Thursday, June 8, 2017

Ganesh - seventh incarnation of Lord Vinayaka

या अवतारात श्री शंकरांनी जो त्रिपुरासुराचा वध केला तो करण्याचे सामर्थ्य श्री शंकरांनी प्रत्यक्ष विनायकाची एकाक्षर मंत्रानेच म्हणजेच "ॐ गं" ह्या मंत्राची उपासना करून श्री विनायकाकडूनच मिळवले. त्यांच्या मुखातूनच विनायक श्री गणेशरूपाने प्रकट झाला. 

दशभुजा, पंचमुखी, पीतवर्ण अंगकांती, रत्नमौक्तिक धारण करणारा असे या अवतारात श्री गणेशाचे रूप आहे.

पूर्वयुगात त्रिपुर नांवाचा दैत्य होऊन गेला. तो अत्यंत दुष्ट व क्रूर होता. त्याने बळजबरी करूनच राक्षस व देव यांना जिंकून त्यांच्यावर आपले स्वामित्त्व प्रस्थापित केले. अगदी पाताळातील तक्षक, वासुकी यांनाही त्याने सोडले नाही. सर्व देवांना राजा इंद्रासहित त्याने स्वर्गातून पळवून लावले. 

त्याने अंतराळात तीन गोपुरे असलेले नगर बांधून तो स्वतः त्या सुंदर अशा नगरात वास्तव्य करीत असे. त्याच्या या नगराला त्रिपुर असे नांव त्याने दिले होते.

एक दिवस हिमालयातील मंदर पर्वताच्या गुहेत सर्व देव एकत्र जमले. त्या वेळी श्री शंकरांना एक कल्याणकारी अशी कल्पना सुचली. 

त्यांनी स्वतः विनायकाचा  "ॐ गं" हा एकाक्षरी मंत्र एकाग्रमनाने, निराहार, दिवसरात्र शुद्ध अंतःकरणाने करण्यास सुरुवात केली. ज्या ॐ या बीजापासून सर्व वेदांची निर्मिती झाली त्याचा त्यांनी जप सुरु केला. थंडी, ऊन पाऊस यांतही त्यांचे उग्र तप चालू होते. शेवटी त्यांनी त्या परमात्म्याची स्तुती करण्यास सुरुवात केली. "तुझे अहोरात्र मी ध्यान करत आहे कारण सर्व देव संकटात आहेत. ते स्वर्ग सोडून हिमालयात वास करत आहेत. त्रिपुरासुरापासून त्यांचे रक्षण करून त्यांची ह्या संकटातून तूंच सुटका करू शकतोस. तुझी भक्ती केल्यास उपनिषदांबद्दल प्रेम उत्पन्न होते. योगी, तापसी यांना कठोर तपश्चर्येनंतरच तुझी प्राप्ती होते. मलाही तुझे वरदान हवे आहे." अशी विनायकाची स्तुती केल्यानंतर प्रसन्न होऊन प्रत्यक्ष विनायक त्यांच्या मुखातून श्री गणेशाच्या रूपाने प्रकट झाला. तो दहा हातांचा, पांच मुखांचा, सोन्यासारखी कांती असलेला, दशदिशा उजळून टाकणारा दिव्य पुरुष पहाताच श्री शंकरांनी त्याला "आपण कोण? कुठून आलात? आपले नाव काय?" असे विचारले.

श्री शंकरांनी असे विचारताच विनायकाला आश्चर्य वाटले. तो म्हणाला "तूं माझे सदासर्वकाळ एकाग्रमनाने ध्यान केलेस तो मी, ब्रह्माण्ड व्यापून उरणारा, त्रिगुणात वास करणारा, सर्वांच्या अंतरात्म्यात वास करणारा, जगच्चालक असा परमात्मा "श्री गणेश" या नांवाने तुझ्या मुखातूनच प्रकट झालो आहे. तुझी इच्छा असेल ते तू माग" 

श्री शंकरांनी विनायकाला साष्टांग नमस्कार करून त्याच्याकडे त्रिपुरासुराला मारण्यासाठी शक्ती मागितली. विनायकाने प्रसन्न मनाने त्याला वरदान दिले. विनायकाने "तू बीजमंत्राचा तीन वेळा उच्चार करून बाण किंवा त्रिशूल सोडल्यास तुला जय मिळेल" असे सांगितले. 

श्री शंकरांना आनंद झाला व देवांबरोबर जाऊन त्यांनी त्रिपुरासुराला युद्धाचे आव्हान करून त्याचा त्रिशुळाने वध केला. 

असा हा विनायकाचा श्री गणेश अवतार संपन्न झाला!

अशा तऱ्हेने विनायकाने नाना अवतार धारण करून दुष्ट दैत्य मारले व जगताचे रक्षण केले. 

पुढल्या आठवड्यात श्री विनायक विजय ग्रंथाची फलश्रुती प्रस्तुत करू. 

No comments:

Post a Comment