हे मंदिर थिरुवैयारू-तंजावूर मार्गावर थिरुवैयारू पासून ३ किलोमीटर्स वर, तंजावूर पासून १० किलोमीटर्स वर तर कुंभकोणम पासून २१ किलोमीटर्स वर आहे.
थिरुवैयारू सप्त स्थानांमधलं हे पांचवं मंदिर आहे. अष्टवीराट्टेश्वरर मंदिरांमधलं हे पहिलं मंदिर आहे. पाडळ पेथ्र स्थळं म्हणजेच नायनमारांनी ज्या २७५ मंदिरांची स्तुती गायली आहे त्या मंदिरांपैकी पण हे एक मंदिर आहे. संबंधर, अप्पर आणि वल्लाळर ह्या नायनमारांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. त्यामुळे हे मंदिर सातव्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. असा समज आहे कि पल्लव साम्राज्यामध्ये हे मंदिर बांधलं गेलं असावं आणि नंतर चोळा साम्राज्याच्या काळात ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असावा. इथल्या शिलालेखांमध्ये पल्लव, चोळा तसेच पांड्या साम्राज्याच्या राजांनी केलेल्या कामाची तसेच देणग्यांचा उल्लेख आढळतो. सप्त मातृकांनी ज्या सात मंदिरांमध्ये भगवान शिवांची पूजा केली त्या मंदिरांमधलं पण एक मंदिर आहे.
मूलवर: श्री ब्रम्हकंडीश्वरर, श्री वीराट्टेश्वरर, श्री बृहद्नाथर, श्री आदिविल्वनाथर
उत्सवर मूर्ती: श्री सोमस्कंदर
देवी: श्री मंगलांबिका
क्षेत्र वृक्ष: बिल्व
पवित्र तीर्थ: नंदि तीर्थ, कुडमुरुट्टी तीर्थ (नदी), दक्ष तीर्थ, ब्रम्ह तीर्थ
पुराणिक नाव: कंडपुरम, थिरुकंडीयुर, आदिविल्वारण्य, विराटम, त्रिमूर्तीस्थळ
शहर: कंडीयुर
जिल्हा: तंजावूर, तामिळनाडू
क्षेत्र पुराण:
१. श्री ब्रह्मदेवांना आधी पांच शिरे होती. एकदा चुकून श्री ब्रम्हदेवांना भगवान शिव समजून श्री पार्वती देवींनी श्री ब्रम्हदेवांची पाद्यपूजा केली. पण भगवान शिवांच्यामते श्री ब्रम्हदेवांकडून फसवणूक झाली होती. म्हणून भगवान शिवांनी शिक्षा म्हणून श्री ब्रम्हदेवांचे एक शिर छेदून टाकले. म्हणून ह्या स्थळाला कंडीयुर किंवा कंडनपुरम असे नाव प्राप्त झाले. पण ह्या कृत्यामुळे भगवान शिवांकडून पाप घडले आणि श्री ब्रम्हदेवांचे छेदलेले शिर त्यांच्या हाताला चिकटले. ह्या पासून मुक्ती मिळविण्यासाठी भगवान शिवांनी भिक्षाटनरच्या रूपामध्ये भगवान विष्णूंची थिरुकरम्बूर येथे पूजा केली. ह्या पूजेचा परिणाम म्हणून त्यांना त्यांच्या पापापासून अंशतः मुक्ती मिळाली. त्यानंतर भगवान शिवांनी ह्या ठिकाणी भगवान विष्णूंची पूजा केली आणि कमलपुष्करिणी तीर्थामध्ये स्नान केले आणि ह्या पूजेच्या प्रभावाने त्यांची पापातून पूर्ण मुक्ती झाली. ह्या ठिकाणी भगवान विष्णूंनी भगवान शिवांना पापातून मुक्त केले म्हणून ह्या मंदिराचे नाव श्री हरपापविमोचन मंदिर असे प्रसिद्ध झाले. कालांतराने कमलपुष्करिणी तीर्थाचे नाव कपालतीर्थ असे झाले.
२. अजून एका आख्यायिकेनुसार श्री लक्ष्मी देवींनी भगवान विष्णूंचे पूर्ण लक्ष्य आपल्याला मिळावं म्हणून भगवान शिवांना श्री ब्रम्हदेवांचे एक शिर छेदण्याची विनंती केली आणि म्हणून भगवान शिवांनी ब्रह्मदेवाचे शिर छेदले.
३. राजा महाबळी आणि चंद्र ह्यांना इथे भगवान शिवांची पूजा करून आपल्या पापांपासून मुक्ती मिळाली.
४. भृगु ऋषींनी एकदा भगवान विष्णूंच्या वक्षस्थळावर लथप्रहार केला होता आणि त्यामुळे त्यांना पाप लागले होते. ह्या ठिकाणी भगवान शिवांची पूजा करून त्यांना त्या पापापासून मुक्ती मिळाली.
५. चंद्राने आपल्या गुरूंच्या म्हणजेच बृहस्पतींच्या पत्नीला मोहित करून तिच्या बरोबर व्यभिचार केल्याने पाप लागले होते. त्यांनी इथे भगवान शिवांची पूजा केल्याने त्यांना पापापासून अंशतः मुक्ती मिळाली.
६. शतपाद ऋषी प्रत्येक प्रदोष दिवशी कालहस्तीला जाऊन भगवान शिवांची पूजा करायचे. त्यांची परीक्षा घेण्यासाठी एकदा भगवान शिवांनी कालहस्तीच्या रस्त्यावर पाऊस आणि वादळ घडवून आणलं. शतपाद ऋषी त्या दिवशी कालहस्तीला पूजेसाठी जाऊन शकले नाहीत म्हणून त्यांनी अग्निकुंडात उडी मारून आत्मसमर्पण करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी शतपाद ऋषींना आपल्या कालहस्तीतल्या रूपाचे दर्शन घडवले. त्याचबरोबर भगवान शिवांनी शतपाद ऋषींना पूजेसाठी लागणाऱ्या बिल्वपत्रांसाठी कैलासपर्वतावरील बिल्व वृक्ष इथे आणले. म्हणून ह्या स्थळाला आदिबिल्ववनम असे पण नाव प्राप्त झाले.
७. ह्या स्थळाला इथे त्रिमूर्ती (ब्रम्ह, विष्णू आणि शिव) असल्याने खूप महत्व प्राप्त झाले म्हणून ह्या स्थळाला त्रिमूर्तीस्थळ असे पण नाव प्राप्त झाले.
मंदिरात ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री ब्रम्हदेव, श्री सरस्वती देवी, सूर्य, शतपाद ऋषी, द्रोणाचार्य, दक्ष आणि राजा भगीरथ.
वैशिष्ट्ये:
१. भगवान शिवांच्या देवालयाला लागूनच श्री ब्रम्हदेव आणि श्री सरस्वती देवी ह्यांचे देवालय आहे. श्री ब्रम्हदेवांची मूर्ती खूप भव्य आहे, ते बसलेल्या मुद्रेत आहेत आणि ऊर्ध्वाभिमुख आहेत. त्यांच्या हातामध्ये जपमाळ आणि कमळ आहे.
२. गाभाऱ्याच्या दोन बाजूंना असलेल्या श्री मुरुगन ह्यांच्या मूर्ती अलौकिक आहेत. त्यांच्या एका मूर्तीमध्ये त्यांच्या हातात जपमाळ आहे तर दुसऱ्या मूर्तीमध्ये त्यांच्या हातात कमळ आहे. एका मूर्तीचे नाव ज्ञानस्कंदर तर दुसऱ्या मूर्तीचे नाव वीरस्कंदर आहे.
३. श्री अर्धनारीश्वरर ह्यांची मूर्ती खूप सुंदर आणि अलौकिक आहे. ते बसलेल्या मुद्रेत आहेत.
४. नवग्रह संनिधीमध्ये सगळे आठ ग्रह सूर्याकडे मुख करून आहेत. सूर्यदेव त्यांच्या दोन पत्नींसमवेत आहेत.
५. शैव संत अरुणागिरिनाथर ह्यांनी येथील श्री मुरुगन ह्यांची स्तुती गायली आहे.
६. पुढल्या मंडपामध्ये श्री दंडपाणी ह्यांची मूर्ती आहे. ह्या मंडपाचा आकार वटवाघुळाच्या कपाळासारखा आहे.
७. दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या शिखरावर भगवान शिव आणि श्री पार्वती देवींची सुंदर शिल्पे आहेत. ह्या शिल्पांमध्ये भगवान शिव आणि श्री पार्वती देवी कैलासावर बसले आहेत आणि श्री ब्रम्हदेव आणि श्री सरस्वती देवी त्यांची पूजा करत आहेत असे दृश्य आहे.
८. मासी (फेब्रुवारी-मार्च) ह्या तामिळ महिन्याच्या तेराव्या, चौदाव्या आणि पंधराव्या दिवशी संध्याकाळी ५.४५ ते ६.१० च्या मध्ये सूर्याची किरणे इथल्या शिव लिंगावर पडतात. असा समज आहे की त्यावेळी श्री सूर्यदेव भगवान शिवांची पूजा करतात.
९. ब्रम्हहत्या आणि कलत्र दोषांसाठी हे परिहार स्थळ आहे.
मंदिराबद्दल माहिती:
हे मंदिर कुडमुरुट्टी नदीच्या काठावर आहे. वैष्णव भक्त भगवान विष्णूंच्या ज्या १०८ दिव्यदेशम मंदिरांची भक्ती करतात त्यामधलं हे एक मंदिर आहे. भगवान शिवांच्या मंदिराच्या समोर भगवान विष्णूंचे मंदिर आहे ज्याचे नाव श्री हरशापविमोचन मंदिर किंवा हरविमोचन पेरुमल कोविल असे आहे. पुराणांनुसार हे मंदिर राजा महाबळीने कुडमुरुट्टी आणि वेन्नार नद्यांच्या मध्ये बांधलं.
हे मंदिर रस्त्याच्या पातळीच्या थोडे खाली आहे. गाभाऱ्यामध्ये गाभारा, अंतराळ आणि अर्थ मंडप आहे. हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे आणि ह्याला पांच स्तरांचं राजगोपुर आहे. इथे ध्वजस्तंभ, नंदि आणि बलीपीठ आहे. ध्वजस्तंभाजवळ श्री विनायकांची मूर्ती आहे. इथल्या शिलालेखांमध्ये भगवान शिवांचा उल्लेख थिरुविराटमहादेवर, थिरुकंडीयुर महादेवर असा केला आहे. भगवान शिव स्वयंभू लिंगरूपात थोड्या उंच मंचावर आहे.
मंदिरामधल्या इतर मूर्ती आणि देवालये:
श्री दंडपाणी एका मंडपामध्ये स्वतंत्र देवालयामध्ये आहेत. श्री अंबिका देवींचे देवालय दक्षिणाभिमुख आहे. त्यांच्या देवालयाचा आकार वटवाघुळाच्या कपाळासारखा आहे. त्यांना चार हात आहेत आणि त्यातील एक हात अभय मुद्रेमध्ये आहे. श्री विनायकांच्या देवालयामध्ये श्री वल्ली आणि श्री दैवानै समवेत श्री मुरुगन ह्यांची मूर्ती आहे. इथे श्री महालक्ष्मी, श्री नटराज, श्री विष्णुदुर्गा, श्री भैरव, सप्त विनायकर ह्यांच्या मूर्ती आहेत तसेच श्री अर्धनारीश्वरांची बसलेल्या मुद्रेमधली मूर्ती आहे.
कोष्टामध्ये श्री ब्रम्हदेव, श्री लिंगोद्भवर, श्री भिक्षाटनर, श्री नर्तनविनायकर आणि श्री अर्धनारीश्वरर ह्यांच्या मूर्ती आहेत. श्री चंडिकेश्वरर त्यांच्या स्वतंत्र देवालयामध्ये आहेत. श्री कालहस्तीनाथर पण स्वतंत्र देवालयामध्ये आहेत. द्वारपालकांच्या जवळ शतपाद ऋषी, सप्त स्थान लिंगे, पंचमहाभूत लिंगे आणि श्री मुरुगन ह्यांच्या मूर्ती आहेत. नवग्रह संनिधीमध्ये श्री सूर्यदेव त्यांच्या पत्नींसमवेत आहेत. भगवान शिवांच्या गाभाऱ्याजवळ श्री ब्रम्हदेव आणि श्री सरस्वती देवी ह्यांच्या मूर्ती आहेत. श्री ब्रह्मदेव भगवान शिवांची पूजा करत आहेत असे दृश्य आहे. त्यांच्या एका हातात जपमाळ आहे तर दुसऱ्या हातामध्ये कमळ आहे. बिल्व वृक्षाच्या खाली श्री राजगणपती ह्यांचे स्वतंत्र देवालय आहे. इथे एका शिकाऱ्याची मूर्ती आहे जी भगवान शिव (वदुगर म्हणजेच शिकारी) श्री ब्रम्हदेवांचे पांचवं शिर छेदत आहेत हे दर्शवते. श्री ब्रम्हदेवांच्या देवालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ही मूर्ती आहे. मुख्य गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना श्री मुरुगन ह्यांच्या मूर्ती आहेत. एका मूर्तीच्या हातामध्ये जपमाळ आहेर आणि ह्या मूर्तीचे नाव ज्ञानस्कंदर आहे तर दुसऱ्या मूर्तीच्या हातात कमळ आहे आणि त्या मूर्तीचे नाव वीरस्कंदर असे आहे. इथल्या नवग्रह संनिधीमध्ये सर्व ग्रह सूर्याकडे मुख करून आहेत. दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या शिखरावर भगवान शिव आणि श्री पार्वती देवींचे कैलासावर बसले आहेत असे शिल्प आहे आणि श्री ब्रम्हदेव आणि श्री सरस्वती देवी त्यांची पूजा करत आहेत असे दृश्य आहे.
प्रार्थना:
१. भाविक जन इथे ब्रम्हहत्या दोष, पुत्रदोष तसेच कलत्र दोषांच्या निवारणासाठी पूजा करतात.
२. भाविक जन इथे विवाहातल्या अडचणींवर मात करण्यासाठी पूजा करतात.
पूजा:
१. दररोज दिवसभरात चार पूजा केल्या जातात.
२. प्रत्येक प्रदोष दिवशी प्रदोष पूजा केली जाते.
मंदिरात साजरे होणारे सण:
चित्राई (एप्रिल-मे): सप्त स्थान उत्सव
आनी (जून-जुलै): भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये थिरुमंजनं
आडी (जुलै-ऑगस्ट): पुरम उत्सव (पूर्वा फाल्गुनी नक्षत्र उत्सव)
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंदषष्ठी उत्सव
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्थिगई दीपम
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): अरुद्रदर्शन
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तिरं (उत्तरा फाल्गुनी नक्षत्र उत्सव)
मंदिराच्या वेळा:
सकाळी ७ ते दुपारी १२, संध्याकाळी ४ ते रात्री ८.३०
पत्ता:
श्री ब्रम्हकंडीश्वरर मंदिर, थिरुकंडीयुर पोस्ट, थिरुवैयरू तालुका, तंजावूर जिल्हा, तामिळ नाडू ६१३२०२
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.