हे मंदिर तंजावूर पासून १७ किलोमीटर्स वर तंजावूर-थिरुकट्टूपल्ली मार्गावर वसले आहे. हे मंदिर थिरुकंडियुर पासून ५ किलोमीटर्सवर तर थिरुपूंथुरुथी पासून १ किलोमीटरवर आहे. नायनमारांनी स्तुती केलेल्या २७५ पाडळ पेथ्र स्थळांपैकी हे एक स्थळ आहे आणि ते कावेरी नदीच्या दक्षिण काठावर वसले आहे. श्रेष्ठ शैव संत अप्पर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. म्हणून हे मंदिर सातव्या शतकाच्याही आधी बांधले असावे. चोळा साम्राज्याच्या काळामध्ये ह्या मंदिराचा जीर्णोद्धार होऊन दगडी मंदिर बांधले गेले. इथे बरेच शिलालेख आहेत पण सध्या ते सगळे विस्कळीत अवस्थेमध्ये आहेत.
मूलवर: श्री आत्मनाथेश्वरर, श्री वडमूलनाथर, श्री वडमुळेश्वरर, श्री वडअरण्येश्वरर
देवी: श्री ज्ञानाम्बिका
क्षेत्र वृक्ष: वट वृक्ष (सध्या हे अस्तित्वात नाही), बिल्व
पवित्र तीर्थ: कावेरी नदी
पौराणिक नाव: वलमपुळील (अलमपुळील)
वर्तमान नाव: थिरुवलमपुळील
क्षेत्र पुराण:
१. पुराणानुसार अष्ट वसू हे श्री इंद्रदेवांचे परिचर होते. कालांतराने हे भगवान विष्णूंचे परिचर झाले. अष्ट वसू हे निसर्गाचे आठ पैलू समजले जातात. पुराणांमध्ये अष्ट वसुंबद्दल विविध स्पष्टीकरणे आहेत पण ह्या सगळया स्पष्टीकरणांमध्ये महाभारतातले स्पष्टीकरण स्वीकार्य समजलं जातं. रामायणामध्ये त्यांना कश्यप ऋषींचे पुत्र मानलं जातं तर महाभारतामध्ये त्यांना ब्रह्मदेवांचे किंवा मनूचे पुत्र मानलं जातं. वसिष्ठ ऋषींच्या कामधेनू ह्या गायीबरोबर अष्ट वसूंनी दुर्वर्तन केलं म्हणून वसिष्ठ ऋषींनी त्यांना पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप दिला. जेव्हां त्यांनी क्षमायाचना केली तेव्हां वसिष्ठ ऋषींनी त्यांना सांगितलं की ते गंगामातेच्या पोटी जन्म घेतील आणि गंगा माता त्यांना आपल्या मूळ रूपात येण्यासाठी मदत करतील. पण त्या अष्ट वसुंमधले एक वसू, ज्यांचे नाव बिबसन होते, ते मात्र त्यांच्या मूळ रूपात येणार नाहीत. असं म्हणतात की बिबसन हेच भीष्म म्हणून जन्माला आले. वसिष्ठ ऋषींच्या कामधेनू गाईबरोबरच्या दुर्वर्तनाचे मुख्य दोषी बिबसन होते.
२. इंद्र देवांना इथल्या श्वेत कमळांच्या तलावात स्नान केल्याने शापातून मुक्ती मिळाली.
३. ह्या मंदिरामध्ये सुंदरर ह्यांना नंदिदेवांच्या विवाहाची बातमी मिळाली.
४. स्थळ पुराणानुसार जेव्हा श्रेष्ठ शैव संत संबंधर ह्यांची पालखी ह्या मंदिराच्या जवळ आली त्यावेळी पालखी वाहकांमध्ये अजून एक श्रेष्ठ शैव संत अप्पर हे पण सामील झाले. जेव्हां पालखी थिरुपूंथुरुथी येथे आली तेव्हां संबंधरांना कळलं कि अप्पर ह्यांनी पालखी वाहिली म्हणून. त्यांनी अप्पर ह्यांची क्षमा मागितली आणि मग ते दोघेही मंदिरांच्या दर्शनासाठी गेले.
मंदिरात ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
कश्यप ऋषी, अष्ट वसू, शैव संत अप्पर, इंद्रदेव
वैशिष्ट्ये:
१. अष्ट वसूंनी ह्या मंदिरात भगवान शिवांची पूजा केली आहे.
२. इथे भैरवांची मूर्ती नाही कारण इथे भगवान शिव स्वतःच भैरव आहेत.
३. इथे दक्षिणामूर्तींचे नाव मेधा दक्षिणामूर्ती आहे.
४. मघा नक्षत्रासाठी हे परिहार स्थळ आहे.
मंदिराबद्दल माहिती:
गाभाऱ्यामध्ये गाभारा, अंतराळ आणि अर्थ मंडप आहेत. हे पश्चिमाभिमुख मंदिर आहे आणि ह्या मंदिराला पांच स्तरांचं राजगोपुर आहे. इथे ध्वजस्तंभ नाही. गाभाऱ्यासमोर बलीपीठ आणि नंदि आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशावर द्वारपाल आहेत. येथील शिव लिंग हे स्वयंभू आहे आणि बाकीच्या मंदिरातल्या शिव लिंगांच्या तुलनेत मोठ्ठे आहे. ह्या मंदिरात भैरवांचे स्वतंत्र देवालय नाही कारण भगवान शिव स्वतःच इथे भैरव आहेत.
कोष्टामध्ये श्री विनायकर, श्री मेधा दक्षिणामूर्ती, श्री ब्रम्हदेव आणि श्री दुर्गादेवी ह्यांच्या मूर्ती आहेत.
इथे एक परिक्रमा आहे आणि मंदिरातली बरीचशी देवालये ह्या परिक्रमेमध्येच आहेत. परीक्रमेमध्ये असलेल्या मूर्ती आणि देवालये अशी आहेत - श्री वल्ली आणि श्री दैवानै समवेत श्री सुब्रमण्य, श्री गणेश, पंचभूत लिंगे, श्री विशालाक्षी देवींसमवेत श्री काशी विश्वनाथ, नवग्रह, शैव संत नालवर, श्री नटराज, श्री मूळ विनायकर, श्री चंडिकेश्वरर, शैवसंत अप्पर.
श्री अंबाळ त्यांच्या स्वतंत्र देवालयामध्ये आहेत आणि त्या दक्षिणाभिमुख आहेत. त्या ज्ञान देतात म्हणून त्यांना ज्ञानाम्बिका असं नाव आहे. त्या उभ्या मुद्रेमध्ये आहेत.
इथे श्री दुर्गादेवी ह्या खूप शक्तिमान मानल्या जातात कारण त्या आपल्या भक्तांना वरदाने देतात.
प्रार्थना:
१. भाविक जन इथे विवाहातल्या अडचणींचे निवारण होण्यासाठी, अपत्यप्राप्तीसाठी आणि शिक्षणामध्ये प्रगती मिळविण्यासाठी प्रार्थना करतात.
२. मघा नक्षत्रदोषांसाठी हे परिहार स्थळ आहे.
३. असा समज आहे की सलग ११ अष्टमी, ११ प्रदोष किंवा ११ सोमवारी इथे पूजा केल्यास सर्व ग्रहांच्या दोषांचे निवारण होते.
४. असा समज आहे की भगवान शिव, श्री अंबिका देवी आणि पंच लिंगांची सलग ८ पौर्णिमा दिवशी पूजा केल्यास अपत्य प्राप्तीचे आशीर्वाद मिळतात.
पूजा:
मंगळवारी आणि शुक्रवारी इथे श्री दुर्गादेवींच्या विशेष पूजा केल्या जातात. तसेच दररोजच्या पूजा आणि प्रदोष पूजा पण केल्या जातात.
मंदिरात साजरे होणारे काही महत्वाचे सण:
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): मूळ नक्षत्र उत्सव
पूरत्तासी (सप्टेम्बर-ऑक्टोबर): नवरात्री, स्कंद षष्ठी
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): प्रत्येक सोमवारी पूजा
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै
मासी (फेब्रुवारी-मार्च): शिवरात्रि
मंदिराच्या वेळा:
सकाळी ७ ते ११, संध्याकाळी ५ ते ७
इथले पुजारी थिरुपूंथुरुथी येथून येतात म्हणून मंदिरात पूजेसाठी किंवा दर्शनासाठी जाण्याआधी पुजाऱ्यांशी पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा - +९१-४३६५२८४५७३, +९१-४३६५३२२२९०
पत्ता:
श्री आत्मनाथेश्वर मंदिर, थिरुवलमपोळील पोस्ट (थिरुकंडीयुर मार्गे), थिरुवैयरू तालुका, तंजावूर जिल्हा, तामिळ नाडू
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment