Sunday, January 25, 2026

अंबर येथील श्री ब्रह्मपुरीश्वरर मंदिर

हे मंदिर तामिळनाडू राज्यातल्या नागपट्टीनं जिल्ह्यातील अंबर (अंबल) ह्या गावात वसले आहे. पुंथोट्टम-कारैक्कल मार्गावर पुंथोट्टम पासून ५ किलोमीटर्स वर, कुथनूर पासून ५ किलोमीटर्स वर आणि पेरलम पासून ९ किलोमीटर्स वर तर कुंभकोणम पासून ४० किलोमीटर्स वर आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. शैव संत संबंधर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. शैव संत अप्पर ह्यांच्या रचनांमध्ये पण ह्या मंदिराची स्तुती आढळते. शैव संत अरुणागिरिनाथर ह्यांनी ह्या मंदिरातील श्री मुरुगन ह्यांची स्तुती गायली आहे. म्हणून हे मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. अंबर ह्या गावाचा उल्लेख संगम काळातील साहित्यामध्ये आढळतो. असा समज आहे की चोळा साम्राज्याच्या राजांनी ३ऱ्या शतकामध्ये हे मंदिर खडक (ग्रॅनाईट) वापरून बांधलं. कोचेंगट चोळा राजाने बांधलेल्या माड कोविल मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. चोळा साम्राज्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला. पुढे ह्या मंदिराचा विस्तार पांड्या, विजयनगर आणि मराठा राजांनी केला. ह्या मंदिरामध्ये चार शिलालेख आहेत पण ते विस्कळीत अवस्थेत आहेत.

मूलवर: श्री ब्रह्मपुरीश्वरर, श्री अंबरीसर, श्री महापुरीश्वरर 
देवी: श्री सुगंधाकुंडलांबिका, श्री पुंगकुळलांबिका, श्री वंदमारकुळली
पवित्र तीर्थ: ब्रह्मतीर्थ, इंद्रतीर्थ, शूलतीर्थ, अन्नमम पोईगली
पवित्र वृक्ष: पुन्नाग वृक्ष
पुराणिक नाव: अंबर पेरूनकोविल, ब्रह्मपुरी, मकालीपूरम, पुन्नागवनम, नंदराजापूरम, शेनबागवनम
वर्तमान नाव: अंबर, अंबल

क्षेत्र पुराण:
१.  आधीच्या एका ब्लॉगमध्ये श्री विष्णू आणि श्री ब्रह्मदेव कसे भगवान शिवांचे शीर्ष आणि तळ शोधण्यासाठी गेले पण ते शोधू शकले नाहीत ह्याबद्दल माहिती दिली होती. त्यावेळी ब्रह्मदेव खोटंच बोलले कि ते शीर्ष शोधण्यामध्ये यशस्वी झाले. भगवान शिवांनी ब्रह्मदेवांना शाप दिला कि ते पांढरा हंस बनतील आणि पृथ्वीवर त्यांची कोणीही पूजा करणार नाही. जेव्हा ब्रह्मदेवांनी भगवान शिवांना ह्या शापापासून मुक्ती व्हावी म्हणून विनंती केली त्यावेळी भगवान शिवांनी त्यांना इथे येऊन तपश्चर्या करण्याची आज्ञा केली. त्या आज्ञेनुसार ब्रह्मदेव इथे आले आणि त्यांनी इथे जमीन खणून एक तीर्थ तयार केलं आणि तपश्चर्या केली. बऱ्याच वर्षानंतर भगवान शिवांनी त्यांना दर्शन दिलं आणि शापापासून मुक्त केलं तसेच त्यांना सृष्टीनिर्माण सुरु करण्याची आज्ञा पण दिली.

२. पुराणानुसार दुर्वास ऋषींना मधलोला ह्या स्वर्गीय अप्सरेकडून दोन पुत्र प्राप्त झाले होते - अंबन आणि अंबरसुराल. ह्या पुत्रांनी भगवान शिवांची प्रखर तपश्चर्या केली आणि वरदाने मिळविली. ह्या वरदानांमुळे ते देव, ऋषी आणि इतरांना त्रास देऊ लागले. जेव्हां देव, ऋषी आणि इतर जन भगवान शिवांकडे मदतीसाठी गेले तेव्हां भगवान शिवांनी त्यांना श्री पार्वती देवींकडे पाठवलं. पार्वती देवींनी कालीदेवींकडे कटाक्ष टाकला. कालीदेवींनी एका सुंदर तरुण मुलीचं रूप धारण केलं. कालीदेवी इथे आल्या आणि त्यांच्याबरोबर भगवान विष्णू एका म्हाताऱ्या माणसाचं रूप घेऊन आले. जेव्हां दुर्वास ऋषींच्या पुत्रांनी ह्या तरुण मुलीला पाहिलं ते तिच्या प्रेमात पडले आणि तिला प्राप्त करण्यासाठी दोघांमध्ये भांडण चालू झाले. ह्या भांडणांमध्ये ज्येष्ठ पुत्र मरण पावला आणि नंतर कालीदेवींनी कनिष्ठ पुत्राला म्हणजेच अंबनला पण मारून टाकले. जिथे तिने अंबनला मारले त्या जागेला अंबकरथुर असे नाव प्राप्त झाले. अंबनला मारल्यामुळे कालीदेवींना ब्रह्महत्येचा दोष जडला. ह्या दोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी कालीदेवींनी इथल्या पवित्र तीर्थाजवळ एक शिव लिंग निर्माण करून त्याची बिल्व पत्रांनी पूजा केली. त्यांच्या हाताची चिन्हे अजूनही लिंगावर पाहावयास मिळतात. कालीदेवींनी इथे असुरांचा संहार केला आणि भगवान शिवांची पूजा केली म्हणून ह्या स्थळाला अंबरमक्कलम असं म्हणतात. भगवान विष्णूंचा पण असुरांचा संहार करण्यामध्ये महत्वाचा वाटा होता. ह्या मंदिराच्या जवळ भगवान विष्णूंचे एक छोटं मंदिर आहे जिथे त्यांना वेट्रीरुंध पेरुमल असे नाव आहे. ह्या मंदिरामधे कालीदेवींचीपण मूर्ती आहे.

३. स्थळ पुराणानुसार पुलस्ती ऋषींचा वंशज इथे वास्तव्य करून होता. तो असुर होता आणि त्याचे नाव संहारशील असे होते. ब्रह्मदेवांची तपश्चर्या करून त्याने ब्रह्मदेवांकडून प्रचंड शक्ती प्राप्त केली होती. संहारशीलने इंद्रदेव आणि इतर देवांचा पराभव केला. संहारशीलच्या अत्याचारापासून रक्षण करण्यासाठी इंद्रदेव आणि इतर देव ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवांनी त्यांना पुन्नागवनामध्ये येऊन भगवान शिवांची उपासना करण्याचा सल्ला दिला. इंद्रदेव आणि इतर देव इथे आले आणि त्यांनी भगवान शिवांची उपासना केली. संहारशील पण इथे आला. भगवान शिवांनी कालभैरवांना संहारशीलला मारून इंद्रदेव आणि इतर देवांची रक्षा करण्याची आज्ञा केली. इंद्रदेवांनी इथे भगवान शिवांची उपासना केली म्हणून ह्या स्थळाला इंद्रपुरी असे नाव प्राप्त झाले.

४. अजून एका स्थळपुराणानुसार सोमसी मर नायनार हे ७व्या शतकातील सुंदरर ह्या नायनमारांचे समकालीन होते. ६३ नायनमारांमधले हे ३३व्वे नायनमार होते. ते जातीने ब्राह्मण होते. अंबर मधल्या मंदिराचे ते पुरोहित होते. ते भगवान शिवांचे कट्टर भक्त होते. ते सोमयज्ञ करायचे. म्हणून त्यांना सोमसी असे म्हणत. ते सर्व भक्तगणांची भेदभाव न करता सेवा करत. ते थिरुवारुरला गेले आणि तिथे ते सुंदरर नायनमारांचे भक्त बनले. एकदा त्यांना भगवान शिवांच्या आदराप्रीत्यर्थ सोमयज्ञ करण्याची इच्छा झाली. भगवान शिवांनी स्वतः येऊन यज्ञाचे हवीस स्वीकारावे अशी त्यांची इच्छा होती. त्यावेळी सुंदरर तीर्थयात्रेवर निघाले होते आणि मार्गामध्ये त्यांनी अंबर इथे वास्तव्य केलं होतं. सोमसी नायनार ह्यांना कळलं कि सुंदरर हे सर्दी आणि खोकल्याने पीडित आहेत. त्यांनी सुंदरर ह्यांना थूडूवलर ह्या वनस्पतीपासून बनवलेले औषध दररोज द्यायला सुरुवात केली. जेव्हां सुंदरर पूर्ववत झाले तेव्हा ते सोमसी नायनार ह्यांचे आभार मानण्यासाठी आले. त्यावेळी सुंदरर ह्यांना सोमसी नायनार ह्यांच्या सोमयज्ञाबद्दल समजले तसेच भगवान शिवांनी स्वतः येऊन यज्ञाचे हवीस स्वीकारावे ह्या सोमसी नायनार ह्यांच्या इच्छेबद्दलपण समजले. सुंदरर ह्यांनी भगवान शिवांना विनंती केली की त्यांनी वैकासि ह्या तामिळ महिन्यातील आश्लेषा ह्या नक्षत्र दिवशी यज्ञामध्ये येऊन दर्शन द्यावे. सुंदरर ह्यांनी केलेल्या विनंतीची बातमी वणव्यासारखी पसरली आणि विविध ठिकाणाहून सर्व ऋषी, मुनी आणि संत ह्या यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी अंबर येथे आले. भगवान शिव, पार्वती देवी, श्री विनायक आणि श्री मुरुगन हे पारधी कुटुंबाच्या रूपांत तेथे आले. त्यांच्याबरोबर चार वेद चार श्वानांच्या रूपांत आले. भगवान शिवांच्या खांद्यावर एक मृत वासरू होते. त्या काळी पारधी हे समाजातून बहिष्कृत मानले जायचे. पारधी कुटुंबाला पाहून तिथे जमलेले विद्वान आणि ऋषी ह्यांना यज्ञ साजरा करण्यामधे घोडचूक झाली आहे असे मानून निघून गेले. पण सोमसी नायनार ह्यांनी पारधी कुटुंबाचं स्वागत केलं आणि पारधी कुटुंबाने पण त्यांचं आदरातिथ्य आनंदाने स्वीकारलं. ह्या घटनेच्या स्मृत्यर्थ इथे एक श्री विनायकांचं देवालय आहे जिथे श्री विनायकांना अच्चू तीर्थ विनायक असे संबोधले जाते. इथे त्यांचे शिर हत्तीचे नसून मानवी आहे. यज्ञाचे हवीस स्वीकारल्यावर पारधी कुटुंबाने आपल्या मूळ रूपांत दर्शन दिलं. इथे एक छोटा मंडप आहे जिथे हा सोमयज्ञ साकार झाला असा समज आहे. हा यज्ञकुंड अंबरमक्कलम आणि अंबरपेरूनथिरुकोविल ह्या स्थळांच्या मध्यभागी आहे.

५. अजून एका स्थळपुराणानुसार विमलन नावाचा ब्राह्मण त्याच्या पत्नीसोबत काशी यात्रेला निघाला होता. यात्रेच्या मार्गावर ते अंबर येथे आले आणि इथे बरीच वर्षे राहिले. त्यांनी भगवान शिव आणि पार्वती देवींची अत्यंत भक्तिभावाने उपासना केली. भगवान शिवांनी त्यांना बरीच वरदाने प्रदान केली. असा समज आहे की भगवान शिवांनी त्यांच्यासाठी इथल्या तीर्थामध्ये गंगेचं पाणी आणलं. त्यांनी ह्या तीर्थामध्ये स्नान केलं आणि त्यांना माधवन नावाच्या पुत्राची प्राप्ती झाली. विमलन आणि त्यांच्या पत्नीला इथे मोक्षप्राप्ती झाली. 

६. पुराणानुसार एकदा स्वर्गीय अप्सरांनी विश्वामित्र ऋषींच्या तपश्चर्येमध्ये व्यत्यय आणला. ह्यामुळे विश्वामित्रांच्या मनात प्रणयभाव निर्माण झाला आणि ह्याला मन्मदांचे (कामदेव) कामबाण जबाबदार आहेत असे मानून त्यांनी मन्मदांना शाप दिला कि ह्यापुढे त्यांचे कामबाण निष्फळ होतील. ह्या शापापासून मुक्ती मिळविण्यासाठी मन्मद ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवांनी त्यांना इथे येऊन भगवान शिवांची उपासना करण्याचा सल्ला दिला. ह्या सल्ल्यानुसार मन्मदांनी इथे येऊन भगवान शिवांची उपासना केली आणि त्यांना शापातून मुक्ती मिळाली.

७. स्थळपुराणानुसार पिंगलक्कन नावाचे ऋषी वनामध्ये व्याघ्राजिन परिधान करून तपश्चर्या करत होते. कामभोज राज्याचा राजा नंदन हा इथे शिकारीला आला होता. राजाला दृष्टिभूल होऊन त्याने ऋषींना व्याघ्र मानलं आणि बाण मारून त्यांची हत्या केली. त्यामुळे राजाला ब्रह्महत्येचा दोष जडला. राजाने बऱ्याच मंदिरांना भेट दिली पण त्याचा दोष काही गेला नाही. जेव्हा तो अंबर गावाच्या वेशीवर आला तेव्हा त्याचा दोष वेशीवरच राहिला. ऋषींनी राजाला इथे ब्रह्मदेवांची उपासना करण्याचा सल्ला दिला. ह्या सल्ल्यानुसार ब्रह्मदेवांची उपासना करून राजाची ब्रह्महत्येच्या दोषातून मुक्ती झाली.

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री ब्रह्मदेव, श्री इंद्रदेव, व्यास ऋषी, दुर्वास ऋषी, नंदन राजा, मन्मद, सप्तऋषी, विमलन, कालीदेवी आणि इतर देव. 

वैशिष्ट्ये:
१. भगवान शिवांच्या मागे सोमस्कंद मूर्ती हे दृश्य खूप दुर्मिळ आहे.
२. सोमसी मर नायनार ह्या नायनमारांचे हे जन्मस्थान आहे. त्यांना भगवान शिव, पार्वती देवी आणि श्री विनायकांचे दिव्य दर्शन प्राप्त झाले.
३. हे मंदिर माड शैलीच्या मंदिरांसारखे आहे.
४. ह्या मंदिरामध्ये श्री विनायकांच्या तीन मूर्ती आहेत.
५. येथील नटराज सभेमध्ये श्री नटराजांच्या तीन मूर्ती आहेत.
६. भगवान शिवांची उत्सव मूर्ती नंदीच्या बाजूला उभ्या मुद्रेमध्ये आहे. ह्या मूर्तीमध्ये ते ब्रह्मदेवांना दर्शन देत आहेत असं चित्रित केले आहे. हे दृश्य खूप दुर्मिळ आणि अलौकिक आहे.

मंदिराबद्दल माहिती:
हे मंदिर पूर्वाभिमुख असून इथे तीन स्तरांचे राजगोपुर आहे आणि भिंतींनी आच्छादलेल्या दोन परिक्रमा आहेत. मंदिरामध्ये गाभारा, अर्धमंडप आणि महामंडप आहे. राजगोपुराच्या पुढे ध्वजस्तंभ, बलीपीठ, एक दगडी नंदी आणि एक नंदींचे गाभाऱ्याकडे मुख करून असलेले स्टुक्कोचे चित्र आहे. हे माडकोविल असल्याकारणाने इथे दक्षिण दिशेला गाभाऱ्याकडे जाण्यासाठी १२ पायऱ्या आहेत. इथले गाभाऱ्यातील शिवलिंग स्वयंभू आहे. शिवलिंगाच्या पाठीमागे श्री सोमस्कंदांचे शिल्प आहे. 

कोष्ठ मूर्ती: श्री दक्षिणामूर्ती, भगवान विष्णू, श्री ब्रह्मदेव आणि श्री दुर्गादेवी. श्रीदक्षिणामूर्ती सोडून बाकीच्या मूर्ती गाभाऱ्याच्या खालच्या पातळीवर आहेत. श्री चंडिकेश्वरांची मूर्ती त्यांच्या नेहमीच्या जागी आहे. 

गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला श्री सोमस्कंदांचे देवालय आहे. नवग्रह देवालय खालच्या पातळीवर आहे. नटराज सभा महामंडपाच्या उजव्या बाजूला आहे. 

परिक्रमेतील मूर्ती आणि देवालये: श्री विनायकांच्या तीन मूर्ती, श्री पडिक्कासु विनायकर, कोचेंगट चोळा राजा, श्री सरस्वती देवी, शैव संत संबंधर आणि अप्पर, सुशीलांबल, श्री स्थळ विनायकर, श्री सुब्रह्मण्य, श्री अय्यप्पा, श्री महालक्ष्मी, श्री जम्बुकेश्वरर, श्री सूर्य, सोमसी मर नायनार आणि श्री पुन्नागवननाथर. 

श्री अंबिका देवींचे एक स्वतंत्र दक्षिणाभिमुखी देवालय आहे. हे देवालय गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला जमिनीच्या पातळीवर आहे. अंबिका देवींच्या देवालयाच्या बाजूला श्री आदिपुरमअम्मन ह्यांचे देवालय आहे. 

राजगोपुराच्या बाजूला अन्नमपोयीगै हे पवित्र तीर्थ आहे. 

उत्सव मूर्ती: १) भगवान शिवांची नंदीसमवेत मूर्ती. ही मूर्ती त्यांनी श्री ब्रह्मदेवांना दर्शन दिलं त्यावेळची आहे. २) श्री ब्रह्मदेव ३) शैव संत नालवर

प्रार्थना:
१) भाविक जन विविध वरदाने प्राप्त करण्यासाठी श्री पार्वती देवींची पूजा करतात.
२) विवाहातल्या अडचणी दूर होण्यासाठी भाविक जन इथे भगवान शिवांची सलग पांच आठवडे पूजा करतात.

पूजा:
दैनंदिन पूजा, साप्ताहिक पूजा, प्रदोष पूजा

मंदिरात साजरे होणारे सण:
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री, मासीमाघम (माघ नक्षत्रावर उत्सव)
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथिरै
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक
वैकासि (मे-जून): आश्लेषा नक्षत्र दिवशी विशेष यज्ञ केला जातो. ह्या दिवशी त्यागराज मंदिरामध्ये दुपारी कुठलीही पूजा केली जात नाही.

मंदिराच्या वेळा: सकाळी ७ ते ११, दुपारी ४.३० ते ८.३०

मंदिराचा पत्ता
श्री ब्रह्मपुरीश्वरर मंदिर,
ऍट पोस्ट: अंबल,
पुंथोट्टम मार्गे, 
जिल्हा आणि तालुका: नागपट्टीनं,
तामिळ नाडू ६०९५०३

संपर्क: +९१-४३६६२३८९७३

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment