आणि सृष्टीनिर्मितीला आवश्यक सर्व बीजे कलशामध्ये पेरायला सांगितली. त्या कलशाच्या चारी बाजूंना वेद, पुराणे, आगमशास्त्रे पसरायला सांगितली. त्या कलशाच्या तोंडाशी पांच आंब्याची पाने ठेवून त्या वरती नारळ ठेवण्यास सांगितले जेणेकरून त्याला कलशाचा आकार येईल. तसेच तो कलश बंद करण्याआधी त्या कलशाला एक यज्ञोपवीत (जानवे) गुंडाळण्यास सांगितले. त्या तयार झालेल्या कलशाला भगवान शिवांनी मेरुपर्वताच्या शिखरावर जेथे ब्रह्मदेवांचे वसतिस्थान आहे तिथे ठेवावयास सांगितले आणि त्याला दर्भाच्या दोरीने छतास टांगावयास सांगितले. त्यानंतर त्यांनी त्या कलशाची बिल्वपत्र आणि फुलांनीं पूजा करण्यास सांगितले. आणि त्या कलशावर अमृताचा शिडकाव करून पवित्र करण्यास सांगितले. भगवान शिव म्हणाले कि प्रलयाच्या वेळेस हा कलश वाहत जाऊन एका स्थळी थांबेल. आणि मग भगवान शिव स्वतः किरटमूर्तींच्या (शिकारी) रूपात येऊन तो कलश फोडतील जेणेकरून ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती परत चालू करू शकतील.

ब्रह्मदेवांनी भगवान शिवांच्या सर्व सूचनांची अचूक अंमलबजावणी केली. पुढे जेव्हा प्रलय आला त्यावेळी निसर्गाच्या कोपाची पराकाष्ठा झाल्याने सगळीकडे अंदाधुंदी माजली. मेरू पर्वत पण प्रलयामध्ये बुडून गेला. तो कलश वाहत वाहत दक्षिणेकडे जाऊ लागला आणि एका स्थळी जाऊन थांबला. जसजसं प्रलयाचे पाणी ओसरायला लागले तसतसं कलशाच्या भोवतीचे दर्भ, जानवे हे कलशापासून अलग झाले. ज्या ठिकाणी आंब्याची पाने पडली त्या ठिकाणी शमीचे वृक्ष उगवले आणि कलशाला बांधलेल्या दर्भाचे शिवलिंगात रूपांतर झाले. त्या ठिकाणी एक बिल्व वृक्ष होते आणि तिथे सात देवी अवतरल्या आणि त्या स्थळाच्या रक्षणकर्त्या बनल्या. दर्भाचे जे शिव लिंग बनले त्याचे नाव दर्भ लिंग पडले. हे सगळं समुद्राच्या पश्चिमेस घडलं. त्यानंतर कलश वायव्य दिशेला सरकायला सुरुवात झाली आणि पुढे जाऊन तो थांबला. त्या क्षणी आकाशवाणी झाली ज्यामध्ये सांगितलं गेलं कि हा कलश आता ह्या ठिकाणी स्थिर होईल आणि हे स्थळ सर्व स्थळांमध्ये पवित्र स्थळ मानलं जाईल. ह्या ठिकाणी कलश म्हणजेच कुंभ स्थित झाला म्हणून ह्या स्थळाला कुंभकोणम असे नाव पडले.

श्री आदिकुंभेश्वरर मंदिर: ह्या ठिकाणी कलश प्रथम थांबला. असा समज आहे कि भगवान शिवांनी स्वतः अमृत आणि माती मिसळून इथे शिवलिंग बनवलं. त्यांनी इथे शिव लिंगाची पूजा केली. ह्या शिवलिंगाचा आकार कलशाच्या गळ्यासारखा आहे.   

२. ह्या ठिकाणी भगवान शिवांनी आपल्या शरीराचा अर्धा भाग श्री पार्वती देवींना दिला तसेच त्यांनी ३६ कोटी मंत्रशक्ती पण अर्पण केल्या. श्री पार्वती देवींनी पण आपल्या ३६ कोटी मंत्रशक्ती भगवान शिवांना अर्पण केल्या. म्हणून श्री पार्वती देवींना इथे श्री मंत्रपीठेश्वरी असं नाव आहे. हे स्थळ शक्तीपीठ समजलं जातं.

३. पुराणांमध्ये असा उल्लेख आहे कि श्री विनायकर इथे भगवान शिव आणि श्री पार्वती देवींच्याही आधी इथे आले. म्हणून इथे श्री विनायकांना श्री आदिविनायकर असे नाव आहे.

४. स्थळपुराणानुसार ह्या ठिकाणी श्री मुरुगन ह्यांना सुरपद्मन राक्षसाबरोबरच्या युद्धाला निघण्याआधी श्री मंत्रपीठेश्वरी ह्यांच्याकडून मंत्रोपदेश मिळाला. 

५. भगवान महाविष्णूंनी इथे भगवान शिवांची पूजा केली आणि त्यांना चक्र प्राप्त झालं म्हणून भगवान महाविष्णूंना इथे चक्रपाणी म्हणलं जातं. 

६. भगवान विष्णूंना इथे भगवान शिवांची पूजा करून धनुष्य (शारंग) प्राप्त झालं म्हणून इथे भगवान विष्णूंना इथे शारंगपाणी म्हणलं जातं.

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

श्री ब्रह्मदेव, भगवान महाविष्णू, भगवान विष्णू, श्री मुरुगन, श्री इंद्रदेव, कामधेनू, कश्यप ऋषी, हेम ऋषी, मूर्खनायनार, नव-कन्निका (नऊ पवित्र नद्या - गंगा, यमुना, नर्मदा, सरस्वती, कावेरी, गोदावरी, कृष्ण, तुंगभद्रा आणि शरयू).

वैशिष्ट्ये:

१. महामागम उत्सवात भाग घेणाऱ्या मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे.

२. किराटमूर्तींचे इथे स्वतंत्र देवालय आहे.

३. इथले शिवलिंग मातीचे बनले आहे आणि ते सुवर्णकवचाने आच्छादलेले आहे. अभिषेक फक्त शिवलिंगाच्या पायथ्याशीच (अवूदयार) केला जातो. सिवेटचा (तामिळ मध्ये पुन्नुगु) लेप लावला जातो. 

४. इथले शिवलिंग खूप मोठे आहे आणि म्हणून ह्या शिवलिंगाला महालिंगम असे म्हणाले जाते.

५. इथली श्री मुरुगन ह्यांची मूर्ती अद्वितीय आहे. त्यांना सहा मुखे आहेत आणि सहा हात आहेत. ते त्यांच्या मोर ह्या वाहनावर त्यांच्या पत्नींसमवेत बसले आहेत. 

६. हे स्थळ काशीपेक्षाही पवित्र मानलं जातं. 

७. इथले राजगोपुर अपूर्णावस्थेत आहे. म्हणून त्याला मोट्टैगोपुर असं म्हणतात.

८. सोळा स्तंभांच्या मंडपामध्ये, ज्याचे नाव नवरात्री मंडप असे आहे, एका दगडामध्ये २७ नक्षत्रे आणि १२ राशी कोरलेल्या आहेत. 

९. इथे नादस्वरम नावाचे दगडापासून बनवलेले संगीत वाद्य आहे.

१०. हे ५१ शक्तिपीठांमधलं पहिलं शक्तीपीठ मानलं जातं. 

११. नवकन्निका ज्या महामागम तलावात स्नान करतात त्या पोर्ट्रमरै कुलम (गोल्डन लोटस पॉंड) मध्ये पण स्नान करतात.

१२. महामागम तलावामध्ये २० छोटे तलाव आणि तीर्थे आहेत असा समज आहे.

१३. परिक्रमा अशा पद्धतीने रचलेली आहे कि जेव्हा ह्या परिक्रमेमध्ये प्रदक्षिणा घातली जाते ती भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्या दोघांना एकत्र घातली जाते. हि रचना गणेश पुराणामधल्या श्री गणेशांची भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांच्या भोवती घातलल्या प्रदक्षिणेशी संलग्न आहे. 

मंदिराबद्दल माहिती:

गाभाऱ्यामध्ये गाभारा, अंतराळ आणि अर्थमंडप आहेत. हे पूर्वाभिमुख मंदिर आहे. इथले मुख्य राजगोपुर नऊ स्तरांचे आहे आणि १२८ फूट उंच आहे. ह्या मंदिरामध्ये तीन प्रकार (परिक्रमा) आहेत.

जसे आपण मंदिरात प्रवेश करतो तसे आपल्याला बलीपीठ, ध्वज स्तंभ आणि नंदि ह्यांचे दर्शन होते. नंदिंची मूर्ती खूप भव्य आणि सुंदर आहे. पहिल्या परिक्रमेमध्ये ६३ नायनमार, सप्त मातृका, कामधेनू ह्यांच्या मूर्ती तसेच भव लिंग, सर्व लिंग, ईशान लिंग, पशुपती लिंग, रुद्र लिंग, उग्र लिंग, भीम लिंग आणि महा लिंग आहेत.

इथले शिवलिंग स्वयंभू आहे. शिवलिंग मातीचे असल्याकारणाने त्यावर अभिषेक होत नाही. शिवलिंगाच्या पायथ्याशीच फक्त अभिषेक केला जातो. शिवलिंगावर वेळोवेळी सिवेटचा (तामिळ मध्ये पुन्नुगु) लेप लावला जातो. शिव लिंग भव्य असल्याकारणाने त्याला महालिंगम असं म्हणतात आणि ते थोडं एका बाजूला वाकलं आहे. नवरात्री मंडपामध्ये सिंहाचे एक अद्वितीय शिल्प आहे.

असा समज आहे कि इथले शिव लिंग प्रत्यक्ष भगवान शिवांनी प्रलयानंतर म्हणजेच नवीन युगाच्या आरंभी तयार केले आहे. त्यांनी हे शिवलिंग अमृत, माती आणि कलशाचे तुटलेले भाग हे मिसळून तयार केले आहे. हे शिव लिंग कलशाच्या आकाराचे आहे म्हणजेच पायथ्याशी रुंद तर जसजसे वरती जातो तसतसे निमुळते होत जाते.

हे पीठ विष्णू शक्ती पीठ म्हणून पण प्रसिद्ध आहे. 

भगवान शिवांनी सृष्टिनिर्मितीच्या बीजांची ती कुंभामध्ये ठेऊन त्यांचं रक्षण केलं म्हणून त्यांना इथे श्री कुंभेश्वरर असं नाव आहे.

इतर देवता आणि देवालये:

कोष्ठ मूर्ती: श्री विनायकर, श्री दक्षिणामूर्ती, श्री ब्रह्मदेव, भगवान विष्णू. 

श्री चंडिकेश्वरर ह्यांची मूर्ती त्यांच्या नेहमीच्या स्थानी आहे. ह्याच परिक्रमेमध्ये आपल्याला पुढील मूर्ती बघावयास मिळतात - श्री विनायकर, श्री मुरुगन, श्री गजलक्ष्मी देवी, श्री नटराज, श्री सोमस्कंदर, श्री किरटमूर्ती, नालवर, श्री वीरभद्र, श्री काशीविश्वनाथ आणि श्री विशालाक्षी देवी, श्री सरस्वती देवी आणि श्री ज्येष्ठादेवी. 

ह्या परिक्रमेमध्ये श्री वलमचुळीविनायकर म्हणजेच श्री गणेशांची मूर्ती बघावयास मिळते. ह्या मूर्तीमध्ये श्री गणेशांची सोंड उजव्याबाजूला वळली आहे. तसेच श्री भिक्षाटनर, श्री अन्नपूर्णी देवी, श्री महालक्ष्मी देवी ह्यांच्या मूर्ती आणि अक्षय लिंग, सहस्र लिंग हे पण पाहावयास मिळतात. दुसऱ्या परिक्रमेमध्ये श्री पार्वती देवींची मूर्ती आहे. तसेच शयनगृह पण आहे. दुसऱ्या परिक्रमेमध्ये ह्या शिवाय पुढील मूर्ती आहेत - श्री सट्टैनाथर, श्री चंद्र, श्री सूर्य, श्री वल्लभगणेश, श्री लक्ष्मीनारायण, श्री वन्नीविनायकर, श्री कुंभमुनिसिद्ध, श्री अष्टभुजा दुर्गा, श्री नवनीतविनायकर, श्री काळभैरव, श्री ज्वरहरेश्वरर, श्री शास्ता, श्री महानगोविंददीक्षितर आणि श्री नागांबळ.

श्री अंबिका देवींचे स्वतंत्र दक्षिणाभिमुखी देवालय आहे. त्यांच्या उजव्याबाजूला श्री सोमस्कंदांची मूर्ती आहे.

ह्या मंदिरामध्ये नवग्रहांचे देवालय आहे. 

श्री मंगलांबिका पिवळी साडी परिधान करून आहेत आणि त्यांच्या मुखाला हळदीचा लेप लावला आहे आणि कपाळावर कुंकवाचा तिलक आहे. श्री मंगलनायकी ह्यांना श्री मंत्रपिठेश्वरी असं पण म्हणतात. श्री मंगलांबिका ह्यांच्या मूर्तीवर दर संध्याकाळी अभिषेक केला जातो. श्री किरटमूर्ती ह्यांचे स्वतंत्र देवालय आहे. श्री मुरुगन त्यांच्या श्री वल्ली आणि श्री दैवानै ह्या दोन पत्नींसमवेत मोरावर आरूढ आहेत अशी मूर्ती आहे. त्यांना सहा मुखे आहेत आणि बाराऐवजी सहा हात आहेत.

ह्या मंदिराशी निगडित चौदा तीर्थे आहेत - महामाघम तीर्थ, पोर्ट्रमरै तलाव, वरुण तीर्थ, कश्यप तीर्थ, चक्र तीर्थ, मातंग तीर्थ, भागवत तीर्थ, मंगल तीर्थ, नाग तीर्थ, कुरा तीर्थ, चंद्र तीर्थ, सूर्य तीर्थ, गौतम तीर्थ आणि वराह तीर्थ.

नवरात्री मंडपामध्ये १६ स्तंभ आहेत. हा मंडप विजयनगर साम्राज्याच्या राजांनी बांधला. इथे २७ नक्षत्रे आणि १२ राशी एका दगडामध्ये कोरल्या आहेत. ग्रॅनाईटने बनवलेले नादस्वरम नावाची दोन सुषिर संगीत वाद्ये (पाईप इन्स्ट्रुमेंट) इथे आहेत.

मंदिराच्या समोर पोर्ट्रमरै तलाव आहे. भाविकजन पोर्ट्रमरै तलावात स्नान घेण्याआधी महामाघम तीर्थामध्ये स्नान घेतात.

परिक्रमेमध्ये नवकन्नीका (नऊ पवित्र नद्या) आहेत. त्यांची नावे - गंगा, यमुना, नर्मदा, सरस्वती, कावेरी, गोदावरी, कृष्णा, तुंगभद्रा आणि शरयू. 

प्रार्थना:

१. भाविक जन इथे पुढील कारणांसाठी प्रार्थना करतात - कलेमध्ये प्राविण्य प्राप्त करण्यासाठी, व्यापार आणि व्यवसायामध्ये यशप्राप्तीसाठी, विवाहातल्या अडचणी दूर होण्यासाठी, अपत्यप्राप्तीसाठी आणि संपत्ती आणि समृद्धीप्राप्तीसाठी.

२. भाविकांचा असा समज आहे कि मघा नक्षत्रादिवशी किंवा महामाघम उत्सवाच्या काळात इथल्या पवित्र तीर्थात स्नान करून भगवान शिवांची पूजा केल्यास गतजन्मींच्या पापांचं क्षालन होऊन मोक्षप्राप्ती होते.

३. ग्रहदोषांच्या परिणामांचा परिहार करण्यासाठी भाविक जन इथे श्री कुंभमुनी सिद्धर ह्यांची प्रार्थना करतात. 

पूजा:

१. नित्य दैनंदिन पूजा केल्या जातात. 

२. नियमितपणे प्रदोष पूजा केली जाते. 

३. आवनी ह्या तामिळ महिन्याच्या दर रविवारी विशेष पूजा केली जाते.

मंदिरात साजरे होणारे सण:

चित्राई (एप्रिल-मे): सप्तस्थानं उत्सव

वैकासि (मे-जून): थिरकल्याण (विवाह उत्सव)

आनी (जून-जुलै): थिरुमंजनं

आडी (जुलै- ऑगस्ट): पुरम नक्षत्रावर १८ दिवसांचा उत्सव

मासी (फेब्रुवारी-मार्च): इथे मासीमाघम उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. अश्विनी नक्षत्रावर ध्वजारोहण होऊन उत्सवाची सुरुवात होते. आठव्या दिवशी भगवान शिव आणि श्री पार्वती देवींची विशेष पूजा केली जाते, नवव्या दिवशी रथयात्रा, दहाव्या दिवशी पंचमूर्तींची मोर, मूषक आणि ऋषभ वाहनांवरून मिरवणूक निघते.

मंदिराच्या वेळा: सकाळी ५.३० ते दुपारी १२.३०, दुपारी ४ ते रात्री ८.३०

पत्ता: श्री आदि कुंभेश्वरर मंदिर, कुंभकोणम (थिरुकूडमुकू), जिल्हा: तंजावूर, तामिळनाडू  ६१२००१

दूरध्वनी: +९१-४३५२४२०२७६

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment