Sunday, July 6, 2025

थिरुवळंचुळी येथील श्री कबर्दीश्वरर मंदिर

हे शिव मंदिर कुंभकोणम येथील श्री आदिकुंभेश्वरर ह्या मंदिराशी निगडीत असलेल्या सप्तस्थानांमधलं एक मंदिर आहे. हे मंदिर श्री श्वेतविनायक मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. कुंभकोणम-तंजावूर मार्गावर पापनाशम मार्गे जाताना कुंभकोणम पासून हे मंदिर १ किलोमीटर्स वर आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. शैव संत अप्पर आणि संबंधर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. हे मंदिर सातव्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. चोळा राजांनी हे मंदिर बांधलं असावं असं समजलं जातं आणि नंतर पांड्या आणि विजयनगर राजांनी ह्याचा विस्तार केला. इथे काही शिलालेख आहेत ज्यामध्ये मंदिराला दिलेल्या भेटवस्तु आणि देणग्यांचा उल्लेख आहे.  

मूलवर: श्री कबर्दीश्वरर, श्री वळंचुळीनाथर, श्री सेंचातैनाथर
देवी: श्री मंगलनायकी, श्री पेरियानायकीअंबाळ
पवित्र तीर्थ: कावेरी नदी, अरसालारू, जटातीर्थ
क्षेत्र वृक्ष: बिल्व
पुराणिक नाव: शक्तिवनम, थिरुनावर्थम, दक्षिणावर्थम

क्षेत्र पुराण:

१. यायारव ऋषींना १०० पुत्र होते. त्यांनी श्री पार्वती देवींकडे पुत्रीप्राप्तीसाठी प्रार्थना केली. श्री पार्वती देवींनी यायारव ऋषींची पुत्री म्हणून जन्म घेतला कारण त्यांना जटाधारी भगवान शिवांशी विवाह करण्याची इच्छा होती. लहानपणीच त्यांनी आपल्या पितांकडे भगवान शिवांबरोबर विवाह करण्याची इच्छा बोलून दाखवली आणि त्यांनी तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. आपल्या दिव्य शक्तीने त्यांनी वाळूपासून शिव लिंग निर्माण केलं. त्यावेळी त्यांनी भगवान शिवांना गंगेमधून पाणी आणण्याची प्रार्थना केली. भगवान शिवांनी ह्या प्रार्थनेला प्रतिसाद देऊन त्यांनी आपल्या जटेमधल्या गंगेच्या पाण्याने तिथे जटातीर्थ नावाचं तीर्थ निर्माण केलं. श्री पार्वती देवींनी जटाधारी भगवान शिवांशी विवाह करण्याची इच्छा केली म्हणून इथे भगवान शिवांना श्री कबर्दीश्वरर असं संबोधलं जातं. (उर्दू मध्ये कबर म्हणजे जटा). भगवान शिवांनी श्री पार्वती देवींच्या प्रार्थनेला प्रतिसाद देऊन त्यांच्याशी ह्या ठिकाणी विवाह केला. श्री पार्वतीदेवींच्या इच्छेनुसार भगवान शिव इथे लिंगरूपात राहिले. ह्या लिंगाला श्री कबर्दीश्वरर असे नाव आहे.

२. पुढील क्षेत्र पुराणातील कथा ह्या स्थळाला थिरुवळंचुळी असं का म्हणतात ह्याचे स्पष्टीकरण देते. ह्या कथेचे तपशील अभिदान चिंतामणी ह्या ग्रंथामधून आले आहेत. समुद्र मंथनाच्यासमयी वासुकी सर्पाला दोरखंड वापरून क्षीरसमुद्र घुसळायला सुरुवात केली. वासुकीने विष ओतायला सुरुवात केली तेव्हा सर्व देव भयभीत झाले आणि ते भगवान शिवांकडे गेले. भगवान शिवांनी त्यांना ज्ञात करून दिले कि ते समुद्रमंथन चालू करण्याआधी श्री गणेशाला वंदन करायचे विसरले. म्हणून देवांनी समुद्राच्या फेसापासून श्री गणेशांची मूर्ती तयार केली आणि त्याची पूजा केली. तसे केल्यावर त्यांना वासुकीच्या विषापासून मुक्ती मिळाली. ह्या श्री गणेशाच्या मूर्तीला श्री श्वेतविनायक असे नाव आहे. 

३. श्री इंद्रदेवांना श्री श्वेतविनायकांची मूर्ती आपल्याकडे पूजेसाठी असावी अशी इच्छा झाली. त्याच वेळी इतर देवांना पण अशीच इच्छा झाली. शेवटी श्री श्वेतविनायकांची पूजा काही काळापुरती प्रत्येकाच्या ठिकाणी करावी असे ठरले. भगवान शिव आणि श्री पार्वती देवींनी श्री श्वेतविनायकांची पूजा कैलासावर केली, भगवान विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवींनी वैकुंठात केली, श्री ब्रह्मदेव आणि श्री सरस्वती देवींनी सत्यलोकांत केली आणि शेवटी ती मूर्ती इंद्रलोकांमध्ये श्री इंद्रदेव आणि श्री इंद्राणीदेवींकडे पूजेसाठी आली. जेव्हा श्री इंद्रदेवांना गौतमऋषींनी दिलेल्या शापामुळे इंद्रलोक सोडायला लागला तेव्हां ते तीर्थयात्रेला निघाले आणि त्यांनी आपल्या बरोबर श्री श्वेतविनायकांची मूर्ती पण घेतली. श्री इंद्रदेव ह्या स्थळी पोचले आणि त्यांनी जटातीर्थामध्ये स्नान करण्याचे ठरवले. भगवान शिवांना वाटलं कि श्री श्वेतविनायकांची ह्या ठिकाणी स्थापना करावी. त्यांनी एका छोट्या बटूचे रूप धारण केलं. श्री इंद्रदेवांनी त्या बटुकडे श्री श्वेतविनायकांची मूर्ती तीर्थामध्ये स्नान करेपर्यंत सांभाळायला दिली. श्री इंद्रदेवांना आज्ञा होती कि हि मूर्ती जमिनीवर ठेवायची नाही. इंद्रदेव स्नान करत असताना त्या बटूने ती मूर्ती जमिनीवर ठेवली आणि अदृश्य झाला. इंद्रदेवांनी ती मूर्ती हलवण्याचा प्रयत्न केला पण ते त्यामध्ये सफल झाले नाहीत. त्यावेळी आकाशवाणीने इंद्रदेवांना ती मूर्ती तिथेच ठेवून ऑगस्ट च्या शुक्ल पक्षापासून (ऑगस्ट महिन्याचा दुसरा भाग) ते सप्टेंबर महिन्यातील पहिला पक्ष ह्या काळातल्या प्रत्येक सोमवारी ह्या मूर्तीची पूजा करायला सांगितली. पण इंद्रदेवांनीं तरीही मूर्ती हलवण्याचे प्रयत्न कायम ठेवले. त्यासाठी त्यांनी हत्ती, घोडे, रथ ह्यांचा उपयोग केला पण ते सफल झाले नाहीत. भगवान शिवांनी त्यांना परत प्रयत्न थांबवायला सांगितलं. त्यांनी इंद्रदेवांना सांगितलं कि सत्ययुगामध्ये श्री श्वेतविनायक कैलासावर राहून, तर त्रेतायुगामध्ये वैकुंठावर राहून, द्वापारयुगामध्ये सत्यलोकामध्ये राहून तर कलियुगामध्ये पृथ्वीवर राहून ते सर्वांवर कृपावर्षाव करतील आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतील.

४. एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी श्री आदिशेष पाताळ लोकांमधून एक मोठं छिद्र पाडून पृथ्वीलोकावर भगवान शिवांची पूजा करण्यासाठी आले. कावेरी नदी ह्या छिद्रामधून वाहायला लागली. त्यावेळी येथे राज्य करत असलेल्या हरीध्वजन राजाला वाटले कि कावेरी अशी पाताळ लोकामध्ये वाहत राहिली तर दुष्काळ पडून सर्व लोकांना अन्नाची भ्रांत पडेल. म्हणून त्याने कावेरी नदी परत जमिनीवर वाहावी म्हणून भगवान शिवांना प्रार्थना केली. तेव्हा भगवान शिवांनी आकाशवाणीने त्या राजाला सांगितले कि जर राजा किंवा कोणी ऋषींनी छिद्रामध्ये शिरून बलिदान दिलं तर हे संकट टळू शकेल. लोकोपकारक वृत्ती ठेवून राजाने स्वतः ह्या छिद्रात शिरून बलिदान देण्याचे ठरवले. त्यावेळी ह्या गावाजवळच असलेल्या कोट्टैयुर गावामध्ये अत्री ऋषी (ज्यांना हेरंड असं पण म्हणतात) तपश्चर्या करत होते. त्यांना जेव्हा राजा छिद्रामध्ये शिरून बलिदान करायला तयार झाला आहे हे कळलं तेव्हा त्यांनी येऊन राजाला थांबवलं. राजाचं आयुष्य ऋषिंपेक्षाही मौल्यवान असल्याकारणाने हेरंड ऋषी स्वतः छिद्रामध्ये शिरले आणि त्यांनी कावेरी नदीला परत जमिनीवर आणलं. कावेरी नदी जिथून परत पृथ्वीवर आली त्या जागेला मेलकावेरी असं म्हणतात. ऋषी ज्या जागेतुन परत बाहेर आले त्या जागेला थिरुवळंपुरम असं नाव पडलं. सध्या त्या जागेला मेलपेरूपल्लम असं नाव आहे. पुढे जाऊन हेरंड ऋषींनी मेलपेरूपल्लम येथे तपश्चर्या करून मुक्ती प्राप्त केली.

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

श्री पार्वती देवी, भगवान महाविष्णू, श्री ब्रह्मदेव , श्री इंद्र, श्री आदिशेष आणि हेरंड महर्षी.

वैशिष्ट्ये:

१. श्री श्वेतविनायकांची मूर्ती समुद्राच्या फेसापासून तयार केली आहे.

२. इथे कोरीव काम केलेल्या स्तंभांचे सुंदर मंडप आहेत आणि सुंदर शिल्पे पण आहेत

३. श्री श्वेतविनायकांसमोर एक दगडी खिडकी आहे.

४. श्री श्वेतविनायकांची मूर्ती चांदी आणि सोन्याच्या मंडपामध्ये आहे. 

५. चोळा साम्राज्याच्या काळातील काही बुद्धाच्या मूर्ती इथे आहेत.

६. नवग्रह संनिधी मध्ये सूर्य आणि चंद्र एकमेकांकडे मुख करून आहेत.

७. इथे बऱ्याच सुंदर आणि विस्मयकारक मूर्ती आहेत. 

८. गाभाऱ्याच्या आजूबाजूला खंदकाच्या आकाराची रचना भूमीपातळी मध्ये वाढ झाल्याकारणाने झाली असावी. 

९. इथे श्री मुरुगन ह्यांची दोन देवालये आहेत. एका देवालयामध्ये ते श्री षण्मुख रूपात आहेत ज्यामध्ये ते मोरावर आरूढ झाले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या दोन पत्नी आहेत, तर दुसऱ्या देवालयामध्ये श्री सुब्रमण्यम रूपात त्यांच्या दोन पत्नींसमवेत आहेत.   

मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर कावेरी नदीच्या काठावर वसलेल्या २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी एक आहे. ह्या मंदिराला वेल्लै (श्वेतविनायक मंदिर) असं पण संबोधलं जातं. हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याला तीन परिक्रमा आहेत. हे मंदिर साधारण ७.२५ एकरवर पसरलेलं आहे. इथले राजगोपुर हे पांच स्तरांचं आहे. दक्षिणायनातल्या कुठल्याही एका दिवसभरात ह्या मंदिरासमवेत थिरुनल्लर, पट्टिश्वरम, कीळपळयारै आणि आवूर ह्या स्थळांतल्या मंदिरांमध्ये पूजा करणे हे खूप शुभ आणि हितकारक मानलं जातं. गाभाऱ्याचा आकार अर्धवर्तुळाकार आहे. इथले शिव लिंग स्वयंभू आहे. हे मंदिर साधारण १७०० वर्षे जुनं आहे. 

ह्या मंदिरातली श्री विनायकांची मूर्ती फेसापासून तयार केलेली असल्याने त्यावर अभिषेक करत नाहीत. कच्या कापराचे चूर्ण सिवेट अत्तरामध्ये मिसळून त्याचा लेप अभिषेक म्हणून लावला जातो. श्री विनायकांच्या ह्या मूर्तीला हाताने स्पर्श केला जात नाही म्हणून ह्या मूर्तीला थींदथा थिरुमेनी (स्पर्श न केलेली तनु) असं म्हणलं जातं.

कोष्ट मूर्ती: श्री नर्दन विनायकर, श्री नटराज, श्री भिक्षाटनर, श्री दक्षिणामूर्ती, श्री ब्रह्मदेव, श्री लिंगोद्भवर, श्री अर्धनारीश्वरर, श्री दुर्गादेवी आणि श्री चंडिकेश्वरर. 

परिक्रमेमध्ये भगवान शिव आणि श्री पार्वती देवी, भगवान विष्णू, श्री मुरुगन, श्री नटराज, श्री सोमस्कंदर, श्री गजलक्ष्मी, श्री सूर्य, श्री चंद्र, श्री विशालाक्षी समवेत श्री काशी विश्वनाथ, जुळे विनायकर (इरत्तीआई), सप्त मातृकांसमवेत श्री दुर्गादेवी ह्यांच्या मूर्ती आहेत, तसेच ब्रह्म लिंग पण आहे. भगवान शिवांच्या उजव्याबाजूला श्री बृहन्नायकी (पेरियानायकी) ह्यांचे देवालय आहे. श्री अष्टभुजा महाकाली, हेरंड महर्षी आणि श्री भैरव ह्यांची स्वतंत्र देवालये इथे आहेत. पुराणांनुसार ऋषीमुनी आणि देवांनी इथे यज्ञ केला. त्यातील प्रत्येक देवाने आणि ऋषींनी एक एक शिव लिंग स्थापन केलं. म्हणून इथे बाहेरील परिक्रमेमध्ये आपल्याला २२ लिंगाचं दर्शन होतं. ह्या प्रत्येक लिंगावर ज्या ऋषींनी ते स्थापन केलं त्यांची नावे आहेत.

भगवान शिव आणि श्री पार्वती देवी हे पूर्वाभिमुख आहेत. श्री पार्वती देवी भगवान शिवांच्या उजव्याबाजूला आहेत. शैव संत संबंधर ह्यांच्या मते ह्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी आणि भगवान शिवांचे पूजन करण्यासाठी भरपूर पुण्य असावं लागतं. 

इथे श्री मुरुगन ह्यांची दोन देवालये आहेत. एक देवालय श्री षण्मुखांचे आहे तर दुसऱ्या देवालयामध्ये श्री वल्ली आणि श्री दैवानै ह्यांच्या समवेत श्री सुब्रह्मण्य आहेत.

मरुत पुराणानुसार श्री महालिंगेश्वर मंदिर अजून नऊ मंदिरांसमवेत परिवार स्थळ मानलं जातं. ती नऊ मंदिरे अशी

- थिरुवळंचुळी येथील श्री श्वेतविनायक मंदिर 

- स्वामीमलै येथील श्री सुब्रह्मण्य मंदिर

- अलंगुडी येथील श्री दक्षिणामूर्ती मंदिर

- थिरुवडुथूरै येथील श्री नंदी मंदिर

- सूर्यनार कोविल येथील श्री नवग्रह मंदिर

- सैंगनूर येथील श्री चण्डिकेश्वरर

- चिदंबरम येथील श्री नटराज

- सिरकाळी येथील श्री भैरव

- थिरुवारुर येथील श्री सोमस्कंदर

प्रार्थना:

१. भाविक जन इथे विवाहातल्या अडचणींचे निरसन करण्यासाठी आणि संपत्ती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. 

२. भाविक जनांचा असा समज आहे की इथे भगवान शिवांची पूजा केल्याने सर्व पापांचे निरसन होते.

३. भाविक जन इथे शिक्षणात आणि ज्ञानप्राप्ती मध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी प्रार्थना करतात.

पूजा:

नित्य दैनंदिन पूजा. तसेच प्रदोषकाळात प्रदोषपूजा केली जाते.

मंदिरात साजरे होणारे सण:

आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री विनायक चतुर्थी

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): स्कंदषष्ठी आणि अन्नाभिषेक

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेम्बर): थिरुकार्थिगई उत्सव  (दीपोत्सव)

मारगळी (डिसेम्बर-जानेवारी): थिरुवडुथीरै (अरुद्र दर्शन)

थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकर संक्रांत

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

मंदिराचा पत्ता:

श्री थिरुवळंचुळीनाथर मंदिर, ऍट पोस्ट स्वामी मलै मार्गे थिरुवळंचुळी, कुंभकोणम, तामिळ नाडू ६१२३०२

दूरध्वनी: ९१-४३५२४५४४२१, ९१-४३५२४५४०२६


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment