Sunday, June 25, 2023

श्री कैलासनादर थिंगळूर - चंद्रग्रहाचे मंदिर

हे चंद्रदेवाचे मंदिर आहे. साधारण १५०० वर्षांपूर्वी बांधलेले आहे. 


मुख्य दैवत: श्री कैलासनादर 

अम्मन (देवी): श्री पेरियनायकी 

क्षेत्रवृक्ष: बिल्व 

पवित्र तीर्थ: चंद्र पुष्करिणी 

पत्ता: थिंगळूर, तंजावूर जिल्हा, तामिळनाडू


मंदिरापर्यंत पोचायचा मार्ग:  

कुंभकोणम वरून थिरुवैयरुकडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारण ३३ किलोमीटर्सवर हे मंदिर आहे. थिरुपळनं पासून २ किलोमीटर्सवर आहे.


ठळक वैशिष्ठ्ये:

पुरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर) आणि पंगूनी (मार्च-एप्रिल) ह्या महिन्यांमध्ये चंद्राची किरणे मूर्तीवर पडतात. चंद्रदेवाचे इथे स्वतंत्र देवस्थान आहे जिथे चंद्राची विशेष पूजा केली जाते. नवीन जन्मलेल्या बालकाला अन्नाचा पहिला घास भरवतात त्या संस्काराला अन्नप्राशन संस्कार म्हणतात. ह्या संस्कारासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे. इथे बालकाला आधी चंद्र आणि गायीचं साधन दाखवून मग  पहिला भाताचा घास भरवतात. 


चंद्र मंदिराचा इतिहास:

पुराणातील कथांनुसार चंद्र हा अतिशय सुंदर होता. त्यामुळे अर्थातच बऱ्याच मुलींना त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा होती. प्रजापतीला २७ सुंदर मुली होत्या ज्या चंद्राच्या सौन्दर्यावर मोहीत झाल्या होत्या. त्या सगळ्यांनी चंद्राबरोबर लग्न केलं. त्या सर्वांमध्ये चंद्राचं रेवतीवर जास्त प्रेम जडलं. पण त्यामुळे बाकी सर्व पत्नी आणि त्यांचा पिता प्रजापती हे चंद्रावर रुष्ट झाले. प्रजापतीने चंद्राला शाप दिला कि त्याच्या सर्व १६ कला एक एक करून प्रत्येक दिवशी नाश पावतील. चंद्र शंकराला शरण गेला आणि शंकरांच्या आज्ञेनुसार त्याने तपश्चर्या केली. त्याने स्वतः एक तीर्थ बनवलं. त्या तीर्थामध्ये स्नान घेऊन त्याने भगवान शंकराची पूजा केली. भगवान शंकर चंद्रावर प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्राला वरदान दिलं कि त्याच्या कला वैकल्पिकरित्या (अल्टरनेट) विकसित (शुक्ल पक्ष) आणि अविकसित (कृष्ण पक्ष) होतील. त्यातूनच शुक्ल आणि कृष्ण पक्ष निर्माण झाले. 


प्रार्थना: सहसा इथे विवाहातले अडथळे, अपत्य प्राप्ती आणि शिक्षणातील प्रगतीसाठी प्रार्थना करतात. 


मंदिरात साजरे होणारे सण:

मासी (फेब्रुवारी - मार्च): महाशिवरात्री

पंगूनी (मार्च - एप्रिल): पंगूनी उत्तरं 

मारगळी (डिसेंबर - जानेवारी): थिरुवाधिराई 

कार्तीगै (नोव्हेंबर - डिसेंबर): थिरुकार्थिगै

अमावस्या, कृत्तिका नक्षत्र, पौर्णिमा, महाशिवरात्री आणि आर्द्रा दर्शन या दिवशी इथे विशेष अभिषेक केला जातो.


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment