Sunday, February 23, 2025

थिरुवेरूम्बूर येथील श्री एरुम्बीश्वरर मंदिर

हे मंदिर त्रिची शहरापासून १० किलोमीटर्स वर त्रिची-तंजावूर मार्गावर थिरुवेरूम्बूर गावात वसलेलं आहे. नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी हे मंदिर कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. श्रेष्ठ शैव संत अप्पर आणि संबंधर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. त्यामुळे हे मंदिर सातव्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. असा समज आहे की चोळा साम्राज्याचा राजा आदित्य चोळा ह्याने ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. ह्या मंदिरामध्ये बरेच शिलालेख आहेत ज्यामध्ये १०व्या शतकाच्याही आधीचे उल्लेख आढळतात. वर्तमान मंदिर साधारण १३०० वर्षे जुनं असावं. मूळ मंदिर पल्लव साम्राज्याच्या काळात बांधलं असावं. असा समज आहे कि मुघलांनी ह्या मंदिराचा विध्वंस केला म्हणून हे मंदिर पुन्हा बांधलं गेलं. पौराणिक काळात ह्या मंदिराचे नाव पिपीलिचीरम, मणिकुडम, रत्नकुडम, थिरुवेंम्बियापुरम, एरुम्बीसन, ब्रम्हपुरम, लक्ष्मीपुरम, मधुवनपुरम आणि कुमारपुरम. चोळा साम्राज्याच्या काळात ह्या मंदिराला दक्षिण कैलास असं म्हणलं जात होतं.

मूलवर: श्री एरुम्बीश्वरर, श्री पिपिळेकश्वरर, श्री मधुवनेश्वरर, श्री एरुम्बीसर, श्री मकूटचलापती, श्री माणिकनाथर
देवी: श्री सौंदर्यनायकी, श्री मधुवनेश्वरी, श्री रत्नाम्बळ, श्री नरुकुळलनायकी, श्री सुगंधनायकी
क्षेत्र वृक्ष: बिल्व
पवित्र तीर्थ: ब्रम्ह तीर्थ, मधू तीर्थ, कुमार तीर्थ, पद्म तीर्थ
पौराणिक नाव: थिरुवेरुम्बीयूर, थिरुवेरुम्बर
वर्तमान नाव: थिरुवेरूम्बूर

क्षेत्र पुराण:

१. पुराणांनुसार तारकासुर नावाच्या राक्षसाने इंद्रलोक पादाक्रांत केले होते. तो इंद्र देव आणि इतर देवांना त्रास देत होता. म्हणून इंद्रदेव आणि इतर देव श्री ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांनी ब्रम्हदेवांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. श्री ब्रम्हदेवांनी त्यांना ह्या ठिकाणी टेकडीवर स्थित शिव लिंग स्वरूपात असलेल्या भगवान शिवांची उपासना करण्याचा सल्ला दिला. श्री ब्रह्मदेवांनी आश्वासन दिले की देवांनी भगवान शिवांची उपासना केल्यास भगवान शिव त्या राक्षसाचा निश्चित अंत करतील. देव इथे आले आणि त्यांनी भगवान शिवांची उपासना केली. त्यांनी तारकासुरापासून वाचण्यासाठी स्वतःचे रूपांतर मुंग्यांमध्ये केले. त्यांनी शिव लिंगावर पुष्प अर्पण करण्यासाठी लिंगाच्या बाणावर चढण्याचा प्रयत्न केला पण बाण उंच आणि नितळ असल्याने त्यांना पुष्प अर्पण करणे खूप कठीण गेले. भगवान शिवांना त्यांची दुर्दशा बघून दया आली आणि त्यांनी स्वतःला खडबडीत केले आणि ते थोडे डाव्याबाजूला वाकले जेणेकरून त्या मुंग्यांना शिखरावर पोचून पुष्प अर्पण करता येतील. मुंग्यांच्या रूपात असलेल्या देवांची भक्ती पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी देवांवर कृपा केली आणि तारकासुराचा वध केला. इथे मुंग्यांनी (तामिळ मध्ये एरुम्ब) भगवान शिवांची उपासना केली म्हणून भगवान शिवांना इथे एरुम्बीश्वरर असे नाव पडले.

२. वायुदेव आणि आदिशेष ह्यांच्या द्वंद्वामध्ये मेरू पर्वताचा उडालेला तुकडा इथे पडला तोच ह्या मंदिराची टेकडी आहे. 

३. असा समज आहे कि मन्मथ म्हणजेच कामदेव यांची पत्नी रतीदेवी हिने इथे तिला तिच्या सौंदर्याचा अभिमान होऊ नये म्हणून भगवान शिवांची उपासना केली.

मंदिरात ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

श्री मुरुगन, श्री ब्रम्हदेव, श्री इंद्रदेव, श्री अग्निदेव, रतीदेवी, नैमिषारण्य मुनी, कट्टंगळी स्वामी

वैशिष्ट्ये:

१. वायुदेव आणि आदिशेषांच्या द्वंद्वामध्ये मेरू पर्वताचा उडालेला एक तुकडा इथे पडून टेकडी बनला. त्या टेकडीवर हे मंदिर आहे.

२. इथले शिव लिंग मुंग्यांच्या वारुळावर आहे. ह्या शिवलिंगाला एक छेद आहे आणि हे लिंग डाव्याबाजूला वाकले आहे.

३. इथली पूजा झाल्यानंतर मुंग्या नैवेद्य घेण्यासाठी एका रांगेत येतात. 

४. श्री षण्मुख त्यांच्या पत्नींसह स्वतंत्र देवालयामध्ये आहेत आणि त्यांच्या पायाखाली षट्कोनी चक्र आहे. 

५. श्री स्वर्णकाल भैरवांचे मुख खूप उग्र आहे.

६. इथल्या गाभाऱ्याच्या बाहेर असलेल्या द्वारपालांच्या मुखावरचे भाव खूप वेगळे आहेत.

७. श्री नटराजांची मूर्ती रुद्राक्ष मंडपामध्ये आहे. त्यांच्या पायांमध्ये पायल आहेत.

८. कोष्टामध्ये श्री शंकरनारायण ह्यांची मूर्ती आहे. हे खुप दुर्मिळ आहे.

मंदिराबद्द्ल माहिती:

हे मंदिर २०० फूट उंच टेकडीवर आहे. मंदिराला जाण्यासाठी १२५ पायऱ्या चढून जायला लागतं. हे मंदिर टेकडीवर असल्याकारणाने त्याला मलैकोविल असं पण म्हणतात. मंदिराच्या मार्गावर मधे मधे विश्रांती घेण्यासाठी बरेच मंडप आहेत. मंदिरामध्ये गाभारा, अंतराळ आणि अर्थमंडप आहेत. हे पूर्वाभिमुख मंदिर आहे. इथे दोन स्तरांचे राजगोपुर आहे आणि दोन परिक्रमा आहेत. राजगोपुर गाभाऱ्याच्या समोर आहे. बलीपीठ, ध्वजस्तंभ आणि नंदि हे गाभाऱ्याकडे मुख करून आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशाच्या दोन बाजूंना श्री गणेश आणि श्री मुरुगन ह्यांच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशावर दोन द्वारपाल आहेत. एका द्वारपालाच्या मुखावर उग्र भाव आहेत तर दुसऱ्या द्वारपालाच्या मुखावर स्मितहास्य आहे. शिवलिंग वारुळाचे बनले असून ते थोडे उत्तरेकडे झुकले आहे आणि त्याची पोत खडबडीत आहे. शिवलिंगामध्ये एक छेद आहे ज्यामुळे त्याचे दोन भाग आहेत असं वाटतं. असा समज आहे की डावा भाग श्री पार्वती देवी आहेत आणि उजवा भाग भगवान शिव आहेत. म्हणून ह्या लिंगाला शिव शक्ती असं संबोधलं जातं. हे शिव लिंग मातीचे असल्याकारणाने ह्याच्यावर अभिषेक होत नाही. फक्त तेलाचा लेप लावला जातो.

कोष्ठ मूर्ती: श्री विनायकर, श्री दक्षिणामूर्ती, श्री शंकरनारायण, श्री ब्रम्हदेव आणि श्री दुर्गादेवी. 

श्री चंडिकेश्वरर त्यांच्या नेहमीच्या जागी आहेत. पूजेच्या वेळेस इथे नैवेद्य घेण्यासाठी मुंग्या रांगेत येतात हे दृश्य बघायला मिळते. परिक्रमेमध्ये नालवर, सप्त मातृका, श्री विनायकर, श्री काशी विश्वनाथ, श्री वल्ली आणि श्री दैवानै समवेत श्री षण्मुख ह्यांची देवालये आहेत. 

गाभाऱ्याच्या मागे श्री विष्णू, श्री गजलक्ष्मी, नवग्रह ज्यामध्ये श्री सूर्यदेव त्यांच्या पत्नीसमवेत आणि श्री स्वर्णकाळ भैरव ह्यांची देवालये आहेत. श्री गजलक्ष्मी त्यांच्या देवालयामध्ये श्री काळभैरवांच्या समोर आहेत. श्री नटराजांच्या पाउलांमध्ये पायल आहेत. नालवरांच्या देवालयासमोर एक पादचारीमार्ग आहे. हा मार्ग त्रिची रॉकफोर्टकडे जातो. दुसऱ्या परिक्रमेमध्ये श्री अंबिका स्वतंत्र देवालयामध्ये आहेत आणि त्या दक्षिणाभिमुख आहेत. ह्या मंदिरामध्ये श्री अंबिकादेवींच्या दोन मूर्ती आहेत. ह्यातील एका मूर्तीमधले कमळ विस्कळीत झाले म्हणून ही मूर्ती बदलली गेली. श्री अंबिका देवींना दर दिवशी विविध अलंकार अर्पण केले जातात. टेकडीच्या पायथ्याशी गिरीवलम (प्रदक्षिणा) साठी आखलेला मार्ग आहे. श्री विनायकांना इथे श्री सेल्व विनायकर असे संबोधले जाते. श्री नंदि देव नंदि मंडपात आहेत. हा मंडप चारी बाजूंनी खुला आहे. टेकडीच्या पायथ्याशी श्री गणेशांची मूर्ती आहे. मंदिराच्या समोर येथील पवित्र तीर्थ आहे.

प्रार्थना:

१. इथे भाविक जन आळशीपणा जाऊन कार्यरत होण्यासाठी प्रार्थना करतात.

२. विघ्नांचे हरण करण्यासाठी इथे भाविक जन प्रार्थना करतात.

३. भाविक जन दोषनिवारणासाठी श्री षण्मुख आणि त्यांच्या पायाखालच्या चक्राची पूजा करतात.

पूजा:

१. दररोज सकाळी ५.३० ते संध्याकाळी ८ पर्यंत सहा पूजा केल्या जातात.

२. सोमवारी आणि शुक्रवारी विशेष पूजा केल्या जातात.

३. प्रदोष दिवशी प्रदोष पूजा केल्या जातात.

४. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या, पौर्णिमा आणि चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्या जातात. 

मंदिरात साजरे होणारे सण:

वैकासि (मे-जून): विशाखा नक्षत्राचा १० दिवसांचा ब्रम्होत्सव

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरु कार्थिगई, पौर्णिमेच्या दिवशी भाविक जन गिरीवलम (प्रदक्षिणा) करतात.

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

मंदिराच्या वेळा: सकाळी ६.३० ते दुपारी १२, संध्याकाळी ४.३० ते रात्री ८.३०

पत्ता: श्री एरुम्बीश्वरर मंदिर, थिरुवेरूम्बूर, त्रिची ६२००१३

दूरध्वनी: +९१-४३१६५७४७३८, +९१-९८४२९५७५६८ 

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


No comments:

Post a Comment