Thursday, June 4, 2020

सूर्यनार कोविल - सूर्यग्रहाचे मंदिर



हे सूर्य ग्रहाचे मंदिर आहे. सूर्य ग्रहदोषांचे हे परिहार स्थळ तर आहेच, पण
त्याशिवाय हे उर्वरित ग्रहदोषांचे पण परिहार स्थळ म्हणून मानले जाते.
साधारण २००० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले आहे. सर्व नवग्रहांपैकी हे एकच
नवग्रह स्थळ आहे जिथे मुख्य दैवत भगवान शिव नसून भगवान सूर्य
आहे. 

मुख्य दैवत: शिवसूर्यन 
अम्मन (देवी): उषादेवी, प्रत्युषादेवी (छायादेवी)
क्षेत्र वृक्ष : अर्घ वृक्ष (अर्घवन), (मराठी मध्ये रुई)
पवित्र तीर्थ: सूर्य तीर्थ
पत्ता: सूर्यनार कोविल, तंजावूर जिल्हा

मंदिरापर्यंत पोचण्याचा मार्ग:

मंदिराकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक म्हणजे कुंभकोणम किंवा
मैलादुथुराई कडून रस्त्याने सूर्यनार कोविल कडे जाऊ शकतो किंवा
अदुथुराई वरून रेल्वे करून पण जाऊ शकतो. पण रेल्वेचा मार्ग फार
काही सोयीस्कर नाही. अदुथुराई रेल्वे स्टेशन पासून मंदिर उत्तरेला
साधारण ३ किलोमीटर्स वर आहे.

ठळक वैशिष्ठ्ये:

हे भारतातील तीन प्रसिद्ध सूर्यमंदिरांपैकी एक आहे. येथील गाभाऱ्यात
सूर्यदेवाची मूर्ती पश्चिमाभिमुख आहे आणि मूर्तीच्या डाव्या बाजूला उषादेवी
तर उजव्याबाजूला छायादेवी वधूंच्या रूपात आहेत. सूर्यदेवाची मूर्ती उभी
असून त्यांच्या हातामध्ये लाल कमळ आहे. मूर्तीच्या पुढे सूर्यदेवाचे वाहन
म्हणजेच अश्वाची मूर्ती आहे. गुरुग्रहदेवाची मूर्ती सुर्याभिमुख आहे जणू
काही ते सूर्याला शांत करत आहेत. हे एकच मंदिर असं आहे की जिथे
एकाच ठिकाणी सर्व नवग्रहांची स्वतंत्र देवस्थाने आढळतात. इथले सर्व
नवग्रह हे अनुग्रह देण्याच्या रूपात आहेत आणि ते त्यांच्या वाहनांशिवाय
आहेत.

सूर्य मंदिराचा इतिहास:

पुराणातील कथांनुसार पूर्वी काल नावाचे ऋषी होते ज्यांनी स्वतःच्या
कुंडलीचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासामध्ये त्यांना आपले ग्रहदोष
समजले. ह्या ग्रहदोषांचं निवारण होण्यासाठी त्यांनी तपश्चर्या केली आणि
नवग्रहांना प्रसन्न केले. आणि नवग्रहांकडून त्यांनी आपल्या वंशजांना ह्या
ग्रहदोषांचा त्रास होणार नाही असा आशीर्वाद प्राप्त केला. अशा रीतीने ते
आणि त्यांचे वंशज पितृदोषापासून मुक्त झाले. पितृदोष हा पूर्वजांकडून
त्यांच्या वंशजांकडे येतो. 

जेव्हा नवग्रहांनी काल ऋषींना दिलेल्या आशीर्वादाची माहिती त्यांच्या
(नवग्रहांच्या) अधिदेवतांना -  म्हणजेच शिव, पार्वती, कार्तिक स्वामी
(मुरुगन), थिरुमल (विष्णू), ब्रह्म, वल्ली (कार्तिक स्वामींची पत्नी) ह्यांना
कळली, तेव्हा अधिदेवतांना त्यांचा खूप राग आला. त्यांच्या मते नवग्रहांना
ग्रहदोषांचे निवारण करण्याचा अधिकार नाही. अधिदेवतांनी नवग्रहांना
कुष्ठरोग सहन करायला लागेल असा शाप दिला. नवग्रहांना आपण आपली
मर्यादा ओलांडली आहे ह्याची जाणीव झाली आणि त्यांनी अधिदेवतांकडे
ह्या अपराधाबद्दल क्षमार्चना केली. नवग्रहांची क्षमार्चनेच्या मागील
प्रामाणिक भावना लक्षात घेऊन अधिदेवतांनी नवग्रहांना अर्घवनामध्ये
जाऊन तपश्चर्या करण्यास सांगितले. ह्या तपश्चर्येचं स्वरूप असं होतं -
रविवारी उपवास करून तेथील तीर्थामध्ये स्नान करून शिव आणि
पार्वतीची पूजा करणे आणि सोमवारी मंदारच्या पानावर दहिभाताचं सेवन
करणे. असे ११ रविवार करण्यास सांगितले. असे केल्यास त्यांची
शापापासून मुक्तता होईल असे आश्वासन दिले. नवग्रहांनी भक्तिभावाने ही
तपश्चर्या केली आणि त्यांचे कुष्टरोग निवारण झाले.

भगवान शिवांनी नवग्रहांना इथेच राहून भक्तांवर अनुग्रह करून त्यांचे
ग्रहदोष निवारण करण्याची आज्ञा केली.

मंदिरातील इतर देवस्थाने: भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश

मंदिरात साजरे होणारे सण:


  1. फेब्रुवारी महिन्यामध्ये १० दिवसांचा रथसप्तमी सण 
  2. प्रत्येक तामिळ महिन्याच्या पहिल्या रविवारी येथे भगवान सूर्यांवर विशेष अभिषेक आणि अर्चना केली जाते. 
  3. सूर्य आणि गुरु ग्रहांचे एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण होत असतांना इथे विशेष पूजा केल्या जातात.

No comments:

Post a Comment