हे मंदिर थिरुवैयारूपासून ५ किलोमीटर्स वर, कंडीयुर पासून ३ किलोमीटर्स वर आहे. कंडीयुर हे गाव तंजावूर पासून १६ किलोमीटर्स वर तंजावूर-थिरुवैयारू मार्गावर आहे.
नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ पाडळ पेथ्र स्थळांपकी पण हे एक मंदिर आहे. श्री अप्पर आणि श्री संबंधर ह्या नायनमारांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. त्यामुळे हे मंदिर सातव्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावे. चोळा साम्राज्याच्या आदित्य चोळा I ह्या राजाच्या कारकिर्दीमध्ये ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. ह्या मंदिरातील शिलालेखांमध्ये चोळा राजांनी दिलेल्या देणग्यांचा उल्लेख आढळतो.
थिरूवैयारू प्रदेशातल्या सप्त स्थानांमधील हे चौथं मंदिर आहे. तसेच हे मंदिर नंदिदेवांच्या विवाह सोहळ्याशी पण निगडित आहे. ह्या स्थळामधून भगवान शिवांनी नंदिदेवांच्या विवाहासाठी पुरोहितांची सोय केली होती.
मूलवर: श्री वेदपुरीश्वरर, श्री वळैमाडूनाथर (तामिळ मधे वळै म्हणजे केळ्याचे झाड आणि माडू म्हणजे तलाव)
देवी: श्री मंगैयारअरासी
क्षेत्र वृक्ष: बिल्व
पवित्र तीर्थ: वेद तीर्थ
वर्तमान आणि पुराणिक नाव: थिरुवेदीकुडी
जिल्हा: तंजावूर, तामिळनाडू
क्षेत्र पुराण:
१. प्रणव मंत्र ॐ हा वेदांचा शिरोमणी मानला जातो. म्हणून असा समज आहे की वेद प्रणव मंत्राचं अनुसरण करतात. प्रणव मंत्राने इथे भगवान शिवांची उपासना केली म्हणून वेदांनी पण त्याला अनुसरून इथे भगवान शिवांची उपासना केली. असा समज आहे की भगवान शिवांनी नंदिदेवांच्या विवाहासाठी येथून पुरोहित जमवले.
२. पंगूनी (मार्च-एप्रिल) ह्या तामिळ महिन्याच्या १३व्या, १४व्या आणि १५व्या दिवशी येथील शिव लिंगावर सूर्याची किरणे पडतात. म्हणून असा समज आहे की ह्या दिवशी सूर्य भगवान शिवांची उपासना करतात.
३. एका असुराने श्री ब्रम्हदेवांकडून वेद चोरून ते खोल समुद्रामध्ये नेऊन ठेवले. भगवान विष्णूंनी असुराचा वध करून वेद परत श्री ब्रम्हदेवांकडे सुपूर्त केले. वेद काही दिवस असुराकडे राहिले म्हणून त्यांना दोष प्राप्त झाले. त्या दोषांचं निवारण करण्यासाठी त्यांनी इथे भगवान शिवांची उपासना केली. म्हणून भगवान शिवांना इथे श्री वेदपुरीश्वरर असे नाव प्राप्त झाले.
४. एक चोळा राजा आपल्या पुत्रीचा विवाह ठरत नाही म्हणून चिंताग्रस्त होता. त्याने इथे येऊन श्री मंगैयारअरासी म्हणजेच श्री पार्वती देवींची उपासना केली आणि त्याच्या प्रभावाने लवकरच त्याच्या पुत्रीचा विवाह पार पडला. म्हणून त्याने आपल्या पुत्रीचे नाव बदलून मंगैयारअरासी असे ठेवले.
मंदिरात ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री सूर्य, श्री इंद्र, श्री ब्रम्हदेव, चार वेद, व्यास मुनी तसेच शैव संत अप्पर आणि सुंदरर.
वैशिष्ट्ये:
१. ह्या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे २७६ पाडळ पेथ्र स्थळांमधील प्रत्येक मंदिराचे प्रतीक म्हणून इथे २७६ शिव लिंगे आहेत. त्यामुळे ह्या मंदिराचे दर्शन घेतल्याने सर्व पाडळ पेथ्र स्थळांचे दर्शन घेतल्याची फळे प्राप्त होतात.
२. इथले शिव लिंग केळ्याच्या तलावामध्ये सापडले.
३. येथील श्री दक्षिणामूर्तींची मूर्ती खूप सुंदर आहे. असा समज आहे की श्री ब्रम्हदेवांनी ह्या मूर्तीची पूजा केली होती.
४. विवाह ठरण्यामध्ये विलंब येत असेल तर त्यासाठी हे परिहार स्थळ आहे.
५. येथील अर्धनारीश्वरर मूर्तीचे वैशिष्ट्य असे आहे की सहसा श्री पार्वती देवी भगवान शिवांच्या डाव्या बाजूला असतात. पण ह्या मूर्तीमध्ये त्या उजव्याबाजूला आहेत. पण ही मूर्ती विस्कळीत अवस्थेत आहे.
६. गाभाऱ्याचे विमान ग्रॅनाईटचे आहे.
७. पंगूनी (मार्च-एप्रिल) ह्या तामिळ महिन्याच्या १३व्या, १४व्या आणि १५व्या दिवशी येथील शिव लिंगावर पडतात.
८. चारी वेद जाणणारे बरेच विद्वान इथे वास्तव्य करून राहिले म्हणून ह्या स्थळाला चतुर्वेद-मंगलम असे नाव प्राप्त झाले.
९. गाभाऱ्याचा आकार अर्धवर्तुळाकार खंदकासारखा आहे.
१०. इथे श्री ब्रम्हदेवांनी भगवान शिवांची उपासना केली म्हणून ह्या स्थळाला वेदीकुडी असे नाव प्राप्त झाले आणि भगवान शिवांना श्री वेदपुरीश्वरर असे नाव प्राप्त झाले.
११. श्री आंजनेय इथे पूजा करत आहेत अशा मुद्रे मध्ये आहेत आणि त्यांच्या माथ्यावर मुकुट नाही.
मंदिराबद्दल माहिती:
गाभाऱ्यामध्ये गाभारा, अंतराळ आणि अर्थमंडप आहे. हे पूर्ण मंदिर, म्हणजेच गाभाऱ्यापासून ते शिखरापर्यंतचे मंदिर हे दगडांनी बांधलं आहे. हे मंदिर जमिनीच्या पातळीच्या काही फूट खाली आहे. हे पूर्वाभिमुख मंदिर असून त्याला तीन स्तरांचं राजगोपुर तसेच दोन परिक्रमा आहेत. राजगोपुराच्या समोर बलीपीठ, नंदी आणि ध्वजस्तंभ आहेत.
येथील शिव लिंग स्वयंभू आहे. केळ्याच्या पानांच्या तलावाच्या मुळातून, ज्याला तामिळ मध्ये माडू म्हणतात, त्यातून भगवान शिव प्रकट झाले आणि म्हणून भगवान शिवांना इथे श्री वळै-माडू-नाथर असे नाव आहे. येथील गाभारा अर्धवर्तुळाकार आकारामध्ये आहे (तामिळ मध्ये अगळी). गाभाऱ्यावरील गोपुर हे ग्रॅनाईटचे बनले आहे आणि त्याखाली भगवान बसले आहेत. विमानाच्या चारी बाजूंना चार वेदांचे प्रतीक म्हणून चार नंदि आहेत. पंगूनी ह्या तामीळ महिन्याच्या १३व्या, १४व्या आणि १५व्या दिवशी सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात.
कोष्ठामध्ये श्री विनायकर, श्री दक्षिणामूर्ती, श्री अर्धनारीश्वरर, श्री ब्रम्हदेव आणि श्री दुर्गादेवी ह्यांच्या मूर्ती आहेत. श्री चंडिकेश्वरर ह्यांचे देवालय नेहमीच्या जागी आहे.
मूर्ती आणि देवालये:
प्रकाराध्ये श्री शेवीसैथविनायकर (तामिळमध्ये शेवी म्हणजे कान आणि सैथ म्हणजे वाकलेला) ह्यांच्या मूर्ती आहेत. श्री विनायकांचे शिर थोडे झुकले आहे हे दर्शविण्यासाठी की श्री विनायकर वेद ऐकत आहेत. म्हणून श्री विनायकांना इथे श्री वेदविनायकर असे म्हणतात आणि त्यांचे स्वतंत्र देवालय आहे.
परिक्रमेमध्ये १०८ शिव लिंगे आहेत तसेच श्री सुब्रमण्य, श्री दक्षिणामूर्ती, श्री अर्धनारीश्वरर, श्री दुर्गा देवी, श्री महालक्ष्मी देवी, श्री नटराज ह्यांच्या मूर्ती आणि सप्त स्थानांची लिंगे आहे.
येथील शिलालेखामध्ये भगवान शिवांची श्री थिरुवेदीकुडीमहादेवर आणि श्री पराकेसरी-चतुर्वेद-मंगलम-महादेवर अशी नावे उल्लेखिली आहेत. ह्या मंदिराचा जीर्णोद्धार पल्लव राजांनी केला. ह्या ठिकाणी चारी वेद जाणणारे ब्राह्मण होते म्हणून ह्या स्थळाला चतुर्वेद-मंगलम असे पण नाव आहे. येथील शिव लिंग वळै नावाच्या विशेष जातीचा मासा असलेल्या तलावाच्या काठी सापडले. म्हणून पण भगवान शिवांना इथे श्री वळै-माडू-नाथर असे म्हणतात. श्री पार्वती देवी इथे सगळ्या स्त्रियांच्या राज्ञी म्हणून चित्रित केल्या आहेत आणि ज्या स्त्रिया त्यांची पूजा करतात त्यांना त्या सुहासिनीत्व प्रदान करतात म्हणून त्यांना इथे श्री मंगलांबीका असे म्हणतात.
इथे श्री लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे आणि श्री आंजनेयांची ते श्री लक्ष्मीनारायणांच्या मूर्तीची पूजा करत आहेत अशी मूर्ती आहे.
श्री अर्धनारीश्वरर ह्यांच्या मूर्तीचे वैशिष्ट्य हे आहे कि सहसा श्री पार्वती देवी ह्या भगवान शिवांच्या डावीकडे असतात पण ह्या मूर्तीमध्ये त्या उजवीकडे आहेत. हि रचना स्त्रियांचे महत्व, मुख्यत्वेकरून श्री पार्वती देवींचे, दर्शविण्यासाठी आहे. म्हणून श्री पार्वती देवींचे नाव श्री मंगैयार-आरसी (स्त्रियांची राज्ञी) असे आहे.
इथे श्री ब्रम्हदेव आणि चार वेद ह्यांनी भगवान शिवांची उपासना केली म्हणून ह्या स्थळाचे नाव थिरुवेदीकुडी असे आहे आणि भगवान शिवांचे नाव श्री वेदपुरीश्वरर असे आहे.
श्री ब्रह्मदेवांनी इथे श्री दक्षिणामूर्तींची उपासना केली.
प्रार्थना:
१. भाविक जन इथे विवाहातल्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करतात.
२. वेदाभ्यास करणारे विद्यार्थी इथे वेदांमध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी प्रार्थना करतात.
३. नवरात्रीतील सरस्वतीपूजनाच्या दिवशी तसेच शिक्षण चालू होण्याआधी पालक आपल्या अपत्यांना इथे आणून पूजा करतात.
४. हे मंगळ ग्रहाच्या दोषांचे परिहार स्थळ आहे.
पूजा:
१. दैनंदिन पूजा केल्या जातात.
२. प्रदोष दिवशी प्रदोष पूजा केली जाते.
मंदिरात साजरे होणारे सण:
चित्राई (एप्रिल-मे): सप्त स्थान उत्सव, ब्रम्होत्सव
अवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): गणेश चतुर्थी
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी उत्सव
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्थिकेय दीपम नावांचा दिव्यांचा उत्सव
थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकर संक्रांति
मासी (फेब्रुवारी-मार्च): शिवरात्रि, दैनंदिन पूजा, साप्ताहिक पूजा तसेच पाक्षिक प्रदोष पूजा केल्या जातात, अरुद्र दर्शन
मंदिराच्या वेळा: सकाळी ८ ते दुपारी १२, दुपारी ४.३० ते रात्री ८
पत्ता: श्री वेदपुरीश्वरर मंदिर, थिरुवेदीकुडी,ऍट पोस्ट: कंडीयुर, तालुका: थिरुवैयारू, जिल्हा: तंजावूर, तामिळ नाडू ६१३२०२
दूरध्वनी: +९१-९३४५१०४१८७, +९१-४३६२२६२३२४, ९८४२९७८३०२
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment