Thursday, August 20, 2020

थिरुनागनाथस्वामी मंदिर - केतू ग्रहाचे मंदिर



हे मंदिर केतू ग्रहाशी निगडित असल्याने ह्या स्थळाला केतूस्थळ म्हणतात. ह्या मंदिरातील मुख्य दैवत भगवान शिव आहेत. 


मुलवर (मुख्य दैवत): नागनादर (भगवान शिव)

उत्सव मूर्ती: सोमस्कंदर

देवी: सौन्दर्यनायकी

क्षेत्र वृक्ष: बांबू 

गावाचे नाव: कीळ्पेरुम्पळ्ळम्

जिल्हा: नागपट्टीनं, तामिळनाडू 


समुद्रमंथन चालू असताना जेव्हा वासुकी नागाने विष ओकलं, तेव्हा सर्व देव देवतांचं रक्षण करण्यासाठी भगवान शिवांनी ते विष प्यायलं. भगवान शिवांनी विष प्यायलं ह्या गोष्टीचं वासुकीला खूप वाईट वाटलं आणि तिला खूप दुःख झालं. ह्या दुःखाचं निवारण करण्यासाठी तिने ह्या ठिकाणी तपश्चर्या केली. तिच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी तिला दर्शन देऊन आशीर्वाद दिला. वासुकीने भगवान शिवांना विनंती केली कि त्यांनी नागाच्या रूपातच इथे वास्तव्य करावं. तिच्या विनंतीला मान देऊन भगवान शिव इथे नागनादर (नागाचे नाथ) ह्या नावाने राहिले.


केतू मंदिराचा इतिहास: 

पुराणांनुसार ह्या स्थळाला खूप महत्व आहे. समुद्र मंथन प्रक्रियेमध्ये वासुकी नाग जेव्हा बेशुद्धावस्थेत गेली तेव्हा असुरांनी तिच्या शरीराचे तुकडे करून ह्या प्रदेशातील बांबूच्या वनात टाकले. भगवान शंकरांच्या कृपेने वासुकी नाग परत जिवंत झाली. तिने ह्या स्थळी तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांना इथे येऊन राहण्याची आणि जे कोणी त्यांची उपासना करतील त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवण्याची विनंती केली. 


येथील क्षेत्रवृक्ष बांबू आहे. 


केतू पुराण: समुद्र मंथनामध्ये जीव गमावलेले राहू आणि केतु जेव्हा परत जिवंत झाले तेव्हा त्यांना कोणीच आपलंसं करायला तयार नव्हतं. केतुला एका ब्राह्मणाने आश्रय दिला आणि त्याला वाढवलं. केतुने आपल्या मानलेल्या पित्याकडून ज्ञान ग्रहण केलं. त्याने ह्या स्थळी तपश्चर्या केली आणि ग्रह होण्याचं वरदान मिळवलं. केतुच्या पत्नीचं नाव आहे चित्रलेखा. आणि त्यांच्या पुत्राचं नाव अवमृत. केतुचं ह्या शिवाय अजून एका ठिकाणी मंदिर आहे.


ह्या स्थळातील तीर्थे: इथे नागतीर्थ नावाचं तीर्थ आहे. असा समज आहे कि हे तीर्थ वासुकी नागाने निर्माण केलं. ह्या तीर्थाच्या पश्चिम दिशेला एकमेकात मिसळलेले पिंपळ आणि कडुलिंब वृक्ष आहेत. ह्या ठिकाणी नागपूजा केली जाते.


साधारण माहिती:

ह्या मंदिरातील विनायकाला अनुग्रह विनायक ह्या नावाने पुजलं जातं. केतू देवाचं वेगळं देऊळ आहे. येथील केतूच्या मूर्तीला मानवी शरीर आणि सर्पाचं शिर आहे. भक्तांना आशीर्वाद देऊन त्यांना तो ज्ञान प्रदान करतो. म्हणूनच केतूला अनुग्रहकेतू आणि ज्ञानकारक ह्या नावांनी पुजलं जातं. केतू हे मंदिराचं मुख्य दैवत असल्याने इथे नवग्रहांचं वेगळं मंदिर नाही.


मंदिराचे वैशिष्ठ्य:

१) राहू काळ आणि यमगंड काळ ह्या काळांत इथे केतूदेवाच्या विशेष पूजा केल्या जातात. 

२) राहू आणि केतूच्या भ्रमण काळात विशेष होम हवन केलं जातं

३) जरी इथे नवग्रहांचं वेगळं मंदिर नसलं तरी इथे भगवान सूर्याच्या दोन मूर्ती आणि भगवान शनीची एक मूर्ती इथे दिसते. 


मंदिरात साजरे केले जाणारे सण:

१) शिवरात्रि (फेब्रुवारी-मार्च, तामिळ मध्ये मासी)

२) अन्नाभिषेक (ऑक्टोबर-नोव्हेंबर, तामिळ मध्ये ऎपसी)

३) वासुकी उत्सव (मार्च-एप्रिल, तामिळ मध्ये पंगूनी)  


आभार: खाली दिलेल्या वेब साईट्स वरून काही माहिती ह्या पोस्ट मध्ये समाविष्ट केली आहे

1. https://tamilnadu-favtourism.blogspot.com/ 2. https://temple.dinamalar.com/en/

3. http://www.indiatemples.in/

No comments:

Post a Comment