Thursday, January 10, 2019

नवग्रह मंदिरे - बुध

बुधग्रह मंदिराची माहिती:


मंदिराची माहिती:


मंदिराचे नांव: थिरुवेनकाडू बुधकोविल  
स्थल देवता: श्वेतारण्येश्वर (श्वेत + अरण्य + ईश्वर) आणि श्री ब्रह्मविद्याम्बिका (श्री + ब्रह्मविद्या + अंबिका)   
ग्रहाचे नांव: बुध
गावाचे स्थान: थिरुवेनकाडू, तामिळनाडू ६०९११४, भारत

मंदिराकडे जाण्याचा मार्ग:

शिरकाळी च्या १७ किलोमीटर आग्नेयेला, पुम्बुकर च्या १० किलोमीटर पश्चिमेला आणि वैतीश्वरन कोविल पासून ११ किलोमीटर वर.

बुध ग्रह मंदिराचा इतिहास:

पुराणांनुसार मरुथुवासूर नावाचा राक्षस होता. त्याने प्रखर तपश्चर्या करून देवांकडून बरेच वर मिळवले होते ज्याच्यातून त्याला वेगवेगळ्या शक्ती मिळाल्या होत्या. पण त्याने त्या शक्ती वापरून देवांविरुद्धच युद्ध करायला सुरुवात केली. भगवान शंकरांनी सगळ्या देवांना थिरुवेनकाडू येथे रूप बदलून राहायला सांगितलं. मरुथुवासूरला जेव्हां ह्या गोष्टीची खबर लागली तेव्हा त्याने तिथे जाऊन देवांना त्रास द्यायला सुरुवात केली. भगवान शंकरांनी नंदी देवाला मरुथुवासूर बरोबर युद्ध करण्यास पाठवलं. मरुथुवासूरने त्याला भगवान शंकरांकडून वरदान म्हणून मिळालेल्या त्रिशुळाने नंदी देवाला भीषण रित्या जखमी केलं. आपल्या वरदानाचा असा दुरुपयोग बघून भगवान शंकर कोप पावले. क्रोधायमान भगवान शंकरांनी मरुथुवासूर बरोबर युद्ध करून त्याला शरण येण्यास भाग पाडलं.

ह्या देवळाच्या भिंतींवर शिल्पामधून ह्या कथेची माहिती दिली आहे. भगवान शंकराचं क्रोधायमान अघोर मूर्ती रूप, त्यांच्या पायाखाली मरुथुवासूर आणि बाजूला जखमी नंदी देव असा भिंतीवर कोरीव शिल्प आहे.

मंदिराच्या चारी बाजूंनी रथयात्रेसाठी मार्ग आखला आहे. मंदिराच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला राजगोपुरम आहे.

ह्या मंदिराच्या बाजूला ३ तीर्थ (कुंडं) आहेत. असा समज आहे कि भगवान शंकर जेव्हा स्वर्गामध्ये नृत्य करत होते त्यावेळी पाण्याचे थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातूनच ही तीर्थे निर्माण झाली. त्यांची नांवें - अग्नी तीर्थ, सूर्य तीर्थ आणि चंद्र तीर्थ.

ह्या स्थळी ३ प्रकारचे पवित्र वृक्ष आहेत: १. बिल्व, २. वडवळ आणि ३. कोन्नाई  

बुध ग्रहाचे महत्व:

बुध हा ज्ञानी आणि सर्व कलांमध्ये निपुण आहे. तो चंद्र आणि तारा यांचा पुत्र आहे. चंद्राने बृहस्पतींना आपला गुरु मानलं होतं. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी त्याने एकदा एका यागाचं आयोजन केलं होतं. ह्या यागाच्या वेळी बृहस्पती आणि त्यांची पत्नी तारा हे पण तिथे आले होते. चंद्राच्या सौंदर्यावर तारा मोहित झाली आणि ती चंद्राबरोबरच राहिली. तिला चंद्रापासून पुत्र झाला. हा पुत्र म्हणजेच बुध. ताराचं चंद्राबरोबर राहाणं हे धर्माविरुद्ध असल्याने भगवान शंकरांनी ताराला परत बृहस्पतींकडे जाण्याची आज्ञा केली आणि बुध चंद्राकडे राहिला. जेव्हा बुद्ध समंजस झाला तेव्हा त्याला चंद्राचा तिरस्कार झाला. त्याने हिमालयामध्ये जाऊन तपश्चर्या केली. सर्व कलांमध्ये तो निपुण झाला. भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला ग्रह होण्याचं वरदान दिलं.

बुध हा शुभ ग्रह मानला जातो आणि कुंडली मध्ये तो पुढील गोष्टींसाठी कारणीभूत असतो - ज्ञान, बुद्धी, ज्योतिषशास्त्रामधील नैपुण्य, वादविवादामधील नैपुण्य वगैरे

बुध ग्रहदोषांपासून निवृत्ती:

बुध ग्रह हा मिथुन आणि कन्या राशींचा स्वामी आहे. बुधग्रहाची अधि देवता भगवान महाविष्णू आहेत.

बुद्ध महादशा ही १७ वर्ष चालते.

जेव्हा कुंडलीमध्ये बुध सहाव्या, आठव्या किंवा बाराव्या घरात असतो तेव्हा तो प्रतिकूल परिणाम देतो. ज्योतिषशास्त्रानुसार पुढील गोष्टींवर बुधाचा प्रभाव असतो - मानसिक असंतुलन, अशक्तपणा, मेंदूमधले असंतुलन, शरीरावरचे पांढरे कोड (ल्युकोडर्मा), कुष्ठरोग

बुध ग्रहाची वैशिष्ठ्ये:


#
वैशिष्ठ्य
बुध ग्रह
पत्नी
इला
कपड्यांचा रंग
हिरवा  
लिंग
नपुंसक
पंच महाभूतातील घटक
पृथ्वी
देव
विष्णू
वाहन
सिंह
अधि देवता
विष्णू
धातू
कासे
रत्न (खडा)
पाचू
१०
अवयव
त्वचा
११
चव
मिश्र
१२
धान्य
मूग
१३
ऋतू
शरद
१४
ग्रहाच्या मुखाची दिशा
पूर्व
१५
पुष्प
पांढरी कण्हेर
१६
क्षेत्र वृक्ष
बिल्व / बेलफळ
१७
आठवड्यातला दिवस
बुधवार
१८
ध्वनी
सा


बुध ग्रहाची रांगोळी:


बुधाची पूजा करताना काढावयाची रांगोळी:




बुध ग्रहाचा श्लोक :


बुध ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ह्या श्लोकाचा जप करावा

ध्यान श्लोक:
प्रियङ्गुकलिकाश्यामं रूपेणाप्रतिमं बुधम् |
सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम् ||



No comments:

Post a Comment