हे मंदिर कुंभकोणम-नागपट्टीनं मार्गावर आहे. कुंभकोणम पासून ४६ किलोमीटर्सवर, मयीलादुथुराई पासून ३८ किलोमीटर्सवर, थिरुवारुरपासून २५ किलोमीटर्सवर थिरूकंदपूरम पासून ८ किलोमीटर्सवर आणि नन्नीलं पासून १७ किलोमीटर्सवर आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. शैव संत संबंधर, अप्पर आणि वल्ललर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. शैव संत अरुणागिरिनाथर ह्यांनी ह्या मंदिरातील श्री मुरुगन ह्यांची स्तुती गायली आहे. हे कोचेंगट चोळा राजाने बांधलेल्या ७० माड कोविल पैकी एक मंदिर आहे. हे मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. असा समज आहे की हे मंदिर ३ऱ्या शतकात बांधलं असावं. चोळा राजांनी ह्या मंदिराची ग्रॅनाईट वापरून पुनर्निर्मिती केली आणि नायक आणि मराठा राजांनी जीर्णोद्धार केला. इथल्या शिलालेखांमध्ये सरभोजी ह्या मराठा राजाने तसेच इतरांनी मंदिराला दिलेल्या देणग्यांचे उल्लेख आहेत.
मूलवर: श्री रत्नगिरीश्वरर, श्री माणिक्कवन्नर
देवी: श्री वंदरकुळली
पूजा / आगम: कामीग आगम
पवित्र तीर्थ: लक्ष्मी तीर्थ, माणिक तीर्थ
पवित्र वृक्ष: मारुगल (तामिळ मध्ये एक प्रकारचे केळ्याचे झाड)
पुराणिक नाव: मारुगल, थिरुमारुगल
वर्तमान नाव: थिरुमारुगल
क्षेत्र पुराण:
१. पुराणानुसार एकदा ऋषींमध्ये भगवान शिव, श्री ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू ह्यांमध्ये कोण श्रेष्ठ आहे ह्यावर वाद झाला. हा वाद मिटविण्यासाठी भृगु ऋषी भगवान शिव आणि श्री ब्रह्मदेव ह्यांना भेटायला गेले. त्यांना तिथे अपेक्षित मान नाही मिळाला असं वाटलं म्हणून ते भगवान विष्णूंकडे गेले. त्यावेळी भगवान विष्णू श्री लक्ष्मीदेवींबरोबर होते. भृगु ऋषींना दोन मुहूर्त वाट पाहून पण भगवान विष्णूंना भेटता नाही आलं म्हणून त्यांना क्रोध आला आणि त्यांनी विष्णूंच्या हृदयावर लाथ मारली. भगवान विष्णूंनी भृगु ऋषींची पाऊलं धरून ती प्रेमाने चोळली. श्री लक्ष्मी भगवान विष्णूंच्या हृदयात वास करतात म्हणून भगवान विष्णू भृगु ऋषींची पाऊलं चोळत आहेत हे पाहून लक्ष्मीदेवींना क्रोध आला. त्या भगवान विष्णूंना सोडून गेल्या आणि जाताना भगवान विष्णूंना त्यांच्याकडे म्हणजेच लक्ष्मीदेवींकडे जायला भाग पाडतील असं सांगून गेल्या. त्यांनी बऱ्याच तीर्थक्षेत्रांना भेट दिलीआणि शेवटी त्या इथे कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आल्या. त्यांनी इथे एक तीर्थ बनवलं आणि श्री विष्णूंशी पुनर्मीलन व्हावं म्हणून भगवान शिवांची उपासना केली. ह्या तपश्चर्येमध्ये त्यांनी वरलक्ष्मी व्रत पाळलं. शेवटी भगवान शिवांनी भगवान विष्णू इथे आणून त्यांचा मिलन घडवून आणलं. ह्या घटने स्मृत्यर्थ इथल्या तीर्थाला लक्ष्मी तीर्थ संबोधलं जातं.
२. स्थळ पुराणानुसार हे स्थळ रानटी झुडपे, लहान झुडपे आणि काटेरी झाडे ह्यांनी भरलेले वन होते. कुषकेतू नावाचा राजा इथे वन साफ करत होता. साफ करताना एकदा कुदळ एका कठीण वस्तूवर लागली. राजाने तिथली जागा स्वच्छ केली तेव्हा त्याला शिव लिंग दिसले. इथे अजूनही शिव लिंगावर कुदळीचा व्रण दिसतो.
३. स्थळ पुराणानुसार पांड्या राज्यामध्ये धमनीन नावाचा एक व्यापारी राहत होता. आपली सर्वात थोरली मुलगो तुला देईन असं वचन त्याने आपल्या भाच्याला देऊन त्याला आपल्याकडे कामाला ठेऊन घेतले. पण त्याने वचन मोडून आपल्या थोरल्या मुलीचे लग्न आपल्या पसंतीच्या मुलाबरोबर लावून दिले. त्याने नंतर त्या भाच्याला त्याची दुसरी मुलगी देण्याचे वचन दिले. ते वचन पण त्याने मोडले आणि आपल्या दुसऱ्या मुलीचे पण लग्न आपल्या पसंतीच्या मुलाबरोबर लावून दिले. असं करत करत त्या व्यापाऱ्याने आपल्या सहा मुलींची लग्न वचन मोडून आपल्या पसंतीच्या मुलांबरोबर लावून दिली. सातव्या मुलीला हे आपल्या वडलांचं वचन मोडणं आवडलं नाही. ती त्या तरुण मुलाशी, म्हणजेच व्यापाऱ्याच्या भाच्याशी लग्न करण्याचे ठरवून त्याला घेऊन ती दुसऱ्या गावात गेली. वाटेवर ते थिरुमारुगल इथे रात्री विश्रांतीसाठी थांबले. त्या रात्री त्या मुलाला सर्पाने दंश केला. ती मुलगी खूप व्यथित झाली कारण तिला तिथे मदतीला कोणीच नव्हतं. तिने भगवान शिवांची प्रार्थना केली. शैव संत संबंधर त्यावेळी मंदिराकडे जात होते आणि त्यांनी ह्या मुलीचं आक्रंदन ऐकलं. त्यांचं हृदय कालवलं आणि त्यांनी तिच्या मदतीसाठी भगवान शिवांची स्तुती गायली. भगवान शिव त्या स्तुतीने प्रसन्न झाले आणि त्यांनी श्री विनायकांमार्फत त्या मुलाचे विष काढून घेतले. भगवान शिव त्या मुलीच्या आणि मुलाच्या समोर प्रकट झाले. संबंधरांनी भगवान शिवांसमक्ष त्या दोघांचा विवाह करविला. श्री विनायकांना इथे विष-तीर्थ-विनायक असे संबोधले जाते (म्हणजे ज्यांनी विष काढून घेतले).
४. सर्पाचा दंश झालेल्या मुलाला वाचविल्यानंतर संबंधर थिरुमारुगल इथेच राहिले. संबंधर इथे वास्तव्य करून असताना एकदा सिरूथोंडर नायनार इथे आले आणि त्यांनी संबंधरांना थिरुचेनगट्टनकुडी इथल्या मंदिरात येण्याचं निमंत्रण दिलं. थिरुचेनगट्टनकुडीला निघण्याच्या आधी संबंधर आणि सिरूथोंडर नायनार थिरुमारुगल इथल्या मंदिरात आले आणि त्यांनी इथे भगवान शिवांची पूजा केली. जेव्हा ते मंदिरातून निघण्याच्या तयारीत होते त्यावेळी भगवान शिवांनी त्यांना थिरुचेनगट्टनकुडी येथील श्री गणपतीश्वरर रूपांत दर्शन दिले. त्यावेळी संबंधर ह्यांनी दोन्ही मंदिराची स्तुती ह्याच ठिकाणी गायली.
५. मागच्या लेखात आम्ही चार अंबिका देवींचा उल्लेख केला होता. त्या चार पैकी श्री वंदरकुळली ह्यांनी इथल्या मंदिरातील भगवान शिवांशी विवाह केला. नंतर त्यांनी एका गर्भवती स्त्रीला तिच्या प्रसूतीमध्ये मदत केली. आणि त्यानंतर त्या मंदिराच्या बाहेरच राहिल्या. म्हणून इथे श्री वंदरकुळली ह्यांचे देवालय मंदिराच्या बाहेर आहे.
६. पुराणानुसार श्री ब्रह्मदेवांनी इथे त्यांची लोप पावलेली शक्ती परत प्राप्त करण्यासाठी इथे तपश्चर्या केली.
७. स्थळपुराणानुसार पराशर ऋषींनी त्यांच्याकडून घडलेल्या पापांचं क्षालन करण्यासाठी इथे तपश्चर्या केली.
८. स्थळपुराणानुसार एकदा इथे प्रखर दुष्काळ पडला होता. तेव्हा भगवान शिवांनी रत्न पुरवून दुष्काळ घालवला. म्हणून इथे भगवान शिवांना माणिक्कवनर किंवा रत्नगिरीश्वरर असे संबोधले जाते.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
पराशर ऋषी, श्री ब्रह्मदेव, भृगु ऋषी, श्री लक्ष्मी देवी, कुषकेतु राजा.
वैशिष्ट्ये:
१. इथले शिव लिंग स्वयंभू आहे.
२. इथले मुख्य दैवत (मूलवर) श्री गणेश आहेत.
३. असा समज आहे कि ह्या मंदिरात जे उपासना करतात त्यांना कधीही सर्पदंश आणि इतर विषारी किड्यांचा उपद्रव होत नाही.
४. ह्या क्षेत्राला पूर्वी कदलीवन असे नाव होते.
५. इथल्या क्षेत्र वृक्षाची फळे खूप गोड आहेत. पण हे वृक्ष जर मंदिराच्या बाहेर लावलं तर ते वाढत नाही.
मंदिराबद्दल माहिती:
ह्या मंदिराला दोन प्रवेशद्वार आहेत. मंदिरामध्ये गाभारा, अंतराळ, महामंडप आणि मुखमंडप आहेत. पूर्वेकडील प्रवेशाच्या इथे पांच स्तरांचं राजगोपुर आहे तर दक्षिणेकडील प्रवेशाच्या इथे तीन स्तरांचं राजगोपुर आहे.
इथे दोन परिक्रमा आहेत आणि त्या भिंतींनी आच्छादलेल्या आहेत. राजगोपुराच्या पुढे ध्वजस्तंभ, बलीपीठ आणि नंदी गाभाऱ्याकडे मुख करून आहेत. ध्वजस्तंभाच्या डावीकडे शमी वृक्षाच्या खाली एक फलाट (प्लॅटफॉर्म) आहे.
असा समज आहे कि शैव संत संबंधर ह्यांनी एका तरुण मुलाचा विवाह एका तरुण मुलीबरोबर भगवान शिवाच्या समक्ष घडवून आणला.
इतर माड कोविल मंदिरांप्रमाणे इथेपण थोड्या उंचावर असलेल्या गाभाऱ्यात काही पायऱ्या चढून जायला लागतं.
शिव लिंग स्वयंभू आहे. ते पूर्वाभिमुख असून एका चौथऱ्यावर (अवूदयार) आहे. गाभाऱ्याचा आकार शिव लिंगासारखा आहे.
कोष्ठ मूर्ती: श्री विनायक, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिङ्गोद्भवर, श्री ब्रह्मदेव आणि श्री दुर्गा देवी.
श्री चंडिकेश्वरांचे देवालय त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी आहे.
श्री अंबिका देवींचे देवालय मुखमंडपामध्ये उजव्याबाजूला आहे आणि ते दक्षिणाभिमुख आहे. अंबिका देवींच्या देवालयाजवळ श्री चंडिकेश्वरींचे देवालय आहे. ह्या देवालयामध्ये काही चित्रे आहेत ज्यामध्ये कुषकेतु राजाचे पुराण तसेच संबंधरांनी तरुण मुलाला सर्प दंशापासून वाचविल्याची कथा चित्रित केली आहेत. श्री शनीश्वरांचे देवालय श्री अंबिका देवींच्या देवालयाच्या उजव्या बाजूला आहे.
महामंडपामध्ये नटराज सभा आहे. ह्या सभेमध्ये पतंजली ऋषी, व्याघ्रपाद ऋषी तसेच तरुण मुलाची चित्रे आहेत.
परिक्रमेमधली इतर देवालये आणि मूर्ती: श्री सोमस्कंदर, श्री माणिक्कवनर, शैव संत नालवर, ६३ नायनमार, श्री प्रार्थना विनायक, शिव लिंगाची पूजा करत असलेले पराशर ऋषी, वल्ली आणि दैवानै समवेत श्री सुब्रमण्यम.
आतल्या परिक्रमेमध्ये चौथऱ्यावर पुढील मूर्ती आणि देवालये आहेत: श्री महालक्ष्मी, नटराज सभा, नवग्रह, श्री भैरव, श्री चंद्र, श्री सूर्य, नाग, तरुण मुलगा आणि तरुण मुलगी.
ह्याशिवाय बाहेरील परिक्रमेमध्ये सप्त मातृका, श्री गणेश आणि श्री सौंदर्यनायकी आहेत.
मंदिराच्या तीर्थाच्या काठावर श्री मुथू विनायक ह्यांची मूर्ती आहे.
जमिनीच्या पातळीवरील परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती आणि देवालये आहेत: श्री तीर्थ विनायक (ज्वरतीर्थ विनायक), श्री संतन विनायक, श्री सौंदर्यनायकींसमवेत श्री मारुगल उदयार.
श्री विषम-तीर्थ-विनायकांच्या दोन बाजूला श्री गणेशाच्या मूर्ती आहेत. असा समज आहे की सिरूथोंडर नायनार ह्यांचा पुत्र सिरलन ह्याने ह्या मूर्तींची पूजा केली.
वरच्या भागात प्रवेशद्वाराच्या डाव्याबाजूला भात साठविण्यासाठी धान्याचे कोठार आहे. (तामिळ मध्ये ह्याला नेल कळंजूयं असं म्हणतात).
प्रार्थना:
१. भाविक जन इथे विवाहातल्या अडचणी दूर होण्यासाठी तसेच अपत्य प्राप्तीसाठी प्रार्थना करतात.
२. भाविक जन ज्वर बरा होण्यासाठी तसेच इतर आरोग्याच्या समस्यांसाठी ज्वरतीर्थ विनायकांची पूजा करतात.
३. भाविक जन इथे परिस्थितीमुळे किंवा गैरसमजुतीमुळे विभक्त झालेल्या दाम्पत्यांचे पुनर्मीलन होण्यासाठी श्री लक्ष्मी देवी आणि भगवान शिवांची पूजा करतात.
पूजा:
कामीग आगमानुसार नियमित पूजा केल्या जातात तसेच प्रदोष पूजा, दिवाळीत विशेष पूजा आणि पोंगल, इंग्लिश नववर्ष आणि तामिळ नववर्ष दिनी पूजा केल्या जातात.
मंदिरात साजरे होणारे सण:
चित्राई (एप्रिल-मे): १० दिवसांचा ब्रह्मोत्सव
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): वरलक्ष्मी व्रत, गणेश चतुर्थी
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई
थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकर संक्रांति, पुष्य नक्षत्र दिवशी उत्सव
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
मंदिराच्या वेळा: सकाळी ७ ते दुपारी १२.३०, दुपारी ४.३० ते रात्री ८.३०
मंदिराचा पत्ता:
थिरुमारुगल येथील श्री रत्नगिरीश्वरर मंदिर,
तालुका आणि जिल्हा नागपट्टीनं,
तामिळ नाडू ६०९७०२
मंदिराच्या पुजाऱ्याचा संपर्क: सुंदर गणपती गुरुक्कल - +९१-९७८६१९२१९६
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment