Sunday, April 2, 2023

श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या - भाग ५

मागच्या अंकात आपण श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या ह्या सदरातील भाग ४ वाचला. त्यामध्ये आपण भगवान शिवांच्या श्री वीरभद्रर आणि श्री चंडिकेश्वरर ह्या रूपांबद्दल माहिती वाचली. आता ह्या अंकात आपण भगवान शिवांच्या श्री दक्षिणामूर्ती ह्या रूपाबद्दल माहिती करून घेऊया. 

गुरुपरंपरेमध्ये भगवान शिवांना आदिगुरू असं समजलं जातं. आणि त्यांच्या आदिगुरुरूपाला श्री दक्षिणामूर्ती असं नाव आहे. ह्या रूपात ते वटवृक्षाखाली मृगाजिनावर दक्षिणाभिमुख बसलेले आहेत, त्यांचा एक पाय घडी घातलेल्या स्थितीत आहे तर एक पाय अज्ञान दर्शविणाऱ्या अपस्मार नावाच्या राक्षसावर ठेवलेला आहे आणि आपले प्रथम शिष्य सनकादि मुनी (सनक, सनन्दन, सनातन व सनत्कुमार) हे त्यांच्या समोर बसून ते आपल्या गुरूंकडून उपदेश घेत आहेत असं त्यांचं रूपदर्शन प्रसिद्ध आहे.

पुराणांनुसार ज्यांना कोणाला गुरु प्राप्त झालेले नाहीत ते श्री दक्षिणामूर्तींना आपला गुरु मानू शकतात आणि त्यांची गुरुभक्ती जर योग्य असेल तर पुढे जाऊन त्यांना आत्मज्ञानी गुरूंची प्राप्ती होईल.

शिव मंदिरामध्ये श्री दक्षिणामूर्तींची मूर्ती हि साधारणतः गाभाऱ्याभोवतीच्या दक्षिण दिशेच्या प्रदक्षिणेच्या मार्गावर दक्षिणाभिमुख असते. दक्षिण दिशा हि मृत्यूची किंवा परिवर्तनाची दिशा मानली जाते. म्हणजेच श्री दक्षिणामूर्ती हे त्यांच्या शिष्यांना, जे उत्तरेकडे म्हणजेच श्री दक्षिणामूर्तींकडे मुख करून बसले आहेत, त्यांना मृत्यूकडून अमृताकडे, परिवर्तनशील जगतातून अपरिवर्तनशील म्हणजेच सत्याकडे नेतात.

सप्ताहामधला पांचवा दिवस हा गुरु ग्रहाचा दिवस समजला जातो. आणि म्हणून दर गुरुवारी सर्व शिव मंदिरामंध्ये श्री दक्षिणामूर्तींची विशेष पूजा केली जाते.

पुढच्या अंकात आपण भगवान शिवांच्या श्री लिंगोद्भवर ह्या रूपाबद्दल माहिती करून घेऊया. 

 

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment