Monday, September 26, 2022

नवरात्रीतील देवीमाहात्म्य पठण

देवी म्हणे देवांलागून । जो एकाग्रचित्त होऊन । नित्य हें माहात्म्य पठण करून । तोषवील मजलागीं ।।
तयाच्या सकल बाधेत । नि:संशय स्वयें नाशितें । इहपरत्रीं सौख्य त्यातें । देऊनियां तोषवीन ।। 
                                    - देवीमाहात्म्य अध्याय १२ 


देव आणि असुर ह्यामध्ये ज्या ज्या वेळी युद्ध झाले आहे त्यावेळी देवीने देवांना वेगवेगळे अवतार घेऊन रक्षिले आहे. प्रत्येक मानवामध्ये दैवी आणि राक्षसी वृत्ती नांदत असतात. ह्या दैवी आणि असुरी वृत्तींमध्ये कायम युद्ध चालू असते. जेव्हा असुरी वृत्तींचा प्रादुर्भाव होतो अर्थात असुरी वृत्ती जेव्हा दैवी वृत्तींपेक्षा वरचढ होतात तेव्हा मानवाचा अहंकार, अभिमान जागृत होऊन त्यामुळे निर्माण होणाऱ्या क्लेश, दुःख अशा निराशाजनक भावनांतुन त्याला जायला लागतं. अशावेळी पूर्वपुण्याईने जर देवीमाहात्म्य वाचायची बुद्धी होऊन एकाग्रचित्ताने ह्या माहात्म्याचं पठण केल्यास त्या मानवाच्या असुरी वृत्तींचा नाश करून त्यास सौख्याचा अनुभव करून देईन असे स्वतः देवीनेच आश्वासन दिले आहे. 

देवीमाहात्म्याचं पठण कसं करावं? देवीमाहात्म्य संस्कृत मध्ये आहे तसेच प्राकृत म्हणजेच मराठी भाषेत पण आहे. संस्कृत भाषेतल्या देवीमाहात्म्याचे पठण करण्याच्या बाबतीत अनेक नियम आहेत ज्यात कुमारीपूजनाचाही भाग येतो. पण सर्वसाधारण भक्तांना हे नियम पाळणे शक्य नाही म्हणून श्री राम वर्णेकर ह्यांनी अत्यंत निस्वार्थी भावाने मराठी भाषेत देवीमाहात्म्य लिहिले ज्याच्या पठणाचे नियम सुलभ आणि सुकर आहेत. 

मराठी भाषेतले देवीमाहात्म्य पठण सुरु करण्याआधी श्री चंडीकवच, श्री अर्गलास्तोत्र आणि श्री कीलकस्तोत्र ह्यांचं पठण करावं आणि नंतर नऊ दिवसात १६ अध्यायांचं पठण करावं ते असं  १) तीन स्तोत्रे आणि अध्याय १  २) अध्याय २ व ३ ३) अध्याय ४ व ५ ४) अध्याय ६ व ७ ५) अध्याय ८ व ९ ६) अध्याय १० व ११ ७) अध्याय १२ ८) अध्याय १३ व १४ ९) अध्याय १५ व १६. प्रत्येक दिवशी शक्य असल्यास दुपारी १२ च्या आत त्या दिवसाचं पठण संपवावं. आणि १६ अध्यायांचं पठण पूर्ण झाल्यावर श्री शंकराचार्यकृत देवीअपराधक्षमापन स्तोत्र म्हणून देवीची क्षमा मागावी.   

No comments:

Post a Comment