ह्या स्थळाला मेलैपूंथुरुथी असं पण नाव आहे.
हे मंदिर कंडीयुर पासून ३ किलोमीटर्सवर तंजावूर-थिरुकट्टूपल्ली-कल्लनै मार्गावर, थिरुवैयारू पासून ५.८ किलोमीटर्सवर, तंजावूर पासून १४.८ किलोमीटर्सवर आणि थिरुकट्टूपल्ली पासून १४.६ किलोमीटर्सवर आहे. नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी हे एक स्थळ आहे कावेरी नदीच्या दक्षिण काठावर कुडूमुरूट्टी उपनदीच्या काठावर आहे. श्रेष्ठ शैव संत अप्पर, वेल्लळर आणि संबंधर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती केली आहे. पण सध्या संबंधर ह्यांनी रचलेली स्तोत्रे उपलब्ध नाहीत. हे मंदिर सातव्या शतकाच्याही आधी बांधलं असावं. कालांतराने चोळा साम्राज्याच्या राजांनी त्याचा जीर्णोद्धार केला. तसेच चोळा, पांड्या आणि विजयनगर साम्राज्याच्या राजांनी त्याचा विस्तार केला. इथल्या शिलालेखांमधे विविध राजांनी केलेल्या कामाचे तसेच दिलेल्या देणग्यांचे उल्लेख आहेत.
थिरुवारुर सप्त स्थांनांमधलं हे सहावं मंदिर आहे. तामिळमधे पु म्हणजे पुष्प, थुरुथी म्हणजे दोन नद्यांमधली जागा. ही जागा कावेरी आणि कुडूमुरूट्टी नद्यांच्या मधे आहे म्हणून ह्या जागेला थिरुपूंथुरुथी असं नाव आहे. नंदिदेवांच्या विवाहासाठी भगवान शिवांनी येथून पुष्पे घेतली.
मूलवर: श्री पुष्पवनेश्वरर, श्री आदि पुराणर, श्री पोयलेलियार
देवी: श्री सौंदर्यनायकी, श्री अळकमर्थनायकी
क्षेत्र वृक्ष: बिल्व
पवित्र तीर्थ: सूर्य, कश्यप, गंगा आणि अग्नी
पौराणिक नाव: थिरुपूंथुरुथी
वर्तमान नाव: मेलैपूंथुरुथी
जिल्हा: तंजावूर, तामिळनाडू
क्षेत्र पुराण:
१. जेव्हां अप्पर आणि संबंधर हे दोघे नायनमार एकत्र भगवान शिवांच्या दर्शनासाठी येत होते त्यावेळी भगवान शिवांना त्यांचं दर्शन व्हावं म्हणून नंदिदेव थोडे वळले.
२. जेव्हां अगस्त्य मुनींचा कमंडलू कावळ्याचं रूप घेतलेल्या श्री गणेशांनी पाडला तेव्हां त्यातील पाणी सांडलं त्यातूनच कावेरी नदीचा उगम झाला. त्यानंतर कावेरी बऱ्याच प्रदेशातून वाहत गेली जसे कंडीयुर, थिरुपळनम, थिरुवैयरु, थिरुनैथनम आणि शेवटी ती समुद्रात मिसळून स्थिर झाली. तिच्या वाटेवर बरीचशी गावे बुडून गेली जशी करुप्पूर, कोनेराजापूरम, नाडूकावेरी, थिरुवलमपोळी आणि थिरुपूथुर. श्री इंद्रदेवांनी श्री अय्यरअप्पर (भगवान शिव) ह्यांची पूजा करून त्यांच्या कृपेने कावेरी नदीला पूर्वेकडे वळवलं. त्यामुळे ती कंडीयुर आणि पूथुर ह्या गावांतून वाहत गेली आणि तिथली जमीन सुपीक झाली. ह्या नदीच्या काठावर थोडं उंचावर एक वटवृक्ष होतं. इथली जमीन सुपीक आणि मऊ झाल्याने ह्या स्थळाचे नाव पूंथुरुथी असे प्रसिद्ध झाले.
३. गौतम ऋषींच्या पत्नीबरोबर व्यभिचार केल्याने इंद्रदेवांना गौतम ऋषींकडून शरीरभर कुरूप चिन्हे प्रकट होण्याचा शाप प्राप्त झाला. ह्या शापाचे विमोचन होण्यासाठी इंद्रदेवांनी बऱ्याच शिव स्थळांना भेट देऊन तिथे तपश्चर्या केली. जेव्हां ह्या स्थळी येऊन त्यांनी पुष्पांनी भगवान शिवांची पूजा केली तेव्हां त्यांची शापातून मुक्तता झाली.
४. दोन देवदूतांना (ज्यांना विनय असे म्हणतात) गरुडाचं रूप प्राप्त होण्याचा शाप मिळाला होता. त्यांना ह्या स्थळी भगवान शिवांची पूजा करून शापातून मुक्ती मिळाली आणि परत मूळ रूप प्राप्त झाले.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
इंद्र, कश्यप ऋषी, भगवान विष्णू, श्री लक्ष्मी देवी, सूर्य, अप्पर
वैशिष्ट्ये:
१. ह्या मंदिरातल्या मूर्ती आणि चित्रे खूप सुंदर आहेत.
२. नवग्रह संनिधीमध्ये सगळे आठ ग्रह सूर्याकडे मुख करून आहेत.
३. ह्या मंदिरामध्ये थिरुवैयारू सप्त स्थानांमधल्या सर्व सात शिव लिंगांचे दर्शन घडते.
४. इथे असलेला भव्य नंदि संबंधर ह्यांना वाट देण्यासाठी थोडा सरकला हे मूर्तीतून प्रदर्शित होतं.
५. ह्या मंदिरामध्ये अंबिका दक्षिणाभिमुख आहेत जे खूप शुभ समजलं जातं.
६. ह्या मंदिरातल्या सगळ्या नंदिंच्या मूर्ती ह्या आपल्या केंद्रापासून थोड्या सरकलेल्या आहेत.
७. मंदिरात एक अशी जागा आहे की जिथून मंदिरातल्या सर्व राजगोपुरांचं दर्शन होतं.
मंदिराबद्दल माहिती:
हे खूप जुनं मंदिर आहे. ह्या मंदिराचा व्याप साधारण २.५ एकर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामधे गाभारा, अंतराळ, अर्थमंडप आणि महामंडप आहे. हे पूर्वाभिमुख मंदिर आहे. ह्या मंदिराला पांच स्तरांचं राजगोपुर आहे आणि ते साधारण १०० फूट उंच आहे. गाभाऱ्याला एक छोटं गोपुर आहे. दोन गोपुरांमध्ये नंदि आणि बलीपीठ आहे. पण ते मूलवर च्या सरळ रेषेमध्ये नाहीत. येथील शिव लिंग स्वयंभू आहे. इथे एक भव्य नंदि आहे. असा समज आहे की हा नंदि शैव संत संबंधर ह्यांच्यासाठी बनवलेला आहे.
कोष्टामध्ये श्री विनायकर, श्री अर्धनारीश्वरर, श्री भिक्षाटनर, श्री वीणा दक्षिणामूर्ती, भगवान विष्णू, श्री ब्रह्मदेव आणि श्री दुर्गादेवी ह्यांच्या मूर्ती आहेत.
बाहेरील परिक्रमेच्या भिंतींवर शैव संत अप्पर ह्यांची कथा चित्रित केली आहे.
परिक्रमेमधल्या मूर्ती आणि देवालये:
शैव संत अप्पर बसलेल्या मुद्रेमध्ये, शैव संत सुंदरर त्यांच्या दोन पत्नींसमवेत परवैनच्यार आणि संगीलीनच्यार, शैव संत नालवर, श्री महालक्ष्मी, श्री दुर्गा देवी, श्री वीरभद्र, श्री विनायकर, श्री श्रीदेवी, अय्यनार, सप्त मातृका, नवग्रह संनिधी ज्यामध्ये सर्व आठ ग्रह सूर्याकडे मुख करून आहेत, श्री चंडिकेश्वरर, श्री सूर्यदेव, श्री कैलासनाथर, सधाथप महर्षी, थिरुपथंकर. बाहेरील परिक्रमेमधल्या मूर्ती आणि देवालये: श्री दुर्गाम्बिका देवींचे स्वतंत्र देवालय, श्री काशीविश्वनाथर, थिरुवैयारू सप्त स्थानांमधील शिव लिंगे, सोमस्कंद मंडप, नटराज सभा. इथे श्री कदवनमाळी ह्यांची मूर्ती आहे जिथे ते प्रकट झाले. ह्या ठिकाणी भगवान शिवांनी श्री अप्पर यांना दर्शन दिले. श्री दुर्गा देवींच्या मूर्तीमध्ये त्या तपश्चर्येच्या मुद्रेमध्ये म्हणजेच एका पायावर उभ्या आहेत आणि ही तपश्चर्या त्या महिषासुराचा वध केल्यामुळे प्राप्त झालेल्या पापांचं विमोचन करण्यासाठी करत आहेत.
ह्या ठिकाणी भगवान विष्णू आणि श्री लक्ष्मी देवींनी भगवान शिवांची प्रार्थना केली. श्री लक्ष्मीदेवींना इथे पूमगल असं पण म्हणतात. त्यांनी इथे म्हणजेच थुरुथीमधे पूजा केली म्हणून ह्या स्थळाला पंथुरुथी म्हणतात.
शैव संत नालवर ह्यांची चरित्रे इथल्या भिंतींवर चित्रित केली आहेत.
भगवान शिवांनी इथे एका विहिरीमध्ये १३ तीर्थे निर्माण केली. कश्यप ऋषींनी केलेल्या तपश्चर्येला मान देण्यासाठी म्हणून त्यांनी ही तीर्थे निर्माण केली. त्यांनी कश्यप ऋषींना आडी महिन्याच्या अमावास्येला दर्शन दिलं. अमावास्येला इथे पितृदोषाच्या निवारणासाठी गिरिवलम (टेकडीच्या भोवती प्रदक्षिणा) केली जाते.
असा समज आहे की श्री संबंधर ह्यांनी श्री अप्पर ह्यांची पालखी आपल्या खांद्यावर वाहिली.
प्रार्थना:
१. भाविक जनांची अशी भावना आहे की अमावास्येला गिरिवलम (डोंगराला प्रदक्षिणा) करून मग पूजा केल्यास पितृदोषांतून मुक्ती मिळते.
२. भाविक जन इथे अपत्य प्राप्तीसाठी, विवाहातल्या अडचणी दूर होण्यासाठी तसेच शिक्षणात प्रगती होण्यासाठी प्रार्थना करतात.
पूजा:
१. दररोज दिवसभरात चार पूजा केल्या जातात.
२. नियमित साप्ताहिक पूजा केल्या जातात.
२. प्रदोष दिवशी प्रदोष पूजा केली जाते.
मंदिरात साजरे होणारे महत्वाचे सण:
चित्राई (एप्रिल-मे): सप्त स्थान उत्सव, ब्रम्होत्सव
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी उत्सव
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्थिगई दीपम हा दिव्यांचा उत्सव
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): अरुद्रदर्शन
थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकर संक्रांति
मंदिराच्या वेळा: सकाळी ६.३० ते ११.३०, संध्याकाळी ४.३० ते ८.३०
पत्ता:
श्री पूवननाथर मंदिर, थिरुपूंथुरुथी पोस्ट, कंडीयुर तालुका, थिरुवैयारू, तंजावूर जिल्हा, तामिळ नाडू ६१३१०३
दूरध्वनी: +९१-४३६५३२२२९०, +९१-९४८६५७६५२९
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment