Sunday, February 2, 2025

थिरुक्कारकुडी येथील श्री उय्याकोंदण थिरूमाली मंदिर

ह्या स्थळाचे नाव थिरुमलैनल्लूर असे आहे. त्रिची पासून साधारण ५ किलोमीटर्सवर हे मंदिर आहे. हे मंदिर कावेरी नदीच्या दक्षिणकाठावर आहे म्हणजेच उय्याकोंदण ह्या नदीच्या काठावर आहे. शैव संतांनी स्तुती केलेल्या २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी हे एक मंदिर आहे. शैवसंत मूवर म्हणजेच श्री सुंदरर, श्री अप्पर आणि श्री संबंधर ह्यांनी त्यांच्या स्तोत्रांमधे ह्या मंदिराची स्तुती केली आहे. शैवसंत श्री अरुणागिरिनाथर ह्यांनी येथील श्री सुब्रमण्यम ह्यांच्या स्तुत्यर्थ स्तोत्रे रचली आहेत. पुराणांनुसार मूळ मंदिर रावणाचा सावत्र भाऊ करण ह्याने बांधले. श्री संबंधर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती केलेली असल्याकारणाने हे मंदिर सातव्या शतकाच्याही आधी अस्तित्वात असावे. सध्याचे मंदिर पल्लव राजांनी बांधले असावे आणि त्याचा जीर्णोद्धार चोळा राजांनी केला असावा आणि विस्तार विजयनगर राजांनी केला असावा. ह्या मंदिरामध्ये शिलालेख आहेत. त्यातल्या बऱ्याचश्या शिलालेखांमध्ये विविध राजांनी दिलेल्या देणग्यांचे उल्लेख आहेत. अठराव्या शतकातील एका राजपत्रातील उल्लेखानुसार फ्रेंच, ब्रिटिश आणि मुस्लिम राजांनी ह्या मंदिराचा युद्धांमध्ये बंकर म्हणून उपयोग केला.

मूलवर: श्री उज्जेवनाथर, श्री उचीनाथर, श्री मुक्तिसर, श्री कर्पगनाथर
देवी: श्री अंजनाक्षी, श्री बालांबिका, श्री मैवळीअम्माई
उत्सव मूर्ती: श्री भिक्षाटनर, श्री चंद्रशेखरर, श्री सुब्रमण्यम त्याच्या पत्नींसमवेत
क्षेत्र वृक्ष: बिल्व
पवित्र तीर्थ: कुडूमुरुट्टि नदी, ज्ञान वावी, एंकोनकिनारु, नाल्कोनारकिनारु, पुनोलीओडयै आणि अजून पांच तीर्थे आहेत.
पौराणिक नाव: थिरुक्कारकुडी, उय्याकोंदण थिरुमलै 

क्षेत्र पुराण:

पुराणांनुसार मृकंद ऋषींनी प्रखर तपश्चर्या केली आणि त्याच्या प्रभावाने त्यांना मार्कंडेय ऋषी पुत्र म्हणून प्राप्त झाले. मार्कंडेय ऋषींचे विधिलिखित आयुष्य फक्त १६ वर्षांचे होते. ते वेदपारंगत होते आणि त्यांना सर्व शास्त्रांचे ज्ञान होते. जेव्हां ते १६ वर्षाचे झाले तेव्हां त्यांचा प्राण घेण्यासाठी श्री यमदेव त्यांच्या मागावर होते. मार्कंडेय ऋषी आश्रय मिळविण्यासाठी बऱ्याच शिव मंदिरामंध्ये गेले. शेवटी ते ह्या मंदिरामध्ये आले आणि त्यांनी इथे भगवान शिवांना श्री यमदेव त्यांचे प्राण घेण्यासाठी त्यांच्या मागावर असल्याचे सांगितले. भगवान शिवांनी त्यांना श्री यमदेवांपासून रक्षण करण्याचे आश्वासन दिले. असा समज आहे कि मार्कंडेय ऋषींचे रक्षण करण्यासाठी भगवान शिव मंदिराच्या दक्षिण भागातून ध्वजस्तंभाच्या जवळ प्रकट झाले आणि त्यांची पदचिन्हे सोडून गेले. भगवान शिवांनी मार्कंडेय ऋषींचे रक्षण तीन मंदिरात केले. ह्या मंदिरात त्यांनी रक्षण करण्याचे आश्वासन दिले, थिरुकडीयुर येथे त्यांनी श्री यमदेवांचा वध केला आणि थिरुपंजिली येथे त्यांनी श्री यमदेवांना परत जीवित केले.

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

नारद मुनी, उपमन्य ऋषी, करण आणि मार्कंडेय ऋषी.

वैशिष्ट्ये:

१. हे मंदिर रावणाचा सावत्र भाऊ करण ह्याने बांधले असा समज आहे. त्याने इथे भगवान शिवांची उपासना केली.
२. श्री ज्येष्ठादेवींची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे.
३. मंदिराचा आकार तामिळ भाषेतल्या ॐ (ௐ) आहे.
४. श्री नटराजांची मूर्ती खूप सुंदर आहे.
५. इथली पवित्र तीर्थे अष्टकोण आणि आयताकृती आकाराची आहेत.

मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर १०० फुटावर एका खडकावर आहे आणि किल्ल्यासारख्या भिंतींनी वेढलेले आहे. मंदिरापर्यंत पोचण्यासाठी १०० पायऱ्या आहेत. हे माड शैलीचे मंदिर आहे. बाहेरील परिक्रमे व्यतिरिक्त पूर्ण मंदिर हे उंचीवर आहे. मंदिराचा तलाव मंदिराच्या आवारात आहे. मंदिराला तीन प्रवेशद्वारे आहेत त्यातील दोन दक्षिणाभिमुख आहेत तर एक पूर्वाभिमुख आहे. मंदिराचा व्याप साधारण चार एकर आहे. इथली सगळी देवालये आयताकृती भिंतींनी वेढलेली आहेत. मंदिराच्या पायथ्याशी श्री सुब्रमण्यम ह्यांचे त्यांच्या पत्नींसमवेत म्हणजेच श्री वल्ली आणि श्री दैवानै ह्यांच्या समवेत देवालय आहे आणि त्याच बरोबर श्री विनायकांचे पण देवालय आहे. हे पश्चिमाभिमुख मंदिर आहे. इथे ध्वजस्तंभ, बलीपीठ आणि नंदि हे गाभाऱ्याकडे मुख करून आहेत. इथले मुख्य प्रवेशद्वार हे गाभाऱ्याच्या समोर नाही. ते मंदिराच्या उजव्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे. मुख्य प्रवेशद्वाराला पांच स्तरांचे राजगोपुर आहे आणि मंदिराच्या पायऱ्या इथून चालू होतात.

गाभाऱ्यामध्ये गाभारा, अंतराळ आणि अर्थ मंडप आहे. शिव लिंग छोटे आहे आणि चौकोनी पीठावर (अवूदयार) आहे. थै महिन्याच्या एका दिवशी संध्याकाळी सूर्याची किरणे शिव लिंग तसेच श्री अंजनाक्षी ह्यांच्यावर पडतात. ध्वजस्तंभाच्या जवळ भगवान शिवांची पदचिन्हे दिसतात.

कोष्टामध्ये श्री विनायकर, श्री दक्षिणामूर्ती, श्री अर्धनारीश्वरर, श्री ब्रह्मदेव, श्री दुर्गादेवी आणि श्री चंडिकेश्वरर ह्यांच्या मूर्ती आहेत. 

भगवान शिवांच्या देवालयाच्या परिक्रमेमध्ये श्री गणेशाचे देवालय आहे ज्याचे नाव श्री शक्ती गणेश असे आहे. तसेच श्री लक्ष्मीदेवी, श्री सरस्वतीदेवी, श्री बालात्रिपुरसुंदरी, श्री सुब्रमण्यम त्याच्या पत्नींसमवेत, नवग्रह, श्री भैरव, श्री शनीश्वरर आणि श्री सूर्य ह्यांच्या मूर्ती आहेत. इथे श्री अंबिकादेवींची दोन देवालये आहेत. जेव्हां श्री अंबिकादेवींच्या हातातील कमळ पुष्प विस्कळीत झालं तेव्हां त्या मूर्तीच्या जागी नवीन मूर्ती स्थापित केली गेली. ही नवीन मूर्ती एकाने मंदिराला दान केली. श्री अंजनाक्षीदेवी ह्या पूर्वाभिमुख आहेत. त्या उभ्या मुद्रेमध्ये आहेत, त्यांना चार हात आहेत आणि त्यांचे नेत्र खूप आकर्षक आहेत. श्री अंजनाक्षीदेवींच्या परिक्रमेमध्ये श्री गणेश आणि श्री सुब्रमण्यम ह्यांची देवालये आहेत. श्री चंडिकेश्वरांची मूर्ती आहे. श्री बालांबिकादेवींची पश्चिमाभिमुख मूर्ती स्वतंत्र देवालयामध्ये आहे. तिन्ही देवालयांमध्ये श्री नंदि गाभाऱ्याकडे मुख करून आहेत. 

श्री नटराजांची स्वतंत्र देवालये आहेत ज्यामध्ये त्यांच्याबरोबर श्री शिवगामीदेवी आणि श्री ज्येष्ठादेवींच्या मूर्ती आहेत. ह्या प्रदेशात श्री ज्येष्ठादेवींची पूजा अजूनही केली जाते. श्री ज्येष्ठादेवींची मूर्ती वैशिष्ट्यपूर्णआहे. श्री ज्येष्ठादेवींना श्री लक्ष्मीदेवींची मोठी बहीण मानलं जातं. त्या त्यांच्या भक्तांचे अपघातांपासून संरक्षण करतात. त्या सर्व प्रवाशांना जागं ठेवतात आणि त्यांचं रक्षण करतात. पल्लव राजा नंदी वर्मन ह्यांच्या श्री ज्येष्ठादेवी कुलदेवी होत्या. जे श्री ज्येष्ठादेवींची मेरूरुपी मूर्तीची पूजा करतात ते हि मूर्ती नऊ पायऱ्यांच्या वरती ठेवतात. ह्या पायऱ्यांना नवआवरण असं म्हणतात. ह्यातील दुसरं आवरण हे श्री ज्येष्ठादेवी मानलं जातं. ह्या मंदिरामध्ये श्री ज्येष्ठादेवींच्या बाजूंना दोन लहान मुलांच्या मूर्ती आहेत. त्यातील एक मुलगा श्री नंदिकेश्वरांसारखा दिसतो. दुसरी मूर्ती एका मुलीची आहे जिला वाक्द्देवि म्हणून पुजलं जातं. असा समज आहे कि ह्या मंदिरात श्री अंजनाक्षीदेवी ह्या श्री ज्येष्ठादेवींच्या रूपात आहेत.  

श्री आदी विनायकांचे इथे स्वतंत्र देवालय आहे. श्री ईडरकंथन ह्यांचे इथे देवालय आहे. तामिळ मध्ये ईडर म्हणजे शंका किंवा अडचण आणि कंथन म्हणजे निरसन करणारा. अशी श्रद्धा आहे कि श्री ईडरकंथन हे शंकांचे आणि अडचणींचे निरसन करून विचारांची स्पष्टता प्रदान करतात. 

श्री नटराजांची मूर्ती: सरम ऋषींनी ज्याचा राज्याभिषेक केला त्या राजाला इथे भगवान शिवांची पूजा करताना भगवान शिवांचे आनंद नृत्य बघावयास मिळाले. असा समज आहे की शिल्पकारांनी ही मूर्ती बनवताना श्री नटराजांच्या पाऊलांचे माप घेऊन हि मूर्ती बनवली.

भगवान शिवांनी इथे मार्कंडेय ऋषींचे प्राण वाचवले म्हणून त्यांना इथे उज्जीवननाथर असे नाव आहे. 

भगवान शिव इथे भक्तांना वरदान देऊन त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात म्हणून त्यांना कर्पगनाथर असे नाव आहे.

प्रार्थना:

१. भाविक जन इथे आपल्या अपत्यांच्या कल्याणाप्रीत्यर्थ श्री अंबिकादेवींची पूजा करतात.
२. सुरक्षित प्रवास घडण्यासाठी इथे भाविक जन श्री ज्येष्ठादेवींची पूजा करतात.
३. असा समज आहे कि ह्या ठिकाणी पूजा केल्याने दीर्घ आयुष्य आणि समृद्धी प्राप्त होते.

पूजा:

१. दररोज चार पूजा केल्या जातात.
२. थै महिन्यात ज्या दिवशी सूर्याची किरणे भगवान शिव आणि श्री अंबिका देवींवर पडतात त्या दिवसापासून प्रत्येक ९० दिवसांनी सूर्य पूजा केली जाते.
३. प्रत्येक सप्ताहामध्ये सोमवारी आणि शुक्रवारी विशेष पूजा केली जाते.
४. प्रदोष दिवशी प्रदोष पूजा केली जाते.
५. प्रत्येक महिन्यात पौर्णिमा, अमावस्या, कृत्तिका नक्षत्र आणि चतुर्थीला पूजा केली जाते.

मंदिरात साजरे होणारे काही महत्वाचे सण:

वैकासि (मे-जून): वैकासि विशाखा
आडी (जुलै-ऑगस्ट): आडी पुरम. असा समज आहे कि ह्या दिवशी भगवान शिवांनी मार्कंडेय ऋषींना दर्शन दिलं.
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): स्कंद षष्ठी. ह्या उत्सवामध्ये श्री मुरुगन ह्यांचा श्री दैवानै ह्यांच्याबरोबरचा विवाह साजरा केला जातो. ह्या दिवशी श्री मुरुगन गावात जाऊन पांच मंदिरांचं दर्शन घेतात.
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरु कार्थिगई
थै (जानेवारी-फेब्रुवारी): थैपुसम
पंगूनी (मार्च-एप्रिल): ब्रम्होत्सवम, पंगूनी उत्तीरम 

मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते दुपारी १२, संध्याकाळी ५ ते रात्री ९

पत्ता: श्री उज्जीवनाथस्वामी मंदिर, उय्याकोंदण थिरुमलई, जिल्हा त्रिची

दूरध्वनी: +९१-९४४३१५०३३२, ९४४३६५०४९३


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment