Friday, September 2, 2011

गणेश चतुर्थी


("आपले सण - एक सुलभ संकल्पना" - वेदमूर्ती विनायक वासुदेव भातखंडे व विलास मोरेश्वर कर्णिक, एम. ए, ह्यांच्या पुस्तकातून)

संपूर्ण भारतभर, विशेष करून, महाराष्ट्रामध्ये, अत्यंत उत्साहाने साजरे होणाऱ्या ह्या उत्सवाविषयी समाजामध्ये काही समज-गैरसमज आहेत, ते सर्वप्रथम दूर करणे आवश्यक आहे.

केव्हा:
भाद्रपद शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत दीड दिवसाचा, पाच दिवसांचा, गौरी बरोबर विसर्जित होणारा, सात दिवसांचा, एकादशीचा अथवा अनंत चतुर्दशीला विसर्जित होणारा असे विविध दिवस गणपतीचा उत्सव साजरा केला जातो. सर्वसाधारणपणे हा उत्सव सप्टेंबर महिन्यात येतो.

परंतु वैदिक शास्त्राप्रमाणे गणपती उत्सव फक्त दीड दिवसाचाच असतो. शास्त्राप्रमाणे गणपतीची पार्थिव मूर्ती म्हणजेच काळ्या चिकणमातीची मूर्ती आकाराने हाताच्या अंगठ्यापासून वितीपर्यंत उंच असावी. मूर्ती मृत्तिकेची असल्यामुळे न भंगता ती फार दिवस टिकणे केवळ अशक्यच आहे. सर्वसाधारणपणे दीड दिवसापर्यंत मूर्ती भंग होण्याची शक्यता नसते आणि म्हणूनच गणेश उत्सव हा दीड दिवसच असायला हवा.

ह्या ठिकाणी हे पण नमूद करणे आवश्यक आहे की, पूर्वी मूर्ती लहान असे. एवढेच नव्हे तर, तिच्यावर फक्त हळद, कुंकू आणि वनस्पतींपासून तयार केलेले रंग ह्यांचाच प्रयोग केला जात असे. परिणामतः ह्या मूर्तीच्या विसर्जनाने प्रदूषण होण्याची शक्यता फारच कमी असे. त्याचप्रमाणे गणपती विसर्जन पाण्यात करणे याला सुद्धा शास्त्राचा आधार नाही.

प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्तीवर उत्तरपुजेच्या (विसर्जनाच्या) अक्षता टाकल्यावर मूर्तीतील देवत्व नष्ट होऊन ती मूर्ती केवळ मृत्तिका असल्यासारखेच आहे. मातीत माती मिसळून जावी ह्या उद्देशाने विसर्जन शेतात अथवा वाहत्या पाण्यात करावे. विहिरीमध्ये विसर्जन करणे शक्यतो टाळावे कारण त्यामुळे विहिरीचे झरे बंद होण्याचा धोका तर संभवतोच पण त्याचबरोबर मूर्तींना लावलेल्या विचिध केमिकल्सच्या रंगाने पाणी दुषित होते. तीच गोष्ट तलावांच्या बाबतीतपण आहे. शास्त्रीय संकेत बाजूला ठेवल्यास गणपती उत्सवाचे स्वरूप खालीलप्रमाणे असून त्यात सार्वजनिक उत्सवाचा अंतर्भाव नाही.

गणपती कसा व कशाप्रकारे आणावा?
वर उल्लेख केल्याप्रमाणे श्रींची मूर्ती ही वास्तविक पहाता एक वीतेपेक्षा मोठी नसावी. परंतु सध्याच्या काळात ही गोष्ट मान्य करणे जरा कठीणच दिसते. तरीसुद्धा कमीत कमी मूर्ती पोकळ नसावी ही दक्षता घ्यावी कारण पोकळ मूर्तीत प्राणप्रतिष्ठा होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे गणेश चतुर्थी हा गणेश जन्माचा दिवस आहे म्हणजेच गणेशाची मूर्ती ही बालस्वरूपच असते म्हणून मूर्ती कितीही मोठी असली तरी गणेशाच्या चेहेऱ्यावरचे भाव हे निरागस बालकाचेच असावेत.

मुर्तीकाराकडून मूर्ती घरी आणताना नादमधुर अशा वाद्यांचाच उपयोग करावा. (उदा. झांजा, वीणा, पखवाज वगैरे) कुठल्याही परिस्थितीत कर्कश आवाजांची वाद्ये वाजवू नयेत. श्रींची मूर्ती आणताना तिचा चेहेरा कुणाचीही नजर लागू नये म्हणून वस्त्राने झाकावा. मूर्ती सर्वसाधारणपणे डाव्या सोंडेची असावी. उजव्या सोंडेचा गणपती आणल्यास प्राण प्रतिष्ठेपासून विसर्जनापर्यंत कडक सोवळे पाळायला लागते.

गणपतीची प्राणप्रतिष्ठा शक्यतो सर्वसाधारणपणे पहाटे पाच ते सूर्योदयापूर्वी म्हणजेच अरुणोदय ते सूर्योदयापूर्वी सूर्योदय काळी करावी, असा संकेत असल्याने गणपतीची मूर्ती आदल्यादिवशी आणून ठेवण्याची प्रथा पडत चालली आहे. गुरुजींच्या कार्यबाहुल्यामुळे व त्यांच्या उपलब्धतेची कमतरता असल्यामुळे सुद्धा गणपतीची मूर्ती आदल्यादिवशी आणतात.

पूजा कशी करावी?
गणेशाची प्राणप्रतिष्ठा गुरुजींच्या हस्ते करण्याचा प्रघात आहे, परंतु हे बंधनकारक नसून ज्या व्यक्तींनी गुरुमुखातून संथा घेतली आहे, त्यांनी स्वतः प्राणप्रतिष्ठा करावयास प्रत्यवाय नाही. पुजेची तयारी अशी! (इथे लिहिलेले साहित्य पंचामृती पूजेचे लागते) हळद, कुंकू, गंध, शेंदूर, अबीर, गुलाल, अक्षता, जास्वंद, मंदार अथवा इतर तांबडी फुले, दुर्वा, शमी, केवडा, तुळस (फक्त गणेश चतुर्थीलाच गणपतीला वाहतात) बेल व नानाविध पत्री, श्रीफळ, विड्याची पाने, सुपाऱ्या, जानवी-जोड, गुळ-खोबरं, उदबत्ती, निरांजन, कापूर, स्नानासाठी पंचामृत (दुध, दही, तूप, मध, साखर) अत्तर, गरम पाणी, नैवेद्यासाठी पेढे व उकडीच्या मोदकासह महानैवेद्य.

साहित्याची व्यवस्था केल्यानंतर पुढील कार्य गुरुजी शास्त्राप्रमाणे यजमानांकडून करवून घेतात; पण पूजेला बसण्याआधी यजमानांनी काही दक्षता घेणे आवश्यक आहे. उदा. सोवळे नेसून व खांद्यावर उपरणे अथवा शाल पांघरून, कुंकूम तिलक लावून मगच पूजेसाठी स्थानापन्न व्हावे. त्याआधी घरातील देवांची पूजा झालेली असावी. कुलस्वामिनी व कुलदेवतेस नारळ-विडा ठेवून आई-वडिलांना (हयात अथवा दिवंगत) नमस्कार करून पुजेस आरंभ करावा. ह्यानंतर अर्थातच गुरुजींच्या अधिपत्याखाली पूजन करावे.

आता गणपतीच्या नैवेद्याविषयी विशेष गोष्ट:
सर्वसाधारणपणे बहुतांश लोकांकडे डाव्या सोंडेचा गणपती आणतात व ते योग्यच आहे. जर गणपती डाव्या सोंडेचा असेल तर त्याला सुके खोबरे व गुळ हे प्रिय आहे, हे लक्षात घेऊन त्याचा नैवेद्य दाखवावा. तसेच गुळ - नारळा मिश्रित अथवा खव्याचे तळलेले मोदक ह्याचा पण नैवेद्य दाखवावा. जर गणपती उजव्या सोंडेचा असेल, तर खरवडलेल्या ओल्या नारळाचा किस व गुळ ह्याचा नैवेद्य दाखवावा. तसेच उकडीच्या मोदकांचा सुद्धा नैवेद्य दाखवावा. परंपरेने मात्र सर्वजण दोन्ही प्रकारच्या गणपतींना उकडीच्या मोदकांचाच नैवेद्य दाखवतात.

थोडे विषयांतर करून असे सांगावेसे वाटते की, मनोभावे संकष्टी करणाऱ्या भाविकांनी कदापिही चंद्रोदयापुर्वी उपवास सोडू नये. तसे केल्यास संकष्टी व्रताचे फळ मिळत नाही. संकष्टी ही संकट निवारणासाठी करत असल्यामुळे फलप्राप्तीसाठी उपासकांनी ही काळजी घ्यावी. काही लोक फक्त मंगळवारी येणाऱ्या संकष्टीला म्हणजेच अंगारकी (जी वर्षातून दोन वेळेलाच येते) उपवास करतात. वास्तविक पहाता, उपवास केल्यास सर्वच संकष्टीचा करावा. विनायकी चतुर्थी ही गणपतीचा वरदहस्त कायम असावा म्हणून करतात. आणि म्हणूनच हा संपूर्ण दिवसाचा उपवास आहे.

गणेश चतुर्थी ह्या सणाविषयी माहिती देताना गौरी विषयी सुद्धा माहिती देण्याचा मोह होतो; पण तो कटाक्षाने टाळला आहे. शास्त्राप्रमाणे गौरीच्या उत्सवाचा व गणपती उत्सवाचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. गौरीचा उत्सव हा स्वतंत्र उत्सव असून तो साजरा करण्याच्या प्रथा सुद्धा भिन्न भिन्न आहेत.

गणेश चतुर्थीविषयी लिहिताना, लोकमान्य टिळकांनी आरंभ केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाविषयी चार शब्द सांगावेसे वाटतात. गणेश मूर्ती ही प्रायः बाल स्वरूप असल्यामुळे मूर्ती शक्यतो अवाढव्य नसावी. तसेच मूर्तीचे आगमन हे नादमधुर संगीतातच असावे. कर्कश्श वाद्यांचा वापर हा रणांगणात करावयाचा असतो, हे भाविकांनी लक्षात घ्यावे. त्याचप्रमाणे उत्सवासाठी निधी गोळा करताना बळजबरी करू नये. अलीकडे सजावट व रोषणाई पडदे लांवून झाकली जाते. त्याचा परिणाम म्हणजे दर्शनासाठी लांबच-लांब रांगा लागण्यात होतो. परिणामतः ज्येष्ठ नागरिक तसेच लहान अपत्याला घेऊन येणाऱ्या स्त्रिया श्रींच्या दर्शनापासून वंचित रहातात. तसेच गणेशोत्सव मंडळांनी आलेल्या निधीचा विनियोग गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केल्यास लोकमान्य टिळकांनी चालू केलेल्या गणेश उत्सवाचे सार्थक तर होईलच तसेच विद्येचे दैवत असणारा गणेश सुद्धा आयोजकांवर संतुष्ट होईल.

No comments:

Post a Comment